शिस्तबद्ध गुंतवणूक हवी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 17 जानेवारी 2019

अर्थनीती ः शेअर बाजार
 

सर्व जण ज्याची प्रतीक्षा करत होते त्या येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने माजी सनदी अधिकारी ब्रह्मदत्त यांची नियुक्ती करायचे ठरवले आहे. माजी अध्यक्ष अशोक चावला यांनी केंद्रीय अन्वेषण खात्याने चौकशी केल्यामुळे त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये हे पद सोडले होते. ब्रह्मदत्त यांना वयाची सत्तर वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे ४ जुलै २०२० पर्यंत हे पद भूषवता येईल. ब्रह्मदत्त हे येस बॅंकेवर स्वतंत्र संचालक म्हणून जुलै २०१३ पासून आहेत आणि अनेक उपसमित्यांवर त्यांनी काम केले आहे. बॅंकेची नियुक्ती आणि पगार-भत्ता ठरवण्यासाठी जी समिती आहे त्याचेही ते अध्यक्ष आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळावर आयआरडीएआयचे माजी प्रमुख टी. एस. विजयन, मुकेश साभरवाल, सुभाष कालिया, अजितकुमार, उत्तमप्रकाश आगरवाल आणि प्रतिमा शेवरे आहेत. बॅंकेचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख आर्थिक अधिकारी, एमडी आणि सीईओ म्हणून राणा कपूर संचालक मंडळावर आहेत.

जागतिक बॅंकेच्या प्रमुख पदावर सध्या असलेल्या जिम आँग किम यांची मुदत संपत असल्यामुळे तिथे संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत विक्की हॅले आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि प्रमुख सल्लागार इवांका यांची नावे या संदर्भात घेतली जात आहेत. किम यांची जागतिक बॅंकेचे अध्यक्ष म्हणून अजून ३ वर्षे शिल्लक आहेत. त्यांची २०२२ मध्ये मुदत संपणार होती. याखेरीज डेव्हीड माल्यास आणि मार्क निव्हेन यांचीही नावे या संदर्भात घेतली जात आहेत. स्त्रियांनी धडाडीच्या आर्थिक नेत्तृत्वामध्ये भाग घ्यावा यासाठी सौदी अरेबियाने जो निधी २०१७ मध्ये उभारला होता, त्यामागील प्रमुख सूत्रधार म्हणून इवांका यांनी भूमिका निभावली होती. हा निधी १ अब्ज डॉलर्सचा आहे. जागतिक बॅंकेत अमेरिकेचा खूप मोठा बहुमत असलेला हिस्सा आहे.  बहुमत असूनही अमेरिकेला हे पद यावेळी मिळेलच असे नाही. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमेरिकेने किम यांना नियुक्त केले होते. बॅंकेच्या संचालक मंडळाने निवडीची प्रक्रिया गुणवत्तेवरच अवलंबून पारदर्शकच राहील आणि बिगर अमेरिकन व्यक्तीची नियुक्ती असेल असे सूचित केले आहे. नवनिर्वाचित व्यक्तीची निवड ही समृद्ध अनुभव आणि सिद्ध केलेले कर्तृत्व यावरच अवलंबून  असेल. मात्र अशा व्यक्तीला जागतिक स्तरावरच्या संघटनांच्या व्यवस्थापनाचा अनुभव असला पाहिजे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाने सतत कष्ट करत असलेली प्रामाणिक व्यक्ती आणि भ्रष्ट तसेच गरज असताना देशाबाहेर सुटीला जाणारी व्यक्ती यांच्यात योग्य निवड केली पाहिजे, असे भाजपच्या राष्ट्रीय सभेत सांगितले होते.

केंद्रीय सार्वजनिक कर्म विभागातर्फे (सेंट्रल पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंट) भारत-चीन सीमेपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत चीनशी भिडणाऱ्या सीमेनजीक ४४ महत्त्वाचे रस्ता बांधायचे ठरले आहे. पंजाब आणि राजस्थानमधूनही त्याचा काही भाग जाईल. या रस्त्यासाठी २१ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. भारत आणि पाकिस्तानमधल्या सीमेशी जम्मू आणि काश्‍मीर, राजस्थान, पंजाब व गुजरात या राज्यांचा संबंध येतो. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी काँग्रेसला वगळून लोकसभेच्या ८० जागांसाठी गठबंधन केले असल्यामुळे काँग्रेस स्वतंत्रपणे या ८० जागा लढवणार आहे.

