शेअर्सचा चढता आलेख

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 1 जुलै 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महिंद्र अँड महिंद्र कंपनीने स्वित्झर्लंडमधील गामाया एस. ए. कंपनीचे ११.२६ टक्के शेअर्स ४३ लाख डॉलर्सला खरेदी केले आहेत. ही स्विस कंपनी कृषितंत्रज्ञान क्षेत्रातली आहे. 

हेक्‍झावेअर टेक्‍नॉलॉजीज कंपनीने अमेरिकेतील मोबीक्विटी कंपनीचे आग्रहण ११.२ कोटी डॉलर्स रोख देऊन केले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाचे पालन करण्यासाठी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने गृह फायनान्समधील गुंतवणुकीपैकी ४.२ टक्के शेअर्स २९० रुपये भावाने विकले आहेत. त्यामुळे एचडीएफसीकडील रोकड सुलभता वाढणार आहे.

सिन्टेक्‍स इंडस्ट्रीजला रोकड द्रवतेची चणचण भासू लागल्याने ती सिन्टेक्‍स समूहातील एक कंपनी, सिन्टेक्‍स प्लॅस्टीक्‍स कंपनीचे शेअर्स विकत आहे. सध्या सिन्टेक्‍स समूहापासून लांब राहिलेले बरे. 

ॲस्ट्रा झेनेका फार्माने कॅन्सरसाठी सध्या गुंतागुंतीच्या केमोथेरपीला साह्यभूत ठरेल असे एक औषध शोधले आहे. ॲस्ट्रा झेनेकाला मार्च २०१९ च्या तिमाहीत ९.८ कोटी रुपये नफा झाला आहे. मागल्या वर्षातील मार्चच्या ३.२२ कोटी रुपये नफ्याच्या ही रक्कम तिप्पट आहे. येस बॅंक गेल्या काही महिन्यांत प्रचंड गडगडला होता. ४०० रुपयांवरुन आजमितीला या शेअरचा भाव ११२ रुपये आहे. गिल यांनी राणा कपूर यांच्यानंतर प्रमुख आर्थिक अधिकारी म्हणून सूत्रे ग्रहण केल्यानंतर त्यांनी बॅंकेची पुनर्रचना मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. बॅंकेची भांडवली पर्याप्तता वाढवण्यासाठी बॅंक पुन्हा एकदा प्राथमिक भागविक्री करेल किंवा काही खासगी गुंतवणूक संस्थांतर्फे भांडवल उभारेल. थोडी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांनी उलट्या प्रवाहात पोहून इथे काही गुंतवणूक करावी. 

ज्युबिलंट लाइफ सायन्सेस सध्या ४७२ रुपयाला उपलब्ध आहे. स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये तिने गेल्या काही महिन्यांत चांगला व्यवसाय केला आहे. सध्या ४७० रुपयाला मिळणारा हा शेअर खरेदीसाठी स्वस्त वाटतो.

दिवाण हाउसिंग फायनान्स सध्या ७८ रुपयापर्यंत उतरल्याने काही जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा भाव आकर्षक वाटत आहे. सध्या खरेदीचा मोह टाळावा आणि जून २०१९ व सप्टेंबर २०१९ चे तिमाही आकडे बघून खरेदीचा विचार करावा. 

ट्रेन्ट कंपनी ही आपले प्रवर्तक टाटा सन्स यांना १,५५० कोटी रुपयांच्या किमतीच्या समभागांची प्राधान्य क्रमाने विक्री करेल.

भारत फोर्ज इलेक्‍ट्रिक पॅसेंजर मोटारींच्या व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरवत आहे. नॅचरल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) ला सध्या धातू क्षेत्रातील उत्पादनाच्या विक्रीत चांगली वाढ मिळत असल्यामुळे हा शेअर नजीकच्या भविष्यात ३० टक्के वर जावा. 

दिलीप बिल्डकॉन सध्या गोव्यामध्ये मनोरा पुलाचे धाडसी काम करत आहे. त्यासाठी भांडवल पुरवठा हवा म्हणून आणि काही कर्जे कमी करण्यासाठी कंपनी आपले महामार्गाचे काही प्रकल्प विकून २,५०० कोटी रुपये उभे करेल. सध्या या शेअरचा भाव ४०० रुपये इतका आहे. वर्षभरात तो किमान ६०० रुपये इतका जाईल. इथे गुंतवणूक अवश्‍य करावी. 

