गुंतवणुकीस अनुकूल

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 15 एप्रिल 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा एव्हाना पार पडला आहे. आता सर्वच पक्षांना स्फुरण चढले असून, अर्थकारण मागे पडले आहे. नाही म्हणायला गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने रेपो व्याजदरात पुन्हा पाव टक्‍क्‍याने कपात करून तो सहा टक्‍क्‍यांवर आणला आहे. २०१९ सालातील ही दुसरी कपात आहे, त्यामुळे निवासिकांसाठी वा वाहनांसाठी कर्जे घेणाऱ्यांचा मासिक हप्ता थोडा कमी होऊ शकेल (बॅंकांनीही आपल्या व्याजदरात कपात केली तर). पण बॅंका तसे करणार नाहीत असे चित्र आजतरी आहे.
अन्य बातम्यांत, अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणाऱ्या क्षेपणास्त्राची (A-Sat) यशस्वी चाचणी घेतली आहे. ओडिशातील बालासोर येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या A-sat ने सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह टिपला. अवघ्या तीन मिनिटांत ही कामगिरी झाली आणि अशी क्षमता असलेला, अमेरिका, रशिया व चीननंतर भारत हा चौथा देश झाला आहे. मात्र, अमेरिकेने भारताने पाडलेल्या उपग्रहाच्या अंतराळातील ४०० अवशेषांचा मुद्दा उपस्थित करत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे तुकडे फार लहान असल्यामुळे त्यांना ट्रॅक करणे अवघड आहे. अमेरिकेने आतापर्यंत असे ६० तुकडे मिळवले आहेत. हे तुकडे ६ इंचापेक्षा मोठे आहेत. भारताने अंतराळ कक्षेत असलेल्या सर्व उपग्रहांच्या खाली ही चाचणी घेतली. आता सध्या अंतराळात भारत, चीन, रशिया यांचे २३००० तुकडे फिरत आहेत. बारा वर्षांपूर्वी चीनने ५३० मैलांवर घेतलेल्या उपग्रह चाचणीमुळे हे तुकडे पडले आहेत. हे तुकडे हळूहळू वातावरणात येतील; तसतसा त्यांचा धोका कमी होईल.

भारत अमेरिकेकडून एमएच ६० रोमिओ सी-हॉक हेलिकॉप्टर्स विकत घेणार आहे, त्यासाठी २.४ अब्ज डॉलर्स एवढी रक्कम भारताला द्यावी लागेल. ही हेलिकॉप्टर्स समुद्रातील पाणबुड्यांचा अचूक वेध घेतात. जमिनीवरून, जहाजातून, विमानवाहक कॅरिअर्सवरून आणि क्रूझर्सवरून त्यांचे उड्डाण होऊ शकेल. सध्या ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या नौदलात आहेत. या व्यवहारामुळे भारताचे व अमेरिकेचे संबंध मजबूत होतील. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र महंमद बिन झायेद यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीने नुकतेच पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैशे महंमदचा सदस्य निसार अहंमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिले होते. जम्मू-काश्‍मीरच्या लेथ पोल येथील सीआरपीएफच्या तळावर त्याने हल्ला केला होता.

काही दिवसांपूर्वीच ऑगस्टा वेस्टलॅंड डील प्रकरणातील एक प्रमुख आरोपी ख्रिश्‍चियन मिशेललाही भारताच्या ताब्यात दिले आहे.भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीचा लंडनमधील न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी २६ एप्रिलला होणार आहे.

निवडणुकीमध्ये आपला पक्ष मोठ्या संख्येने निवडून यावा म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिरिरीने प्रयत्न करीत आहेत. उत्तर भारतात अमेठीतून उभे राहणाऱ्या राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. डाव्या पक्षांच्या उमेदवारांबरोबर गांधी या नावाचे तीन वेगवेगळे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी के. राघूल गांधी हे पत्रकार आहेत. दुसरे शिवप्रसाद गांधी हे संस्कृत शिक्षक आहेत. वायनाड मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे; पण प्रत्यक्ष निकाल २३ मेला म्हणजे १ महिन्यानंतर लागणार आहे. मतदानाच्या दिवशी पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटरवर ५० पैसे सूट देण्याची घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केली आहे. बोटावरचे मतदानाचे चिन्ह (मतदानाची काळी शाई) दाखवून ग्राहक ही सूट घेऊ शकतील. भारतात एकूण ६४ हजार पेट्रोलपंप आहेत. निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसने १२ कोटी लोकांना ७२ हजार रुपये वर्षाला द्यायचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, हे पैसे कुठून येतील याचा खुलासा झालेला नाही.

लालकृष्ण अडवानी यांना आणि मुरली मनोहर जोशी यांना अतिवृद्ध झाल्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचे सध्या विरोधी पक्ष भांडवल करत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तळागाळात रुजलेल्या तृणमूल काँग्रेसला भाजपने खडे आव्हान उभे केले आहे. पिरामल समूह आणि अमेरिकेतील बारिंग प्रायव्हेट इक्विटी यांनी दिवाण हाऊसिंग फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे तो सध्या १४९ रुपयांपर्यंत वर चढला आहे. थोडीशी जोखीम घेऊ शकणाऱ्यांनी सध्याच्या भावात इथे गुंतवणूक करावी.