कंपनी कायद्यात सुधारणा करण्यासाठी मांडलेले विधेयक ४ जानेवारी २०१९ ला संमत झाले असले, तरी राज्यसभेत ते अजून प्रलंबित असल्यामुळे त्यातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी १० जानेवारीला आवश्‍यक तो वटहुकूम काढला आहे. त्यायोगे न्यायालयातील कामे सुकर होतील. सन २०१९-२० साठी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट कदाचित ३.५ टक्के इतकी वाढलेली दिसेल. मागील वर्षी ही ३.३ असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या आठ महिन्यांतच वित्तीय तुटीचे ७.१६ लाख कोटी रुपयांची सीमा गाठली आहे. केंद्र सरकारचे अपेक्षित सार्वजनिक कंपन्यांतील निर्गुंतवणुकीकरण अद्याप पूर्ण न झाल्याने ही शक्‍यता निर्माण झाली आहे. २०१८ मध्ये शेअरबाजारात चांगली तेजी होती, पण गलथान अर्थमंत्रालयाला त्याचा फायदा घेता आला नाही. कृषिकर्जमाफी आणि अन्य अनुदाने यामुळे सरकारवर अतिरिक्त बोजा पडला आहे. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चच्या अंदाजाप्रमाणे २०१८, २०१९ ची वित्तीय तूट ३९ हजार ९०० कोटी रुपये अपेक्षित आहे. सातत्याने गेली तीन वर्षे वित्तीय तूट साडेतीन टक्के राहिली आहे. जागतिक बाजारात क्रूड पेट्रोलच्या किमती कमी झालेल्या असल्याने सरकारला जरा तरी दिलासा मिळाला आहे.

देशातील नऊ महानगरात २०१८ मध्ये नवीन बांधकामे २२ टक्‍क्‍याने कमी झाली आहेत. यावर्षी फक्त १ लाख ४६ हजार सदनिकाच बांधल्या गेल्या. २०१७ मध्ये १ लाख ८७ हजार सदनिका बांधल्या गेल्या होत्या. २०१८ मध्ये सदनिकांची विक्री ६० टक्के वाढूनही न विकलेल्या सदनिकांचा आकडा ९ लाख इतका आहे. गुरुग्राम, नॉयडा, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद, बंगलोर आणि ठाणे या नऊ महानगरांसाठी ‘प्रॉप इक्विटी’ या संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे.

शेअरबाजारासाठी २०१९ हे वर्ष उत्तम जाईल असा अंदाज आहे. १३ जानेवारीला २०१८ रोजी निर्देशांक ३३००० च्या खाली होता. वर्षभरात तो ३८,९८९ पर्यंत वाढला होता, तरी सध्या तो ३६००० च्या आसपास आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये तो ४०००० पर्यंत जाईल असा अंदाज आहे.

वर्षभरासाठी गुंतवणूकदारांनी ज्या शेअर्सकडे लक्ष द्यायला हवे, त्यात येस बॅंक, स्टरलाईज टेक्‍नॉलॉजीज, हेग, दिवाण हाउसिंग फायनान्स, ओएनजीसी, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार), विद्या टेलिलिंक्‍स, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, गोदावरी पॉवर अँड इस्पात, दिलीप बिल्डकॉन, उज्जीवन फायनान्स, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, ग्राफाइट इंडिया, कोड इंडिया, चेन्नई पेट्रो यांचा विचार करायला हरकत नाही. पिरामल एंटरप्राइझेस, सेलन एक्‍सप्लोरेशन, कॅनफिन होम्स या कंपन्याही विचारार्ह आहेत. सिएट, जेके टायर, हिंदुस्थान युनिलिव्हर, पेट्रोनेट एलएनजी अशा अनेक कंपन्याही त्यांचे तिमाही आकडे बघून विचारात घ्यायला हरकत नाही. डोळसपणे अभ्यास करून मार्च-जून-सप्टेंबर तिमाहींचे आकडे बघून आणि जागतिक व राष्ट्रीय अर्थकारणात काय फरक होतात त्यावर लक्ष ठेवून गुंतवणूक करायला हवी. वेगवेगळ्या ब्रोकरेज संस्थांचे रिसर्च रिपोर्टस्‌ देखील वाचायला हवेत. गुंतवणूक हे एक शास्त्र आहे. तशीच ती एक कलाही आहे. सातत्य, संयम, अभ्यास आणि चिकाटी यांची जरुरी गुंतवणुकीसाठी असते. आर्थिक वृत्तपत्रे व नियतालिके यांचेही वाचन आवश्‍यक असते.

गुंतवणुकीबाबत अनेक ठिकाणांहून सल्ले मिळत असले तरी शेवटी गुंतवणुकीतील जोखीम ही आपलीच असते.

शेअरबाजारातील निवडक कंपन्यांची नावे जरी वर दिली असली, तरी या सर्वच कंपन्यांत कुणालाही गुंतवणूक करणे शक्‍य नसते. विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा अभ्यास करून जिथे जास्त नफ्याची शक्‍यता आहे अशा १० ते १५ कंपन्यांतच गुंतवणूक हवी. कुठल्याही एका कंपनीत ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी व २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुंतवणूक असू नये. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे राजकीय पक्षांचे आर्थिक आराखडे बघून कंपन्यांमध्येही अदलाबदल करायला हवी.

‘सकाळ साप्ताहिक’मधील या लेखमालेत अनेक बाबींचा विस्ताराने जरी परामर्श घेतला जात असला, तरी समर्थ रामदासांचे ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हे वचन लक्षात ठेवायला हवे. 

संबंधित बातम्या