शेअर बाजार संथच

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी चांद्रयान-२ ची मोहीम आखण्यात आली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ते सोडण्याचा प्रयत्न बंगलोरमधून केला. त्यासाठी अवकाश संशोधन खाते ज्यांच्याकडे आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने रात्रभर जागून इस्रोच्या केंद्रात होते. जे यान उतरणार होते, त्याला अंतराळसंशाधनाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले होते. रात्री अडीचच्या सुमारास ऑर्बिटरबरोबरचा इस्रोचा संपर्क तुटला. संगणक यंत्रणा ठप्प झाल्याने काहीच कळत नव्हते. वाट बघून, इस्रोच्या संशोधनाचे कौतुक करून पंतप्रधान निवासस्थानी गेले. पुन्हा सकाळी त्यांनी इस्रोच्या कार्यालयाला भेट दिली. शास्त्रज्ञांच्या पाठीवरून हात फिरवला आणि ''हौसले बुलंद है, बुलंद रखो,'' असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या. तिथून अथक ते औरंगाबादला गेले व तिथे एक कार्यक्रम करून ते मुंबईला गेले. सतत वीस तास अथक राहणारा पंतप्रधान देशाने प्रथमच बघितला. असा नेता मिळतो तेव्हा देश प्रगतिपथावर जातो. सुमारे ९६० कोटी रुपये खर्चून भारताने हा कार्यक्रम केला. अमेरिकेतील नासा संस्थेपासून सर्व देशांनी कौतुक केले. अमेरिका, चीन व रशियानंतर चंद्रावर यान उतरवून बघणारा भारत चौथा देश होता. 

अनंत चतुर्दशीनंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका जाहीर होतील. मुंबईतल्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींबरोबर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदींनी उद्धव ठाकरेंना 'धाकटा भाऊ' म्हणून संबोधून, युती अभेद्यच राहील याची ग्वाही दिली. २८८ जागांपैकी अन्य मित्रपक्षांसाठी ५ ते १८ जागा सोडल्या, तर उरलेल्या २७२ ते २७५ जागांपैकी भाजप १६० जागांवर हक्क सांगेल व शिवसेनेला ११० ते ११५ जागांवर समाधान मानायला लागेल. २०१४ च्या राज्य निवडणुकीत शिवसेनेला ६० जागा, भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. याचे शिवसेनेला भान ठेवून, निम्या १४४ जागांचा हट्ट सोडावा लागेल. युती झाली तर तिला मागच्या प्रमाणे २२० जागांपर्यंत मजल मारता येईल व राज्यात पुन्हा युतीचेच सरकार पाच वर्षे राहील. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सध्या गळती लागली आहे. उदयनराजे, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील असे म्होरके भाजपात प्रवेश करीत आहेत. त्यांना तिकिटे द्यावीच लागतील. 

शेअर बाजार सध्या संथ पाण्याच्या डोहासारखा आहे. ठरावीक शेअर्सखेरीज त्यात फारशी उलाढाल होत नाही. सोमवारी ६ सप्टेंबरला निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३७,१८८ व ११,००९ वर होते. १५ ऑक्‍टोबरपासून कंपन्यांचे सप्टेंबर २०१९ तिमाही व पहिल्या सहामाहीचे आकडे प्रसिद्ध होऊ लागतील व शेअर्सचे उत्तरायण सुरू होईल. 

बजाज फायनान्स ३,४५० पर्यंत चढला आहे. अजूनही या भावात गुंतवणूक करणे हितावह ठरेल. कारण मार्च २०२० पर्यंत तो ४,२०० रुपयांपर्यंत जावा. या काळात रिझर्व्ह बॅंकेने आपला रेपोदर दोनदा पाव टक्‍क्‍यांनी कमी केला, तर बाजाराला आणखी बाळसे येईल. 

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा बॅंकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती, पण एका बॅंकेच्या किती शेअर्ससाठी दुसऱ्या बॅंकेचे किती शेअर्स दिले जातील याचा अजून उलगडा झालेला नाही. त्यामुळे कित्येक वेळा अशा घोषणा सवंगच राहतात. एका कार्यक्रमाच्या घोषणेनंतर त्याचा पुरता पाठपुरावा झाला पाहिजे, तर त्याला काही अर्थ राहतो. अन्यथा त्या निरर्थक ठरतात. 

लार्सेन टुब्रोला काही दिवसांपूर्वी मोठी ऑर्डर मिळाली आहे. तिने नुकतेच काही परिवर्तनीय रोख्यांचे ११ हजार समभागात रूपांतरण केले आहे. लार्सेन टुब्रो सध्या आकर्षक भावात मिळत आहे. याच समूहातील एक एल अँड टी टेक्‍नॉलॉजीचा समभाग सध्या १,६१० रुपयांना मिळत आहे. सहा महिन्यांत तो निदान १० टक्के तरी वर जावा. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर सव्वाबावीस पट दिसते. रोज सुमारे ७० हजार शेअर्सचा व्यवहार होतो. 