मार्च २०१९-२० वर्षासाठी पोकर्णा कंपनीचे शेअरगणिक उपार्जन ३० रुपये अपेक्षित आहे. सध्या या शेअरचा भाव १४८ रुपये असल्याने किं/उ गुणोत्तर फक्त ५.७ पट दिसते. 

शेमारू एंटरटेनमेंट या सिनेमा क्षेत्रातील कंपनीचे शेअरगणिक उपार्जन मार्च २०२० वर्षासाठी ३५ रुपये व्हावे. सध्या हा शेअर ३४० रुपयांना उपलब्ध आहे. किं/उ गुणोत्तर ११.२ पट दिसते. वर्षभरात हा शेअर ४०० रुपयांपर्यंत जाईल. 

कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल हा शेअर सध्या ७१८ रुपयाला उपलब्ध आहे. येत्या वर्षात त्याचे शेअरगणिक उपार्जन ५५ रुपये व्हावे. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सने आपली घाऊक अनार्जित कर्जे फक्त ०.८६ टक्के आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या शेअरची किंमत ६५० रुपयांपर्यंत जावी.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर अघोषित युद्ध सुरू केले आहे. मात्र, आपल्या व इराणमधील पेट्रोल व्यवहारांना धक्का लागणार नाही अशी ट्रम्प काळजी घेणार आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तम परराष्ट्रनीती याला कारणीभूत आहे. केंद्र सरकार आता १२ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे काढत आहे. रिझर्व्ह बॅंक ते सर्व विकत घेऊन बाजारातील द्रवता वाढवेल. प्रादेशिक ग्रामीण बॅंका सध्या दुर्लक्षित आहेत. केंद्र सरकार नजीकच्या भविष्यात त्यात काही भांडवलाची गुंतवणूक करेल.

संसदेचे नवीन अधिवेशन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाले आहे. नव्या भारताचा आराखडा जनतेसमोर मांडण्याचा विचार करून, सर्वांनी राष्ट्रीय सुरक्षेला जास्त महत्त्व द्यावे असे त्यांनी म्हटले आहे. कृषिक्षेत्रात २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सर्वत्र येत असलेल्या आणि वाढत्या जलसंकटाला सामोरे जाण्याची जरुरी त्यांनी व्यक्त केली आहे. मुद्रा योजनेची व्याप्तीही ३० कोटी लोकांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकारसमोर राष्ट्रपतींतर्फे ठेवले गेले आहे. सध्या देशात ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका, राज्य विधानसभा, आणि लोकसभा इतक्‍या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. सतत कुठे ना कुठे तरी आचारसंहिता लागू होत असते. त्यामुळे विकासकामे खोळंबतात. या सर्वांवर जालीम उपाय म्हणून एक देश एक निवडणूक व्यवस्था या प्रस्तावाचा सांसदानी गंभीरपणे विचार करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे. 

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने २०२५ पर्यंत म्हणजे पुढच्या सहा वर्षांत पाच ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत आपली अर्थव्यवस्था नेऊ असे म्हटले आहे. (एक ट्रिलीयन म्हणजे एक हजार अब्ज कोटी रुपये, म्हणजेच एकावर १२० इतकी होईल.) २०३२ मध्ये ती सात ट्रिलीयन रुपयांपर्यंत जाण्याचीही शक्‍यता आहे.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्टॅटिस्टीकल टाइम्स’ या नियतकालिकाप्रमाणे जगातील १९२ देशांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यात अमेरिकेचे उत्पन्न २०.४१ ट्रिलीयन डॉलर्स आणि चीनचे उत्पन्न १४.०९ ट्रिलीयन डॉलर्स होते. जगाच्या एकूण उत्पन्नात अमेरिकेचे व चीनचे उत्पन्न अनुक्रमे २३.३ टक्के व १६.१ टक्के आहे. त्यानंतर जपान ५.१६, जर्मनी ४.२१, ग्रेट ब्रिटन २.९४ आणि फ्रान्स २.९ ट्रिलीयन असे उत्पन्न आहे. त्यानंतर २.८५ ट्रिलीयनवर भारताचा सातवा नंबर लागतो. म्हणजे ही रक्कम २०० लाख कोटी रुपये होते. 

