गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 20 मे 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान आणि त्यांचे विरोधक एकमेकांवर प्रखर हल्ले चढवीत आहेत. राजस्थानातील अलवर येथे झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणीदेखील उलटसुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. राजकारण किंवा समाजकारण याबाबत फारशा महत्त्वाच्या बातम्या नसल्यामुळे आणि गेल्या काही दिवसांत कंपन्यांचे रिझल्टस्‌ जाहीर झाल्यामुळे त्यावरच इथे भर दिला आहे.

 केवल किरण या वस्त्रोद्योग कंपनीने मार्च २०१८-२०१९ मध्ये ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. मार्च २०१९ वर्षासाठी तिचे शेअरगणिक उपार्जन ६५ रुपये दिसण्याची शक्‍यता आहे. एका जाणकाराच्या मते ती यंदा बक्षीसभागही देण्याची शक्‍यता आहे.

 अशोक लेलॅंडने एप्रिल २०१९ मध्ये १३,१४१ वाहने विकली आहेत. बायोकॉनने मार्च २०१९ तिमाहीचे आकडे चांगले दाखवले आहेत, तरीही तो शेअर वर गेलेला नाही. गुंतवणुकीची एक चांगली संधी इथे उपलब्ध आहे. गोदरेज प्रॉपर्टीने आर. के. स्टुडिओ १५० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. तिथे ती काही निवासिका बांधणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीची आजही विक्रोळीला मोठी जमीन आहे. इथेही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक योग्य ठरेल. ग्रासिम इंडस्ट्रीजकडून खूप मोठी रॉयल्टी मिळाल्यामुळे वरळीच्या सेंच्युरी टेक्‍स्टाईल्स अँड इंडस्ट्रीजने मार्च २०१९ तिमाहीसाठी मार्च २०१८ तिमाहीपेक्षा १०९ टक्के जास्त नफा दाखवला आहे.

 अलाहाबाद बॅंकेला मार्च २०१९ तिमाहीला ३८३४ कोटी रुपयांचा तोटा झाला. नक्त व्याजाचे उत्पन्न मात्र ४१.६ टक्‍क्‍याने वाढून १२५७.५८ कोटी रुपये झाले. ढोबळ अनार्जित कर्जे १७.५५ टक्के होती, तर नक्त अनार्जित कर्जे ५.२२ टक्के आहेत. मार्च २०१८ तिमाहीसाठी नक्त तोटा ३५१० कोटी रुपये होता. नक्त व्याजाचे उत्पन्न ८८८ कोटी रुपये होते. ढोबळ अनार्जित १७.८१ टक्के होती व नक्त अनार्जित कर्जे ७.७ टक्के होती.

 दिलीप बिल्डकॉनला यावेळीच्या मार्च तिमाहीसाठी नफा २१९.६ कोटी रुपये आहे. एकूण उत्पन्न २५७१ कोटी रुपये आहे. गेल्या मार्चमध्ये नफा २१७.७ कोटी रुपये होता. उत्पन्न २५५८ कोटी रुपये होते. कंपनीने दर शेअरमागे १ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. रिलॅक्‍सो फूटवेअरने या तिमाहीसाठी ५४.४१ कोटी रुपये नफा दाखवला आहे. एकूण विक्री ६३५.७ कोटी रुपये होती. गेल्या मार्च तिमाहीसाठी नक्त नफा ५३.४६ कोटी रुपये होता व विक्री ५५०.३५ कोटी रुपये होती. कंपनीने शेअरमागे १.८० रुपये लाभांश जाहीर केला आहे.

 आयशर मोटर्सचा मार्च २०१९ तिमाहीचा नफा ५४४.८४ कोटी रुपये आहे. विक्री २४९९.६ कोटी रुपये आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी नफा ४६१.५३ कोटी रुपये होता, तर एकूण उत्पन्न २५२९.७७ कोटी रुपये होते. कंपनीने शेअरमागे १२५ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. मर्क या औषधी कंपनीची मार्च २०१९ तिमाहीची विक्री २३१०.३ कोटी रुपये होती आणि नक्त नफा ४०७.०७ कोटी रुपये होता. मार्च २०१८ तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे १९८१.६६ कोटी रुपये व २२७.१४ कोटी रुपये होते. नक्त नफ्यात यावेळेला ७९ टक्‍क्‍यांची वाढ आहे. विक्रीतली वाढ मात्र फक्त १६.६ टक्के आहे. प्रिझम जॉन्सनची मार्च २०१९ तिमाहीची विक्री १६८९.८५ कोटी रुपये होती व नक्त नफा ४९.७२ कोटी रुपये होता. गेल्या मार्चच्या ६२.७४ कोटी रुपये नफ्यापेक्षा यावेळेला नफा २१ टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र, मागील वर्षाच्या मार्च तिमाहीच्या १६०८ कोटी रुपये उत्पन्नात ३.८ टक्‍क्‍यांची वाढ होऊन ती १६६९.८५ कोटी रुपये आहे.

