शेअरबाजारात तेजी कायम

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 27 मे 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

निवडणुकीचे पर्व संपल्यानंतर इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपची चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या विश्‍वविजेत्या संघाला २८ कोटी रुपये (४० लाख अमेरिकन डॉलर्स) मिळणार आहेत. उपविजेत्या संघाला २० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळेल. यावेळच्या रकमा या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या रकमा आहेत. दोन उपांत्य सामने खेळणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांनाही प्रत्येकी आठ लाख डॉलर्स मिळतील. पाच जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. भारतीय संघाच्या मधल्या फळीत महाराष्ट्राचा केदार जाधवही खेळू शकेल. खांदा दुखावल्यामुळे काही दिवसांपूर्वी तो संघाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट यांच्याबरोबर सराव करत होता. त्यासाठी फरहार्ट ऑस्ट्रेलियाहून मुद्दाम परतले होते. दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत असून, जगात सर्वत्र कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जवळपास १० लाख जीवजंतूंच्या प्रजाती नष्ट होतील असा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. वाढत्या कार्बनमुळे अमेरिकेला पुढील ७० वर्षांत ५० कोटी डॉलर्सचा फटका बसेल.

भारतीय वंशाचे हिंदुजा बंधू इंग्लंडमधील सर्वांत श्रीमंत बंधू ठरले आहेत. हिंदुजा समूह १९१४ मध्ये मुंबईत स्थापन झाला आहे. नैसर्गिक वायू, पेट्रोल, जाहिरात तंत्रज्ञान, जमिनी व बांधकामे एवढ्या उद्योगात हिंदुजा समूह आघाडीवर आहे. ७९ वर्षांचे गोपी हिंदुजा, ८३ वर्षांचे हिंदुजा यांच्यासह ४ बंधू हा समूह चालवतात. प्रकाश हिंदुजा स्वित्झर्लंडमधून आर्थिक व्यवहार बघतात, तर सर्वांत कनिष्ठ बंधू अशोक आंतरराष्ट्रीय व्यवहार बघतात.

राजकीय स्थैर्यामुळे शेअरबाजार सध्या जोरात आहे. आता काही कंपन्यांच्या मार्च २०१९ च्या तिमाहीच्या आकड्यांचा परामर्श घेता येईल. सुंदरम फायनान्सचा या तिमाहीचा नफा ८५ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ च्या तिमाहीत तो ५४ कोटी रुपये होता. यावेळी त्यात ५७ टक्के वाढ झाली आहे.

भारताची विदेशमुद्रा गंगाजळी १० मेला संपलेल्या आठवड्यात ४२०.०५ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. १९९१ मध्ये हा आकडा एक अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला होता. वरील निधीत सर्वांत मोठा वाटा अमेरिकन डॉलर्सचा आहे. विदेशमुद्रा गंगाजळीत अमेरिकन डॉलर ३९२.२२७ अब्ज इतके आहेत.
नॅशनल पेरॉक्‍साईडचा मार्च २०१९ तिमाहीचा नफा ५३ टक्‍क्‍यांनी घसरून १७.३६ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी तो ३७.३ कोटी रुपये होता. एकूण विक्री मार्च २०१८ व मार्च २०१९ तिमाहीसाठी अनुक्रमे ९९.२४ कोटी रुपये व ६८.८९ कोटी रुपये होती. कंपनीने शेअरमागे ६५ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची या मार्च तिमाहीची विक्री १,४७,१३४ कोटी रुपये होती व नक्त नफा ६००४.८८ कोटी रुपये होता. मार्च २०१८ तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे १,३९,२४२ कोटी रुपये व ५५२७.४६ कोटी रुपये होते. कंपनीने शेअरमागे एक रुपयाचा लाभांश जाहीर केला आहे.

गुजराथ इंडस्ट्रीज पॉवर कंपनीचा नक्त नफा ३७१.७९ कोटी रुपयांच्या विक्रीवर १६२.८४ कोटी रुपये झाला आहे. मार्च तिमाहीचे हे आकडे अनुक्रमे ३७१.७९ कोटी रुपये व ६९.१३ कोटी रुपये होते. कंपनीने शेअरमागे २.९० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. बजाज ऑटोची या तिमाहीची विक्री ७२२५.२ कोटी रुपये होती आणि नक्त नफा १४०८.४९ कोटी रुपये होता. मार्च २०१८ साठी हे आकडे अनुक्रमे ६६५०.८१ कोटी रुपये व ११७५.४७ कोटी रुपये होते. कंपनीने शेअरमागे ६० रुपये लाभांश जाहीर केला आहे.

बजाज होल्डिंग्ज अँड इनव्हेस्टमेंटची विक्री ८३.०२ कोटी रुपये होती व नफा ७९१.४४ कोटी रुपये होता. उपकंपन्यांच्या नफ्यामुळे या कंपनीचा नफा विक्रीपेक्षा जास्त दिसतो. कंपनीने शेअरमागे ३२.५ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

बजाज फायनान्सची या मार्च तिमाहीची विक्री ४८८७.७६ कोटी रुपये होती. नक्त नफा ४८८६.५४ कोटी रुपये होता. पूर्ण वर्षासाठी एकूण उत्पन्न १७४००.८५ कोटी रुपये होते. शेअरगणिक उपार्जन ६७.५२ रुपये होते. आतापर्यंत हे सर्वोत्कृष्ट आकडे आहेत. आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीचा शेअर ३,३०१ रुपयांपर्यंत चढला आहे. दर तिमाहीला २५० ते ३०० रुपयांची वाढ होऊन तो चार हजार रुपयांपेक्षा जास्त जाईल.

या शेअरमध्ये सदैव गुंतवणूक हवी - एकूण भागभांडारापैकी २५ ते ४० टक्के रक्कम इथे हवी. कंपनीचा शेअरमागे लाभांश अगदीच किरकोळ म्हणजे ६ रुपये आहे.

सिटी युनियन बॅंकेचा मार्च २०१९ तिमाहीचा नफा १७५.१० कोटी रुपये आहे. गेल्या वेळच्या १५२.१२ कोटी रुपयांपेक्षा तो १५ टक्के जास्त आहे. कंपनीची ढोबळ अनार्जित कर्जे २.९५ टक्के होती व नक्त अनार्जित कर्जे १.८१ टक्के होती. अनार्जित कर्जात दोन्ही ठिकाणी यावेळी वाढ आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा मार्च २०१९ तिमाहीचा नफा गेल्या वेळच्या ४४.३२ कोटी रुपयांपेक्षा १०८ टक्‍क्‍यांनी वाढून ९२.१० कोटी रुपये झाला आहे. विक्री ८४८.०५ कोटी रुपये होती. मार्च २०१८ तिमाहीची विक्री ७९१.३२ कोटी रुपये होती.

संघी इंडस्ट्रीजची या तिमाहीची विक्री २७५.९६ कोटी रुपये होती व नक्त नफा मार्च २०१८ च्या तिमाहीपेक्षा ४२ टक्‍क्‍यांनी जास्त होऊन २६.४३ कोटी रुपये होता. ग्राफाईट इंडियाचा यावेळचा नफा १,६९३ कोटी रुपयांच्या विक्रीवर ५६२ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने शेअरमागे ३५ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. अन्य काही कंपन्यांचा परामर्श पुढील लेखात.  
 

संबंधित बातम्या