शेअर बाजारात घसरण 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 15 जुलै 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला २०१९-२०२० वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांप्रमाणेच ज्या मध्यमवर्गाने मोदी-२ साठी भरभरून मते दिली त्यांच्या तोंडाला इथे पाने पुसली गेली आहेत. मध्यमवर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली करमुक्त मर्यादा पाच लाख, २५ हजार रुपये आहे. ही मर्यादा ५० हजार रुपये ते एक लाख रुपयांनी वाढवली असती, तर ‘उलट्या हाताने कावळा हाकल्याचे’ किंचित पुण्य त्यांना मिळाले असते. पुढील निवडणुका २०२४ मध्ये होईपर्यंत आता या वर्गाकडे दुर्लक्ष केले तरी चालणार आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्पातील आकडे देण्यापूर्वी दोन तास रटाळ भाषणांची सुरुवात केली होती. मागील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तीच प्रथा चालू ठेवली. निर्मला सीतारामन यांनी अडीच तास भाषण करून इजा बिजा तिजा हे शब्द सार्थ ठरविले.

यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत संरचना, सर्व देशात सर्वांना पाणीपुरवठा आणि तेलबियांच्या उत्पादनवाढीवर जोर देण्यात आला आहे, तो योग्यच आहे. खाद्य तेलाच्या आयातीवर आपण दरवर्षी ७३ हजार कोटी रुपये खर्च करतो. हा आकडा पुढील पाच वर्षांत शून्यावर आला पाहिजे. महसुली तूट व वित्तीय तूट यावर्षी, दरवर्षीप्रमाणेच फक्त चायपे चर्चा झाली. जलवाहतुकीसाठी मात्र मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातील, असा पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी केला असला, तरी देशातील सर्व नद्या एकमेकांना जोडण्याचे स्वप्न अपुरेच राहत आहे. नद्यांतील गाळ काढून (Dredging) त्यांचे पात्र खोल व विस्तीर्ण करण्याचे व नद्यांतील पाणीपुरवठा वाढवण्याचे अजूनही मनावर घेतले जात नाही. जलसंधारण कल्पनेतील पहिले पाऊल हे असायला हवे. पूर्व-पश्‍चिम किनाऱ्याजवळून खूप मोठे महामार्ग आखून आणि कोकण रेल्वेप्रमाणेच सर्व किनाऱ्यांवर किनारा रेल्वे सुरू करणे अत्यावश्‍यक आहे.

अर्थसंकल्पात नागरी आणि ग्रामीण विभागातील सर्व रस्ते एकमेकांना जोडणे या कल्पनेचा प्रत्यक्षात अंमल व्हायला हवा. देशात पूर्वी २१० किलोमीटर मेट्रो रेल्वे धावत होत्या. आता त्याचे उद्दिष्ट ६५७ किलोमीटर ठेवण्यात आले आहे. १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात मेट्रोचे जाळे वाढायला हवे. २०२२ पर्यंत इथे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. रेल्वेच्या वाढीसाठी ५० लाख कोटी रुपये हवे आहेत. त्यासाठी परकीय गुंतवणूकदारांना जास्त सवलती द्यायला हव्यात. रस्ते व घरबांधणी व्यवसाय इथेच मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढत असतात, त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात भर हवा.

शेअरबाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात यायला हवे यासाठी काही वर्षांपूर्वी राजीव गांधी योजना सुरू केली गेली होती. ‘राजीव’ या नावाला न बिचकता या योजनेची व्याप्ती तीन लाख रुपयांपर्यंत वाढवायला हवी. नाहीतरी ‘राजीव’ या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असाच होतो.

गेल्या वर्षी तीन राष्ट्रीयकृत बॅंकांचे एकत्रीकरण करण्यात आले होते. ही एकत्रित बॅंक आता १ एप्रिल २०१९ पासून कार्यरत होणार आहे. यावर्षीही अशाच काही विलीनीकरणाच्या घोषणा जाहीर व्हायला हव्या होत्या. त्यायोगे राष्ट्रीयकृत बॅंकांची संख्या कमी झाली असती आणि थोड्याच पण सक्षम बॅंका ग्राहकांना चांगल्या सोयी, सवलती देऊ शकल्या असत्या.

भारत सरकार आपले लोखंड, पोलादाचे धोरण महिनाअखेर जाहीर करणार आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील अँड पॉवरमध्ये गुंतवणूक हवी. सध्या हा शेअर २७५ रुपयांना आहे. वर्षभरात त्यात ३० टक्के वाढ होईल.

