शेअर बाजारात उलाढाल

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 18 मार्च 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. लोकसभेच्या निवडणुकीची साधारण सात टप्प्यांत मतमोजणी होईल. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली असल्याने बऱ्यापैकी बाहेरून तरी वातावरण शांत जाणवत आहे. तसेच सर्व पक्षांनी आतापर्यंत केलेल्या घोषणाबाजीवरून कोणत्या पक्षाला किती फायदा होतो ते बघणे औत्सुक्‍याचे ठरेल.  

पुलवामावरील हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान आक्रमक होण्याची भाषा करू लागला असला, तरी त्यात फारसा दम असणार नाही. पाकिस्तानचे एक ड्रोन विमान राजस्थानमध्ये पाडण्यात आले आहे, त्याचाही फायदा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला होईल. कोलकातामध्ये नुकतीच १००० किलो स्फोटक द्रव्ये हस्तगत करण्यात आली आहेत. अन्यत्रही असे प्रकार होणार नाहीत, याबद्दल दक्षता घेतली जात आहे. 

जवळजवळ चार वर्षांनंतर मिझोराम राज्यात मद्यपानबंदी करण्यात आली आहे. ‘मिझो नॅशनल फ्रंट’ने याच मुद्यावर दहा वर्षांनंतर निवडणुका जिंकल्या आहेत. मार्च ३१ पूर्वी सरकारने सरकारी निवासस्थाने आणि सर्व हॉटेलांमधील दारूचे साठे संपवण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणुका जवळ येत आहेत, तशा आयाराम गयारामांच्या हालचाली सुरू होतील. गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर भाजपमध्ये जाण्याच्या वावड्या उठल्या होत्या, पण त्याचे त्यांनी खंडन केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा एकत्र आल्यानंतर त्या गठबंधनात काँग्रेसही जाणार का? याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले होते, पण प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये नवीन जबाबदारी टाकली असल्यामुळे त्या स्वतःची शक्ती आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.

नीरव मोदी हा हिरे व्यापारी काही दिवसांपूर्वी भारतातून पळून गेला होता. त्याचा लंडनमधील पत्ता हुडकण्यात केंद्रीय अन्वेषण खात्याला यश आले आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताचे लक्ष सध्या चीन व अमेरिकेतील संभाव्य व्यापार करारावर आहे. या करारामुळे अमेरिकेचाच जास्त फायदा होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. हा करार झाल्यास चीन अन्य देशातूनही काही आयात करू शकेल. त्यामुळे भारताचाही त्यात फायदा होऊ शकेल.

कर्नाटकमध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणावर पडला असल्यामुळे, खरीप आणि रब्बी पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. बंगलोरमध्ये नुकतेच ‘एरो इंडिया २०१९’ हे प्रदर्शन पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबरच केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यावेळी उपस्थित होत्या. ४०३ जणांनी त्यात भाग घेतला होता. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात ५१ राष्ट्रांनी आणि ४४ अधिकृत सरकारी शिष्टमंडळांनी भाग घेतला होता.

निवडणुकांच्यावेळी शेअरबाजार म्हणावा तितका स्थिर नसतो. यावेळेलाही त्यात बऱ्याच उलाढाली होत आहेत. १ मार्चपासून येस बॅंकेच्या कार्यकारी संचालकपदावर, राणाकपूर यांच्या जागी गिल आले आहेत. आल्या आल्याच त्यांना बॅंकेच्या SWIFT कारभाराबद्दल १ कोटी रुपयांचा दंड भरावा लागला आहे. रिझर्व्ह बॅंकेने असा दंड एकूण दहा बॅंकांना ठोठावला आहे. येस बॅंक सध्या २३२ रुपयांपर्यंत वाढला आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत म्हणजे येत्या नऊ महिन्यांत तो ३०० रुपयांपर्यंत जावा. युनायटेड ब्रुअरीजचे जे शेअर्स बॅंकेच्या डिपॉझिटरी खात्यावर होते, त्यावर किंगफिशर एअरलाईन्सच्या वसुलीबाबत नेमल्या गेलेल्या वसुली अधिकाऱ्याने टाच आणल्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने ते शेअर्स वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायला सांगितले आहेत. अर्थात बॅंकेच्या व्यवहारावर याचा काहीही परिणाम होणार नाही. गुंतवणूकदारांनी अजूनही येस बॅंकेचा शेअर जरूर घ्यावा. वर्षभरातील पुढील तिमाही आकड्यांकडे लक्ष द्यायला हवे.

