पुनर्खरेदीचा विचार?

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 3 जून 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर होईल. या वेळेला रिझर्व्ह बॅंक रेपो दरात पाव ते अर्धा टक्का कपात करेल असा अंदाज आहे. निवडणुकीनंतर निर्देशांकांनी एक हजार अंकांची उसळी घेतली होती.
मार्च २०१९ च्या तिमाहीचे/वर्षाचे आकडे पुढे दिले आहेत. बजाज हिंदुस्थान या साखर कंपनीची विक्री तिमाहीत २१.३ अब्ज रुपये झाली होती. नक्त नफा २.४६ अब्ज रुपये आहे. बॅंक ऑफ बडोदाने मार्च २०१९ तिमाहीसाठी अनार्जित कर्जासाठी ५४ अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे तिने यावेळी ९.९ अब्ज रुपयांचा तोटा दाखवला आहे. तिची ढोबळ अनार्जित कर्जे, एकूण कर्जाच्या ९.६१ टक्के आहेत. कॅनफिन होम्स पुढील काही महिन्यांत सहा हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीला काढणार आहे. शेअर भांडवलातही ती एक हजार कोटी रुपयांची वाढ करणार आहे. कमिन्स इंडियाचा या तिमाहीचा नफा १.४१ अब्ज रुपये आहे. एचडीएफसी बॅंक आपल्या एका शेअरचे दोन विभागात विभाजन करणार आहे. इंडियन रेल्वे फायनान्सने एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून ऊर्जेवर रेल्वे चालवण्यासाठी ७५ कोटी डॉलर्सचे कर्ज घ्यायचे ठरवले आहे.

गुजराथ स्टेट फर्टिलायझर्स (GSFC) चा मार्च तिमाहीसाठीचा नफा ९९.७६ कोटी रुपये झाला आहे. तो ११३ कोटी रुपये व्हावा अशी अपेक्षा होती. थरमॅक्‍सचे मार्च तिमाहीचे उत्पन्न १२७ कोटी रुपये होते. उत्तम शुगरचा नक्त नफा २६ कोटी रुपये झाला आहे. सागर सिमेंटचा या तिमाहीचा नफा २४ कोटी रुपये झाला आहे. विक्री २६८ कोटी रुपये होती. मार्च २०१८ तिमाहीपेक्षा या तिमाहीचा नफा ९० टक्के जास्त आहे. 

जे. के. लक्ष्मी या सिमेंट कंपनीने ४४.४ कोटी रुपये नफा या तिमाहीत केला आहे. कंपनीच्या विक्रीत यावेळी ३२ टक्‍क्‍यांची वाढ आहे. बोडल केमिकल्स तुर्कस्तानच्या एका कंपनीचे आग्रहण करण्याच्या विचारात आहे. येत्या तीन-चार आठवड्यांत अनेक कंपन्या शेअरच्या पुनर्खरेदीचा विचार करणार आहेत. ॲक्रीसील, ऑल कार्गो लॉजिस्टिक्‍स, ट्रॅक्‍टर इंडिया(TIL), थरमॅक्‍स, टीडी पॉवर या सर्व कंपन्यांनी मार्च तिमाहीसाठी चांगला नफा दाखवला आहे. अनेकदा परामर्श घेतलेला बजाज फायनान्स गेल्या आठवड्यात १० टक्‍क्‍याने वाढून ३,४०० रुपयांपर्यंत गेला आहे. बजाज फायनान्सचा या तिमाहीचा नफा ५० टक्‍क्‍यांनी वर गेला होता. 

ऑइल अँड नॅचरल गॅस (ONGC) कंपनीचा शेअर सध्या १६७ रुपयांना उपलब्ध आहे. रोज ५० लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ९.७७ पट दिसते. हिंदुस्थान पेट्रोलियमचा सध्या भाव २७५ रुपये आहे. वर्षभरातील कमाल भाव ३२५ रुपये होता. रोज सुमारे ५० ते ६० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर ५.८० पट आहे. कंपनी शेअरवर चांगला लाभांश देत असल्यामुळे तिचा परतावा चांगला पडतो. तिचे जुळे भावंड असलेल्या भारत पेट्रोलियमचा भाव ३७६ रुपये आहे. हीसुद्धा कंपनी चांगला लाभांश देते. हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियममध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक करावी. नॉन बॅंकिंग फायनान्समधली एक कंपनी म्हणून मन्नापूरम फायनान्सचे नाव घ्यावे लागेल. सध्या या शेअरचा भाव १२३ रुपये आहे. वर्षभरातील किमान भाव ६६.२५ रुपये होता. सुमारे ७५ लाख शेअर्सचा इथे व्यवहार झाला. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १२.२३ पट दिसते. चोलामंडलम्‌ इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचा सध्या भाव १,३५० रुपये आहे. वर्षभरातील किमान भाव १,०३८ रुपये, तर कमाल भाव १,६५० रुपये होता. रोज तीन ते पाच लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७.६५ पट दिसते. कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा २३ टक्‍क्‍यांनी वाढून २९१.८६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीचा मार्चचा नफा २८५.२६ कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न या वर्षी १,८८५ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीसाठी हा आकडा १,४५५.९१ कोटी रुपये होता. कंपनीकडे रोकड व बॅंक खात्यातली रक्कम धरता तीन हजार कोटी रुपयांची द्रवता आहे. तिची नक्त अनार्जित कर्जे फक्त १.१ टक्का आहेत.

रालोआच्या बहुमतामुळे काही विश्‍लेषकांच्या मते बॅंका जलद गतीने वाढणाऱ्या ग्राहक वस्तू निर्मितीच्या कंपन्या, पायाभूत संरचनात्मक कंपन्या, सिमेंट, गृहवित्त कंपन्या एवढ्या क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांना चांगले दिवस येतील. इथे विदेशी गुंतवणूकदारांचीही गुंतवणूक वाढेल; गेल्या वेळच्या अंतरिम अर्थसंकल्पात तात्पुरते अर्थमंत्रिपद सांभाळणाऱ्या पियुष गोयल यांनी बॅंकांची कर्जे वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के अनुदान द्यायचे कबूल केले होते. २२ पिकांसाठी किमान भावाची हमी मिळणार होती. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे उत्पन्न वाढणार होते. कर्जाची नियमित फेड केल्यास बॅंका जास्ती प्रमाणात कर्जे देणार आहेत. बॅंकांच्या भांडवलातही सरकार दरवर्षी बरीच रक्कम गुंतवणार आहे. त्यातून बॅंकांचा नफा वाढेल. ज्या बॅंकांना फायदा होईल, त्यात खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंक, फेडरल बॅंक, आरबीएल बॅंक आणि कोटक महिंद्र बॅंक असतील.

ग्राहकांची खरेदी जिथे जास्त होते, त्यातील मैरिको, ब्रिटानिया, नेस्ले व हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), पायाभूत संरचनेतील कंपन्या, केएनआर कन्स्ट्रक्‍शन, अशोका बिल्डकॉन, दिलीप बिल्डकॉन, सनटेक रिॲल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश होईल. आता लक्ष रिझर्व्ह बॅंकेच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या द्वैमासिक वित्तीय धोरणाकडे व जुलैत सादर होणाऱ्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पाकडे असेल. मॉर्गन स्टॅन्लेच्या अमेरिकन ब्रोकरेज कंपनीच्या अंदाजाप्रमाणे निर्देशांक ४५ हजार, तर निफ्टी १३,५०० पर्यंत जावा. 

संबंधित बातम्या