निर्यात क्षेत्रात तेजी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शनिवार, 8 डिसेंबर 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
क्विझचे उत्तर :  १)  ड    २) ब   ३) क   ४) ब   ५) अ  ६) क   ७) ड  ८) ब   ९) अ  १०) क   
११) ब   १२) ब  १३) ड  १४) अ   १५) क    १६) ड    १७) ब   १८) क   १९) ड  २०) अ   २१) ब

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड इथल्या विधानसभांच्या निवडणुकांचे पडघम जोरात वाजत आहेत. त्यातच शिवसेनेने अयोध्येत शक्तिप्रदर्शन करून राममंदिराचा मुद्दा तापवला आहे. पंतप्रधानांना सध्या राममंदिर, राफेल व राहुल गांधी या तीन ‘रा’कारांनी ग्रासले आहे. एप्रिल २०१९ पर्यंत हे चालू राहील. आर्थिक आघाडीवर क्रूड पेट्रोलने किमतीत तळ गाठला आहे. सध्याची दर गॅलनची किंमत लंडनच्या वायदेबाजारात ६० डॉलरवर आली आहे. तीन वर्षातील हा नीच्चांक आहे व पेट्रोल १०० डॉलर्सवर जाण्याची भीती सध्या नाहीशी झाली आहे. 

भारतात तेल विपणन कंपन्यांना नवीन ५६ हजार पंप उभारण्याची परवानगी तेल नियामक मंडळाने दिली आहे. त्यामुळे पाच लाख रोजगार निर्माण होतील. रस्ते रुंद व चांगले झाल्याने वाहतूक सुरळीत होते. नवा मध्यमवर्ग जोराने वाहन खरेदी करीत आहे. त्यामुळे रस्ते, वाहने, पर्यटन व रोजगार हे सुष्ट चक्र पुढील काही वर्षे चालू राहील. ‘आमच्या आर्थिक सुधारणांमुळे हे झाले’ असा प्रचार रालोआ सरकार करू शकते. 

रुपया घसरत असल्याने भारताच्या निर्यातीला चांगले दिवस आहेत. यंदा साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे व ती निर्यात होत आहे. बासमतीशिवाय इतर वाणाचे तांदूळ निर्यात करणाऱ्यांना वस्तू निर्यात योजनेखाली ५ टक्के बटाव मिळणार आहे. आफ्रिका, अमेरिका, दक्षिण आशियायी राष्ट्रे, युरोप इथे भारताची निर्यात जगाच्या तांदूळ निर्यातीपैकी २५ टक्के आहे. रुपया घसरणीचा त्या निर्यातीला फायदा होत असला, तरी आयातदार राष्ट्रेही ते लक्षात घेऊन भाव पाडून मागत आहेत. तांदूळ, साखरेप्रमाणे दार्जिलिंगचे चहा मळेही अमेरिका व पूर्व युरोप या चहा न पिणाऱ्या राष्ट्राकडे आपला मोहरा वळवीत आहेत. गेल्या वर्षी चहाची पाने खुडणाऱ्यांना तिथल्या आंदोलनाचा चार महिने त्रास झाला होता. ८५ लाख किलो चहा गेल्या वर्षी या मळ्यांनी पिकवला होता. पण आता उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने ते चिंतेत आहेत. श्रीलंकाची खूप मोठी स्पर्धा त्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच केरळप्रमाणे इथेही पावसाने मळ्यांचे नुकसान केले आहे.

सध्याच्या निर्वाचन आयोगाचे अध्यक्ष ओ.पी.रावत या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. त्यांनी जाताजाता सध्याच्या निवडणुकांत पैशाचा संचार सुरू असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. यावेळी निवडणुकांचे निकाल कसेही लागो, हरणारे पक्ष त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन जिंकणाऱ्या पक्षाला दूषणे देतील. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर नमूद करता येण्याजोगी एक बातमी म्हणजे युरोपीय महासंघाने ब्रिटनच्या ‘ब्रेक्‍झिट’ला मंजुरी दिली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या अनुपस्थितीत २७ नेत्यांनी या कराराला मंजुरी दिली आहे. या करारानुसार अजून ४ महिन्यांनी २९ मार्च २०१९ रोजी ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडणार आहे. त्यासाठी मतदान न घेता २५ नोव्हेंबरला त्याला एकमताने मान्यता दिली. कुठलाही घटस्फोट हा दुःखदच असतो अशा शब्दात युरोपीय कमिशनचे अध्यक्ष जेन क्‍लॉड जंकर यांनी सांगितले. खुद्द ब्रिटनमध्ये संसदेत डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. उत्तर आयर्लंडची सीमा खुली ठेवायची ही एक बाब यात समाविष्ट आहे. ज्या ब्रिटनने एकवेळ जगावर राज्य केले त्याचेच आता तुकडे होत आहेत. 

श्रीराम मंदिराबरोबर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. तसेच महाराष्ट्रात महावीर बुद्धाचाही पुतळा उभारण्यात यावा ही मागणी होत आहे. हे सगळे मुद्दे बघितले, की राज्यांच्या अर्थशक्तीबद्दल कुणीच का बोलत नाही हा प्रश्‍न पडतो. विकासाचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. सकळ राष्ट्रीय उत्पादन (GDP) आता सात का सव्वा सात टक्के या चर्चाही कालबाह्य होत आहेत. भारत हा देश फक्त निवडणूकप्रिय आहे व त्यासाठी पैशाचे कितीही पाट वाहात राहतील असेच चित्र जगात उभे होत आहे.

