गुंतवणुकीला ‘अच्छे दिन’!

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 10 जून 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या बाहेर काढून भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लावला आहे. भारताने अमेरिकन वस्तूंवर जर काही करसवलती दिल्या, तर ट्रम्प त्यांच्या धोरणाचा पुनर्विचार करू शकतील. 

यानंतर कदाचित अमेरिकेतील व ब्रिटनमधील राजदूत बदलण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळात ज्यांची वर्णी लागलेली नाही, त्यांना इथे कदाचित संधी मिळू शकेल. 

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत रिझर्व्ह बॅंकेने पाच व सहा जून रोजी आपले द्वैमासिक धोरण जाहीर केले असेल. रेपो दरात पाव किंवा अर्धा टक्‍क्‍याने कपात झाली, तर बॅंकांतील कर्जावरील व्याजांचे दर कमी होऊ शकतील. यामुळे भारताला कर्जरोख्यांवरील व्याज कमी द्यावे लागेल व अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब पडेल. भारताला आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आठ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवायचा असेल, तर मूलभूत अर्थव्यवस्थेत बरेच बदल करावे लागतील. अशक्त बॅंकांचे सशक्त बॅंकांत विलीनीकरण केले, तर सरकारला राष्ट्रीयकृत बॅंकांत कमी भांडवल घालावे लागेल. कदाचित काही बॅंकांचे खासगीकरण किंवा विलीनीकरण झाले, तर सशक्त बॅंकांनी आपल्या हिमतीवर भांडवल वाढवावे असा सल्ला दिला जाईल. खासगी बॅंकांत किंवा मोठ्या राष्ट्रीयकृत बॅंकांत परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाण्याचीही शक्‍यता आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेअरबाजारानेही त्यांचे चांगले स्वागत केले. निर्देशांकाने ४०,१०० ची सीमा ओलांडली. निफ्टीनेही १२ हजारच्या आकड्याला स्पर्श केला. मॉर्गन स्टॅन्ले या पतमूल्यन संस्थेच्या मताप्रमाणे मार्च २०२० पर्यंत निर्देशांक ४५ हजार व्हावा. शेअरबाजारात सध्या गुंतवणुकीला ‘अच्छे दिन’ आहेत. बीपीसीएल, हिंदुस्थान पेट्रोलियम अनुक्रमे ४२१ व ३३२ रुपयांपर्यंत पोचले आहेत. दिवाण हाउसिंग फायनान्सच्या प्रवर्तकांच्या बातम्यांमुळे या शेअरमध्ये प्रचंड घसरण होऊन तो ११० रुपयांपर्यंत आला आहे. या भावाला सध्या किं/उ गुणोत्तर तीन पट आहे. पण ते फसवे असून त्यावर अवलंबून गुंतवणूक करू नये. सध्या इथे रोज २५ लाख शेअर्सचा व्यवहार होत आहे. शेअरबाजारातील काही कंपन्यांचा पुढे परामर्श घेतला आहे. इंडिया ग्लायकॉलने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ४३ रुपयांचे शेअरगणिक उपार्जन दाखवले आहे. या शेअरचा भाव सध्या २६४ रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ६.१७ पट दिसते. रोज एक लाख शेअर्सपर्यंत व्यवहार होतो. 

हॅवेल्स इंडियाने या मार्च तिमाहीसाठी २२५ कोटी रुपये नफा दाखवला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा नफा आठ टक्‍क्‍यांनी कमी आहे. आता उन्हाळा सुरू असल्यामुळे या कंपनीच्या उत्पादनाला वाढती मागणी येईल. सध्या या शेअरचा भाव ७४८ रुपये आहे. वर्षभरातील कमाल भाव ५२० रुपये होता, पण इथले किं/उ गुणोत्तर प्रचंड असल्यामुळे गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता नाही. जून २०२० पर्यंत शेअर ८०० रुपयांपर्यंत होण्याची शक्‍यता काही विश्‍लेषक संस्थांनी वर्तवली आहे. एचएसबीसी (HSBC) हिने हा भाव ७७५ पर्यंत जाईल असे म्हटले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन-तीन अशक्त राष्ट्रीयकृत बॅंकांचे विलीनीकरण होण्याची शक्‍यता आहे. माफक प्रमाणावर इथे गुंतवणूक करायला हरकत नाही. 

 विनती ऑरगॅनिक्‍स या कंपनीच्या शेअरचा भाव गेल्या आठवड्यात वाढून २,१६६ रुपयांपर्यंत गेला. गेल्या १२ महिन्यांतील तिचा किमान भाव ९१० रुपये होता. तिचा २०१८-१९ चा नक्त नफा दुप्पट झाला आहे. यावर्षीच्या जूनच्या तिमाहीत नफा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी हा शेअर सध्या घेतल्यास पुढील चार महिन्यांत त्यांना चांगला नफा मिळू शकेल. मार्कसन फार्माने मार्च तिमाहीसाठी चांगला नफा दाखवला आहे. दोन वर्षे मुदतीपर्यंत थांबण्याची तयारी असणाऱ्यांनी इथे माफक गुंतवणूक करावी. ग्राफाईट इंडिया सध्या ४१८ रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा किमान भाव ३०९ रुपये, तर कमाल भाव १,१२७ रुपये होता. कंपनीने शेअरमागे ३५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. थोडी जोखीम घेतल्यास इथे काही महिन्यांत ७०-८० रुपयांची वाढ मिळू शकेल. 

 पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने मार्च २०१९ तिमाहीचे व वर्षाचे चांगले आकडे जाहीर केले आहेत. सध्या या शेअरचा भाव १२४ रुपये आहे. परताव्याचा विचार करता या कंपनीचा लाभांश चांगला असतो. या कंपनीत गुंतवणूक करायला हरकत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील इरकॉनने शेअरमागे २१ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. लाभांश हा करमुक्त असल्यामुळे इथेही गुंतवणूक करायला हरकत नाही. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स सध्या ७८६ रुपयांना घेण्यासारखा आहे. वर्षभरातील भाव १,३९७ रुपये व किमान भाव ५७५ रुपये होता. किमान भावापासून तो ४० टक्के वाढला आहे. सध्या त्यात ८० ते ९० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. गुंतवणूक करायला हरकत नाही. नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांत ही एक उत्तम कंपनी आहे. नॅशनल पेरॉक्‍साईड सध्या २,४६५ रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यात ३५ रुपयांचा लाभांश अंतर्भूत आहे. हाही शेअर गुंतवणुकीला चांगला आहे. 

महिंद्र अँड महिंद्र फायनान्शिअल सर्व्हिसेस, भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स, एसजेवीएन (सतलज जल विद्युत निगम) या शेअरचा परामर्श पुढील लेखात घेता येईल.    

संबंधित बातम्या