निवडणुकांमुळे तेजी 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 11 मार्च 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात अर्थकारणापेक्षा राजकारणालाच जास्त महत्त्व आले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल-मेमध्ये पार पडेपर्यंत ते तसेच कायम राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार आणि अन्य राज्यांतून जाहीर सभा घेत अप्रत्यक्षपणे निवडणुकीचे रणशिंग फुंकलेच आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर सज्ज आहेत. नरेंद्र मोदी अतिरेकी पाऊल उचलणार नाहीत, हे नक्कीच; पण पाकिस्तान काही आगळीक करणारच नाही, याची खात्री नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एक सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो. साऱ्या जगाचे लक्षही आता भारत-पाकिस्तानकडे लागले आहे. लंडनच्या प्रसिद्ध ‘इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने २ मार्चच्या अंकात भारताविषयी तीन पाने मजकूर प्रसिद्ध केला आहे. वातावरण असेच राहिले आणि सर्जिकल स्ट्राईक झालाच, तर लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३१० ते ३२५ पर्यंत जागा मिळाव्यात. त्यामुळे पुढील पाच वर्षे परत समर्थ व सक्रिय सरकार दिल्लीमध्ये असेल... आणि मग अर्थकारण जास्त प्रवाही होईल. जुलैच्या आगामी अर्थसंकल्पात आर्थिक घोषणांची बरसात असेल, तोपर्यंत निसर्गातही बरसाती मोसम सुरू झाला असेल. 

महाराष्ट्रातही भाजप व शिवसेनेने आपली युती जाहीर केली आहे. त्यामुळे अनिश्‍चितता निश्‍चित संपली आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. भाजपला २५ पैकी किमान २२ जागा तरी मिळतील. शिवसेनाही २० च्या आकड्यांपर्यंत जाऊ शकेल. 

एका बातमीनुसार जैशे महंमदचा मसूर अझर याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील एका लष्करी रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजारावर त्याच्यावर उपचार सुरू होते. 

पुलवामानंतर जम्मू-काश्‍मीरमधील हंडवारा येथेही झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्‍यांचा खात्मा झाल्याची बातमी आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली होती. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अजित डोवल व परराष्ट्र सचिव विजय गोखले हेही उपस्थित होते. १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या परिषदेची स्थापना केली होती. ब्रजेश मिश्रा हे परिषदेचे पहिले सल्लागार होते. 

आता अर्थकारणाकडे थोडी नजर टाकता, बॅंक खात्यांसाठी आधार कार्डाचा उपयोग ग्राहकांच्या मर्जीवर ठेवण्यात आला आहे. मोबाईल फोनमधील सिमकार्डांसाठीही त्याची सक्ती असणार नाही. लोकसभेमध्ये याबाबतचे विधेयक आधीच मंजूर झाले असले, तरी राज्यसभा २ मार्चला स्थगित झाली असल्यामुळे तिथे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. याबाबतच्या वटहुकुमाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्‍यक होती. 

निवडणुकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुकीत आंबेडकरांनी बारा जागांसाठी हा समझोता केला आहे. 

हे आर्थिक वर्ष (२०१८-१९) संपण्यासाठी मार्च हा शेवटचा महिना आहे. त्यातील बॅंकांतील मुद्रा कर्जयोजनेत आतापर्यंत फक्त दोन लाख कोटी रुपयांचीच कर्जे दिली गेली आहेत. या वर्षीचे उद्दिष्ट तीन लाख कोटी रुपयांचे होते. ३.८९ लाख कोटी रुपयांसाठी कर्जांची मंजुरी दिली गेली आहे. पण २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात याबाबतचे उद्दिष्ट तीन लाख कोटी रुपयांचे ठरवले गेले होते. आतापर्यंतच्या झालेल्या वितरणात महिलांना मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली गेली आहेत. 

इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रकल्पांपैकी ३६९ प्रकल्पांचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने ते अपुरे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी (GDP) २९.५ टक्के इतका भाग इन्फ्रास्ट्रक्‍चर व बांधकामातला आहे. अदानी समूहाने कॉम्प्रेस नॅचरल गॅसच्या किरकोळ विक्रीसाठी जयपूर व उदयपूरमध्ये वितरणाची परवानगी मागितली होती, पण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंडळाने ती देण्याचे नाकारले आहे. राजस्थान राज्य सरकारने २००५ मध्ये या प्रकल्पांसाठी अदानी गॅस कंपनीला परवानगी दिली होती. तेव्हापासून हा प्रकल्प रखडतच आहे. 

