निवडणुकीपर्यंत बाजारात तेजी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

फेब्रुवारीच्या पहिल्या बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या वित्तीय समितीची बैठक झाली. तिने रेपो दर पाव टक्‍क्‍याने कमी करुन साडे सहावरुन सव्वा सहा टक्‍क्‍यांवर आणला. सहा जणांच्या समितीपैकी चौघांनी कपातीच्या बाजूने मत दिले. नव्याने गव्हर्नर म्हणून आलेल्या शक्तिकांत दास यांनी कपातीच्या बाजूने मत दिले. त्याच बरोबर रिझर्व्ह बॅंकेने परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीसाठीचे नियम शिथिल केले. नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबतही पुन्हा विचार विनिमय होणार आहे. तसेच येत्या वर्षात अर्थव्यवस्था ७.४ टक्‍क्‍याने वाढेल, असा अंदाज दिला आहे. 

नुकत्याच मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना अडीच लाख रुपयांची करमर्यादा होती, ती वाढवून पाच लाख रुपये केल्यामुळे; तसेच शेतकऱ्यांसाठी ५०० रुपयांची मदत दिली जाणार असल्यामुळे गुंतवणूकदारांत व शेअरबाजारात समाधानाचे वातावरण होते. पाठोपाठ रिझर्व्ह बॅंकेनेही व्याजदर कमी केल्यामुळे निवडणुका जाहीर होईपर्यंत बाजारात तेजीचा नूर असेल. 

भारत पेट्रोलियमने केरळमधल्या कोची शहरात १६५०० कोटी रुपये गुंतवून एक नवीन तेलशुद्धीकरण कारखाना टाकला आहे. कारखान्याचे लोकार्पण केले. केरळचे मुख्यमंत्री पेनराई विजयन हेही या समारंभाला उपस्थित होते. आशिया खंडात पेट्रोल शुद्धीकरण करण्यासाठी असलेल्या कारखान्यात भारत पेट्रोलियमचा हा कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारखान्यामुळे पेट्रोलची आयात १० टक्‍क्‍याने कमी होईल.

देशामध्ये सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने बेरोजगारीबद्दलची चर्चा सुरू आहे. बेरोजगारीत वाढ झाली, असे विरोधकांचे म्हणणे असले आणि नीती आयोग याबद्दल अनभिज्ञ असला, तरी सरकारने मात्र रोजगार वाढल्याचा दावा केला आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने (ICCI) प्रसिद्ध केलेल्या पाहणी अहवालानुसार देशातील उत्पादन वाढणार आहे व त्यामुळे रोजगारही वाढेल, असे म्हटले आहे. ऑक्‍टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी हा अंदाज होता. गेल्या वर्षीच्या या तिमाहीत औद्योगीक उत्पादन ४७ टक्‍क्‍याने वाढल्याचा अंदाज होता. यावेळही ही टक्केवारी ५४ वर गेली आहे. सिमेंट, वाहने, वाहनांचे सुटे भाग, भांडवली वस्तू, सेरॅमिक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रात ही वाढ दिसेल. खते, औषधे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, चामड्यांच्या वस्तू आणि पादत्राणे, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योगासाठी लागणारे माग व तत्सम वस्तू, टायर्स, स्टेशनरी या ठिकाणी ही वाढ दिसेल. निर्यातीमध्ये देखील अनेक उद्योगांत वाढ अपेक्षित आहे. मात्र रुपयाची घसरण चालू असूनही निर्यातीत त्यामानाने वाढ नाही, असे हा अहवाल सांगतो. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, कर्जावरील व्याजाचे वाढते दर, शिथिल मागणी, कुशल कामगारांची वानवा, वाढती आयात, आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी लागणारा वाढता खर्च, केंद्र व राज्याकडून मिळणाऱ्या अनुदानात होणारी दिरंगाई हे उत्पादन वाढीतील अडथळे आहेत, असे उद्योजकांना वाटते. वर निर्देश केलेल्या उद्योगात यांचा (या घटकांचा) प्रादुर्भाव दिसून येतो. तरीही निर्यात ३६ टक्‍क्‍यांनी येत्या काही महिन्यात वाढावी, असे अहवालात नमूद केले गेले आहे.

चीनमधील वाढती आयात ही भारतीय उद्योगांची मोठी डोकेदुखी आहे. ग्रॅफाईट धातू, टायर्स यांना याचा फटका जास्त बसत आहे. चीनी टेलिफोन्स, मोबाईल्स यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. कोरियाच्या सॅमसंग कंपनीला चीनशी स्पर्धा जास्त जाणवत आहे. रिलायन्स जिओ मात्र याला अपवाद आहे. भारतातील कंपन्या ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञान देऊ शकत नाहीत, हे याचे कारण आहे.  व्होडा-आयडिया कंपनी येत्या १५ महिन्यात २० हजार कोटी रुपये गुंतवून चीनी स्पर्धेला तोंड देईल. मार्च २०१९ व मार्च २०२० या दोन वर्षांचा विचार केला, तरी गुंतवणूक २६ हजार कोटींवर जाईल. त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी कंपनी २५ हजार कोटी रुपयांचे हक्कभाग काढण्याच्या विचारात आहे. आदित्य बिर्ला समूह यातला काही  वाटा उचलेल. 

