शेअर खरेदीसाठी उत्तम संधी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 13 मे 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी अजून संपली नसल्यामुळे अर्थकारणाकडे कुणाचेच लक्ष नाही. नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देश किती पुढे गेला किंवा किती मागे गेला यावरच चर्चा सुरू आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मौन बाळगणारे पूर्वीचे पंतप्रधान आता मुखर झाले आहेत, तर नरेंद्र मोदींनी देशाला काय दिले हे हिरिरीने मांडण्यात भाजप आघाडीवर आहे. लोकांनी कशावर विश्‍वास ठेवला आहे, हे २३ तारखेलाच कळेल.

 ओडिशाला फणी वादळाने जो तडाखा दिला, त्यात २० लाख लोकांना सुखरूप बाहेर काढण्याबद्दल जगभरात भारताचे कौतुक होत आहे. फणी वादळामुळे २९ जणांचा बळी गेला याबद्दल सर्वांनाच खेद आहे.

 राफेल विमान प्रकरण अजून थंडावलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात त्याची सुनावणी सुरू असताना राफेल कागदपत्रे जाहीर केल्यास सुरक्षाव्यवस्थेला धक्का बसेल, असे सरकारने प्रतिज्ञापत्र दिले आहे.

 सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांसह ३०० पासून ३५० जागांपर्यंत यश मिळण्याचे विविध अंदाज व्यक्त होत आहेत. निदान रालोआ आघाडीला किमान ३२५ जागा जरी मिळाल्या, तरी त्याचे विविधांगी परिणाम दिसून येतील. भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढेल. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येईल. त्यामुळे रुपया ६५ रुपयांपर्यंत सुधारेल. मोदी जास्त धाडसी पाऊल टाकू शकतील. सहा महिन्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळेल. देवेंद्र फडणवीसांचा कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल. पाकिस्तान जास्त नरमाईने वागेल. अर्थात त्याला दोन-तीन वर्षे लागतील. शेअरबाजार सुधारून निर्देशांक ४४ हजार पर्यंत तरी जाऊ शकेल. औद्योगिक परिस्थिती सुधारली, तर वस्तूसेवा कराचे उत्पन्नही वाढेल. विरोधी पक्षांचे महत्त्व कमी झाले, तर केंद्रीय सत्ता थोडीशी हुकूमशाहीकडेही जाईल. औद्योगिक उत्पादन वाढेल, तर बेरोजगारीही कमी होईल. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले, तर वित्तीय तूट कमी होईल. पण कदाचित रुपया सुधारल्याने निर्यात कमी होण्याचीही शक्‍यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात काही धाडसी निर्णयही घेतले जाऊ शकतील. अर्थात ही ‘जर-तारी’ भाषा किती खरी होईल, हे काळच सांगेल.

 रिलायन्स इंडस्ट्रीज, सॉफ्ट बॅंक व्हीजन फंडाबरोबर रिलायन्स जिओ शेअर्स विकण्यासाठी वाटाघाटी करत आहे. गेल्या आठवड्यात येस बॅंकेच्या बातम्यांवर सतत प्रकाशझोत होता. मार्च २०१९ तिमाहीसाठी येस बॅंकेने प्रचंड तोटा दाखवल्याने हा शेअर १७५ रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, यापुढे सर्व नकारार्थी बाबी संपल्यामुळे तो शेअर वरच जावा. मोतीलाल ओसवाल, इडेलवाईज, ॲक्‍सिस कॅपिटल या संस्थांनी हा शेअर विकत घेण्याबद्दल भलावण केली आहे. जाणकारांच्या मते हा शेअर २८० रुपयांपर्यंत जावा. जोखीम पत्करणाऱ्यांनी सध्याच्या भावात या शेअरची माफक गुंतवणूक करावी.

 गेल्या सोळा वर्षांतील मे महिन्याचा विचार केला, तर २००३, २००५, २००७, २०१४ ते २०१७ या वर्षांत निफ्टीमध्ये सतत वाढ दिसली आहे. बाजारात पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक आणि बॅंक ऑफ इंडिया यांच्या विलीनीकरणाबाबतच्या वावड्या उठल्या आहेत. अमेरिकेने पेट्रोल विक्रीबाबत इराणवर निर्बंध लादल्याने आणि क्रूडच्या किमती वाढत असल्यामुळे महागाई वाढण्याची शक्‍यता जरी असली, तरी सत्य परिस्थितीनुसार महागाई कमी झालेली आहे.

 पेट्रोनेट अंदमान बेटावर नैसर्गिक वायूचा साठा करण्याचा विचार करीत आहे. अरबिंदो फार्मा या कंपनीला आंध्रप्रदेशमधील कारखान्याचा विस्तार करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. जिंदगीची गुणवत्ता वाढल्यामुळे बॅंक ऑफ महाराष्ट्र तोट्यातून बाहेर पडून नफ्यात आली आहे.