 डेल्टा कॉर्पने वस्तुसेवाकरात ६१८९ कोटी रुपयांची गफलत केल्याचा आरोप आहे. पण तो तिने फेटाळला आहे. मात्र, शेअरबाजारात या शेअरचा भाव ७ टक्‍क्‍याने घसरला.

 आयडीएफसीने मार्च २०१९ तिमाहीसाठी २१८ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. अनार्जित कर्जासाठी ६९८.२ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे हा तोटा झाला. मार्च २०१८ तिमाहीसाठी २४२.४५ कोटी रुपये होती. पूर्ण वर्षासाठी बॅंकेने १९४४.१७ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. २०१७-१८ वर्षासाठी तिने ८४९.३ कोटी रुपयांचा नफा दाखवला होता. बॅंकेची ढोबळ अनार्जित कर्जे २.४३ टक्के आहेत. मागील वर्षी ही टक्केवारी ३.३१ टक्के होती. बॅंकेचे एकूण उत्पन्न या तिमाहीसाठी ३,९४५ कोटी रुपये होते. मागील वर्षाचा हा आकडा २,३७४ कोटी रुपये होता.

 बारा मेला निफ्टी ११,२७८ होता, तर निर्देशांक ३७,४६३ होता. निवडणुकीचे निकाल प्रसिद्ध व्हायचे असल्यामुळे शेअरबाजार सध्या मंदीतच आहे. पण जून-जुलैमध्ये तो वर जाईल. टायटन कंपनी नवीन १४ दुकाने उघडणार आहे. त्यामुळे तिच्या नफ्यात यंदा २० टक्के जास्त वाढ होईल. महिंद्र आणि महिंद्रने TUV ३०० चे नवे मॉडेल ८.३८ लाख रुपये विक्रीला काढले आहेत. त्यामुळे कंपनीचा फायदा नजीकच्या भविष्यात खूप वाढणार आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्‍ट्‌स नवीन उत्पादने विक्रीला काढणार असल्यामुळे तिचा नफाही चांगला वाढेल.

 लक्ष्मी विलास बॅंकेमध्ये इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सचे विलीनीकरण जाहीर झाले असल्यामुळे त्या बॅंकेचा शेअरही भरपूर वाढू शकेल. सध्या या बॅंकेच्या शेअरचा भाव ७८ रुपये आहे. इरकॉन इंटरनॅशनलला श्रीलंकेतल्या रेल्वेकडून ६३५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. पुढील दोन वर्षे इरकॉनचा नफा सतत वाढणार आहे. साखर उद्योगातील इआयडी पॅरी या दक्षिण भारतातील साखर कंपनीला मार्च २०१९ तिमाहीत, मागच्या मार्च तिमाहीपेक्षा चौपट नफा झाला आहे. हा शेअर सध्या १८७ रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा कमाल भाव २६३ रुपये होता, तर किमान भाव १७६ रुपये होता.
 एलआयसी हाउसिंग फायनान्सने मागच्या तिमाहीत मार्च २०१८ तिमाहीपेक्षा २२ टक्के जास्त नफा दाखवला आहे. सध्या हा शेअर ४७६ रुपये या किमतीला उपलब्ध आहे. गुंतवणुकीची ही संधी सोडू नये.

 मोरपेन लॅबोरेटरीजचा नक्त नफा या तिमाहीत मार्च २०१८ तिमाहीपेक्षा १२४ टक्के जास्त आहे. इंडियन ओव्हरसीज बॅंक बॅंकिंग व्यवसायाखेरीज, अलाहिदा क्षेत्रात असलेली जिंदगी विकून ८५० कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे तिच्या द्रवतेत वाढ होईल.  एचडीएफसी बॅंक आपल्या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागाचे एक रुपया दर्शनी मूल्याच्या दोन शेअरमध्ये विभाजन करणार आहे. आताच इथे खरेदी केल्यास नजीकच्या भविष्यात चांगला नफा होईल.

 हेग आणि ग्राफाईट इंडिया सध्या खूप उतरले आहेत. चीनमधील ग्राफाईट कंपन्यांवर बंद होण्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे त्याचा चांगला फायदा होईल. मध्यप्रदेशमधली ही कंपनी सुमारे ३० देशांत आपल्या उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादन विकते. हाही शेअर सध्या १६६२ इतक्‍या आकर्षक किमतीला उपलब्ध आहे. त्यामुळे इथेही खरेदी फायदेशीर ठरेल. हेगने काही दिवसांपूर्वी आपल्या शेअर्सची पुनर्खरेदी ७५० कोटी रुपयांना केली होती. कॅनडातील जॅक्‍सन या कंपनीने हेगला रेड स्प्रींग्ज इथे उत्खननाची परवानगी दिल्यामुळे तिचे उत्पादन नजीकच्या भविष्यात वाढेल. सध्या या शेअरचे किं/उ गुणोत्तर फक्त २.५ पट इतके आकर्षक आहे.  

संबंधित बातम्या