रेपो दर स्थिरावणार?
अर्थनीती ः शेअर बाजार
डिसेंबर महिना हा आंतरराष्ट्रीयदृष्ट्या व भारतातही महत्त्वपूर्ण घडामोडींचा असणार आहे. डिसेंबर ११ ला पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पाठोपाठ संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होणार आहे. राजस्थान व मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली, तर राजकीय स्थैर्य कायम राहील. एक फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पही सादर होईल. त्यात प्राप्तिकर व कॉर्पोरेट करात काही सवलती याव्यात. वस्तूसेवाकराची वसुली तशी समाधानकारक नसली, तरी त्यामुळे वित्तीय तुटीवर परिणाम होणार नाही.
जागतिक स्थैर्यही आता वाढण्याची लक्षणे आहेत. ओपेक (पेट्रोल उत्पादक देश) राष्ट्रांनी पेट्रोलचे उत्पादन न घटवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे क्रूड पेट्रोल आहे त्याच पातळीवर राहील. क्रूड जर बॅरलला ८० डॉलरच्या आत राहिले तर भारताला फारसा फटका बसणार नाही. ६-७ डिसेंबरला ओपेक राष्ट्रे पेट्रोल उत्पादन कमी न करण्याचा निर्णय घेणार आहेत.
चीन व अमेरिकेतील शीत व्यापारयुद्ध थंडावणार आहे. भारत-चीन यांनीही आपली करविषयक नीती सोपी करून एकमेकांची आयात वाढवायचे ठरवले आहे. २०० अब्ज डॉलर्सच्या वस्तूवरील आयातकर दहा टक्के राहील व उरलेल्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर असेल. भारतानेही असे द्विराष्ट्र करार करून व्यापार वाढवायला हवा.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जी-२० राष्ट्रांची ब्युनॉस एअर्स अर्जेंटिना इथे बैठक झाली. त्यात वाढीव आयातशुल्क न लावायचा निर्णय घेण्यात आला. चीन कृषी, ऊर्जा व उद्योगात अमेरिकेकडून जास्त वस्तू घेईल. ट्रम्प व जिन पिंग यांनी सायबरचौर्य, घुसखोरी, बौद्धिक संरक्षण, तंत्रज्ञान याबाबत तातडीने चर्चा करण्याचे मान्य केले आहे. जगातल्या अर्थव्यवस्थेत आपले क्रमांक एक व दोन टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांची धडपड चालू आहे. तिकडे युरोपात ग्रेट ब्रिटनमध्ये ‘ब्रेक्झिट’ वरून पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत.
भारतात आसाममध्ये ‘बोडोलॅंड’ निर्मितीसाठी पुन्हा आंदोलन पेटले आहे. सध्या तिथे भारतीय जनता पक्ष व बोडोलॅंड पीपल्स फ्रंट युतीचे सरकार आहे. या युतीत नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड व अखिल बोडो विद्यार्थी बघता भारतालाही काही वर्षात लोक युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया (U.S.) असे संबोधायला लागतील. आणि असे होऊ नये यासाठी सर्व पक्षानी ठाम राहायला हवे.
तेलंगणाच्या ११९ जागांसाठी (विधानसभेच्या) रणधुमाळी चालू होती. काँग्रेसने मशिदी व चर्चेसना मोफत वीज पुरवण्याचे आमिष दाखवून अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे. ओवेसी यांच्या भीतीमुळे चंद्रशेखर यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामदिन साजरा करण्याचेही तहकूब केले होते. (आता इतक्या वर्षांनंतर तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड अशा राज्यांनी आपले स्थापनादिन बंद करायला हवे. शेवटी ही सर्व राज्ये भारताचाच भाग आहेत.)
फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यात गतवर्षी अपेक्षिलेल्या महसुलापेक्षा ३० हजार कोटी रुपयाने जास्त महसूल मिळावा असे अर्थमंत्रालयाला वाटत आहे. त्यामुळे वित्तीय तूट कमी व्हावी. ऑक्टोबरमधील ही तूट ६.३० ट्रिलियन इतकी होती. नोव्हेंबरमधला महसूल ६ लाख ९७ हजार कोटी रुपये होता. प्रत्यक्ष जमा व अपेक्षित जमा यामधील तफावत अजून दोन महिन्यांनीच कळेल. महसूल चांगला झाला, तर अर्थमंत्र्यांनी सध्या असलेले वस्तू सेवाकराचे पाच स्तर कमी करून फक्त एक व दोनच स्तर निर्माण करायला हवे. वाटल्यास शून्य टक्के हा स्तर काढून टाकला, तरी लोकांवर फार बोजा पडणार नाही. कारण रिझर्व्ह बॅंकेच्या मते महागाई पूर्ण आटोक्यात म्हणजे पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.
रिझर्व्ह बॅंकेची द्वैमासिक आर्थिक धोरणाची समितीची बैठक सोमवारी ३ डिसेंबरला सुरू झाली. हा लेख लिहिताना ती चालू होती. त्यात रेपो दर बहुधा आहे तोच ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
ॲक्सिस बॅंकेने दिलेल्या जवाहिऱ्यांच्या कर्जाबाबत काही गोलमाल असल्याच्या संशयावरून प्राप्तिकर खात्याने बेनामी व्यवहारात बॅंकेच्या काही कर्मचाऱ्यांचा हात आहे का याची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत ५२ कोटी रुपयांची गफलत हुडकली गेली आहे.
शेअरबाजाराला आता ११ डिसेंबरच्या विधानसभांच्या निवडणूक निकालाचे औत्सुक्य आहे. पण अर्थव्यवस्था सक्षम असल्याने बाजारात तेजीचीच भावना आहे.
हेगच्या संचालक मंडळाने ७५० कोटी रुपयांचे शेअर्स बाजारातून ५४५० रुपयांनी विकत घेण्याचे ठरविले आहे. तसेच ग्रॅफाईट इलेक्ट्रोडचे उत्पादन वाढवण्यासाठी १२०० कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवणार आहे. शिवाय १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपली उत्पादनक्षमता २० हजार टनाने वाढवणार आहेत. सध्याची ८० हजार टनाची उत्पादनक्षमता १ लाख टनावर जाईल. मध्यप्रदेशमध्ये भोपाळ नजीक मंडीदीपला तिची क्षमता वाढवली जाईल. जगातील तो एक मोठा कारखाना ठरेल. सध्या हेग ४३५० रुपयांच्या जवळपास आहे. मल्टीबॅगर स्टॉकपैकी तो एक शेअर आहे.
येस बॅंकेचे राणा कपूर यांची पुनर्नियुक्ती फक्त ३१ जानेवारी २०१९ पर्यंत आहे. त्यांचा उत्तराधिकाऱ्याबद्दल अजून रिझर्व्ह बॅंकेने निर्णय घेतला नसल्यामुळे सध्या हा शेअर १७० रुपयांवर थबकला आहे. ज्यांना जोखीम घ्यायची असेल त्यांनी हा शेअर या पातळीला जरूर घ्यावा. गेल्या बारा महिन्यातील त्याचा ४०४ रुपयांचा उच्चांकी भाव बघता हा शेअर पुढील सहा महिन्यात निदान २२५ रुपयांपर्यंत जावा. सध्या या शेअरमध्ये १२ ते १३ कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. काही ब्रोकरेज संस्थांच्या मते हा शेअर ३०० रुपयांचीही पातळी ओलांडू शकेल. कारण मुळात या बॅंकेची स्थिती उत्तम आहे. याचाच अर्थ या शेअरच्या गुंतवणुकीत ८० टक्के नफा होऊ शकेल.