 जगभरात पोलाद क्षेत्रात डळमळीत परिस्थिती असली, तरी भारतातील पोलाद उद्योगाने चांगली प्रगती केली आहे. ओएनजीसी कच्छच्या सागर किनाऱ्यापासून काही अंतरावर साठे हुडकण्यासाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. ऑगस्टमध्ये भारत आणि पेरू यांच्या दरम्यान मुक्त व्यापार व्हावा म्हणून वाटाघाटी होणार आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत गुंतवणूकदारांची विक्री पाच टक्‍क्‍याने कमी झाली आहे.

 गेल्या काही दिवसांतील या महत्त्वाच्या बातम्यांमुळे अर्थकारण अजून स्थिरावलेले नाही, असे दिसते. 

 बॅंक ऑफ महाराष्ट्रचे मार्च तिमाहीचे नक्त व्याजाचे उत्पन्न १००० कोटी रुपये झाले व नक्त नफा ७२ कोटी रुपये झाला. मार्च २०१८ या तिमाहीसाठी हेच आकडे अनुक्रमे ८८१ कोटी रुपये व तोटा ११४ कोटी रुपये असे होते.

 पावसाळा जवळ आला, की बांधकामे मंदावतात आणि सिमेंटची मागणी कमी होते. त्यामुळे सिमेंट कंपन्या गोणीमागे २५ रुपयांची वाढ करणार आहेत.

 कोल इंडियाने ऊर्जा क्षेत्राला मार्च २०१८-२०१९ वर्षासाठी ४८.८ कोटी टनांचा पुरवठा केला आहे. गेल्या आठवड्यात ग्रीव्हज कॉटन शेअर्सच्या पुनर्खरेदीचा विचार करत होती. हिंदुस्थान पेट्रोलियम, मंगलोर रिफायनरीचे आग्रहण करण्याचा विचार करत आहे. ओएनजीसी कृष्णा गोदावरी खोऱ्यातून आणखी काही विहिरीतून नैसर्गिक वायूच्या उत्पादनाला सुरुवात करेल.

 ॲक्‍सिस बॅंकेच्या संचालक मंडळाने ३५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचा विचार केला आहे.

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा मार्च २०१८-२०१९ वर्षाचा नक्त नफा ९३०.६ कोटी रुपये दाखवला आहे. गेल्या वर्षापेक्षा हा नफा ३१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. कंपनीने शेअरमागे १२ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. विप्रो कन्झ्युमर केअर फिलिपाइन्समधल्या स्फ्लॅश कॉर्पोरेशनचे आग्रहण करणार आहे.

 दिवाण हाउसिंग फायनान्समध्ये, पिरामल एंटरप्राइझेस काही भागीदारी करेल अशा बातम्या आहेत. त्यामुळे पिरामल एंटरप्राइझेसचा शेअर सध्या विकत घेण्यासारखा आहे. पिरामल एंटरप्राइझेसच्या शेअरचा भाव सध्या २३१७ रुपये आहे.

 रुची सोया कंपनीसाठी पतंजलीने ४३२५ कोटी रुपयांचा देकार दिला आहे. रुची सोयाला सध्या ९३०० कोटी रुपयांची बॅंकांची कर्जे आहेत. पतंजलीचे हे आग्रहण यशस्वी झाल्यास तिची सोयाबीन तेलाची विक्री वाढेल. रुची सोयाच्या कर्जापैकी स्टेट बॅंकेची १८०० कोटी रुपयांची कर्जे आहेत. कंपनीवर बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक या तिघांची अनुक्रमे ८१६ कोटी रुपये, ७४३ कोटी रुपये आणि ६०८ कोटी रुपयांची कर्जे आहेत. हा सर्व व्यवहार यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा फायदा होईल. पतंजलीची वार्षिक विक्री १२ हजार कोटी रुपयांची आहे.

 निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत शेअरबाजारात बऱ्याच कंपन्यांचे भाव खाली असतील, त्यामुळे शेअर खरेदीसाठी उत्तम संधी आहे. जीएचसीएल (गुजराथ हेवी केमिकल्स)चा शेअर सध्या २६० रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात त्यात ३५ ते ४० टक्के वाढ व्हावी. जीएचसीएलचा या मार्च तिमाहीचा नफा ४४ टक्‍क्‍याने वाढून ११९ कोटी रुपये झाला आहे.

 निवडणुकीनंतर अनेक गोष्टी जरी चांगल्या होणार असल्या, तरी ओएनजीसीसारख्या कंपन्यांना पेट्रोलचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि १९८० च्या दरम्यान ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांना नॉर्थसीमध्ये जसा मोठा पेट्रोल साठा सापडला, तसेच भाग्य जर भारताच्या वाट्याला आले, तर भावी पिढ्या हा कालखंड सुवर्णकालखंड आहे असे समजतील.

 भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पुरी होत आहेत, तोपर्यंत हे स्वप्न सत्यात यावे अशी आशा करूया.

संबंधित बातम्या