क्रेडिट स्युइसीने जेएसडब्ल्यू स्टीलबद्दल खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा शेअर २२० रुपयांना मिळत आहे. एनसीएलटीने जेएसडब्ल्यू स्टीलचा भूषण स्टीलच्या आग्रहणाचा १९.७०० कोटी रुपयांचा प्लॅन मजूर केला आहे. त्यासाठी कंपनीने विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल घ्यायचे ठरवले आहे. 

मुंबईमध्ये ३४० किलो मीटर्सचे मेट्रोचे जाळे पसरले जाणार आहे. या कामासाठी जे. कुमार इन्फ्रा प्रसिद्ध आहे. दीर्घ मुदतीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी. वर्षभरात त्यात ४० टक्‍क्‍यांची वाढ मिळावी. 

शेअर बाजारात जरी पाच हजार शेअर्सची नोंद असली, तरी त्यांपैकी २५, ३० शेअर्सच घेण्यासारखे असतात. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, लार्सेन अँड टुब्रो, एल अँड टी इन्फोटेक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया अशा शेअर्सकडे सतत लक्ष हवे. स्टेट बॅंकेचे सप्टेंबर २०१९ व डिसेंबर २०१९ चे तिमाही आकडे बघून हळूहळू त्यात गुंतवणूक वाढवत जावी. 

अतुल इंडिया गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. सध्या या शेअरचा भाव ३,४५० च्या आसपास आहे. वर्षभरात तो ४,४२० पर्यंत जाऊ शकेल. पुढील दोन वर्षांत कंपनीचा व्यवसाय १३.५ टक्‍क्यांनी वाढेल असे व्यवस्थापनाला वाटते. सुमारे ६० देशांत तिची १,३५० उत्पादने खपतात. कंपनीची गेल्या दोन वर्षांची प्रत्यक्ष व पुढील तीन वर्षांची संभाव्य आकडेवारी खालील कोष्टकात दिली आहे. 

या कंपनीचे उद्‌घाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन हजारच्या वर आहे. ९० देशांत ते कामे करतात. कंपनी घाऊक व किरकोळ दोन्ही प्रकारची विक्री करते. सुमारे ४३१ कुशल कर्मचारी, तंत्रज्ञ इंग्लंडमध्ये काम करतात. कंपनी इंटरमिजिएट केमिकल्सचे उत्पादन करते. वस्त्रोद्योगात लागणारे रंग, पेपर डाइज, पिग्मेंट्स, वस्त्रावरील छपाईची शाई आणि अन्य रसायनांचीही ती निर्मिती करते. दरवर्षी कंपनीचा नफा निदान पाच टक्‍क्‍यांनी तरी वाढेल. भारतातील शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अतुल साहाय्यभूत ठरेल. टायर क्षेत्रातही तिची उत्पादने जातात. मात्र, परदेशी चलन आणि रुपया यांच्यातील विनिमयदरातील फरकाचा, तिच्या विक्रीवर व नफ्यावर परिणाम होतो. कंपनी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन प्रकल्प हातात घेणार आहे. पावसाळा समाधानकारक झाला तर कंपनीच्या कृषी उत्पादनांना चांगली मागणी येईल. भाग भांडाराचे वैविध्य वाढवण्यासाठी या शेअरचा विचार करावा. 

स्टेट बॅंकेचे कार्यकारी अध्यक्ष अंशुला कांत यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला आहे. त्यांच्याजागी अजून नवीन नेमणूक व्हायची आहे. कांत हे जागतिक बॅंकेतून आले होते. स्टेट बॅंकेची अनार्जित कर्जे बरीच कमी झालेली डिसेंबर तिमाहीच्या आकडेवारीत दिसतील. त्यामुळे मार्च २०२० पर्यंत शेअरचा भाव ३६० रुपयांपर्यंत जावा. सध्याचा भाव २७३ रुपये आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने के.एस.आर. मूर्ती यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. ही कंपनी नेहमी चांगला लाभांश जाहीर करते. 

इंडिगो या विमान कंपनीनेही प्रमुख वित्तीय अधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली आहे. पांडे हे तिथे नव्याने कार्यभार स्वीकारतील. 

कॅनरा बॅंकेचा शेअर सध्या १९८ रुपयांना मिळत आहे. या शेअरचा गेल्या १२ महिन्यांतील उच्चांकी भाव ३०२ रुपये होता. रोज सुमारे चार लाख शेअर्सचा व्यवहार होतो. खासगी क्षेत्रातील फेडरल बॅंकेचा शेअर ८५ रुपयांना उपलब्ध आहे. या शेअरचा वर्षातील उच्चांकी भाव ११० रुपये होता. रोज सुमारे दीड कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १२.१५ पट दिसते. 

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेचा शेअर सध्या २,२५० रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या १२ महिन्यांतील किमान व कमाल भाव अनुक्रमे १,८८५ रुपये व २,५०३ रुपये होते. रोजचा व्यवहार २० ते ३० लाख शेअर्सचा होतो. या बॅंकेची उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दलची ख्याती आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर सध्या ११० रुपयांना उपलब्ध आहे. रोज सुमारे ५० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त २.९२ पट इतके आकर्षक आहे. ही कंपनी उत्तम लाभांश देते.  

संबंधित बातम्या