कृषीक्षेत्रासाठी सुगीचा काळ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

सध्या अर्थनीती राजकारणाच्या पटावरील एक प्यादे बनले आहे. पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांतील पहिली फेरी गेल्या आठवड्यात पार पडली. राजकीय नेत्यासाठी त्यात इंधन म्हणून ‘राफेल’चे प्रकरण वापरले गेले आहे. राफेलबाबत काय निकष वापरले गेले याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही माहिती मागविल्यावर सरकारने एका बंद लखोट्यात ती न्यायालयाला सादर केली आहे. महाराष्ट्रात अर्थकारणाचाच एक भाग म्हणून आरक्षणाचा मुद्दा मांडला जात आहे. कमी शिकलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुबळ्यांना शिक्षण वा नोकऱ्यात आरक्षण मागितले जात आहे व सर्वोच्च न्यायालयाने जास्तीतजास्त ५० टक्के आरक्षण सगळ्यांना मिळून द्यावे असे स्पष्ट केले असले, तरी महाराष्ट्र ही टक्केवारी ६० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊ इच्छित आहे. 

दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या बाबतीत बॅंकेच्या संबंधात सातवे कलम महत्त्वाचे ठरत आहे. रिझर्व्ह बॅंक स्वायत्त असली, तरी केंद्र सरकारला तिला सूचना देण्याचा अधिकार आहे. याबाबत सरकार ठाम आहे. १९ नोव्हेंबरला त्याबाबतची चर्चा रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार होती. द्वैमासिक धोरण ठरविण्यासाठी नेहमी फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट व डिसेंबर या महिन्यात बैठका होतात. यावेळी ऑक्‍टोबरच्या बैठकीनंतर ही एक बैठक बोलविली गेली होती. त्यात देखरेखीखाली असलेल्या काही राष्ट्रीयकृत बॅंकांचा कारभार नॉनबॅंकिंग कंपन्यांना द्रवता पुरवणे याबाबत निर्णय होणार होते. केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेतील मतभेदामुळे बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल राजीनामा देतील अशी वावडीही उठली होती. बॅंकेची एक बैठक १९ ऑक्‍टोबरला पार पडली होती. त्यात रिझर्व्ह बॅंकेच्या capital framework बद्दलही चर्चा झाली. (रिझर्व्ह बॅंकेकडून केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपये मागितले आहेत अशी भूमिकाही त्यावेळी उठली होती.) १९ नोव्हेंबरला PCA (prompt corrective action) १२ बॅंकांपैकी काही बॅंकांना यादीतून वगळण्याचाही मुद्दा होता. हा लेख लिहिपर्यंत निर्णय कळलेला नव्हता. मध्यम व लघू उद्योगासाठी Breather window (हवेचा झरोका) उघडण्यासाठी त्यात चर्चा झाली. नॉन-बॅंकिंग वित्त कंपन्यांसाठी विशेष सवलत नसावी असा एक प्रवाह बॅंकेच्या संचालकांत आहे. येस बॅंकेचे प्रमुख राणा कपूर यांच्या जागी कोण? याविषयी नेमल्या गेलेल्या समितीच्या अध्यक्षांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्याआधी संचालक मंडळाचे अध्यक्ष अशोक चावला यांनी राजीनामा दिल्यानंतर वरील समितीचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट (स्टेट बॅंकेचे माजी कार्यकारी संचालक) यांनी स्वारस्य भेदाचे (conflict of intergt) कारण सांगून राजीनामा दिला. कपूर यांच्या जागी त्यांचेही नाव चर्चेत असल्याने हा स्वारस्य भेद निर्माण झाला.) मात्र येस बॅंकेचे प्रमुख होण्यासाठी अनेक बॅंकर्स किमान दहाजण रांगेत उभे आहेत. निर्णय ३१ जानेवारी पर्यंत घ्यायची मुदत आहे. रजत मोंगा व प्रणय मंडल हे बॅंकेतील प्रमुख अधिकारीही त्यात असण्याच्या वार्ता आहेत. ॲक्‍सिस बॅंकेचे उप कार्यकारी संचालक तसेच काही विदेशी बॅंकेचे प्रमुखही या स्पर्धेत आहेत.)

येस बॅंकेचा शेअर त्यामुळे निवेशकांच्या नजरेत आहे. १९५ रुपयांवरून तो २१५ रुपयांपर्यंत आहे. बॅंकेची स्थिती उत्तम असल्याने कार्यकारी संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर तो पुन्हा किमान २७० रुपयाचा भाव दाखवेल. तातडीची सुधारणा कृती (pca) खाली असलेल्या ११ बॅंकांची एकत्रित परिस्थिती खाली दिली आहे.

तरतुदी खूप वाढवल्या गेल्या असल्या, तरी सप्टेंबर २०१८ मध्ये त्या कमी आहेत. पुन्हा मार्च २०१९ च्या तिमाहीत तरतुदी वाढवल्या जातील. बॅंकांची जिंदगी आता सुधारत आहे. पण गुंतवणुकीला अजून स्टेट बॅंक ऑफ इंडिया वगळता अन्यत्र लक्ष देता येत नाही. गुंतवणुकीसाठी रब्बी पिकांचा विचार करता कृषी क्षेत्रातील कीटकनाशके, बी-बियाणे यातील काही कंपन्या डोळ्यासमोर आणता येतील. यामध्ये धानुका ॲग्रोटेक व इन्सेक्‍टीसाईडस्‌ इंडिया याबाबतचा विचार करावा. त्याबद्दलची माहिती पुढे दिली आहे.

