मंदावलेली अर्थव्यवस्था

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात शेअर बाजार तीनच दिवस सुरू होता. १२ ऑगस्टला बकरी ईदची सुटी होती, तर १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची. गेल्या शुक्रवारी निर्देशांक ३७,३५० वर बंद झाला, तर निफ्टी ११,०४७ वर बंद झाला. कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वर जावेत अशा काही बातम्या देशात वा जागतिक स्तरावर नव्हत्या. 
फिलीप कॅपिटल इंडियाचे जून २०१९ तिमाहीचे आकडे नाउमेद करणारे होते. एनएमडीसीची जून २०१९ तिमाहीची विक्री ८६ लाख ७० हजार टन इतकी झाली. सरासरीने विक्रीचा भाव टनाला ३,७०५ रुपये मिळाला. अपेक्षेपेक्षा टनामागे १४० रुपये जास्त मिळाले. टनामागे ढोबळ नफा ३,१५३ रुपये होता. कर्नाटक सरकारने अजूनही दोनीमलाई येथील खाणीचे हक्क कंपनीला दिलेले नाहीत. शेअर बाजारात १९ ऑगस्टपासून १४ कंपन्यांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यात स्पाइस जेट आणि फोर्स मोटर्सचा समावेश आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांचे भाव हळूहळू वर जाऊ लागतील. स्पाइट जेट ही विमानसेवेतील एक मोठी कंपनी आहे. जेट एतिहादबरोबर तिचे काही संयुक्त प्रकल्प आहेत. 

फोर्स मोटर्स ही फिरोदियांच्या बजाज टेंपो समूहातील कंपनी आहे. तिचा चेन्नईला, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंझ यांच्यासाठी इंजिने तयार करण्याचा कारखाना आहे. 

स्पाइस जेटचा सध्या भाव १४७ रुपये आहे. ऑक्‍टोबरपासून ती आणखी १२ ठिकाणी विमानसेवा देणार आहे. या सेवा पुण्याहून सुरू होऊन सिंगापूर इत्यादी ठिकाणी जाणार आहेत. फोर्स मोटर्स १,२२८ रुपयांना उपलब्ध आहे. जून २०१९ च्या तिमाहीत तिचा नक्त नफा ३६ टक्‍क्‍यांनी कमी झाला. स्पाइस जेटचा सध्या रोज १० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. स्पाइस जेटची वाहतूक सुरक्षित नसते असे वाटल्याने ''डीजीसीए''ने १२ वैमानिकांचे परवाने रद्द केले आहेत. एका वर्षासाठी ही बंदी राहील. रनवेपेक्षा जास्त पुढे विमाने नेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

फोर्स मोटर्सचा वर्षभरातील उच्चांकी भाव २,६२२ रुपये होता, तर नीचांकी भाव १,००१ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १३.१२ पट दिसते. रोज सुमारे ४० हजार शेअर्सचा व्यवहार होतो. 

पहिला १,७५० कोटी रुपयांचा क्‍वालिफाईड इन्स्टिट्यूशनल उद्योजकांकडून पहिल्या हप्त्यात भांडवल उभारल्यानंतर दुसऱ्या हप्त्यात पुन्हा भांडवल उभारणार आहे. येस बॅंकेत सध्या गुंतवणूक करणे चांगले ठरेल असे पूर्वीच्या लेखातही म्हटले आहे. 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना पटकन श्रीमंत होण्याचा मोह धरू नये. कुणीही सल्ला दिला, तरी तो पारखून घ्यावा. इथे डोळे मिटून व्यवहार करता येत नाहीत, त्यासाठी स्वतः काही शिक्षण घ्यावे लागते. स्वतःचे पैसे असतील, तरच गुंतवणूक करावी. तेजीच्या दिवसांत मार्जिन ट्रेडिंगमुळे नफा होत असला, तरी मंदीच्या विळख्यात अडकलात तर मोठे नुकसानही होऊ शकते. 

भारताची विदेशचलन मुद्रा नुकतीच १.६२० अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. नऊ ऑगस्टला ती ४३०.५७ अब्ज डॉलर्स होती. रिझर्व्ह बॅंकेची विदेशमुद्रा गंगाजळी थोडीफार कमी-जास्त होत असते. तिची विदेशमुद्रा गुंतवणूक जरी विविध चलनात असली, तरी उल्लेख मात्र डॉलर्समध्येच होतो. रिझर्व्ह बॅंकेकडे सध्या सोन्याचा साठा २६.७५ अब्ज डॉलर्स इतका आहे. 

अमेरिकेत सरकार ५० आणि १०० वर्षांचे रोखे विक्रीला काढणार आहे. समर्थ देश आपल्या चलनामध्ये कशी उलाढाल करू शकतो त्याचे हे उदाहरण आहे. भारतानेही आपला रुपया समर्थ करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. 

