निवडणुकांच्या निकालांचा परिणाम

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यांत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. बुधवारी ५ तारखेला रिझर्व्ह बॅंकेने आपले डिसेंबर २०१८ चे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. ऑक्‍टोबरच्या धोरणात वा अंदाजात काहीही फरक केला गेला नाही. रेपो दर ६.५ टक्के आणि रिव्हर्स रेपोदर ६.३५ टक्केच ठेवला गेला आहे. समितीच्या सहा सदस्यांपैकी एक जण तटस्थ राहिला. बाकीच्यांनी एकमताने निर्णय केले. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross Domestic Production - G.D.P) ७.४ टक्के असेल व सध्याच्या ऑक्‍टोबर-मार्च या दुसऱ्या सहामाहीसाठी तो ७.२ ते ७.३ टक्के असेल असा बॅंकेचा अंदाज आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑक्‍टोबरचे धोरण जाहीर करताना, जागतिक स्तरावर पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थ यांचे भाव वाढून ते बॅरलला १०० डॉलर्स जातील, असे बॅंकेला वाटले होते. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे तो अंदाज होता. पण अमेरिकेने भारतासाठी ते निर्बंध शिथिल केले आहेत. शिवाय इराण भारताकडून डॉलर्सऐवजी रुपये स्वीकारणार आहे. त्यामुळे भारताचे मोठे संकट दूर झाले आहे. म्हणून रिझर्व्ह बॅंकेने धोरणातील अंदाजात लवचिकता आणली आहे. भारताला गरजेपैकी ८५ टक्के पेट्रोल आयात करावे लागते. 

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल (ता. ११ डिसेंबरला, मंगळवारी) जाहीर झाले असतील. ७ तारखेला मतदानोत्तर चाचण्यांचे जे निष्कर्ष जाहीर झाले होते, त्यानुसार राजस्थानमध्ये भाजप सत्ता गमावणार होती. मध्य प्रदेशमध्ये ‘कांटेकी टक्कर’ होती. मिझोराममध्ये व छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता टिकवणार होती. तेलंगणात तर सबकुछ चंद्रशेखर नायडू हे चित्र होते व भाजप, काँग्रेस नगण्य राहणार होते.

मतदानोत्तर चाचण्यांमुळे शेअरबाजार मात्र घसरला. सोमवारी १० डिसेंबरला निफ्टी व निर्देशांक अनुक्रमे १०४६८ व ३४९५९ वर बंद झाले होते. (शेअरबाजाराचा परामर्श पुढे घेतला आहे.) देशातील सर्व बॅंकांसाठी नवा मापदंड आणण्याचे ठरवण्यात आले. त्यावर आधारित गृहकर्जे, वाहनकर्जे, वैयक्तिक कर्जे व व्यावसायिक कर्जे यावरील व्याजदर निश्‍चित केले जाणार आहेत. व्याजदर घटले तर बॅंकांना त्याचा फायदा कर्जदारांना द्यावा लागेल.

जगात एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून अमेरिकेच्या वॉरेन बफे यांचे नाव घेतले जाते. त्यांची बर्कशायर हाथवे कंपनी, भारतातील कोटक महिंद्र बॅंकेचे बरेच शेअर्स विकत घेण्याच्या तयारीत आहे. सुमारे ६ अब्ज डॉलर्सची (४३००० कोटी रुपये) ती गुंतवणूक असेल. ही गुंतवणूक १० टक्के शेअर्ससाठी असेल. पण या बातमीने कोटक महिंद्र बॅंकेचा शेअर वाढत आहे. सध्या त्याचा भाव १२५० रुपयांच्या मागेपुढे आहे. या भावाला किं/ऊ गुणोत्तर ३४.२ पट दिसते.