या सर्व गदारोळात सुदैवाने भारतातला शेअरबाजार सुस्थितीत आहे. निर्देशांक २६ नोव्हेंबरला ३५३५० च्या आसपास होता, तर निफ्टी १०६२३ वर होता. हेगे कंपनीने buy back जाहीर केला आहे. पाच हजार रुपये ते ५५०० रुपयांपर्यंत कदाचित त्याचा खरेदीदर जाहीर होईल. त्यावेळी भागधारकांनी तो एकदा देऊन टाकावा व स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा खरेदी करावा. २०१८-१९ साठी कंपनीचे सहा महिन्यांचे जाहीर झालेले शेअरगणिक उपार्जन ४४० रुपये विचारात घेता; निदान ७५० ते ७९५ रुपये व्हावे. सध्याच्या ४४०० रुपये भावाला त्यामुळे किं/उ गुणोत्तर ५.५ पट इतके आकर्षक आहे.

चौदा डिसेंबर रोजी रिझर्व्ह बॅंकेची संचालक मंडळाची सभा होणार आहे अशी बातमी आहे. ज्या बॅंका त्वरित देखरेखीखाली आहेत (Prompt Corrective Action, PCA) त्यातील काही बॅंका वगळाव्यात असा अर्थमंत्रालयाचा आग्रह असेल. १९ नोव्हेंबरला यापूर्वी झालेल्या बैठकीत त्यासाठी एक उपसमिती नेमायचे ठरवण्यात आले होते. 

जिंदाल स्टील अँड पॉवर हा शेअर सध्या गुंतवणुकीस चांगला आहे. २३ नोव्हेंबरला हा शेअर १७० रुपयांच्या आसपास होता. गेल्या बारा महिन्यातील या शेअरचा कमाल व किमान भाव २९४ रुपये व १५७ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर २० पट पडते. रोज सुमारे ७० ते ७५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. म्हणजे खरेदी विक्रीसाठी द्रवता भरपूर आहे. वर्षभरात शेअरचा भाव ३०० रुपये व्हावा. सध्याच्या गुंतवणुकीवर ७५ टक्के होऊ शकेल. पण गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून, स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करावी. सप्टेंबर २०१८ च्या तिमाहीसाठी कंपनीची विक्री ९९२३ कोटी रुपये होती. सप्टेंबर २०१७ तिमाहीची विक्री ६१२३ कोटी रुपये होती. या तिमाहीत ढोबळ नफा २२०७ कोटी रुपये होता व नक्त नफा २७९ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ तिमाहीचा ढोबळ नफा १३७३ कोटी रुपये व नक्त नफा (तोटा) ४९९ कोटी रुपये होता. 

येत्या दोन वर्षात पोलाद उद्योगाला चांगले दिवस असणार आहेत. त्यामुळे मार्च २०१९ व मार्च २०२० या वर्षाचे आकडे उत्तम राहावे. २०१८ ते मार्च २०२० या तीन वर्षाचे प्रत्यक्ष व संभाव्य आकडे पुढे दिले आहेत. (खाली दिलेली चाैकट पाहा.)

ही कंपनी ओ. पी. जिंदाल यांच्या समूहाखाली आहे. पोलाद खाणकाम व ऊर्जा या तिन्ही क्षेत्रात ती उपकंपन्याद्वारे काम करते. जिंदाल पॉवरचे ३४०० मेगावॉटचे ऊर्जा उत्पादन आहे. जगातील सर्वांत मोठा कोळशावर चालणारा स्पाँज आयर्नचा तिचा कारखाना आहे. ओडिसा राज्यात अंशुल येथे व मध्यपूर्वेतील ओमान देशात तिचे कारखाने आहेत. कंपनीचे भाग भांडवल ९७ कोटी रुपये आहे. गंगाजळी ३३६७ कोटी रुपये आहे. शेअरचे पुस्तकी मूल्य मार्च २०१८ मध्ये ३१४ रुपये होते. म्हणजे पुस्तकी मूल्याच्या ५६ टक्के किमतीला तो सध्या आहे.

शेअरबाजार हा नेहमी त्या त्यावेळच्या राजकीय व आर्थिक आघाडीवर देशी व परदेशी घटनांच्यावर हलत असतो. सध्या जागतिक पटावर नमूद करण्याजोगे काही नाही. इथल्या बातम्यात राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम इथे होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांतील विविध पक्षांचे संभाव्य संख्याबळ किती याचे अंदाज येत आहेत व अँटी इनकम्बन्सी घटकांमुळे मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपला फटका बसेल अशी चिन्हे आहेत. सकारात्मक बातम्यात रिझर्व्ह बॅंक व केंद्र सरकारमधील दुरावा कमी झाल्याचे वृत्त आहे. रिझर्व्ह बॅंकेने काही राष्ट्रीयीकृत बॅंकांवरील देखरेख कमी करायचे ठरवले आहे. तसेच डॉलरच्या संदर्भात रुपयाचा विनिमय दर सुधारून ७०.७० रुपयावर आला आहे. रिझर्व्ह बॅंकेची विदेशमुद्रा गंगाजळी वाढत आहे व रिझर्व्ह बॅंक डॉलरची खरेदी करत आहे ही गोष्ट शेअरबाजाराला मानवणारी आहे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या