शेअर बाजारात प्रतीक्षा कायम  

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महाराष्ट्र राज्य सध्या सर्व बाजूंनी चर्चेत आहे. राज्याच्या निवडणुका १५ ऑक्‍टोबरच्या सुमारास व्हाव्यात. निवडणुकीसाठी आचारसंहिता अनंत चतुर्दशीनंतर लागू होईल. नवे सरकार फक्त भाजपचे असेल, की भाजप-शिवनेना युतीचे असेल; याबाबत सध्या संभ्रम आहे. एकूण २८८ जागांपैकी शिवसेनेखेरीज अन्य मित्रपक्षांसाठी १५, १६ जागा सोडल्या, तर २७२ जागांमधील निम्म्या जागा म्हणजे सुमारे १३५ जागा शिवसेनेला हव्या आहेत. भाजपला मात्र हे मान्य नाही. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेला ६० जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजप शिवसेनेला ११० च्या आसपासच जागा देऊ शकेल. सेनेला हे मान्य नसेल, तर दोन्हीही पक्ष स्वबळावर जागा लढवतील. 

नगरसेवक व आमदार असा कुठलाही अनुभव नसताना शिवसेनेच्या २७ वर्षांच्या आदित्य ठाकरे यांना तर मुख्यमंत्री पदाचीच स्वप्ने पडत आहेत. त्यासाठी नेट लावला, तर निदान उपमुख्यमंत्रिपद तरी पदरात पडेल असे त्यांना वाटते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्ते बाहेर पडत आहेत आणि भाजपच्या दारावर तिष्ठत आहेत. काही किमान लोकांनाच आत घेण्यासाठी भाजपची दारे किंचित खुली आहेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. संपूर्ण दार उघडे ठेवले, तर मोठ्या प्रमाणावर लोक आत घुसतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

साताऱ्यातून उदयनराजे व रामराजे भाजपच्या वाटेवर आहेत. सोलापूर व अन्य ठिकाणचे काही आमदारही भाजपात जाऊ इच्छितात. त्यामुळे राज्याची यावेळची निवडणूक रोमहर्षक ठरणार आहे. राज्यात काहीही झाले, तरी भाजप पुन्हा सत्तारूढ असेल हे उघड आहे. निवडणुकीची ही बाब सोडली, तर गणेशचतुर्थी सगळीकडे जोरात साजरी झाली आहे. अनेक ठिकाणच्या गणपतींना नेत्यांनी साकडे घालायला सुरुवात केली आहे. पावसाळा आता निम्म्याने होऊन गेला आहे. बहुतेक धरणे भरली आहेत. नेहमी दुष्काळाच्या गर्तेत असलेल्या मराठवाड्यातही ऑगस्टमध्ये बरा पाऊस पडला. सरकारने कृत्रिम पावसाची सोय करून ठेवली होती. पण त्याची जरुरी भासली नाही. कोल्हापूर, सांगलीतील महापुराने आठ ते नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे तेवढी मागणी केली होती. पण केंद्र सरकार बहुतेक पाच हजार कोटी रुपये देईल अशी अपेक्षा आहे. तिथे जोरदार प्रमाणात पुनर्वसन सुरू झाले आहे. 

एअर इंडियामधून केंद्र सरकार बाहेर पडू इच्छित आहे. हा कयास गेली दोन वर्षे चालू होता. एअर इंडिया आपल्या कर्जापैकी २२ हजार कोटी रुपयांची फेड करू शकेल असे एक वृत्त आहे. पण त्यासाठी केंद्र सरकार काही मदत करेल का याबद्दल काही खुलासा नाही. 

भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन एप्रिल-जून २०१९ तिमाहीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. पाच वर्षांतील हा सर्वांत किमान दर आहे. 

आठ-दहा दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा बॅंकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. प्रादेशिक स्तरावर मोठ्या असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि युको बॅंकेचा त्यात समावेश नाही. पंजाब नॅशनल बॅंक आणि ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स या एकत्र येतील. या एकत्रीकरणानंतर पंजाब नॅशनल, सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बॅंक होईल. भारत हेवी इलेक्‍ट्रिकल्सला (BHEL) २,५०० कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ''एचएसबीसी''ने हा शेअर सध्या खरेदी करावा अशी शिफारस केली आहे. पीएनसी इन्फ्राटेक, रेल्वे आणि महामार्ग क्षेत्रातील आपले प्रकल्प वाढवणार आहे. गेल्या शुक्रवारी या शेअरचा भाव १७८ रुपये होता. वर्षभरात तो ४० टक्‍क्‍यांनी वर जावा. 

सध्या पावसाळा चालू असल्यामुळे महामार्ग व निवासिकांची बांधकामे थंडावली आहेत. वाहन क्षेत्रातील कंपन्यांचीही विक्री कमी होत असल्याने तिथेही अस्थिर वातावरण आहे. मोटारींच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. 

काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर ४० हजार नवीन रोजगार निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेची वाढ आठ टक्‍क्‍यांऐवजी पाच टक्‍क्‍यांपर्यंत घसरल्याने खेद व्यक्त केला आहे. मोदी सरकारचे हे अपयश आहे असे त्यांनी म्हटले आहे. टायर क्षेत्रातील सिएट कंपनीचा शेअर सध्या ९०० रुपयांना उपलब्ध आहे. सध्याच्या भावात अपोलो व बाळकृष्ण इंडस्ट्रीज हे शेअर्स खरेदीसाठी आकर्षक वाटतात. अपोलो टायर्स १७० रुपयांना, तर बाळकृष्ण इंडस्ट्रीज ७४० रुपयांना मिळत आहेत. पुढील सहा महिन्यांत हे शेअर्स ३५ ते ४० टक्‍क्‍यांनी वाढतील. 

केंद्र सरकार पुढील दोन वर्षांत नवी ७५ महाविद्यालये सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे १५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. साखरेचे उत्पादन ऑक्‍टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या वर्षात चांगले झाले असल्यामुळे केंद्र सरकार निर्यात करण्यासाठी परवानगी देण्याची शक्‍यता आहे. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादकांना बहुधा अनुदान दिले जाईल. 

महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतीभवनातून १ सप्टेंबर २०१९ ला करण्यात आली. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोशियारी यांची नेमणूक महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून झाली आहे. या आधीचे राज्यपाल विद्यासागर राव यांचा पाच वर्षांचा कार्यकाल ३१ ऑगस्ट २०१९ ला पूर्ण झाला. 

कलराज मिश्र यांची हिमाचल प्रदेशातून राजस्थानात बदली करण्यात आली. मिश्र २०१९ पर्यंतच्या मोदी-१ सरकारमध्ये मंत्री होते. मिश्र यांचे सहकारी आंध्र-तेलंगणातील भाजपचे वरिष्ठ नेते बंडारू दत्तात्रेय यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तमिळनाडूतील भाजपच्या नेत्या तमीळसाई सुंदरराजन यांना तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. तोंडी तलाक पद्धतीच्या विरोधात सतत आवाज उठवणारे मुस्लीम सुधारणावादी नेते अरिफ महंमद खान यांना केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये एसटीच्या अनेक गाड्या सोडल्यामुळे सध्या जरी चांगले उत्पन्न झाले असले, तरी यंदा तिला ६४३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी तीन वर्षांत कुठलीही नवीन मोहीम राबवलेली नाही. तोटा झाला असला, तरी इथे कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार नाही, असे आश्‍वासन मंत्र्यांनी दिले आहे. सहा बॅंकांच्या विलीनीकरणानंतर बॅंक कर्मचाऱ्यांची काही कपात केली जाणार नाही असे आश्‍वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. 

देना व विजया बॅंकेच्या विलीनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांची कपात केली गेली नव्हती. 

पंजाब नॅशनल बॅंकेत ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्सचे आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडियाच्या विलीनीकरणा पाठोपाठ युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये आंध्र बॅंक आणि कॉर्पोरेशन बॅंक विलीन होतील. त्यांच्या ९,६०९ शाखा आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ५,२८४ आहे. अनार्जित कर्जे ६.३ टक्के आहेत. एकूण उलाढाल ८.०८ लाख कोटी रुपये आहे. 

विलीनीकरण मान्य नसल्यामुळे सुधारणांना सदैव विरोध करणाऱ्या संघटनांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम केले. 

३० ऑगस्ट २०१९ रोजी निर्देशांक ३७,३३२ होता, तर निफ्टी ११,०२३ वर बंद झाला. पावसाळा असल्यामुळे सिमेंट कंपन्यांची विक्री कमी होत असल्यामुळे सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी होत आहेत. पण १ ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सहामाहीत सिमेंटला चांगली मागणी येईल. या कंपन्यांतील रॅमको सिमेंटकडे गुंतवणुकीसाठी विशेष लक्ष द्यावे. कंपनीचे एकसंघ (Integrated) कारखाने तामिळनाडूमध्ये आरा आर नगर अलाथियूर, अरियायूर इथे आहेत. तर कर्नाटकातील कारखाना चित्रदुर्ग इथे आहे. आंध्रमध्ये जयंतीपूरम इथे कारखाना आहे. सिमेंट दळण्याचे कारखाने तामिळनाडूत उथूरमेरुर, सालेम इथे आहेत. आंध्रमध्ये वायझॅक व कर्नूल इथे कारखाने आहेत. एक कारखाना ओडिसातही आहे. 

गुंतवणुकीसाठी जरी उत्तेजक वातावरण नसले, तरी सध्याच्या शेअर्सच्या उतरत्या भावात खरेदी करणे योग्य ठरेल. अशा खरेदीला ''बॉटम फिशिंग'' असे म्हटले जाते. भाव वर येण्यासाठी मार्च २०२० ची वाट बघावी लागेल.     

संबंधित बातम्या