गुंतवणुकीच्या बाबतीत आता थोडा विचार करता हेग १,३४६ ला बंद झाला. लक्ष्मी विलास बॅंक ६३ रुपयांना उपलब्ध आहे. इआयडी पॅरी १६७ रुपयांना आहे. तर जीएचसीएल (गुजरात हेवी केमिकल्स) २४३ रुपयांना आहे. हिंद पेट्रोलियम २९२ रुपयांना आहे आणि भारत पेट्रोलियम ३८०ला मिळू शकतो. डिशयन कार्बोजेन ॲम्सीस २२० रुपयांना आहे. ग्राफाईटने शेअरमागे ३५ रुपयांचा लाभांश जाहीर करूनही तो ३४० रुपयांच्या आसपास मिळू शकतो. सध्या त्यात सुमारे ३० लाख शेअर्सचा व्यवहार होत आहे. सध्या तो फक्त दोन पट किं/उ गुणोत्तराला उपलब्ध आहे. थोडीफार जोखीम घ्यायची ताकद असेल, तर हेग आणि ग्राफाईट जरूर घ्यावेत. हेगचे किं/उ गुणोत्तर फक्त १.८० पट आहे. 

पिरामल एंटरप्राइजेस सध्या १,९०० रुपयांना उपलब्ध आहे. कंपनीचा १२ महिन्यांतील कमाल भाव ३,३०० रुपये होता; तर किमान भाव १,७२६ रुपये होता. पिरामलची एक पोटकंपनी जे. बी. केमिकल्स या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

येत्या काही दिवसांत काही महत्त्वाच्या घटनांत भारताला पॉिम्पओ भेट देण्याची शक्‍यता आहे. २८ जूनला जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद भरत आहे. तिथे नरेंद्र मोदी यांची ट्रम्प यांच्याबरोबर बातचीत होईल. ट्रम्प चीनच्या प्रमुख नेत्यांबरोबर बातचीत करणार आहेत. भारत, अमेरिका व जपान या राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक ही जगाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल. केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बॅंकांना भ्रष्ट व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कडक उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत. 

सध्या गुंतवणूक करताना कंपनीच्या भूतकाळाबरोबरच कंपनीच्या व्यवस्थापकांचेही मूल्यमापन लक्षात घेणे आवश्‍यक आहे. 

यापुढील निर्देशांक व निफ्टीतील वाढ जून २०१९ तिमाहीचे मोठ्या कंपन्यांचे विक्री व नफ्याचे आकडे जसे प्रसिद्ध होतील तसतशी होत जाईल.

अमेरिका व इराण यांच्यातील तणाव वाढला, तर जागतिक स्तरावर पेट्रोलचा पुरवठा कमी होईल. या धोक्‍याची तीव्रता लक्षात घेता भारताने ठिकठिकाणी मोठमोठ्या शहरात पेट्रोलचे साठे करून ठेवणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे कृष्णा-गोदावरी खोरे, राजस्थान, आसाम, मुंबई ऑफ शोअर या ठिकाणी उत्खनन करून नवीन साठ्यांचा शोध घ्यायला हवा. संरक्षणाच्या दृष्टीने अणु-पाणबुड्यांवरही बरीच गुंतवणूक करायला लागणार आहे. राफेल विमानांप्रमाणेच अचूक मारा करू शकणाऱ्या ड्रोन विमानांचीही भारताला आवश्‍यकता भासेल. त्यामुळे संरक्षण, विकास, शेतकऱ्यांची ऊर्जितावस्था, बेरोजगारी अशी अनेक आव्हाने देशासमोर उभी आहेत. त्यातच रालोआच्या काही मित्रपक्षांचीही अधूनमधून डरकाळी येतच असते. तिचाही विचार शांतमनाने व्हायला हवा. हे झाले तरच अर्थव्यवस्था जोराने वाढायला लागेल.  

संबंधित बातम्या