शेअरबाजारात सुधारणा 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

भारताची अर्थव्यवस्था सध्या जोराने वाढत आहे. त्यात पाकिस्तानमधून सिमेंट, कातडी व फळांची होणारी आयात अडसर ठरत असल्यामुळे भारताने या आयातीवर २०० टक्के सीमाशुल्क लावायचे ठरवले आहे. विशेषतः पुलवामा इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे हा मुँहतोड जबाब देणे आवश्‍यक ठरले. वरील वस्तूंबरोबरच सिमेंट, पेट्रोलियम पदार्थ, खनिजे, अजैविक रसायने, कच्चा कापूस, सुती कपडे, काच आणि काचसामान याही वस्तू आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्यात व्यवहारावर प्रचंड परिणाम होणार आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स’ने (FIEO) या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी सिमेंटवर साडेसात टक्के सीमाकर होता आणि फळांवरील सीमाकर ३० ते ५० टक्के होता. हा सीमाकर लागू होण्यापूर्वी ज्यांनी या वस्तूंच्या आयातीबद्दल करार केले होते, त्यांना फटका बसणार आहे. २०१७-१८ मध्ये पाकिस्तानमधून भारताने ४.८८५ कोटी डॉलर्सची आयात केली होती. २०१६-१७ मध्ये ही आयात ४५.५५ कोटी डॉलर्सची होती. २०० टक्के लावलेल्या सीमाकरामुळे पाकिस्तानमधून आयात बरीच कमी होणार आहे. 

बॅंकांमधील द्रवतेबद्दल एक पाहणीअहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. खासगी, सार्वजनिक आणि विदेशी बॅंका; तसेच लहान अर्थसंस्था यांच्यातही द्रवता कमी झालेली दिसते. रिझर्व्ह बॅंकेने द्रवता योग्य पातळीवर ठेवण्यासाठी खुल्या आर्थिक धोरणावर या तिमाहीच्या उरलेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बॅंकेने खुल्या आर्थिक व्यवहारांतून बॅंकांना उसंत द्यावी, असे हा पाहणी अहवाल सांगतो. आर्थिक वर्ष संपत आले असता जास्त द्रवतेची आवश्‍यकता, वर्ष संपण्यापूर्वी आगाऊ भराव्या लागणाऱ्या कॉर्पोरेट व प्राप्तिकर यामुळे द्रवतेवर ताण पडणार आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी केलेल्या पाहणीच्या आठव्या टप्प्यासाठी हा निष्कर्ष आहे. सुदैवाने बारा बॅंकांची अनार्जित कर्जे कमी झाल्याने हा ताण सुसह्य झाला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांत नुकताच जो भांडवल पुरवठा केला आहे, त्यामुळे बॅंकांचे ताळेबंद सुधारतील आणि बॅंकांना आणखी काही अनार्जित कर्जे बुडीत काढून आपले चित्र चांगले रंगवता येईल. पायाभूत संरचना क्षेत्रातील ऊर्जा, बांधकाम वगैरे क्षेत्रांत अनार्जित कर्जे जास्त दिसत आहेत. त्वरित योग्य उपाययोजनांमुळे ज्या बॅंकांचे व्यवहार सुधारले आहेत, अशा बॅंकांना रिझर्व्ह बॅंक देखरेखीतून मुक्त करणार आहे. त्यामुळे या बॅंका कर्जे जास्त प्रमाणात देऊ शकतील. त्यामुळे आर्थिक विकास वाढू शकेल, याचा फायदा विशेषतः लघु व मध्यम उद्योगांना होईल. 

स्मार्ट फोन्सची पुनर्बांधणी करून किंवा त्यांच्या दुरुस्तीचा व्यवहार करणाऱ्या ‘यांत्र’ या कंपनीने पुढील तीन वर्षांत ८०० शहरांतून व्यवहार वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ४० हजार किरकोळ व्यवसाय मिळेल. गेल्या वर्षापेक्षा ४१ टक्‍क्‍याने या व्यवहारात वाढ झाली आहे. सुमारे ६ अब्ज डॉलर्सचा व्यवहार सध्या त्यात होत असून २०२२ मार्चपर्यंत तो १० अब्ज डॉलर्सवर जाईल. ‘यांत्रि’चा या क्षेत्रातील व्यवहार सुमारे २०० कोटी रुपयांनी वाढणार आहे. सध्या ४० कोटी लोक ब्रॅंडेड स्मार्टफोन्स वापरत आहेत. पुढील तीन वर्षांत ‘यांत्र’ने आपला व्यवसाय पाचपट वाढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ३००० ते ३५०० कुशल तंत्रज्ञांना रोजगार मिळेल. ‘यांत्र’मध्ये सध्या दहा शहरांना सेवा पुरवली जात आहे. १४ हजार पिन कोड्‌समधून कंपनी सध्या ही सेवा देत आहे. 

अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाने व्यवसाय वाढवण्यासाठी बॅंकांकडे आपले शेअर्स गहाण ठेवले होते. मुद्दल व व्याजाची परतफेड न झाल्यामुळे बॅंका हे शेअर्स विकण्याचा विचार करत होत्या. काही वाटाघाटींनंतर बॅंकांनी अशी विक्री सप्टेंबरपर्यंत थांबवण्याचे ठरवले आहे. या समूहाच्या शेअर्सच्या किमती बाजारात खूप घसरल्या आहेत. बॅंकांनी हे शेअर्स आताच विक्रीला काढले असते, तर किमती आणखी घसरल्या असत्या व रिलायन्स समूहाला खूप नुकसान सोसावे लागले असते. दरम्यान मुद्दल व व्याज देण्यासाठी रिलायन्स समूह काही प्रयत्न करेल, त्याबाबतचे वेळापत्रक बॅंका व कंपनीच्या संमतीने तयार करण्यात आले आहे. 