जुलैमध्ये पॅसेंजर मोटारींची विक्री ३१ टक्‍क्यांनी कमी होऊन फक्त दोन लाख ७९० मोटारी विकल्या गेल्या. पूर्ण वर्षभराची विक्री २०१५-१६ वर्षापेक्षा कमी झाली. एप्रिल-जुलै या चार महिन्यांत नऊ लाख १३ हजार ४१० गाड्या विकल्या गेल्या. विक्री जर कमी व्हायला लागली, तर मारुती सुझुकीपासून अनेक कंपन्यांना कारखाने काही काळ बंद ठेवावे लागतील. त्यामुळे ३११ लाख कर्मचारी बेकार होतील. परिस्थिती अशीच गंभीर राहिली, तर बेरोजगारी १० लाखांनी वाढेल. वाहनउद्योगात सध्या ३७ लाख कर्मचारी आहेत. वाहनउद्योग आणि महामार्ग बांधणी यांच्यातच भरपूर रोजगार असतो. दुचाकी स्कूटर्सची विक्रीही कमी झाली आहे. सुमारे ५६,८०० स्वयंचलित दुचाक्‍यांची विक्री कमी झाली. या क्षेत्रात विक्री वाढवण्यासाठी ''एसआयएएम''ने सरकारला प्रदूषणजन्य गाड्या आणि अनेक वर्षांच्या जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवल्या जाव्यात अशी मागणी केली आहे.  

एकीकडे बेरोजगारी वाढत असताना, शेअर्सचे भाव वाढल्याने मुकेश अंबानींच्या संपत्तीत २९ हजार कोटी रुपयांची (४ अब्ज डॉलर्स) वाढ झाली आहे. 

कॅफे कॉफी डे कंपनी आपला बंगलोरमधील टेक्‍निकल पार्क ब्लॅकस्टोन समूहाला तीन हजार कोटी रुपयांना विकून आपले कर्ज कमी करेल. 

अमेरिकेतील मूडीज या पतमूल्यन संस्थेने, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हेग कंपनीचे जून २०१९ तिमाहीचे आकडे निराशाजनक आहेत. विक्री ४,८११ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ८१६ कोटी रुपयांवर आली आहे. मागच्या जूनमध्ये ही विक्री १,५८७ कोटी रुपये होती. गेल्या जूनमध्ये नक्त नफा ७७० कोटी रुपये होता. तो या तिमाहीत ६९.५ टक्‍क्‍यांनी कमी होऊन २३४ कोटी रुपये झाला आहे. ढोबळ नफा १,१८७ कोटी रुपयांवरून कमी होऊन ३४७ कोटी रुपये झाला आहे. 

भारत आणि चीन या दोन्ही विकसनशील देशांची अर्थव्यवस्था पूर्वीसारखी उभरती राहिलेली नाही. चीन आणि अमेरिकेचे व्यापारयुद्ध सुरू आहे. रुपया डॉलरचा विनिमयदर आता ७१.२७ रुपये आहे. 

सध्याची अर्थव्यवस्था एकूण नाजूक असल्यामुळे त्याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होणार आहे. आयडीबीआय बॅंकेचा जून २०१९ तिमाहीचा तोटा ३८००.८४ कोटी रुपये आहे. गेल्या जूनमध्ये हा तोटा २४०९.८९ कोटी रुपये होता व व्याजाचे उत्पन्न १,६३८ कोटी रुपये होते. ते यावेळी १,४५७ कोटी रुपये आहे. ढोबळ अनार्जित कर्जाची टक्केवारी २९.१२ इतकी आहे. गेल्या जूनमध्ये ही टक्केवारी २७.४७ होती. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे नक्त अनार्जित कर्जे ८.०२ टक्क्यांवर आली आहेत. 

 इंद्रप्रस्थ गॅसचा या जून तिमाहीचा नफा २१८.४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वेळच्या नक्त नफ्याचा आकडा २२५.५ कोटी रुपये होता. विक्री या जून तिमाहीत १,५७६ कोटी रुपये झाली. गेल्या जूनच्या तिमाहीतील हा आकडा १५४२.७ कोटी रुपये होता. 

 ''एमटीएनएल''चा जून तिमाहीचा तोटा यावेळी १०५४.६ कोटी रुपये आहे. मागच्या जूनमध्ये हा तोटा ७५९.३ कोटी रुपये होता. मागच्या वेळची विक्री ५१२.५ कोटी रुपये होती. यावेळची विक्री १५.४ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ४३३.८ कोटी रुपये आहे. 

गायत्री प्रोजेक्‍ट्सचा या तिमाहीचा नफा १६.५ टक्‍क्‍यांनी वाढून ४८.१ कोटी रुपये झाला आहे. मागच्या जूनचा नफा ४१.३ कोटी रुपये होता. विक्री गेल्या जून तिमाहीत ८२२.८ कोटी रुपये होती. ती यावेळी ९८४ कोटी रुपये झाली आहे. 

येस बॅंकेने गेल्या आठवड्यात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांना २.३१ कोटी शेअर्स विकून १,९३० कोटी रुपये उभे केले. त्यांपैकी पाच गुंतवणूकदारांनीच ६५.५ टक्‍क्‍यांचा भरणा केला. सोसायटी जनराले, बीएनपी परिबास आर्ब्रीट्रेज, एचडीएफसी ट्रस्टी कंपनी, का स्क्वेअर मास्टर फंड एक व दोन या पाच गुंतवणूकदारांनी हे शेअर्स ८७.९० रुपये दराने घेतले. परदेशी गुंतवणूकदार अल्पमुदतीतच गुंतवणूक विकून टाकतात. त्यामुळे ९२ ते ९५ भावाला विक्री करून ते बाहेर पडू शकतील. या पार्श्‍वभूमीवर सध्या ८० रुपयांना हा शेअर जरूर घ्यावा.

संबंधित बातम्या