आर्थिक घडामोडी थंडच..

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

पावसाने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. वाहतूक विस्कटली आहे. गाड्या बंद पडल्या आहेत आणि नद्या दुथडी वाहत आहेत, असा पाऊस अजून दोन महिने राहणार आहे. 

दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपमध्ये पक्षांतर करून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. योग्य व्यक्तीसाठी प्रवेश खुला असून इतरांसाठी हाऊसफुल्ल झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या निवडणुका जरी तीन महिन्यांवर असल्या, तरी मुख्यमंत्रिपदाचे बाशिंग बांधायला काहींना घाई झाली आहे. वय, अनुभव नसतानाही सर्वजण स्वतः त्या पदावर बसण्याची स्वप्ने बघत आहेत व त्यासाठी यात्रा काढत आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा केला, तर निदान उपमुख्यमंत्रिपद तरी मिळेल, असा त्यातला डाव आहे. तीन महिन्यांत सर्वच बाबी स्पष्ट होतील, पण देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील यात संशय नाही. विरोधी पक्षांना जेमतेम ३५ ते ४२ जागा मिळतील असे दिसते. 

पावसामुळे खडकवासला-पानशेत धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. मुंबईतील मोडक सागर तलावासह सर्व तलाव भरले आहेत. मराठवाड्याचा अपवाद सोडला, तर सर्वत्र खरीप पिके उत्तम यावीत, असे तज्ज्ञांना वाटते. 

पाच ऑगस्टला जम्मू काश्‍मीर व लेह लडाख असे केंद्रशासित प्रदेश करून ३७० कलम व ३५ अ कलम झेलम नदीत विरघळून गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा भारत-पाकिस्तानमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी तयार आहे, असे सांगत आहेत. चीन, उत्तर कोरियाबरोबर त्यांनी जमवून घेतलेले आहे. पण आता काश्‍मीरबाबत त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ३७० व ३५ अ कलम रद्द झाल्याने भारतात सर्वत्र जल्लोष सुरू आहे. १५ ऑगस्ट १९४७ नंतर ७२ वर्षांनी भारतात पुन्हा नवीन प्रागतिक पाऊल पडले. 

बंगालमध्ये ममता दीदी पक्षाचा मेक ओव्हर करू इच्छित आहेत. पुढील काही दिवसांत १० हजार गावांना तृणमूलचे एक हजार कार्यकर्ते भेट देणार आहेत. आंध्रमध्ये प्रशांत किशोर यांची रणनीती यशस्वी ठरली होती. ग्रामीण भागातही किशोरजी ममता दीदींसाठी रणनिती आखणार आहेत. 

अमित शहांची काश्‍मीरमधील खेळी यशस्वी झाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपला भरपूर मतदान होईल व निदान १५० च्या आसपास जागा मिळतील. राजकीय घडामोडींना जरी वेग आला असला, तरी आर्थिक घडामोडी थंडावलेल्या आहेत. शेअर बाजार सुस्तावलेलाच आहे. सोमवारी ५ ऑगस्टला निर्देशांक ३६,६९९ वर बंद झाला, तर निफ्टी १०,८६२ वर थबकला. गेल्या ५२ आठवड्यांतील ४०,३१२ च्या उच्चांकावरून तो सात हजार अंक घसरला आहे. निफ्टीचा गेल्या १२ महिन्यांतील उच्चांक १२,१०३ होता. तो १०,००४ पर्यंत घसरला होता. बजाज फिनसर्व्ह ५ ऑगस्टला ६,९८६ रुपये, बजाज फायनान्स ३,१६० रुपये, मॅक्‍स फिनान्शिअल सर्व्हिसेस ४०० रुपये असा भाव दाखवत होते. 

सध्या नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना बॅंका कर्जे देईनाशा झाल्या आहेत. त्यांना ठेवी किंवा कर्जरोख्यांच्या स्वरूपातच आपला व्यवहार वाढवावा लागणार आहे. 

बीइएमएल (भारत अर्थ मूव्हर्स)चे जून २०१९ च्या तिमाहीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले होते. जून २०१८ पासून गेल्या एका वर्षात विक्री २८ टक्‍क्‍यांनी वाढून ५०० कोटी रुपयांवर गेली. कंपनीचे ढोबळ मार्जिन ३९ टक्के वाढले आहे. नक्त नफा ९८ कोटी रुपये आहे. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन २३ रुपये आहे. कंपनीचा व्यवसाय पुढील दोन वर्षे दर साल २० टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. स्टरलाईट टेक्‍नॉलॉजीचा जून २०१९ तिमाहीचा नक्त नफा १४१ कोटी रुपये झाला. गेल्या जूनपेक्षा तो १७ टक्‍क्‍यांनी जास्त आहे. गेल्या वर्षीची विक्री ८७६.८६ कोटी रुपये होती. सध्या या शेअरचा भाव १५१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. अमेरिकेमध्ये आपल्या कंपनीची प्रसिद्धी करण्यासाठी एक लॉबीस्ट नेमला आहे. रोज किमान आठ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. त्याचा उच्चांकी भाव गेल्या बारा महिन्यांत ४०० रुपये होता. त्याचा उच्चांकी भाव गेल्या बारा महिन्यांत ४०० रुपये होता. सध्या हा शेअर घेतल्यास वर्षभरात ४० टक्के नफा सहज व्हावा. 