गुंतवणूक करण्यासाठी सध्या सनटेक रिॲल्टीची निवड करता येईल. सध्या तो ४७५ रुपयांच्या आसपास मिळत आहे. वर्षभरात तो ४० टक्के वाढून ६६० रुपयांपर्यंत जावा. सनटेकचे सध्या मुंबईतील गोरेगाव पश्‍चिम व नायगावमध्ये दोन प्रकल्प चालू आहेत. कंपनी नजीकच्या भविष्यात तिथे ७५ निवासिका विकणार आहे. नायगावमधील तिच्या २००० निवासिकांसाठी मोठी मागणी आली होती. एक छोटेसे १० हजार लोकसंख्येचे उपनगरच तिथे उभे राहणार आहे, त्यामुळे निवासिकांचे भाव वाढणार आहेत. आर्थिक वर्ष २०२० - २०२१ मध्ये कंपनीचे ढोबळ व नक्त नफ्याचे प्रमाण भरपूर वाढणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍समधेही तिची बरीच कामे चालू आहेत. मार्च २०१९, मार्च २०२० व मार्च २०२१ साठी तिची अपेक्षित विक्री अनुक्रमे ८०० कोटी रुपये, १२५० कोटी रुपये व १९०० कोटी रुपये व्हावी. मार्च २०२० व मार्च २०२१ साठी तिचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे २२ व २९ रुपये व्हावे. सध्याचे ३० पटीचे किं/उ गुणोत्तर विचारात घेता शेअरच्या भावात सतत वाढ होईल हे उघड आहे.

रेपो दर जरी कमी झाला असला, तरी बजाज फायनान्स, मन्नापूरम फायनान्स, मुथूट फायनान्स, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, श्रीराम सिटी फायनान्स या नॉन बॅंकिंग वित्त विभागातील कंपन्या आपले दर कमी करणार नाहीत. त्यामुळे या सर्व कंपन्यांत आपल्या कुवतीप्रमाणे गुंतवणूक जरूर करावी.

मे अखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आणि पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार हे सिद्ध झाले, की शेअरबाजार वर राहील. जुलै, ऑगस्टमध्ये जर पावसाळा समाधानकारक झाला, तर तेजी बरकरार राहावी. आपल्या भाग भांडारात मात्र १० ते १५ शेअर्सपेक्षा जास्त शेअर्स नसावेत. गुंतवणुकीच्या रकमेपैकी किमान ५ टक्के व कमाल २५ टक्के रक्कम घालायच्या मर्यादा निश्‍चित केल्या, तर गुंतवणूक आवाक्‍यात राहाते. पुनरुक्तिचा दोष पत्करूनही ज्या कंपन्यांत गुंतवणूक करायची त्यांची नावे अशी आहेत. 
१) बजाज फायनान्स, २) पिरामल एंटरप्रायझेस, ३) दिवाण हाऊसिंग फायनान्स, ४) इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, 
५) सनटेक रिॲल्टी, ६) दिलीप बिल्डकॉन, ७) नोसील, ८) हेग, ९) मुथूट फायनान्स, १०) येस बॅंक, ११) स्टेट बॅंक ऑफ इंडिया, १२) एचडीएफसी बॅंक, १३) सुवेन लाइफ सायन्सेस.  
२०१७ - २०१८ मध्ये ९,१५,२५६ कोटी रुपये अप्रत्यक्ष कर वसूल झाला आहे. २०१३ - २०१४ मध्ये मनमोहनसिंग यांच्या शेवटच्या वर्षांत ही रक्कम ४,९५,३४७ कोटी रुपये होती. २०१३ - २०१४ मध्ये करदात्यांची (कर विवरण पत्र भरणाऱ्यांची) संख्या ५,२७,९३००० होती. २०१७ - २०१८ मध्ये हा आकडा ७,४१,२७,२५० होता.

शेअरबाजारात सकारात्मक वातावरण असण्याची संपूर्ण बहुमत असलेले केंद्र सरकार, चांगला अर्थमंत्री, महागाई न वाढणे, कर्जाचे व्याजदर कमी असणे तसेच समाधानकारक पावसाळा आणि दंगे किंवा तणावविरहीत समाजजीवन या सर्वांची आवश्‍यकता असते. या सर्व गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यायला नरेंद्र मोदींसारखे दुर्लभ योजक आहेत. आपापल्या परीने प्रत्येकाने या गोष्टींचा फायदा घ्यायची तयारी ठेवायला हवी.

बॅंकांच्या मुदतठेवीत फक्त ८ टक्के वर्षाला व्याज मिळते. भविष्यनिर्वाह निधीतही वर्षाला ८ टक्केच व्याज मिळते. Equity Linked Saving Scheme (ELSS) इथे सुमारे १५ टक्के व्याज वर्षाला सुटते. समभागातील गुंतवणुकीवर अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यास किमान २५ टक्के तरी नफा होतो.

संबंधित बातम्या