मे अखेरपर्यंत तेजी...

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 29 एप्रिल 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच गुड फ्रायडे या सुट्यांमुळे बाजार फक्त तीन दिवसच सुरू राहिला. त्यातच देशभर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे जोरात वाहत असल्यामुळे राजकीय घडामोडींवर लोकांचे जास्त लक्ष आहे. गेल्या गुरुवारी निर्देशांक ३९,१४० वर बंद झाला आणि निफ्टी ११,७५२ पर्यंत येऊन थडकला. सर्वसाधारणपणे मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षच २८० च्या वर जागा घेऊन सत्तारूढ होईल. महाराष्ट्रातील शिवसेना आणि इतर अन्य मित्रपक्ष धरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) ३१० चा आकडा गाठावा. अपेक्षेप्रमाणे हे अंदाज बरोबर ठरले, तर निर्देशांक जूनमध्ये ४०,००० चा टप्पा ओलांडेल.

राष्ट्रीयकृत बॅंकांनी गेल्या तीन वर्षांत अनार्जित कर्जांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी केल्या असल्यामुळे बॅंकांचे शेअर्स जुलैपासून वाढू लागतील. तोपर्यंत मार्च २०१९ व जून २०१९ च्या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध होतील. भारतातून पलायन केलेल्या मल्ल्या वगैरेंची कर्जे काही प्रमाणात वसूल झाली, तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया व आयसीआयसीआय बॅंकांचे शेअर्स बऱ्यापैकी वर जातील. गेल्या काही महिन्यांतील १७५ रुपयांच्या किमान भावावरून २५५ रुपयांपर्यंत गेलेल्या येस बॅंकेने चांगली वाढ दाखवली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या कार्बन डायऑक्‍साईडचा मोठ्या प्रमाणावर वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवणार आहेत. सध्याच्या भावाला हे तिन्ही शेअर्स घेण्यासारखे आहेत.

इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्सने एका खासगी बॅंकेच्या बरोबर एकत्रीकरण करायचे ठरवले आहे. त्यामुळे इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्सची व्याप्ती खूप वाढेल. सध्या हा शेअर ८०० रुपयांना मिळत आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर ८.३६ पट दिसते. गेल्या वर्षभरातील शेअरचा १,३९७ रुपयांचा उच्चांकी भाव बघता या शेअरमध्ये वाढीला खूप वाव आहे. इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्सला एकत्रीकरणानंतर बॅंकेच्या शाखांचा खूप फायदा होईल. कदाचित तिला रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकिंगचा परवानाही घ्यायला लागेल.

सीमन्स गामेशाने लक्ष्मी मशिन वर्क्‍ससाठी १० मेगावॉट सौरऊर्जेचे उत्पादन सुरू केले आहे. हे ऊर्जा उत्पादन केंद्र तमिळनाडूमध्ये आहे. लक्ष्मी मशिन वर्क्‍सची स्थापना १९६२ साली झाली आहे. वस्त्रोद्योगातील धागा विणण्याचे स्पिंडल्स करण्याचेही तिचे उत्पादन आहे. सीमन्स गामेशा कंपनी २००९ सालापासून कार्यरत आहे. लक्ष्मी मशिन वर्क्‍सचा सध्या भाव ६००० रुपयांच्या आगेमागे आहे. तिचा उच्चांकी भाव गेल्या वर्षात ९,३८० पर्यंत होता. मात्र, या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत नाहीत.

येत्या दोन वर्षांत एचडीएफसी, स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स तसेच एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांचा व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढेल. आजही एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्सचे रोज २० लाखापेक्षा जास्त शेअर्सचे व्यवहार होत आहेत. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ७४ पट इतके प्रचंड असूनही गुंतवणूकदारांचा ओढा या शेअरकडे भरपूर आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्समध्येही रोज १५ लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ३५ पट इतके दिसते.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा सध्या ६१२ रुपये भाव आहे. रोज ३ ते ५ लाख शेअर्सचे व्यवहार होतात. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ४९ पट दिसते.

दिवाण हाउसिंग फायनान्सचा भाव सध्या १५७ रुपये आहे. दिवाण हाउसिंगने काही महिन्यांपूर्वी ९७ रुपयांचा किमान भाव दाखवला होता. तिथून तो आता जवळजवळ ६५ टक्के वाढून १७२ रुपयांपर्यंत गेला आहे. याही भावाला किं/उ गुणोत्तर ४.२६ पट इतके कमी दिसते. गेल्या वर्षभरातील या शेअरचा कमाल भाव ६९० रुपये इतका होता. त्यामुळे जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांनी इथे जरूर गुंतवणूक करावी. दिवाण हाउसिंग फायनान्समध्ये पिरामल एंटरप्राइझेससारख्या काही कंपन्या रस दाखवीत आहेत, अशी वार्ता आहे.

मे महिन्याच्या अखेरीस सत्तारूढ होणाऱ्या सरकारला जुलैमध्ये पुन्हा २०१९-२०२० चा सुधारित अर्थसंकल्प मांडावा लागेल. निवडणुकीनंतर कदाचित अर्थमंत्री बदलला जाईल. पियुष गोयल किंवा सुरेश प्रभू यांच्याकडे अर्थमंत्रिपद जावे.

