शेअर बाजारात तेजी वाढणार? 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 8 जुलै 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महाराष्ट्राच्या विधानसभेचे नवे अधिवेशन सुरू झाले आहे. सहा महिन्यांतच इथेही निवडणुका होणार असल्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे डावपेच सुरू झाले आहेत. विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे. प्रख्यात शेअरबाजार तज्ज्ञ गोऱ्हे यांच्या त्या कन्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या ४० हून अधिक वर्षे त्या कार्यरत आहेत. खरे तर अशी मोठी मानाची जागा त्यांना यापूर्वीच मिळायला हवी होती. उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेतील त्या तिसऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यांनी आपली कारकीर्द युवक क्रांतीदलातून सुरू केली. पुरोगामी जनसंघटनेची कार्यकर्ती इथपासून ते सध्या उपसभापती पदापर्यंत त्या पोचल्या आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस असे टप्पे ओलांडत त्या शिवसेनेत आल्या.

अमेरिका आणि इराण यांचे शीतयुद्ध सध्या सुरू आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष इराणकडे लागले आहे. मध्यपूर्वेतील तेलसंपन्न इराणबरोबर भारताचे संबंध चांगले आहेत. अमेरिकेचे आणि आपले संबंधही चांगले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील शीतयुद्धाचा आपल्याला काहीही फटका बसत नाही. भारताकडून इराण तेलासाठी धान्य या प्रकारे किंमत घेतो. सौदी अरेबिया व इराकनंतर इराणच भारताला जास्त प्रमाणात पेट्रोल पुरवतो.

भारताने इराणच्या चाबहार बंदरात प्रचंड गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान व मध्य आशिया यांच्याबरोबर व्यापार वाढवण्यासाठी चाबहार बंदर महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे भारत अमेरिका व इराण यांचे एकमेकांशी असलेले संबंध महत्त्वाचे ठरतील.

काही दिवसांपूर्वी २८ जूनला केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी १० पैशांची कपात केली आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (National Saving Certicates), किसान विकासपत्रे (KVP), मासिक प्राप्ती योजना (MIS) या योजनांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी आता शेकडा आठ टक्‍क्‍यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळेल. किसान विकासपत्रे यावर आता ७.६ टक्के व्याज दिले जाणार असून, यातील गुंतवणूक ११३ महिन्यांत दामदुप्पट होईल. मासिक प्राप्ती योजनेवर ८.६ टक्के तर खास मुलींसाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.५ टक्‍क्‍यांऐवजी ८.४ टक्के असेल. रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वी रेपो दरात पाव टक्‍क्‍याने कपात केली होती. त्याचाच हा परिपाक आहे.

शेअरबाजारात गेल्या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या वार्ता आल्या. दिवाण हाउसिंगच्या पडझडीनंतर सुझलॉनवरही आता आपत्ती कोसळली आहे. कॉर्पोरेट डेबिट रिस्ट्रक्‍चरींग प्रोगॅम २०१३ मध्ये जाहीर केला होता, पण त्याप्रमाणे सुझलॉन धनकोना कर्जफेड करू शकलेली नाही. बॅंकांना तिच्याकडून १० हजार कोटी रुपये येणे आहे.

रिझर्व्ह बॅंकेने नुकताच एक फायनान्शिअल स्टेबिलीटी रिपोर्ट जाहीर केला आहे. ग्राहकशक्तीत आलेली मंदी आणि त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन सक्षम न राहण्याची शक्‍यता, यामुळे आर्थिक व्यवस्थेवर ताण पडू शकतो. बॅंकांची व वित्तकंपन्यांची अनार्जित कर्जे सध्या ९.३ टक्के आहेत. २०१९-२०२० मध्ये भरपूर तरतुदी करून यंदाची टक्केवारी नऊपेक्षा खाली आणण्याचा बॅंकांचा निर्धार दिसतो. एकूण अनार्जित कर्जांपैकी ५२ टक्‍क्‍यांपर्यंतची तरतूद मार्च २०१९ अखेर झाली आहे.

कॉक्‍स अँड किंग्ज कंपनीला आपली अपरिवर्तनीय कर्ज रोख्यांची २०० कोटी रुपयांपर्यंतची परतफेड करण्यात यश आलेले नाही. फक्‍त ५० कोटी रुपयांचीच परतफेड झाल्यामुळे १५० कोटी रुपयांची रक्कम वांध्यात पडली आहे.

