परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन हवे 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची निवडणूक १० ऑगस्टला होऊन सोनिया गांधी यांची अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष अजूनही नेहरू-गांधी घराण्यावर अवलंबून आहे. पक्षातील प्रियांका गांधी यांचे वय लक्षात घेता, त्यासुद्धा पुढील ३०-३५ वर्षे काँग्रेस पक्षावर आपला अंकुश ठेवतील. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपला या परिस्थितीचा फायदा नक्कीच मिळेल. 

जम्मू-का‍श्‍मीरला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करून, पण तिथली विधानसभा विसर्जित न करता भाजपने मोठी खेळी खेळलेली आहे. 

भारताचा एप्रिल-जून २०१९ तिमाहीचा महसूल २.८९ लाख कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या जूनसाठी हा आकडा २.७८ लाख कोटी रुपयांचा होता. 

झी एंटरटेन्मेंटच्या प्रवर्तकांकडून ४२२४ कोटी रुपये घेऊन इनव्हेस्को ऑप्पेन हायमर डेव्हलपिंग मार्केट फंड ११ टक्के भाग विकत घेणार आहे. झीच्या समूहात झी बिझनेस, झी टीव्ही, झी कॉर्पोरेट व झी न्यूज अशा चार कंपन्या आहेत. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला करामध्ये मोठी सूट देण्यासाठी एक अहवाल तयार होत आहे. १० लाख रुपयांपर्यंतच्या मिळकतीवर फक्त १० टक्के कर लागण्याची शक्‍यता आहे. वैद्यकीय विमा व उच्च शिक्षण यासाठी मोठी वजावट दिली जाण्याची शक्यता आहे. जून २०१९ मध्ये महत्त्वाच्या आठ उद्योगांची वाढ फक्त ०.२ टक्के झाली. मेमध्ये ती ४.३ टक्के होती. 

मात्र, जूनमध्ये कोळशाची उपलब्धता ३.२ टक्‍क्‍याने वाढली. मेमध्ये ही वाढ फक्त १.९ टक्के होती. क्रूडचे उत्पादन ६.८ टक्के कमी होते. मेमध्ये ही घसरण ६.९ टक्के होती. जूनमध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन २.१ टक्‍क्‍याने कमी होते. याच महिन्यात शुद्धीकरण झालेल्या तेलाचे उत्पादन ९.५ टक्‍क्‍याने कमी झाले. मेमध्ये ते फक्त १.५ टक्के कमी होते. जूनमध्ये खते व उर्वरकांचे उत्पादन मेपेक्षा अडीच टक्‍क्‍याने वाढले होते. कारण मेमध्ये उत्पादन एक टक्‍क्‍याने कमी झाले होते. पोलादाचे उत्पादन ६.९ टक्के जास्त होते. मेमधील वाढ १५.३ टक्के होती. मेमध्ये सिमेंटचे उत्पादन २.८ टक्के जास्त होते. जूनमध्ये ते दीड टक्‍क्‍याने कमी झाले. विद्युत उत्पादनात फक्त ७.३ टक्के वाढ होती. मेमध्ये हे उत्पादन ७.३ टक्के जास्त होते. 

टाटा मोटर्सच्या भागधारकांनी ९८.६५ टक्के मतांनी चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती केली आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने कंपन्यांना आपल्या नफ्याचा काही भाग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी खर्च करण्याचा कायदा केला होता. तो ज्यांनी पाळला नसेल त्यांच्यावर तुरुंगात टाकण्याची कडक कारवाई केली जाणार आहे. २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट दाखवली होती, त्यापेक्षा ती कितीतरी जास्त झाली आहे. पहिल्या तीन महिन्यातच तिने ६१ टक्‍क्‍यांचा आकडा गाठला आहे. 

गेल्या पंधरवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २००८ नंतर पहिल्यांदाच ११ वर्षांनी पाव टक्‍क्‍यांची कपात केली आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारासंबंधीची बोलणी अजूनही अपुरीच असल्यामुळे ती सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होणार आहेत. 

निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी बॅंकप्रमुखांची भेट घेतली आणि कर्जपुरवठा वाढवण्यासंबंधी चर्चा केली. 

भारतात रिझर्व्ह बॅंकेने ३५ टक्‍क्‍याने रेपो दरात कपात केली असली, तरी बॅंकांनी ती कपात कर्जदारांना दिलेली नाही. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या म्हणण्याप्रमाणे तिथे रोजगार सतत वाढत आहे. बेरोजगारीचा दर कमी होत आहे. अमेरिकी कुटुंब आपल्या खर्चात वाढ करीत आहे. महागाई दोन टक्‍क्‍यापेक्षाही खाली आहे. भारतातील पायाभूत संरचनेतील उद्योग फक्त दोन टक्क्यांनी वाढले आहेत. 

