बाजारभाव तेजीत...

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 8 एप्रिल 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मार्च ३१ ला संपले. निर्देशांक ३८,६७३ वर बंद झाला, तर निफ्टी ११,६२४ वर बंद झाला. वर्षभरात निर्देशांक १७ टक्‍क्‍यांवर गेला, तर निफ्टी १५ टक्‍क्‍यांवर गेला. त्यातल्या त्यात मार्चच्या एका महिन्यातच निर्देशांक ७ टक्‍क्‍याने वाढला होता. गेल्या चार वर्षातला हा वाढीचा उच्चांक आहे. यापूर्वी २०१४-२०१५ मध्ये निर्देशांक २४.८९ टक्‍क्‍यांनी वाढला होता. जगभरातील सर्व बाजारांत, अमेरिका व चीनमधील व्यापाराच्या संदर्भात प्रगती दिसल्याने मंदीला वाव नव्हता. विदेशी सांस्थिक (FII) गुंतवणूकदारांनी बाजारात बरेच डॉलर्स ओतले. निर्यातीमुळेही बरेच डॉलर्स आले. निर्यातदारांनी व बॅंकांनी बाजारात डॉलर्स विकले.

वेदांत, ओ.एन.जी.सी., टाटा स्टील व टाटा मोटर्स वाढले, पण मार्च अखेर बजाज ऑटो, ॲक्‍सिस बॅंक, इंडुसिंड बॅंक, आय.टी.सी. आणि एन.टी.पी.सी. घसरले. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात येस बॅंक ९ टक्‍क्‍याने वाढून २७५ रुपयांवर स्थिरावला. इंडुसिंड बॅंक ६ टक्‍क्‍याने वाढून १७८० रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टस्‌ अँड सेझ ६ टक्‍क्‍याने वाढला. मिड कॅप इंडेक्‍स आणि स्मॉल कॅप इंडेक्‍सही बरेच वाढले. शेवटच्या दिवशी एम.एस.टी.सी.ने बाजारात आपल्या शेअर्सची नोंदणी केली. प्राथमिक विक्रीच्या दरापेक्षा शेअरची नोंदणी कमी भावात म्हणजे ११४.२० रुपयांना झाली.

सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल अजून पावणेदोन महिन्यांनी म्हणजे २३ मे रोजी जाहीर होणार आहेत. पण नरेंद्र मोदी व भाजप हेच सत्ता टिकवतील, अशा अंदाजाने बाजार मजबूत आहे. डॉलर - रुपयाचा विनिमय दरही वधारून ६९.४ वर थांबला आहे. विदेशी गुंतवणूकदार सतत मुंबई बाजारात खरेदी करत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आणि जुलैमध्यापर्यंत पावसाळाही चांगला झाला, तर दिवाळीपर्यंत शेअरबाजार भरपूर वर जाईल.

भारताने २९ अमेरिकन वस्तूंवर सीमाशुल्क लावायचे ठरवले होते. सध्या हा निर्णय २ मेपर्यंत स्थगित झाला आहे. भारत-अमेरिकेत व्यापार करार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याने ही मुदत लांबणीवर टाकली गेली आहे. जून २०१८ पासून हा निर्णय स्थगित केला गेला आहे.

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत गेल्या बुधवारी रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर झाले असेल. त्यावेळेस रेपो दरात जर पाव टक्का कपात झाली असेल, तर बाजार वर जाण्याची शक्‍यता बळावेल.

जेट एअरवेज सध्या संकटात सापडली आहे. तिची विमाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर फक्त उभी आहेत. वैमानिकांचे पगार न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मार्च अखेर स्टेट बॅंक कंपनीला काही कर्जे देणार होती; पण तसे न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

२०१८-२०१९ आर्थिक वर्षामध्ये प्राथमिक भाग विक्री फार कमी प्रमाणात झाली. फक्त ५६,४४० कोटी रुपयांचीच विक्री झाली. २०१७-२०१८ या वर्षात गतवर्षीपेक्षा ८१ टक्के विक्री कमी झाली. मात्र, कर्जरोख्यांचे ३६,७१५ कोटी रुपयांचे २६ ‘इश्‍यूज’ बाजारात आले. पाच वर्षांतील हा उच्चांक होता. विक्रीच्या आकड्यांत प्राथमिक भाग विक्री आणि अनेक पद्धतीच्या भाग विक्रीचा समावेश होता. सध्या ६४ कंपन्या, सेबीची संमती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्राथमिक विक्रीचा ओघ किती कमी होईल हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील. मागच्या वर्षी प्राथमिक विक्री केलेल्या ज्या कंपन्यांनी शेअरबाजारात नोंदणी केली, त्यातल्या फक्त दोन कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. HDFC Asset Management आणि RITES यांना चांगला प्रतिसाद मिळाला. १०६ लघु व मध्यम आकाराच्या कंपन्यांनी फक्त १६२० कोटी रुपयांची विक्री केली. सार्वजनिक कर्जरोखे बाजारात दिवाण हाउसिंग फायनान्सने १०,९४५ कोटी रुपयांची विक्री केली. अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स आणि टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस होते. त्यांची रोखेविक्री अनुक्रमे ३६४९ कोटी रुपये व ३३७३ कोटी रुपये होती.

गटांगळ्या खात असलेल्या व्हेनेन्झुएलावर अमेरिकेने आपला दबाव वाढवला आहे. भारतासह अनेक अन्य देशांनी व्हेनेन्झुएलातून पेट्रोल विकत घेऊ नये, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे तिथली जुलमी हुकूमशाही संपून लोकशाही स्थापनेला मदत होईल, असे अमेरिकेला वाटते.