देशातील मोटारींची जास्त मागणी लक्षात घेऊन स्पोट्‌स कारचे उत्पादन करणारी लॅंबोर्जीनी ही इटालियन कंपनी भारतात आपली विक्री ५० टक्‍क्‍याने वाढवायचा विचार करीत आहे. तीन कोटी रुपयांच्या आसपास किंमत असलेल्या या गाडीला मोठ्या महानगरांतून तसेच लुधियाना, कानपूर, भुवनेश्‍वर, इंदूर, सुरत आणि हुबळी इथून मागणी येईल. गेल्या वर्षी अशा ४५ गाड्या विकल्या गेल्या होत्या. २०१७ मध्ये २६ गाड्या विकल्या गेल्या होत्या. 

शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बायजू’ ही कंपनी यंदा साडेतीन हजार कर्मचारी घेणार आहे. ही कंपनी गेली तीन वर्षे १०० टक्‍क्‍याने वाढत आहे. रोजगार निर्मितीत फ्लिपकार्ट, पेटीएम, ओला, उबर, ओयो या कंपन्या जास्त कर्मचारी घेत आहेत. ३ ते ८ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी ‘बायजू’ जास्त लोकांना रोजगार देईल. 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सने आपली ३५ ते ४० कोटी रुपयांची थकीत कर्जे विक्रीला काढली आहेत. लहान आणि मध्यम उद्योगातील काही कर्जदारही यात समाविष्ट आहेत.

महाराष्ट्र सरकारने धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी या कंपनीला ३ कोटी चौरस फूट विकसित करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये सध्या तिची दीड कोटी चौरस फुटावर कार्यालये आहेत. महाराष्ट्र सरकारने ही परवानगी ८ फेब्रुवारीला दिली आहे. सध्या या जागेत रिलायन्स कम्युनिकेशन या बंद पडलेल्या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीवर सध्या ४६ हजार कोटी रुपयांची कर्जे आहेत. 

दर जुलैमध्ये रिझर्व्ह बॅंक आपला वार्षिक नफा केंद्राकडे वर्ग करते. तिच्याकडे सध्या मागील वर्षांच्या नफ्यातील गंगाजळी आहे. बॅंकेनी ती सरकारला द्यावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. बॅंकेच्या लेखा परीक्षकांनी २८ हजार कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याबद्दलचा विचार संचालकांच्या १८ फेब्रुवारीच्या सभेत होईल. बिमल जालन यांच्या एका समितीने रिझर्व्ह बॅंकेकडे जादा गंगाजळी आहे ही कल्पना ठोकरुन लावली होती. काही महिन्यापूर्वी डॉ. उर्जित पटेल यांनी या संदर्भातच आपला राजीनामा दिला होता, असे म्हटले जाते. 

चांगला अर्थसंकल्प व रेपो दरातील कपात यामुळे शेअरबाजार सध्या खुशीत आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे नफ्याचे आकडे वाढते दाखवले आहेत. ग्रॅफाईट इंडियाने डिसेंबर २०१८ तिमाहीसाठी नक्त नफ्यात ७२ टक्के वाढ दाखवली आहे. विक्रीतही ७१ टक्‍क्‍याने वाढ आहे. डिसेंबर २०१७ च्या तिमाहीसाठी १०२५ कोटी रुपयांच्या विक्रीवर ३५९ कोटी रुपये नफा झाला होता. डिसेंबर २०१८ तिमाहीचा नफा ७६४ कोटी रुपये आहे. विक्री १८५५ कोटी रुपये आहे. कंपनीच्या बंगळूरचा कारखाना कर्नाटकच्या पर्यावरण विभागाने घातलेल्या निर्बंधामुळे काही दिवस बंद असूनही हा नफा वाढला आहे. गेले काही आठवडे हा शेअर सतत घसरून ५११ रुपयांवर आला होता. आता तो पुन्हा किमान ७०० रुपयांवर जाऊ शकेल. कारण बंगळूरचा कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. या शेअरची घाबरून विक्री करू नये. हेगही सध्या २३७५ रुपयांपर्यंत उतरला आहे. तो ही या भावाला जरूर घ्यावा. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव ४९५५ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ३.७ पट दिसते. ग्राफाईटचे किं/उ गुणोत्तर तर सध्या २.८० पट इतके कमी आहे. दोन्ही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत. २०२० मार्च पर्यंत या शेअर्समध्ये चलती राहील. हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमने अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचा डिसेंबर २०१८ तिमाहीचा नफा ८७ टक्के घसरला आहे. 

पेट्रोलियमने डिसेंबर २०१८ तिमाहीसाठी शेअरमागे ११ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांश हा नेहमी करमुक्त असतो. यामुळे भारत पेट्रोलियम सध्या विकत घेऊन लाभांशाची एक्‍स्पायरी डेट संपेपर्यंत तो जरूर ठेवावा. 

इंडुसिंड बॅंकेने १३ फेब्रुवारीला आपले डिसेंबर तिमाहीचे आकडे प्रसिद्ध केले. खासगी क्षेत्रातील ही बॅंक मापक प्रमाणात गुंतवणुकीसाठी चांगली आहे. मात्र सध्याचा येस बॅंकेचा कमी झालेला भाव लक्षात घेता गुंतवणूक येस बॅंकेतच करावी. सध्या हा शेअर १७५ रुपये इतक्‍या कमी किंमतीला उपलब्ध आहे. सदाहरित बजाज फायनान्स २७३७ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव २९९४ रुपये होता. दिवाळीपर्यंत बजाज फायनान्स ३३०० रुपये व्हावा, हा शेअर व पिरामल एंटरप्राइजेस दीर्घ मुदतीसाठी उत्तम आहेत. सुवेन फार्माही गुंतवणुकीस आकर्षक आहे. 

संबंधित बातम्या