भारतातील शेअरबाजार जानेवारी २०१८ पासून तेजीत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये १९,७२८ कोटी रुपये घातले होते. त्यापैकी जास्तीत जास्त रक्कम फेब्रुवारी महिन्यातच आली आहे. तरीही जानेवारी व फेब्रुवारीमध्ये अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. 

गेल्या आठवड्यात रवनीत गिल यांनी येस बॅंकेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांची कार्यकारी संचालक म्हणून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नेमणूक झाली. रिझर्व्ह बॅंकेने त्याला मंजुरी दिली आहे. शेअरबाजाराने याचे स्वागत केले आहे, त्यामुळे शुक्रवारी १ मार्चला येस बॅंक २३८ रुपयांपर्यंत चढला. सध्या रोज ४ कोटी शेअर्सपेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होत आहे. येस बॅंक १७५ रुपयांपर्यंत उतरला होता, तेव्हापासून हा शेअर घेण्याबद्दल या लेखमालेत आवर्जून लिहिले गेले होते. अजूनही संधी गेलेली नाही. वर्षभरात हा शेअर ३०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 

पावसाळ्यापूर्वी सोभा, ओबेरॉय रिॲल्टी, ब्रिगेड एंटरप्राइझेस, दिलीप बिल्डकॉन आणि अशोक बिल्डकॉनमध्येही गुंतवणूक फलदायी ठरेल. अशोका बिल्डकॉनने १३८२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी निविदा भरलेल्या आहेत. त्यांचे भाव सर्वांत कमी असल्यामुळे ही कामे त्यांना मिळावीत. डिसेंबरच्या तिमाहीत तिच्या विक्रीत ६१ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; तर अंकलेश्‍वर येथे कंपनीला मोठी कामे मिळाली आहेत. कंपनीकडे सध्या ९५०० कोटी रुपयांची कामे आहेत. त्यापैकी महामार्गांची कामे ७००० कोटी रुपयांची आहेत. ऊर्जा, पारेषण व वितरण क्षेत्रात १३०० कोटी रुपयांची कामे आहेत. रेल्वेची कामे ७०० कोटी रुपयांची आहेत. सध्या हा शेअर १२० रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यांत कंपनीच्या शेअरने १९६ रुपयांचा उच्चांकी भाव गाठला होता; तर नीचांकी भाव ९४ रुपये होता. वर्षभरात हा शेअर पुन्हा १७५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सध्या रोज १२ लाख शेअर्सचा व्यवहार होत आहे. 

विसाखा इंडस्ट्रीज या ॲस्बेस्टॉसचे पत्रे करणाऱ्या कंपनीत सध्या ३४० ते ३५० रुपयांच्या आसपास गुंतवणूक केली, तर वर्षभरात ५० टक्के नफा मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र या गुंतवणुकीत जोखीम जरा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली शक्ती ओळखून व कंपनीचा पूर्णपणे अभ्यास करून गुंतवणूक करावी. 

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनची डिसेंबर २०१८ तिमाहीची विक्री व नफा ६४ टक्‍क्‍याने वाढला आहे. नक्त नफा ८२६३ कोटी रुपये झाला. डिसेंबर २०१७ तिमाहीचा नफा ५०१४ कोटी रुपये होता. सध्या हा शेअर घेतल्यास वर्षभरात त्यात किमान ३५ टक्के नफा मिळेल. कंपनीची डिसेंबर २०१७ व डिसेंबर २०१८ तिमाहीची विक्री अनुक्रमे २२,९९६ कोटी रुपये व २७,६९४ कोटी रुपये होती. कंपनीने प्रत्येक शेअरसाठी ५.२५ रुपये लाभांश जाहीर केला होता. मार्च १ पर्यंत ज्यांनी खरेदी केली असेल, त्यांना मार्च ६ ला हा लाभांश मिळाला असेल. कंपनीने २५.२९ कोटी समभाग बाजारातून १५९ रुपयांच्या भावाने पुनर्खरेदी करण्याचे ठरवले आहे. ONGC व ऑइल इंडिया लिमिटेडला सरकारने नवीन तेलक्षेत्रे हुडकण्यासाठी उत्तेजन द्रव्य (Incentive) देण्याचे ठरवले आहे. ONGC चा वर्षभरातील उच्चांकी भाव १९२ रुपये होता. रोज सुमारे १ कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ८.७ पट पडते. ऑइल इंडिया लिमिटेडचा शेअर सध्या १८० रुपयांच्या आसपास मिळत आहे. या शेअरचा वर्षातील उच्चांकी भाव २४८ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर साडेसात पट दिसते. 

निवडणुका जाहीर होईपर्यंत तेजी चालूच राहील, मग थोडी मंदी अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या