शेअर बाजार सुधारण्यास वाव

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

सध्या भारतात आणि जगात अर्थकारणापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व आले आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली. पाकिस्तानचे कुठलेही पंतप्रधान कुठल्याही वेळी कुठल्याही राष्ट्रप्रमुखांना भेटतात, त्यावेळी काश्‍मिरचा प्रश्‍न हमखास उकरून काढतात. संपूर्ण जम्मू-काश्‍मीर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय सैन्याला थांबायचा हुकूम देऊन पंडित नेहरूनी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आणि या प्रश्‍नाचे मातेरे केले. इथे सैन्य ठेवून हजारो कोटींची रक्कम आपण दरवर्षी त्या चुकीपोटी खर्च करीत आहोत. ही ५० वर्षांतील रक्कम भारतातील विकासकामांसाठी झाली असती, तर आजच भारताची अर्थव्यवस्था सहा ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत गेली असती. 

काश्‍मीरनंतर आता कर्नाटकचा विचार केला, तर तिथे जदयु-काँग्रेस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजप असा कलगीतुरा रंगला होता. अखेर भाजपने यात बहूमत मिळवून कर्नाटकात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. 

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे निकालात निघाला नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नोकरभरती रखडली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सातवा वेतन आयोग सुरू करण्याचे ठरवले आहे. १ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ या काळासाठी द्यावयाची रक्कम, कर्मचाऱ्यांना दरवर्षी २० टक्‍क्‍यांप्रमाणे पाच वर्षांत दिली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर किती कोटी रकमेचा बोजा पडेल हे गुलदस्त्यातच ठेवले गेले आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. मी-तू, मी-तू करत भाजप व शिवसेना युती अभंग ठेवली जाईल. युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याची अपेक्षा आहे. 

आंध्रप्रदेशात तिथल्या राज्यसरकारने नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्‍क्‍यांपर्यंत नोकऱ्या द्यायचे ठरवले आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यातही अशी मागणी लवकरच मूळ धरेल. 

जागतिक पटलावर आणखी एका महत्त्वाच्या घटनेची नोंद करायला हवी. ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्‍झिटच्या प्रश्‍नावर राजीनामा दिला. बॉरीस जॉन्सन हे आता नवे पंतप्रधान असणार आहेत. या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढाईत त्यांनी हुजूर पक्षाच्या जेरेमी हंट यांचा पराभव केला. जॉन्सन यांनी पूर्वी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री व लंडनचे महापौर या जागा भूषविल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात भारताने अवकाशात चांद्रयान सोडून एक मोठे यश मिळवले आहे. अमेरिका, चीन व रशिया यांच्यानंतर चांद्रयान पाठवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. 

जून २०१९ च्या तिमाहीचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे बहुतेक मोठ्या कंपन्यांनी आतापर्यंत प्रसिद्ध केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राहुल बजाज यांच्या समूहातील बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, बजाज अलायन्झ जनरल इन्शुअरन्स यांचे आकडे प्रसिद्ध झाले. बजाज फिनसर्व्हचे या जून तिमाहीचे उत्पन्न १२,२७२ कोटी रुपये होते. नक्त नफा ८४५ कोटी रुपये होता. मार्च २०१९ ला संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीचे एकूण उत्पन्न ४२,६०६ कोटी रुपये होते. नक्त नफा ३,२१९ कोटी रुपये होता. 

बजाज फायनान्सची जून २०१९ तिमाहीची विक्री ५,८०८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या जूनसाठी हा आकडा ३९३८ कोटी रुपये होता व नक्त नफा ८५६ कोटी रुपये होता. कंपनीची व्यवस्थापनातील जिंदगी १,२८,८९८ कोटी रुपये होता. ३,०५० वरून हा शेअर आता ३,२५० रुपयांवर गेला आहे. दर तिमाहीला बजाज फायनान्स ३०० रुपयांनी वाढतो. मार्च २०२० पर्यंत तो चार हजार रुपयांची सीमा ओलांडून गेला असेल. 

बऱ्याच दिवसानंतर बॅंक ऑफ बडोदाने या तिमाहीसाठी ७१० कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे. गेल्या वर्षी बॅंकेत दोन लहान बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. 

 महिना अखेर अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्हची बैठक भरणार आहे. त्यावेळी कदाचित व्याजात पाव टक्‍क्‍याची घट होऊ शकेल. 