कोल्हापूर, सांगली व पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी जुलै ३१ पर्यंत एकूण भारतात नऊ टक्के पाऊस कमी झाला आहे. 

हायकल कंपनीची जून २०१९ या तिमाहीची विक्री ४०३ कोटी रुपये झाली. गेल्या वर्षीपेक्षा ती २४ टक्‍क्‍याने कमी आहे. पूर्ण वर्षाची विक्री १५०८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या १३९६ कोटी रुपयांपेक्षा ती २१ टक्क्यांनी जास्त आहे. यावेळी नक्त नफा २५.२३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या १५ कोटी रुपयांपेक्षा तो ६० टक्‍क्‍यांनी जास्त आहे. 

तमिळनाडूमध्ये मद्यार्क कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यांमध्ये अघोषित ७०० कोटी रुपयांचे उत्पन्न सापडले आहे. 

अदानी समूह येत्या सात वर्षांत हवाईतळांच्या व्यवसायात १० हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलैमध्ये अहमदाबाद, लखनौ आणि मंगलोर विमानतळांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केले आहे. त्यात अदानी समूहाला वरील केंद्रे मिळाली आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी १२ तारखेला बकरी ईदमुळे, तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनामुळे बॅंका व शेअर बाजाराला सुटी होती. त्यामुळे आठवड्यात फक्त तीनच दिवस व्यवहार झाले. 

शेअरबाजारात सध्या गुंतवणुकीला येस बॅंक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, स्टरलाईट टेक्‍नॉलॉजीज या कंपन्या उत्तम आहेत. 

एपीएल अपोलो ट्यूब्जने आपले जून २०१९ तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. शुक्रवारी (ता. ९) या शेअरचा भाव १३२५ रुपये होता. या भावाला किं/उ. गुणोत्तर २०.९ पट दिसते. वर्षभरातील उच्चांकी भाव १८३४ रुपये, तर किमान भाव १००३ रुपये होता. तिचे जून २०१९ तिमाहीसाठीचे उत्पन्न २०७१.६० कोटी रुपये होते. ढोबळ नफा १२९.५४ कोटी रुपये होता, तर नक्त नफा ८१.०४ कोटी रुपये होता. जून २०१८ तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे १६७६.५३ कोटी रुपये, ११२.४० कोटी रुपये व ७०.८९ कोटी रुपये होते. शेअरगणिक उपार्जन जून २०१९ तिमाहीसाठी २१.५४ रुपये होते. जून २०१८ तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन १९.८० रुपये होते. 

याच कंपनीचे मार्च २०१९ च्या पूर्ण वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन ६२.४७ रुपये होते. 

नऊ ऑगस्टला शुक्रवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ३७,५८१ होता, तर निफ्टी १७,१०९ होता. सध्या परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणुकीसाठी फारसे उत्सुक नाहीत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने नुकतीच व्याजदरात पाव टक्‍क्‍याने कपात केली असल्यामुळे गुंतवणुकीसाठी आपल्या देशातच चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे त्यांना वाटते. 

पावसाळा समाधानकारक झाला आणि परदेशी गुंतवणुकीसाठी इथे दरवाजे सताड उघडे झाले, तर हे चित्र बदलेल. 

भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पुरे करायचे असेल, तर परदेशी गुंतवणुकीला उत्तेजन दिले पाहिजे. इथल्या कंपन्यांना अर्थव्यवस्थेबाबतचे काहीच घेणेदेणे नसते. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीला विनाकारण महत्त्व येते. 

अमेरिकेतील काही पतमूल्यन संस्थांच्या मते शेअरबाजाराचा निर्देशांक मार्च २०२० पर्यंत ४५ हजार इतका होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चांगल्या शेअर्समधील गुंतवणूक दीड ते दोन वर्षांसाठी ठेवायला हवी. आंब्यासारख्या झाडांना फळे थोडी उशिराच लागतात. हे नैसर्गिक सत्य डोळ्यासमोर ठेवायला हवे. इंडोनेशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या उभरत्या राष्ट्रांतही शेअरबाजार हळूहळू सुधारू लागला आहे. भारत त्याला अपवाद ठरणार नाही. 

बॅंकांची २०१९-२०२० वर्षामध्ये अनार्जित कर्जे कमी होणार आहेत. त्यामुळे त्यांचे शेअर्सही बाळसे धरू शकतील. इथे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसिंड बॅंक, आरबीएल बॅंक, बंधन बॅंक यांचे शेअर्स वर्षभरात चांगले सुधारू शकतील.

संबंधित बातम्या