स्वित्झर्लंडमधील गुप्त खात्यांची माहिती काही बाबतीत मिळवण्यात सरकारला यश आले आहे. परागंदा झालेल्या नीरव मोदी आणि त्याची बहीण यांच्या खात्यातील ६४ लाख डॉलर्सची रक्कम गोठवली गेली आहे. भगिनी पूर्वी मोदी, नीरव मोदींनी पंजाब नॅशनल बॅंकेला दोन अब्ज डॉलर्सचा चुना लावला आहे. सेबीने गेल्या गुरुवारी अनेक सुधारणा जाहीर केल्या आहेत.

नजीकच्या भविष्यात जी-२० राष्ट्रांची बैठक भरणार आहे. भारताच्या जबरी आयात कराबद्दल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तक्रार करतील.
 कर्नाटक राज्य बांधकामावर पाच वर्षे बंदी आणण्याचा विचार करीत आहे. तसे झाल्यास अंतर-राज्य व्यवहारात काही धक्के बसू शकतील.

गेल्या आठवड्यात वर्धमान टेक्‍स्टाईल्स, एशियन पेंट्‌स, अमर राजा बॅटरीज, इमामी, गोदरेज कन्झ्युमर, टीव्ही टोडॅट नेटवर्क, मॅक्‍लॉईड रसेल, भेल, सिंप्लेक्‍स रिॲल्टी, श्री कलहस्ती पाइप्स, ॲक्‍सिस बॅंक, इक्‍लेअर्स, बजाज फायनान्स, आरएसडब्लूएम, टीटीएलटीडी, एल.टी. फूड्‌स, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले.

कॅफे कॉफी डे, कोकाकोलाकडून एक कंट्रोलिंग स्टेक घेण्याचा प्रयत्न करीत आहे. केपीआर ॲग्रोकेम बाजारात शेअर्सची प्राथमिक विक्री करणार होती, पण तिने ही विक्री स्थगित केली आहे. ॲक्‍सिस बॅंक १.३ अब्ज डॉलर्सच्या शेअर्सच्या विक्रीबद्दल इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर्सबरोबर वाटाघाटी करत आहे, त्यामुळे तिचे भागभांडवल वाढेल आणि ती मोठ्या प्रमाणावर कर्जे देऊ शकेल.

एल अँड टीने गुरुवारी २७ जूनला माईंड ट्रीचे शेअर्स बाजारातून घेण्याबद्दल देकार दिला होता. तो यशस्वी झाल्याने माईंड ट्रीमधील लार्सेन टुब्रोची गुंतवणूक ६० टक्‍क्‍यांवर गेली आहे.

एचडीएफसी बॅंकेची, नॉन बॅंकिंग फायनान्शिअल क्षेत्रातील एचडीबी फायनान्शिअलचे शेअर्स प्राथमिक विक्रीसाठी देण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास एचडीएफसी बॅंकेचे शेअर्स खूप वाढतील. जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांनी एचडीएफसी बॅंकेचे शेअर्स जरूर खरेदी करावेत.

एक्‍सेल इंडस्ट्रीज, नेट मॅट्रीक्‍स क्रॉप केअर या कंपनीचा रासायनिक विभाग ९५ कोटी रुपयांना घेऊन ते आग्रहण पुरे करणार आहे. पर्सिस्टंट सिस्टिम्स, You peflence कंपनीचे ७० टक्के शेअर्स १२ लाख स्टर्लिंग पौंडांना (१०.५ कोटी रुपये) घेणार आहे.

 गेल्या वर्षात बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया बॅंक आणि देना बॅंक यांचे विलीनीकरण जाहीर झाले होते. हे विलीनीकरण पूर्णत्वास नेऊन एप्रिल २०१९ पासून बॅंक ऑफ बडोदाचे काम सुरू झाले आहे.

 बजाज फायनान्शिअलचा शेअर गेल्या तीन वर्षांत साडेपंधरा पटीने वाढला आहे. त्यामुळे या लेखमालेत बजाज फायनान्स घ्यावा असे सतत का लिहिले जात होते ते कळेल. वर्षभरात बजाज फायनान्स सध्याच्या ३,६८२ रुपयांवरून ४,२०० ते ४,५०० रुपयांपर्यंत जाईल अशी शक्‍यता आहे.
 
लार्सेन टुब्रोला ऊर्जा कंपन्यांकडून सुमारे सात हजार कोटींच्या ऑर्डर्स मिळणार आहेत. क्रेडिट स्यूसी आणि नोमुरा या कंपन्यांनी ल्युपिनचे शेअर्स घेण्याची शिफारस केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला येत्या वर्षात मोठ्या ऑर्डर्स मिळणार असल्यामुळे हा शेअर वर्षभरात २५ टक्‍क्‍यांनी वाढू शकेल.  

संबंधित बातम्या