उर्जाक्षेत्रातील सरकारी मालकीची रुरल इलेक्‍ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनचे विलीनीकरण करण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी मागणार आहे. एकूण व्यवहार १४ हजार कोटी रुपयांचा असेल. भविष्यात पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ही आणखी एक सार्वजनिक कंपनी तिने विकत घेतल्यास आश्‍चर्य वाटायला नको. स्टेट बॅंकेत, संलग्न बॅंकांचे विलीनीकरण झाले. देना व विजया बॅंकेचे बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण जाहीर झाले, त्यानंतर हा तिसरा मोठा प्रस्ताव ठरेल. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कर्जरोखे काढले होते. त्याला साडेपाच पट प्रतिसाद मिळून १०३७६ कोटी रुपयांच्या बोली (offers) आल्या. जपानमधील सॉफ्ट बॅंक या गुंतवणूक कंपनीने, ओला या टॅक्‍सी कंपनीत १ अब्ज डॉलर्स गुंतवायचे ठरवले आहे. ओला ही ऊबर (UBER) कंपनीला तीव्र टक्कर देत आहे.

भारतातील आर्थिक घटना आता वेगाने घडत आहेत व राजकीय क्षेत्रापेक्षा आर्थिक क्षेत्रावर प्रसारमाध्यमेही जोर देऊन आहेत ‘अर्थ एव प्रधानः।’ हे सांगणारा भारताचा कौटिल्य २५०० वर्षांपूर्वीच ‘अर्था’चे महत्त्व सांगून गेला आहे. शेती, व्यापार, बाराबलुती... शेजारच्या देशाबरोबर व्यापार (आयात, निर्यात) हे सगळे त्याला अभिप्रेत होते. फक्त त्यावेळी ‘सेवाक्षेत्र’ हे सेवाक्षेत्र म्हणून ज्ञात नव्हते. कृषीवलापासून गणिकांपर्यंत सर्व गोष्टी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्यावेळी नोंदलेल्या आहेत. स्मार्ट सिटीजची गावे कशी वसवावीत या प्रकरणात अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो. भारतात डिजिटलायझेशन सुरू झाल्यानंतर ही चौथी क्रांती म्हणावी लागेल. हरितक्रांती, श्‍वेत क्रांती (दुग्धव्यवसाय), मोबाईल क्रांती व इंटरनेटमुळे अर्थव्यवस्था सर्वांगाने अनेक मितीय (multi-dimentional) होत आहे. भारतातील वैयक्तिक डिजिटल व्यवहार आता विस्तारला आहे. Person to Person (P to P) व वैयक्तिक ते व्यावसायिक (Person to Business - P to B) हे दोन्ही व्यवहार आता रूढ झाले आहेत. वैयक्तिक व्यवहारात POS Terminal वर Prepaid Terminal Instruments) आणि UPI द्वारे केलेले व्यवहार होत. सप्टेंबर २०१६ पासून २०१८ जूनपर्यंत क्रेडिट कार्डे व डेबिट कार्डे यांचे व्यवहार दुप्पट झाले आहेत. POS Terminals ची संख्या १४.८० लाखांवरून ३३.१० लाख इतकी झाली आहे. PPI व्यवहार तर तिप्पट झाले आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये UPI चे ८५ लाख व्यवहार झाले, त्याचे मूल्य आता ४०८ अब्ज रुपये झाले आहे, भारतासारख्या एवढ्या मोठ्या कमी अर्धसाक्षर असलेल्या देशाची ही भरारी स्पृहणीय आहे. मात्र क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड व्यवहाराची व्याप्ती फक्त ३० रुपयाने वाढली आहे. सरासरी एक व्यवहार ३४००० रुपयांचा असतो. 

आता एक नजर शेअरबाजाराकडे! शुक्रवारी १० डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे मतदानोत्तर अंदाज (EXIT POLL) भाजपच्या विरुद्ध गेले. त्यामुळे शेअरबाजार निरुत्साही राहिला. या विधानसभांच्या निवडणुका, म्हणजे मार्च-एप्रिल २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची नांदी होती. खरे नाटक आता रंगत जाईल व त्यात शब्दशः गण, गौळण, बतावणी हे सर्व प्रकार विविध पक्षांद्वारे दिसतील. मात्र विधानसभांच्या अंदाजामुळे काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मूठभर मांस चढले आहे. विरोधकांनी एकजूट करून राज्यातल्या प्रमुख पक्षाला बळ दिले व नंतर सर्व पक्ष एकत्र आले तर काँग्रेससह बडी आघाडी स्थापण्याचे मनसुबे, स्वतःला जाणते म्हणवणारे नेते रचू लागले आहेत. शेअरबाजारात तशी मरगळ असली तरी नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना द्रवता (लिक्विडिटी) कमी पडणार नाही याची ग्वाही रिझर्व्ह बॅंकेने दिल्याने बजाज फायनान्स, मूथूट फायनान्स, एम अँड एम फायनान्शियल या कंपन्यांचे भाव स्थिरावत आहेत. बजाज फायनान्स २४२० रुपयांच्या आसपास आहे. तो गेल्या सहा महिन्यांत ३००० रुपयांपर्यंत व्हावा. भागभांडारात हा शेअर अवश्‍य हवा.