भारतातील शेअरबाजारात फेब्रुवारी व मार्चमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ५१,००० कोटी रुपये काही कंपन्यांत घातले, तर काही कंपन्यांची ४१,००० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. २०१९-२०२० या वर्षात आणि विशेषतः त्यातील पहिल्या आर्थिक सहामाहीत सरकार बाजारातून मोठ्या प्रमाणावर कर्ज उभे करणार आहे. येत्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ती रक्कम थोडी कमी असेल. पहिल्या सहामाहीत एकूण कर्जापैकी ६२.३ टक्के रक्कम उभी केली जाईल. ही रक्कम ४.४२ लाख कोटी रुपये असेल. आपली रक्कम उभी करताना बाजारातील अन्य कर्जरोख्यांवर ताण येणार नाही, याची सरकार काळजी घेणार आहे.

फेब्रुवारी अखेर संपलेल्या ११ महिन्यांत वित्तीय तूट, अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा २३४.२ टक्के झाली आहे, असे अर्थव्यवहाराचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी म्हटले आहे. ही वित्तीय तूट आताच ८.५१ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एकूण वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३.४ टक्के असणार आहे.

डिसेंबर २०१८ ला संपलेल्या तिमाहीत व्यापारतुलेतील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २.५ टक्के होऊन ती, १४५.३ अब्ज डॉलर्स होणार आहे. पेट्रोल तेल निर्माण करणाऱ्या व विकणाऱ्या राष्ट्रांनी तेलाचे भाव वाढवण्याचे ठरवले असल्यामुळे पेट्रोलच्या भावात यापुढे सतत वाढच दिसेल.

निर्देशांक आता ३८,७०० रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या महिन्यातील किमान नीचांक ३२,९७२ होता. म्हणजे त्यात वर्षभरात १७ टक्के वाढ झाली आहे. उत्तम वर्धिष्णू कंपन्यांत जर डोळसपणे गुंतवणूक केली, तर वर्षभरात २५ ते ३० टक्के नफा मिळणे अशक्‍य नसते. निफ्टी सध्या ११,६७० पर्यंत आहे. गेल्या बारा महिन्यांतील किमान नीचांक १०,००४ होता. म्हणजे इथेही सुमारे १७ टक्के वाढ दिसते. दोन महिन्यांपूर्वी येस बॅंक १७५ रुपयांपर्यंत होता. आता तो ६० टक्के वाढून २८० रुपयांपर्यंत गेला आहे. येस बॅंकेत सतत आवर्जून गुंतवणूक करावी असे, या लेखमालेत तीन महिने लिहीत आहे. बजाज फायनान्स हा सदा हरितपर्णी शेअर आहे. आता त्याने ३०५० रुपयांची पातळी ओलांडली आहे. या शेअरचा बारा महिन्यांतील किमान भाव १७९० रुपये होता. म्हणजे इथेही ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ मिळाली आहे. पिरामल एंटरप्राइझेस २००० ते २२०० रुपये होता, तेव्हापासून त्याचा परामर्श घेतलेला आहे. आता तो २७९० रुपयांपर्यंत गेला आहे. हाही शेअर वर्षभरात ३४०० रुपयांची पातळी ओलांडेल. पिरामल एंटरप्राइझेस वित्तीय क्षेत्रात आणि औषधी क्षेत्रातही आहे.

इंडिया बुल्स हाउसिंग सध्या ८६० रुपयांच्या आसपास आहे, तोही अजून घ्यावा. वर्षभरात तो १३५० रुपये सहज होऊ शकतो.
लार्सन अँड टुब्रोने माईंड ट्रीचे आग्रहण करण्याचा निश्‍चय केलेला दिसतो आहे. माईंड ट्री सध्या ९४५ रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात तो ११५० रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो. नोसील सध्या १४५ रुपयांना उपलब्ध आहे. हा शेअर सध्या घेतल्यास वर्षभरात किमान ४० टक्के नफा मिळू शकतो. आय.जी. पेट्रोकेमिकल्स ३०० रुपयांच्या आसपास मिळत आहे. हा शेअरही वर्षभरात ४० टक्‍क्‍यांवर नफा देऊन जाईल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ६.२४ पट आहे. पेट्रोनेट एल. अँड जी.चे किं/उ गुणोत्तर १७.९ पट असूनही त्यात अजून वाढ शक्‍य आहे. त्यामानाने आय.जी. पेट्रो बराच स्वस्त आहे. मनाली पेट्रो केमिकल सध्या २६ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचे किं/उ गुणोत्तर फक्त ७.५३ पट आहे. हा शेअरही वर्षभरात किमान ४० टक्के नफा देऊन जाईल.

सन टेक रिॲलिटी सध्या ४६० ते ४७० रुपयांच्या आसपास घेतला, तर त्यातही चांगली वाढ मिळणे शक्‍य आहे. सुब्रॉस सध्या २६० ते २७० रुपयांच्या मध्ये उपलब्ध आहे. दोन महिन्यांपूर्वी तो २२५ रुपयांपर्यंत उपलब्ध होता. घरामध्ये लावणाऱ्या वातानुकूलित यंत्रासाठी सुब्रॉसने नुकताच झामिल एअरकंडिशनर्सबरोबर एक करार केला आहे. त्यामुळे हा शेअरही चांगला वाढेल. झामिल कंपनीची काही जिंदगी सामंजस्य करारानुसार सुब्रॉस घेणार आहे. सुमारे ५ लाख यंत्रे (एअरकंडिशनर्स) ती विकेल. सुब्रॉस १९८५ साली स्थापन झाली आहे.

आतापर्यंत या लेखात अनेक शेअर्सचा परामर्श जरी घेतला असला, तरीही गुंतवणूकदारांनी स्वतःही थोडाफार अभ्यास करून शेअर्सची निवड करणे इष्ट ठरेल.
 

संबंधित बातम्या