जेएसडब्ल्यू स्टीलचा यावेळचा संगठीत नक्त नफा ५६ टक्‍क्‍यांनी कमी होऊन १,००८ कोटी रुपये झाला आहे. स्टॅंड अलोन नफ्यात ३९ टक्‍क्‍यांची घट आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी गाळात निघालेल्या भूषण समूहाच्या कंपन्यांचे आग्रहण केले होते. जेएसडब्ल्यू स्टील तिथे या वर्षी १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी, पंजाब नॅशनल बॅंक आणि अलाहाबाद बॅंक यांच्याकडून काही सवलती मागणार आहे. जेएसडब्ल्यू स्टीलने १०० पेक्षा जास्त डिजिटल टेक्‍नॉलॉजी प्रकल्पात १८० कोटी रुपयांची बचत केली आहे. ही बचत यापुढेही चालू राहील. जेएसडब्ल्यू समूहाने PWC इंडियाबरोबर एक संयुक्त अभ्यास केला होता. त्यांच्या निष्कर्षानुसार ओडिशा राज्याने धातू व अन्य संबंधित क्षेत्रात जर मोठी गुंतवणूक होऊ दिली, तर भारत सहाच काय १० ट्रिलीयनपर्यंतसुद्धा आपली अर्थव्यवस्था गेल्याचे बघू शकेल. चीनमधल्या बेहेर प्रांतात बरीच खनिजे आहेत. तिथे त्या खनिजांचा लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातील लोह मातीपैकी ३५ टक्के लोह माती ओडिशात आहे. तिथे निकेल बॉक्‍साईट, क्रोमाईट आणि मॅंगनीज हे धातूही सापडतात. 

ओडिशामध्ये २० कोटी टन पोलाद, दीड कोटी ॲल्युमिनियम, ४० कोटी टन लोहमाती आणि २५ कोटी टन कोळसा आहे. या सर्वांमुळे ओडिशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न एक ट्रिलीयन डॉलर इतके होऊ शकले. नवीन पटनायक या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ओडिशा विकासाची स्वप्ने बघत आहे. 

येस बॅंक काही दिवसांपूर्वी ८० रुपयांपर्यंत उतरला होता. तिथून तो आणखी घसरेल असे वाटले होते. पण तो सध्या ९५ रुपयांवर स्थिर आहे. गेल्या काही दिवसांत येस बॅंकेच्या भावात १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. येस बॅंकेने कॉक्‍स अँड किंग्जमध्येही १८ टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक केली आहे. नजीकच्या भविष्यात त्याचा फायदा तिला होईल. येस बॅंकेने ३.२७ कोटी शेअर्सचा हा व्यवहार केला आहे. कॉक्‍स अँड किंग्जचा या मार्च २०१९ वर्षाचा व्यवहार ५,६९३ कोटी रुपयांचा होता. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्‍स २५ टक्‍क्‍यांवर आणण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार ज्यांचा वार्षिक व्यवहार ४०० कोटी रुपयांच्या आत आहे, त्यांनाच ती सवलत होती. आता ही सवलत सर्व कंपन्यांना लागू करण्याचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे शेअरबाजार हळूहळू सुधारू लागेल. 

दिलीप बिल्डकॉन ४३० रुपयांच्या आसपास थांबला आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त १०.६५ पट आहे. रोज सुमारे दोन लाख शेअर्सचा व्यवहार होतो. गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव ९१७ रुपये होता. तो लक्षात घेता सध्याच्या भावात वर्षभरात ५० टक्के वाढ व्हायला हरकत नाही. 

स्टरलाईट टेक्‍नॉलॉजी सध्या वर्षभरातील किमान भावापेक्षा थोडासाच वर आहे. १५९ रुपयांना हा शेअर घेतल्यास वर्षभरात त्याचा २४० रुपये भाव पहायला मिळेल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ११ पट आहे. कंपनीचा जून तिमाहीसाठीचा नफा १७ टक्‍क्‍यांनी वाढून १४१ कोटी रुपये झाला आहे. खरेदीसाठी सध्याचा भाव आकर्षक वाटतो. रोज सुमारे १३ ते १५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

सध्याच्या बाजाराचा विचार करता बजाज फायनान्स, स्टरलाईट टेक्‍नॉलॉजीज, येस बॅंक व बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स गुंतवणुकीला योग्य ठरतील.

संबंधित बातम्या