बाजारभावात चढ-उतार

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 6 मे 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

भारतात निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे, तर श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. भारतातल्या निवडणुकीत अनेक मोहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, म्हाडा, मावळ अशा ठिकाणी उमेदवारांमध्ये चढाओढ दिसली. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युती भक्कम झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी २६ एप्रिलला निवडणुकीसाठी अर्ज भरताना वाराणसीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात भाविकांना धक्का देणारी बातमी म्हणजे तिरुपतीच्या गोविंदराजा मंदिरातून तीन हिरेजडित सुवर्णमुकुट जे फेब्रुवारी महिन्यात चोरीला गेले होते, ती चोरी सापडली आहे. नांदेडजवळील कंधार येथील एका युवकाने ही चोरी केल्याची बातमी आहे. सीसीटीव्हीच्या आधारे कुख्यात गुन्हेगार आकाश सरोदे याला अटक झाली आहे. मुकुटाचे रूपांतर सोनेरी बिस्किटात करून चेन्नईला ती विकण्यासाठी गुन्हेगार जाणार होते. चोरी सापडली असली, तरी मुकुट तसेच मिळणार नाहीत. गोविंदराजा मंदिर हे तिरुपतीमध्ये महत्त्वाच्या जागी आहे. १२३५ मध्ये संत रामानुज यांनी या मंदिराची स्थापना केली होती.

महत्त्वाच्या आणखी एका बातमीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांची एकसदस्यीय समिती या संदर्भात चौकशी करत आहे.

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजप सोडून जो कोणता पक्ष सत्तेवर येऊ शकणार असेल, त्याला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्या पक्षाने केंद्रशासित दिल्लीला पूर्ण राज्याचे स्थान देण्याचे वचन द्यावे अशी त्यांची अट आहे.

भारतासाठी मे आणि जून हे महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मेमध्ये लोकसभेच्या निवडणुकांची, तर जूनमध्ये क्रिकेटच्या वर्ल्डकपची सतत चर्चा असणार आहे.

शेअरबाजारात गुंतवणुकीसाठी कंपन्यांचे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर या तिमाहींचे विक्री व नफ्याचे आकडे बघणे आवश्‍यक असते. प्रत्येक तिमाही संपल्यानंतर एक महिना उलटून गेला, की असे आकडे प्रसिद्ध होऊ लागतात. म्हणजेच मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारी हे महिने त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. अर्थात काही चांगल्या कंपन्या तिमाही संपल्यानंतर एका पंधरवड्यानंतरच आपले आकडे देऊ लागतात. इन्फोसिस, टीसीएस अशा संगणक क्षेत्रातल्या कंपन्या त्याबाबत आघाडीवर असतात.

गेल्या दहा दिवसांपूर्वी येस बॅंकेचे मार्च तिमाही व पूर्ण वर्षाचे आकडे जाहीर झाले. सर्वसाधारणपणे येस बॅंक ही एक खासगी क्षेत्रातील चांगली बॅंक आहे. मागच्या तिमाहीपेक्षा पुढच्या तिमाहीत तिचे आकडे वाढलेले असतात. मात्र, यावेळी तिने मार्चसाठी अनार्जित कर्जाच्या बाबतीत कराव्या लागणाऱ्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर केल्याने तिचा हा लौकिक थोडा घसरला. मार्च तिमाहीसाठी तिने पहिल्यांदाच नुकसान दाखवले आहे. या तिमाहीसाठी बॅंकेने १५०६.६४ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी बॅंकेने ११७९.४४ कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे. मार्च २०१९ तिमाहीसाठी तिने नऊ पटीने तरतुदी वाढवल्या आहेत व या तिमाहीची तरतूद ३६६१.७० कोटी रुपये केली आहे. मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये ही तरतूद ३९९.६४ कोटी रुपये होती. IL & FS या समूहाला दिलेली कर्जे अनार्जित म्हणून धरल्यामुळे ही आवश्‍यकता निर्माण झाली. एकट्या IL & FS समूहाची अनार्जित कर्जे २४४२ कोटी रुपये आहेत. याच समूहाच्या काही कर्जांसाठी १२.८९ कोटी रुपयांची कर्जे अनार्जित म्हणून दाखवली आहेत.