शुक्रवारी १६ नोव्हेंबरला निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३५४५७ व १०६८२ वर बंद झाले. बाजार स्थिर होता. फलंदाजीला ७ ते ११ क्रमांकाचे खेळाडू येतात. त्याप्रमाणे काही कंपन्यांचे सप्टेंबर २०१८ तिमाहीचे आकडे आता प्रसिद्ध होता आहेत. या महिनाअखेर ही लाट ओसरेल. 

आयशर मोटर्सचा (रॉयल एन्फिल्ड स्कुटर्सची उत्पादक कंपनी) या तिमाहीचा नफा (नक्त) ५४९ कोटी रुपये आहे. तज्ज्ञांचा अंदाज तो ५८० कोटी रुपये होईल असा होता. आयशर मोटर्सच्या उत्पन्नात गेल्या सप्टेंबरपासून ११ टक्के वाढ होऊन ते २४०८ कोटी रुपये झाले आहे. ढोबळ नफा ६.९ टक्के वाढून ७२९ कोटी रुपये झाला आहे. कच्च्या उत्पादन वस्तूंची किंमत सव्वा दहा टक्के वाढून १२०६ कोटी रुपयावर आहे. 

ओएनजीसीचा सप्टेंबर २०१८ तिमाहीचा नक्त नफा क्रूड पेट्रोलच्या किमतीतली वाढ व घसरता रुपया यामुळे ३४.५ टक्के वाढून ८२६५ कोटी रुपये झाला आहे. बाजाराची अपेक्षा कमी होती. तिची या तिमाहीची विक्री २७९८९ कोटी रुपये आहे. ढोबळ नफा ५६ टक्के वाढला. नक्त नफा उत्खनन खर्च वजा करून १५७८९ कोटी रुपये आहे. अन्य उत्पन्न पूर्वीपेक्षा चार पट होऊन २३९४ कोटी रुपये झाले आहे. अनुदानाचा बोजा या तिमाहीत कंपनीवर नसल्यानेच नफा जास्त दिसतो. ओएनजीसीचा शेअर नोव्हेंबरला १५७ रुपयाला उपलब्ध होता. या भावाला किं/उ. गुणोत्तर ९.१ पट दिसते. रोज ७५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. गेल्या बारा महिन्यातील कमाल व किमान भाव अनुक्रमे २१२ रुपये व १४४ रुपये होते. कंपनीने पोर्ट ट्रस्टचे १७५ कोटी रुपयाचे देणे (व्हॉर्फेज कमिशन) २०१५ सालापासून थकविले आहे. दोन तेलवाहिका (ऑइल पाइप्स) पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतून जातात. त्याठीचा हा आकार (charge) आहे.

बिर्ला समुहातल्या विंध्या टेलिलिंक्‍सचा बाजारभाव आता १९१८ रुपयावर पोचला आहे. कारण कंपनीचा या तिमाहीचा नफा ५५.७० कोटी रुपये झाला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत नक्त नफा २१४ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीची विक्री २९३.८ कोटी रुपये होती. ती यावेळी ५६६ कोटी रुपयांवर गेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीसाठी तिने ८९ कोटी रुपयाचा नफा दाखवला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर सहामाहीसाठी हा नफा ४०.१० 
कोटी रुपये होता. चार महिन्यापूर्वी या शेअरचा भाव ९११ रुपये होता. तो आता दुप्पट झाला आहे. ऑप्टिक फायबर 
केबल्स आणि इंजिनिअरिंग प्रोक्‍युअरमेंट 
अँड कन्स्ट्रक्‍शन असे तिचे दोन व्यवसाय आहेत. कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवीत आहे. शेअरच्या सध्याच्या १७१६ रुपये भावाला किं/उ गुणोत्तर फक्त १३.२६ पट आहे. 

गुंतवणुकीला सध्या कृषिक्षेत्रातल्या कीटकनाशक कंपन्या व अन्य कृषी उत्पादनासाठी चांगले दिवस आहेत. इनसेक्‍टीसाईडसने यंदा बाजारात खूप नवी उत्पादने आणली आहेत. सध्या या शेअरचा भाव ५४० रुपये आहे. वर्षभरात तो ९०० रुपयावर जावा. गेल्या बारा महिन्यातील या शेअरचा कमाल व किमान भाव ९३४ रुपये व ३७० रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७ पट आहे. कंपनीचे मार्च २०१८ वर्षाचे प्रत्यक्ष व २०१९ ते २०२१ मार्च या तीन वर्षाचे संभाव्य आकडे पुढे दिले आहेत.
कोटी रुपयात                  मार्च २०१८    मार्च २०१९    मार्च २०२०    मार्च २०२१    वाढ टक्के
विक्री                             १०७३           ११८०           १२९०          १४००            ३० टक्के
ढोबळ नफा                     १४८             १५९             १८५            २००             ३३ टक्के
शेअरवर उपार्जन (रुपये)    ४०.६            ४५.०            ५४.०            ५९.०           ४८ टक्के
किं/उ गुणोत्तर                ११.७            १०.५            ८.८              ८.०             ४० टक्के
नक्त नफा                      ८४               ९३               ११०             १२२            ५० टक्के

सप्टेंबर २०१८ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री ४५८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षी ही विक्री ४१६.५ कोटी रुपये होती. ढोबळ नफा ६९ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीत ढोबळ नफा ५५.६ कोटी रुपये होता. त्यात यावेळी २४ टक्के वाढ दिसते. 

ॲग्रो केमिकल्समध्ये या कंपनीबरोबरच रॅलीज इंडिया, धानुका ॲग्रोटेक, पी आय इंडस्ट्रीज व यू पी एल यांची नावे घेता येतील. इन्सेक्‍टीसाईडस्‌ आणि धानुका ॲग्रोटेक सध्या घेतल्यास किमान ९० टक्के नफा होऊ शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून आपल्या जोखमीवरच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. 
 

संबंधित बातम्या