येस बॅंकेच्या संचालकांची एक सभा १३ डिसेंबरला होती. त्यांत व्यवस्थापकीय पदाबाबत काही निर्णय घेतले जाणार होते. ते बहुधा सकारात्मक असतील. त्यामुळे हा शेअर सध्या घ्यायला हरकत नाही. व्यवस्थापनाचा मुद्दा ३१ जानेवारीपर्यंत सुटावा. त्यानंतर या शेअर्सचे उत्तरायण सुरू होईल. वर्षभरात तो ३५ टक्के सहज वाढेल. जी एस डब्ल्यू स्टील ३०३ रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा कमाल व किमान भाव अनुक्रमे ४२७ रुपये व २३८ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ७.९ पट दिसते. रोज सुमारे २ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला गुंतवणुकीवर वर्षभरात ३० टक्के नफा होईल. 

दिवाण हाउसिंग सध्या २०० रुपयांपर्यंत उतरला आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा कमाल भाव ३१४ रुपये होता. काहीजणांना या शेअरमध्ये आर्थिक जोखीम वाटते. पण माफक प्रमाणात तो घ्यायला हरकत नाही. वर्षभरात तो ४० टक्के नफा देऊन जाईल.

मुथुट फायनान्स हा शेअर सध्या ४७० रुपयांच्या आसपास मिळत आहे. वर्षभरात तो ६०० रुपये व्हावा. कंपनीचे शेअरगणिक उपार्जन मार्च २०१८ मध्ये ४१ रुपये होते. मार्च २०२० साठी ते ५५ रुपये अपेक्षित आहे. बजाज फायनान्सप्रमाणेच नॉन बॅंकिंग फिनान्शिअस क्षेत्रातील हा एक चांगला शेअर आहे. वर्षभरात तो ६०० रुपयांपर्यंत जाईल. 

हिंदुस्थान युनिलिव्हरने जी.एस.के. कन्झ्युमर इंडिया कंपनी स्वतःत विलीन करून घेण्याचे ठरवले आहे. हॉर्लिक्‍स, बूस्ट, व्हायव्हा आणि माल्टोव्हा ही कंपनीची प्रसिद्ध पेये आहेत. या एकत्रीकरणामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअरगणिक उपार्जन बरेच वाढणार आहे. त्यामुळे एक अत्यंत मोठ्या कंपनीचा उपयुक्त शेअर म्हणून हा शेअर भागभांडारात घ्यायला हरकत नाही. एकत्रीकरणानंतर कंपनीची यंदाची असलेली ३५,५२५ कोटी रुपयांची विक्री मार्च २०२१ मध्ये ५७,३५० कोटी रुपयांची होईल. अर्निंगपर शेअर २३ रुपयांवरून ४३ रुपयांवर जाईल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ७६ पट आहे. ते २०२१ मार्च मध्ये ४२ पटीपर्यंतच खाली येईल. २०१८ मार्चला दोन्ही कंपन्यांची संयुक्त विक्री ४१ हजार कोटी रुपयांची होती, ती वर्षभरात १२ टक्‍क्‍याने वाढेल. लेख संपवताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, अशी बातमी आली आहे. सप्टेंबर १६ मध्ये त्यांना ३ वर्षांची मुदत दिली गेली होती. हा राजीनामा वैयक्तिक कारणासाठी दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.   

संबंधित बातम्या