देशामध्ये सध्या न्यायसंस्था दुबळ्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी व्यक्त केले आहे. एका महिलेने त्यांच्यावर नुकताच लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र, तो अनाठायी असल्याचे बोलले जात आहे. निवडणुका पार पडेपर्यंत लोकशाहीच्या चारही स्तंभावर असे आघात होतच राहातील, पण सज्ञान व्यक्ती त्यांच्याकडे दुर्लक्षच करतील.

काही दिवसांपूर्वी गुंतवणुकीसाठी योग्य अशा सनटेक रिॲल्टी, नोसील, येस बॅंक यांत गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने परामर्श घेतला होता. आता त्यात मिंडा इंडस्ट्रीज या शेअरचाही विचार करावा लागेल. हा शेअर सध्या ३८८ रुपयांना उपलब्ध आहे. वर्षभरात तो ४८० रुपयांपर्यंत जावा. मार्च २०१९ वर्षाची तिची विक्री ५,९२३ कोटी रुपये होती. मार्च २०२१ मध्ये ती ८,२०० कोटी रुपयांपर्यंत जावी. मार्च २०१९ वर्षाचा अपेक्षित नक्त नफा ३५२ कोटी रुपये असेल. मार्च २०२१ वर्षासाठी तो ५५२ कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन सध्या ११.२ रुपये आहे. तो दोन वर्षांत २० रुपयांपर्यंत जावा. कंपनी वाहनांचे सुटे भाग बनवते. जपानमधील टोकाईरिका या कंपनीबरोबर तिचे संयुक्त प्रकल्प आहेत. स्वीचेस आणि इलेक्‍ट्रिकल हॉर्न्समधील तिचे वाढते उत्पादन तिची नफा क्षमता वाढवेल. ॲल्युमिनिअम ॲलॉयव्हील्समध्ये ती आपले उत्पादन जास्त वाढवणार आहे.

बजाज फायनान्सचे मार्च तिमाहीचे आकडे २३ मे रोजी जाहीर होतील. त्यामुळे मे अखेरपर्यंत शेअर ३०० रुपयांनी वाढावा. या गुंतवणुकीवर केवळ दीड महिन्यात १० टक्के नफा मिळावा. अदानी उद्योग समूह लॉजिस्टिक्‍स, ऊर्जा, खनिज पदार्थांचे उत्खनन रस्ते व इमारतींची बांधकामे आणि कृषी उत्पादने यात नवे नवे प्रकल्प हिरिरीने राबवत आहे. अदानी समूहाची मुख्य धुरा गौतम अदानी वाहत आहेत. भारतातील सुमारे १०, १२ विमानतळांवर एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया जी फी गोळा करते, त्याचे पुढील ५० वर्षांचे हक्क या समूहाने मिळवले आहेत. सुमारे साडेसहा कोटी टन कोळशाचे विकसन व वाहन व्यवहाराबाबत तिने नुकतेच हक्क मिळवले आहेत. काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर बॅंकांमध्ये जन-धन खाती उघडायला सांगितली होती, त्याचा मोठा फायदा बॅंकांना ठेवी वाढण्यासाठी झाला आहे. जन-धन खात्यात ३ एप्रिल २०१९ ला ९७,६६५ रुपयांच्या ठेवी होत्या. २८ ऑगस्ट २०१४ ला ही योजना सुरू झाली होती. तिला आता साडेतीन वर्षे झाली आहेत. ३५.३९ कोटी इतकी जन-धन खाती आता आहेत. त्यापैकी २७.८९ कोटी खातेदारांना ‘रूपे डेबिट कार्ड’ देण्यात आली आहेत. २८ ऑगस्ट २०१८ नंतर खाती उघडणाऱ्या खातेदारांना अपघात विम्याचे संरक्षण १ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केले गेले आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या ओव्हरड्राफ्टची रक्कमही आता ५ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपये केली गेली आहे. या खातेदारांपैकी ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खाती स्त्रियांची आहेत. तसेच ही खाती मुख्यत्वेकरून ग्रामीण व निमशहरी भागांत आहेत. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना या खात्यांमुळे जरुरीप्रमाणे कर्ज, एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे पाठवण्याची सोय आणि निवृत्तिवेतनही खात्यात जमा होण्याची सोय झाली आहे. वेगवेगळ्या योजनेतून ग्राहकांना मिळू शकणाऱ्या सुविधा त्यांना उपलब्ध आहेत. गॅस सिलेंडर्ससाठी दिले जाणारे अनुदान या खात्यातूनच जमा होते. Direct Benifit Transfer आणि अन्य केंद्रसरकारच्या अनुदानांची रक्कम तिथे जमा होते.

पुढील वर्षाच्या म्हणजे २०२० च्या जानेवारी-मार्च तिमाहीत एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी आपल्या समभागांची प्राथमिक विक्री (Initial Pubic Offer) जाहीर करणार आहे. २०१८-२०१९ वर्षात एसबीआय जनरल इन्शुरन्सला विमा हप्त्याद्वारा ४,७०० कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षापेक्षा या वर्षाचा भरणा ३३ टक्‍क्‍याने जास्त आहे.   

संबंधित बातम्या