जिंदाल सॉचा सप्टेंबर २०१८ तिमाहीचा नफा ६९ टक्क्याने वाढला आहे. या तिमाहीचा नफा ६०.१० कोटी रुपये होता. या तिमाहीची विक्री २३३७ कोटी रुपयांची आहे. सप्टेंबर २०१८ तिमाहीसाठी ही विक्री १३२१ कोटी रुपयांची होती. पिरामल एन्टरप्राईझेसचे भाव उत्तम वाढले. बजाज फायनान्स २५३८ वर बंद झाला. तर पिरामल एन्टरप्राईझेसने २२०० रुपयांची पातळी गाठली. पिरामल एन्टरप्राईजेस अपरिवर्तनीय रोख्यांच्या द्वारे ५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. खासगी गुंतवणूकदारांना हे रोखे दिले जातील. हे रोखे शेअरबाजाराच्या रोखे प्रकारात नोंदवले जातील. समभागांमध्ये ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना पिरामल एन्टरप्रायझेस सध्याच्या भावाला उत्तम आहे. त्यांनी तो अवश्य घ्यावा. ३ हजार रुपयांवर तो भाव जाईल.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वृद्धीचा दर ७.१ टक्के आहे. भारताची जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. ६.५ टक्क्यांच्या जीडीपी वृद्धी दरासह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेची केंद्रीय बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेच्या व्याजदर वृद्धीचा वेग कमी करण्याचे प्रतिपादन केले. भारतासारख्या विकसनशील देशांना या धोरणाचा फायदा होईल.
हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीच्या संचालक मंडळाने ‘ग्लॅक्सोस्मिथक्काईन कन्झ्युमर हेल्थ केअर’ या कंपनीत विलीन व्हायचे ठरवले आहे. पण हे उलटे विलीनीकरण होणार आहे. ग्लॅक्सोस्मिथ क्राईनच्या एका शेअरला हिंदुस्थान युनिलीव्हरचे ४.३९ कोटी शेअर्स दिले जाणार आहेत. ग्लॅक्सो स्मिथचे हॉर्लीक्स हे अत्यंत लोकप्रिय असणारे उत्पादन आहे. त्यामुळे हिंदुस्थान लिव्हरचे एकूण ब्रॅंड्स खूप वाढतील. कंपनीचा अन्य व खाद्य उत्पादन व्यवहार १० हजार कोटी रुपयांवर जाईल आणि भारतातील ही पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरेल. मार्च २०१८ वर्षासाठी ग्लक्सोस्मिथची विक्री ४२०० कोटी रुपयांची होती. शेअर्सचीही अदलाबदली ३१,७०० कोटी रुपयांची होईल. युनिलिव्हर या इंग्लिश कंपनीची हिंदुस्थान युनिलिव्हरमधील टक्केवारी ६७.२ वरून ६१.९ टक्क्यावर येईल. हे विलीनीकरण फक्त भारतापुरते आहे. देशातील सर्वांत मोठी गृहकर्ज पुरवठा करणारी संस्था ‘एच.डी.एफ.सी. लिमिटेड ९ हजार कोटींचा निधी रोख्यांमार्फत उभा करणार आहेत. आर्थिक वर्ष २०१९ मधील सर्वाधिक किमतीची रोख विक्री, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, कोटक बॅंक यांच्याकडून रोखे खरेदी ९ हजार कोटींच्या रोख्यासाठी एकूण १३ हजार कोटींच्या बोली केल्या आहेत. चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ‘व्हिवो’ भारतामध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. स्मार्टफोन आयात करण्याऐवजी भारतातच स्मार्टफोनचे उत्पादन करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून १६९ एकरची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ५ हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. नवीन समभाग जारी करून सुमारे १५ हजार कोटींचा निधी उभा करण्याचा भारती एअरटेलचा प्रयत्न आहे. रिलायन्स जिओच्या स्पर्धेस उत्तर देण्यासाठी भारती एअरटेलने ३० कोटींचा आक्रमक आराखडा केला आहे.