व्होडाफोन-आयडिया आपला टॉवर्सचा व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. हा व्यवहार सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा होईल. कंपनीवर सध्या १ लाख २३ हजार ६०० कोटी रुपयांची कर्जे आहेत. त्याची अंशतः फेड या रकमेने होईल. या मनोऱ्याबरोबर कंपनी ऑप्टिकल फायबर्सच्या जिंदगीचीही विक्री करणार आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचा इंडस टॉवर्समध्ये सहभाग आहे. कंपनीचे ऑप्टिकल फायबर्सचे जाळे दीड लाख किलोमीटरचे आहे. इंडसचा त्यात ५००० कोटी रुपयांचा वाटा आहे. हक्कभागांची विक्री करून व्होडाफोन-आयडिया कंपनी २५ हजार कोटी रुपये उभे करणार आहे. त्यातून कर्जाची अंशतः फेड होईल आणि काही रक्कम नव्या भांडवली गुंतवणुकीसाठी उपलब्ध होईल. व्होडाफोन समूह ११ हजार कोटी रुपयांचा आणि आदित्य बिर्ला समूह ७२५० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. उरलेल्या रकमेची विक्री शेअरबाजारातील गुंतवणूकदारांकडून होईल. त्यातील काही भाग जर विकले गेले नाहीत, तर हे दोन्ही समूह ते उचलतील. 

एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांत भारतात २६.९३ अब्ज डॉलर्सची आयात झाली. गेल्या वर्षातील याच काळातील आयात ५ टक्‍क्‍याने जास्त होती. सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत असल्यामुळे ही आयात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत कमी झाली होती. जानेवारीतील आयात ३६ टक्‍क्‍याने वाढून २.३१ अब्ज डॉलर्स झाली. 

डिसेंबर २०१८ तिमाहीचे कंपन्यांचे विक्री व नफ्याचे आकडे उत्तम आल्यामुळे शेअरबाजारात सुधारणा होत आहे. 
राणा कपूर जानेवारीअखेर पायउतार झाल्यानंतर येस बॅंकेचा शेअर १७५ रुपयांपर्यंत घसरला होता. कंपनीच्या २०१८ तिमाहीचा नफाही मागील वर्षाच्या तुलनेत ७ टक्‍क्‍याने कमी झाल्याने घसरणीला हातभार लागला. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेचा तपासणी अहवाल जाहीर केला. बॅंकेने बुडीत कर्जे, त्याबाबतच्या तरतुदी आणि एकूण जिंदगीचे व्यवस्थापन यात काहीही गफलत केली नाही, असे आढळून आल्याने शेअर ३५ टक्के वाढला आणि २३५ रुपयांवर गेला. त्यानंतर तो आता २०८ ते २१५ रुपयांच्या पातळीत स्थिर आहे. सध्याच्या भावाला शेअर जरूर खरेदी करावा, अशी जे एम फिनान्शियल तसेच अन्य ब्रोकरेज संस्थांनी शिफारस केल्यामुळे तो आता वर जात राहील. वर्षभरात तो ३०० रुपयांपर्यंत जावा अशी अटकळ आहे. राणा कपूर यांच्या व्यवस्थापनाला हे एक प्रकारचे शिफारसपत्रच आहे. 

मागील लेखात हेग या ग्रॅफाईट इंडियाबद्दल विस्ताराने लिहिले होते. अजूनही गुंतवणुकीला त्यात बराच वाव आहे. वर्षभरात ग्रॅफाईट व हेग सध्यापेक्षा ३० टक्‍क्‍याने तरी वाढतील. 

फेब्रुवारीतला उत्तम अर्थसंकल्प आणि रिझर्व्ह बॅंकेने केलेली रेपो दरातील घट यामुळे बाजारात निफ्टी व निर्देशांक टिकून आहेत. एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला सार्वजनिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जर घसघशीत बहुमत मिळाले आणि यंदाचा पावसाळाही समाधानकारक झाला, तर वर्षभरात निर्देशांक ३९ हजार ते ४० हजार पर्यंत पोचावा. 

पिरामल एंटरप्रायझेसने लोढा समूहाच्या मुंबई महानगरातील टाऊनशिपमध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले आहे. त्यामुळे सध्याच्या २१०० रुपयांच्या पातळीवर हा शेअर जरूर घेण्यासारखा आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ८.६५ पट दिसते. वर्षभरात तो ३५ टक्‍क्‍यांवर जाईल. 

येस बॅंक, पिरामल एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, दिलीप बिल्डकॉन, ब्रिगेड एंटरप्रायझेस इथेही गुंतवणूक अवश्‍य करावी. दिलीप बिल्डकॉन सध्या ४१० ते ४४० च्या दरम्यान उपलब्ध आहे. वर्षातील त्याचा उच्चांकी भाव १२४७ रुपये होता. १०६५ किं/उ गुणोत्तराला उपलब्ध असलेला हा शेअर वर्षभर ठेवण्याजोगा आहे.   
 

संबंधित बातम्या