गुजराथ हेवी केमिकल्सचा (GHCL) भाव सध्या २०० रुपयांच्या आसपास आहे. तिचा जून २०१९ चा नफा गेल्या जूनपेक्षा ५४ टक्‍क्‍यांनी जास्त आहे. जीएचसीएलची मार्च २०१९ वर्षाची विक्री ३,३४१ कोटी रुपयांची होती. नक्त नफा ३५० कोटी रुपये होता. मार्च २०२१ मध्ये विक्री ३,८८२ कोटी रुपयांवर जावी व नक्त नफा ४६० कोटी रुपये व्हावा; असा अंदाज आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ५.९ पट आहे. आणखी दोन वर्षांनी हे गुणोत्तर ४.५ पट इतके आकर्षक होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदर पाव टक्‍क्‍याने कमी केला. रिझर्व्ह बॅंकही आपला रेपोदर पाव टक्‍क्‍याने कमी करेल अशी अपेक्षा होती. एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स सध्या ४९० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. इथेही माफक प्रमाणात गुंतवणूक आकर्षक ठरेल. नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कंपन्यांतील गुंतवणुकीस सदैव आकर्षक वाटणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीचा शेअर ३,१६० रुपयांपर्यंत खाली आला आहे. तो तीन हजार रुपयांपर्यंत खाली आला, तर गुंतवणुकीस आकर्षक ठरेल. वर्षभरात तो चार हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. बजाज फिनसर्व्हही सध्या ६,९०० पर्यंत खाली आला आहे. त्याचा गेल्या १२ महिन्यांतील ८,५८० रुपयांचा उच्चांकी भाव बघता पुढील १२ महिन्यांत त्याने निदान आठ हजार रुपयांची पातळी गाठावी. 

पावसाळ्यात वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खाली येतात. अपोलो टायर्स सध्या १४७ रुपयांपर्यंत खाली आहे. या भावाला घ्यायला तो अत्यंत आकर्षक आहे. गेल्या वर्षभरातील शेअरचा २८८ रुपयांचा उच्चांकी भाव बघता तो निदान २४० रुपयांपर्यंत तरी जावा. सध्या गुंतवणूक केल्यास किमान ४० टक्के तरी नफा सहज मिळू शकेल. 

खासगी बॅंकांतील बंधन बॅंक ४५५ रुपयांपर्यंत आणि आरबीएल बॅंक ३८० रुपयांपर्यंत घेण्यासाठी आकर्षक वाटतात. आरबीएल बॅंकेचा गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव ७१६ रुपये होता. बंधन बॅंकेने वर्षभरातील उच्चांकी भाव गाठला आहे. पिरामल एंटरप्राइझेसने गेल्या वर्षभरात ३,३०७ रुपयांचा उच्चांकी भाव दाखवला होता. सध्या तो १,७१२ रुपयांना उपलब्ध आहे. १,६५० रुपयांपर्यंत हा शेअर मिळाल्यास जरूर घ्यावा.    

सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७.३२ पट दिसते. रोज सुमारे ११ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

दिलीप बिल्डकॉन गेल्या शुक्रवारी ३८० रुपयांपर्यंत खाली आला होता. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव ९१७ रुपये होता. रोज सुमारे दीड ते दोन लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ९.७८ पट इतके आकर्षक दिसते. 

जेएसडब्ल्यू स्टील सध्या घसरून २१० रुपयांपर्यंत खाली आला आहे. काही आठवड्यांपूर्वी हा शेअर २७५ रुपयांपर्यंत गेला होता. सध्या इथून बाहेर पडून अपोलो टायर्समध्ये जाणे इष्ट ठरेल. 

वरील अनेक शेअर्सचा परामर्ष घेतल्यानंतर गुंतवणुकीसाठी सध्या येस बॅंक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी टेक्‍नॉलॉजी, दिलीप बिल्डकॉन, अपोलो टायर्स हे शेअर्स उत्तम वाटतात. 

सध्या शेअर बाजारात मंदी असल्यामुळे अधूनमधून जरी तेजी दिसली, तरी गुंतवणूकदारांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर बाजारातील गुंतवणूक ही एक प्रकारची जोखीम असते हे विसरू नये. बाजाराचा कल बघून शेअर्समध्ये खरेदी-विक्री केली आणि एकाच शेअरला चिकटून न राहिले, तर वर्षभरात २० टक्‍क्‍यांपर्यंत नफा मिळू शकतो.   

संबंधित बातम्या