येस बॅंकेचे मार्च तिमाहीचे नक्त व्याजाचे उत्पन्न १६.३० टक्का वाढून २५०६ कोटी रुपये झाले आहे. नक्त व्याजाचे मार्जिन ३.१० टक्के होते. आता बॅंकेची ढोबळ अनार्जित कर्जे ३.२२ टक्के आहे. बॅंकेचे प्रवर्तक व अनेक वर्षे कार्यकारी संचालक असलेले राणा कपूर यांना ३१ जानेवारीनंतर रिझर्व्ह बॅंकेने मुदतवाढ नाकारल्याने त्यांच्या जागी गिल कार्यकारी संचालक म्हणून आले आहेत. ‘नवा कुंचा चांगला झाडतो’ अशा म्हणीप्रमाणे गिल यांनी आल्या आल्या स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

गुंतवणूकदारांनी मार्च महिन्याच्या आकड्यांनंतरही आपली गुंतवणूक कायम ठेवावी. कारण यापुढे येस बॅंकेचे आकडे चांगलेच राहणार आहेत. सध्या या शेअरचा भाव २३७ रुपयांच्या आसपास आहे. तीन महिन्यांपूर्वी तो १७५ रुपये इतका खाली आला होता. बायोकॉन या औषधी कंपनीने मार्च २०१९ च्या तिमाही नफ्यात ६४ टक्के वाढ दाखवली आहे. पूर्ण वर्षासाठी ही वाढ १४८ टक्के होती. कंपनीने एकास एक बक्षीस भाग जाहीर केले आहे. बायोकॉनचा भाव सध्या ६२० रुपये आहे. बक्षीस भाग बाद झाल्यावर तो ३०० रुपयांपर्यंत यावा. मार्च २०१९ तिमाहीसाठी तिचा कन्सॉलिडेटेड नक्त नफा २१३.७ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी नक्त नफा १३०.४ कोटी रुपये होता. पूर्ण वर्षासाठी तिची विक्री ५५१४.४ कोटी रुपये होती. गेल्या वर्षातील हा आकडा ४१२९.७ कोटी रुपये होता. कंपनीच्या शेअरचे दर्शनीमूल्य ५ रुपये आहे. बक्षीस भागापूर्वी कंपनीने १ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला. बोनस जाहीर झाल्यानंतरही कंपनीच्या शेअरचा भाव न वाढता थोडा कमीच झाला. या शेअरमध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक करण्यास हरकत नाही. सध्याच्या भावात १० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मारुती सुझुकीने डिझेल गाड्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या शेअरचा भाव ६८४२ रुपयांच्या आसपास आहे. डिझेल गाड्या ज्यांना खरेदी करायच्या आहेत, त्यांनी आपली खरेदी लवकर करावी. कारण हे उत्पादन पुढील एप्रिलपासून बंद होणार आहे. या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक करू नये. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीजचा मार्च २०१९ तिमाहीचा नक्त नफा ४७ टक्‍क्‍याने वाढून १६५ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी हा आकडा ११२.४२ कोटी रुपये होता. मार्च २०१९ तिमाहीसाठी विक्री ५०८७ कोटी रुपये झाली. सध्या शेअरचा भाव १९८ रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात तो ४० ते ५० टक्‍क्‍याने वाढावा.

व्यवसायवाढीसाठी कंपनीने एक हजार कोटी रुपयांचे अपरिवर्तनीय कर्जरोखे काढायचे ठरवले आहे. तसेच ती समभाग व अन्य पर्यायांचा विचार करत आहे. शेअरच्या भावात वरचेवर जरी चढउतार दिसत असला, तरी दीड ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी तो जरूर घ्यावा.  

संबंधित बातम्या