सुवेन लाईफ सायन्सेसमध्येही गुंतवणूक करण्याबद्दल पूर्वी लिहिले होते, तेव्हापासून तो शेअर वरच जात आहे. कंपनी अमेरिकेमध्ये एक उपकंपनी स्थापन करणार आहे, त्यात साडेसात कोटी डॉलर्सची (५२५ कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. या कंपनीत ‘काँट्रक्‍ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्‍चरिंग सर्व्हिसेस’चा (CRAMS) विभाग स्थापला जाईल. सध्या हा शेअर २६५ रुपयांना उपलब्ध आहे. नजीकच्या भविष्यात तो ३०० रुपयांची पातळी ओलांडेल. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव ३३७ रुपये होता, तर नीचांकी भाव १६१ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर २७.३ पट पडते. रोज ८ लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. शेअरचे किं/उ गुणोत्तर जरी जास्त दिसले, तरी हा शेअर आवर्जून घ्यावा.

भागभांडारात नेहमी असावा असा शेअर म्हणजे स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीज हा आहे. सध्या हा शेअर २६९ रुपये आहे. फेब्रुवारी १२ ला या शेअरने गेल्या वर्षातील १८१ रुपये हा नीचांकी भाव नोंदवला होता. हा शेअरही ३०० रुपयांची सीमा ओलांडू शकेल.

पिरामल एंटरप्राइझेसमध्येही गुंतवणूक करण्याबद्दल पूर्वी लिहिले आहे. दोन महिन्यांपूर्वी तो २००० रुपयांपर्यंत उपलब्ध होता. आता तो २५८८ रुपयांपर्यंत गेला आहे. नजीकच्या भविष्यात तो २८०० रुपयांपर्यंत जावा.
 जेएसडब्ल्यू स्टील हा शेअरही २८० ते २९० रुपयांच्या पातळीत खरेदी करता येईल. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव ४२७ रुपये होता. कंपनीची मार्च २०१९ व मार्च २०२० ची संभाव्य विक्री ८५९५० कोटी रुपये व ९९७०० कोटी रुपये अनुक्रमे ठरावी. संभाव्य नक्त नफा ८३६९ कोटी रुपये व १००२० कोटी रुपये अनुक्रमे असू शकेल. २०२० मार्च वर्षासाठी शेअरगणिक संभाव्य उपार्जन ४१.७५ रुपये धरले तर किं/उ गुणोत्तर फक्त ७.१३ पट दिसेल. डिसेंबर २०१८ च्या तिमाहीसाठी कंपनीचा नक्त नफा १६०३ कोटी रुपये होता. कंपनीची विक्री गेल्या तिमाहीत ३६ लाख मेट्रीक टन इतकी होती. भूषण स्टील अँड पॉवर या कंपनीची जिंदगी नुकतीच तिने विकत घेतली आहे.

मॅंगनीज ओअर इंडिया लिमिटेड (MOIL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा शेअर सध्या बराच उतरला आहे. कंपनीची २०१८ तिमाहीची विक्री ३३२ कोटी रुपये होती...आणि ढोबळ नफा १८५ कोटी रुपये होता. नक्त नफा १२० कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१७ तिमाहीपेक्षा नफा १६ टक्‍क्‍याने जास्त आहे. कंपनीने सध्या आपल्या उत्पादनाच्या विक्रीच्या किमती कमी केल्या आहेत. सध्याच्या भावाला हा शेअर घ्यायला आकर्षक वाटतो. कंपनीला २०१६ पासून पारसोडा मॅंगेनीज खाणीच्या उत्खननाचे हक्क मिळाले आहेत. या खाणी नागपूरजवळ आहेत. उत्खननाचे हे हक्क २०६६ पर्यंत अबाधित राहतील. ओपन कास्ट माईनिंग पद्धतीप्रमाणे पुढील महिन्यापासून तिथे उत्पादन सुरू होईल. पारसोडा खाण नागपूरपासून ४६ किलोमीटरवर आहे. तिचे क्षेत्रफळ ५३.७५ हेक्‍टर आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला सुमारे २० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.
 तीन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होत असल्यामुळे कावेरी सीड कंपनी व अवंती फीड्‌स या कंपन्यांवर लक्ष केंद्रित होत असते. आंध्र प्रदेश राज्य सरकारने कावेरी कंपनीचा कापूस उत्पादनाचा परवाना १ वर्षभर रद्द केला आहे. त्यामुळे जर कुणी पूर्वी इथे गुंतवणूक केली असेल, तर तिथून बाहेर पडावे...आणि अवंती फीडस्‌मध्ये गुंतवणूक करावी. हा शेअर सध्या ४१२ रुपयांना उपलब्ध आहे. वर्षभरातील उच्चांकी भाव २३७० रुपये होता. सध्या रोज १० लाख शेअर्सचा व्यवहार होतो.

संबंधित बातम्या