अर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे शुक्रवारी बाजार पडलाच होता, पण नंतरही सोमवारी तो ४३८ अंकांनी घसरून ३९,०७६ पर्यंत खाली आला. निफ्टी १३६ अंकांनी उतरून ११,६७४ पर्यंत खाली आला व निफ्टी बॅंकही ४६१ अंकांनी घसरून ३१,०१४ ची पातळी गाठली. सहसा खाली न उतरणारा बजाज फायनान्सही ३,४२० पर्यंत उतरला. ज्यांची पूर्वीची खरेदीची संधी हुकली असेल, त्यांनी अजूनही उतरत्या भावात बजाज फायनान्स घ्यायला हरकत नाही.

दिलीप बिल्डकॉन हाही शेअर ४३६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या १२ महिन्यांतील याचा उच्चांकी भाव ९१७ रुपये बघता तो जरूर घ्यावा. वर्षभरात हा शेअर किमान ४० टक्के नफा देऊन जाईल.

लार्सेन टुब्रो १,६५८ रुपयांपर्यंत उतरला आहे. या शेअरमध्ये त्यामानाने फारशी घट नाही. बजाज फिनसर्व्ह ८,३५८ पर्यंत उतरला आहे. उतरणाऱ्या भावात हे सर्व शेअर्स जरी आकर्षक वाटले, तरी खरेदीसाठी थोडे थांबणेच इष्ट ठरेल.

शेअरबाजारातील गुंतवणूक ही किमान एक वर्षासाठी ठेवली, तर त्यात चांगला नफा मिळून जातो.  अर्थसंकल्पात सोन्यावर कुठार बसली असली, तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून काही गुंतवणूकदार त्याच्याकडे बघतात. पण सोने वाढले तरच त्या गुंतवणुकीत काही हाताला लागते. शिवाय ते चोरीला जाण्याची भीतीही असते. म्हणून शेअरबाजारातील चांगल्या कंपन्यांतच गुंतवणूक केली, तर त्यात सुरक्षितता, विक्रीयोग्यता याबरोबरच काही उत्पन्नाचीही शक्‍यता असते.

केंद्र सरकारचे लोखंड-पोलादाचे धोरण महिनाअखेर जाहीर होणार आहे. त्यामुळे पूर्वी सुचविलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलप्रमाणेच ए.पी.एल. अपोलो ट्युब्जध्येही गुंतवणूक यशस्वी ठरेल. सध्या या शेअरचा भाव १,६२० रुपये आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा किमान भाव १,००३ रुपये होता; तर कमाल भाव १,८४० रुपये होता. घसरत्या बाजारामध्येही हा शेअर टिकून आहे. जून २०१९ ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत तिची विक्री २९ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. या तिमाहीत तिने तीन लाख, ८८ हजार टन उत्पादन विकले. कंपनी बांधकामात लागणाऱ्या पोलादी नळ्यांच्यावर भर देत आहे. तिने नुकताच शंकरा बिल्डिंगकडून दोन लाख टन निर्मितीचा एक कारखाना घेतला असून अपोलो ट्रायकोट अशी एक उपकंपनी स्थापन केली आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रकल्प जसजसे वाढत जातील तशी तशी या कंपनीच्या उत्पादनाला मागणी वाढत जाईल.

काही दिवसांपूर्वी एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत असलेली आपली अर्थव्यवस्था आता तीन ट्रिलीयन डॉलरपर्यंत गेली आहे. पुढील पाच वर्षांत ती पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. कोळसा उत्पादन, औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, खाणी, खनिजे या क्षेत्रांत विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर यावी असे धोरण जर अवलंबिले गेले, तर अर्थव्यवस्था जास्त बळकट ठरले.

अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक जरी नाराज असला, तरी ओ.एन.जी.सी. आणि ऑइल इंडिया या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. पेट्रोल वितरण कंपन्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यातही अवश्‍य गुंतवणूक हवी. सामान्य नागरिकांनी आपली बचत बॅंकांतील ठेवीत ठेवण्याऐवजी शेअरबाजारात घालायला हवी. अधून मधून चढउतार जरी दिसले, तरी दोन-तीन वर्षांचा विचार करता शेअरबाजारात वर्षभरात ३० टक्के सरासरीने नफा मिळतो.

राष्ट्रीयकृत बॅंकांची अनार्जित कर्जे आता बरीच कमी झाली आहेत आणि केंद्र सरकारने त्यात ७५ हजार कोटी रुपयांचे भांडवल घालायचेही ठरवले आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक यशस्वी ठरेल.

सागरमाला व भारतमाला या समुद्रकिनाऱ्यांशी संबंधित असलेल्या प्रकल्पांवर सरकार भर देणार आहे. इथे लागणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करणाऱ्या विंध्या टेलि व स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी इथेही गुंतवणूक चांगली ठरेल.  

संबंधित बातम्या