शेअर बाजारात खरेदीची संधी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकांचा फड रंगू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात २४ ऑक्‍टोबरला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीचेच सरकार असेल असे स्पष्ट केले आहे. गेल्या निवडणुकीत २८८ पैकी फक्त ६६ जागा मिळवलेल्या शिवसेनेला १३५ जागा लढवायच्या आहेत. भाजपकडून शिवसेनेला ११५ ते १२० जागा देण्याचा विचार कळवला गेला आहे. 

कॉर्पोरेट करात पाच टक्‍क्‍यांची कपात केल्यानंतर शेअर बाजार वर जात आहे. शुक्रवारी २७ सप्टेंबरला निर्देशांक ३८,८२२ वर बंद झाला होता, तर निफ्टी ११,५१२ होता. बजाज फिनसर्व्ह ८,५५०, लार्सेन टुब्रो १,४७२, बजाज फायनान्स ४,०६५, लार्सेन टुब्रो इन्फोटेक १,५२०, एपीएल अपोलो १,३८०, स्टरलाईट टेक्‍नॉलॉजी १६१, स्टेट बॅंक ऑफ इंडिया २८१, एचडीएफसी बॅंक १,२४४, एचडीएफसी लाइफ ५८२, पिरामल एंटरप्राइझेस २,७२६, जे.के. टायर ७२, दिलीप बिल्डकॉन ४४२, फोर्स मोटर्स १,१६०, अतुल ४,०३२, ओबेरॉय रिअॅल्टी ५०६, पराग मिल्क १६२, आयटीसी २५२, एमओआयएल १४३ असे अन्य भाव होते. 

आयटीसीचे पूर्वीचे पूर्ण नाव इंपिरिअल टोबॅको कंपनी असे होते. आता आयटीसी या लघू नावाने ओळखली जात आहे. सिगरेटचे उत्पादन हा तिचा प्रमुख व्यवसाय असला, तरी अनेक महानगरांत तिची पंचतारांकित हॉटेल्स आहेत. पावसाळ्यानंतर येणाऱ्या सहामाहीत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्यावेळेला हॉटेलचा व्यवसाय तेजीत जातो. त्यामुळे जून २०२० पर्यंत हा शेअर ३२० रुपयांपर्यंत जावा. रोज सुमारे दीड कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर २४ पट दिसते. या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक जरूर करावी. एमओआयएल या खनिज पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरचा भाव १४३ रुपये आहे. वर्षभरात हाही शेअर ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढावा. रोज सुमारे २० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ७.७२ पट दिसते. 

अर्थकारणापेक्षा सध्या राजकारणातच अनेक चर्चा रंगत आहेत. एका सहकारी बॅंकेबाबत अजित पवार यांना ''ईडी''कडून (एन्फोर्समेंट डिपार्टमेंट) चौकशीसाठी बोलावले जाण्याचे वृत्त प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्यात चर्चेत होते. शरद पवार हे त्या बॅंकेवर संचालक नव्हते, तरीही त्यांना ईडीने बोलावले अशा वार्ता झळकल्यानंतर शरद पवार यांनी ''बिन बुलाये'' जाण्याचा आपला निर्धार जाहीर केला आणि ते ईडीच्या कार्यालयात आपण होऊन दाखलही झाले. आम्ही तुम्हाला बोलावलेलेच नाही असे सांगून ईडीने त्यांना परत पाठवले. प्रकाशझोतात येण्यासाठी या जाणत्या राजाची खेळी यशस्वी ठरली. महाराष्ट्रातील विधानसभांच्या निवडणुकांबरोबरच साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेचीही निवडणूक जाहीर व्हावी. तिथे जर शरद पवार उभे राहणार असतील, तर भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले उदयनराजे ही निवडणूक न लढवता पवारांचा मार्ग मोकळा करणार आहेत. 
राजकारणाप्रमाणेच सध्या पावसाबद्दलही चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस पडला. कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आले. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. त्यामुळे कोल्हापूरला उसाऐवजी तांदूळ लावावा असे थट्टेने म्हटले गेले होते. पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. काही भागांत पावसाने हाहाकार उडवला. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या आठवड्यात कॉर्पोरेट कर ३० टक्‍क्‍यांवरून २५ टक्‍क्‍यांवर आणल्यानंतर अनेक कंपन्यांचा करोत्तर नक्त नफा वाढणार आहे. सध्या लाभांशावर लावला जाणारा डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्‍स जर नजीकच्या भविष्यात काढला गेला, तर शेअर बाजार आणखी उसळेल. शेअर बाजारात सध्या खरेदीची सुवर्णसंधी आहे. गुंतवणूकदारांनी ती घालवू नये. राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने आपल्या नफ्यापैकी एक लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्राला दिल्यामुळे हे शक्‍य होणार आहे. गंगेच्या पाण्याचे अर्ध्य गंगेलाच दिल्याचा हा प्रकार होईल. त्यामुळे बॅंकांचे शेअर्स वर जातील. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बॅंक, आरबीएल बॅंक, बंधन बॅंक, फेडरल बॅंक, सिटी युनियन बॅंक, डी.सी.बी. बॅंक त्याचप्रमाणे स्टेट बॅंक ऑफ इंडियाचेही शेअर्स वर जातील. 

नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांत बजाज फायनान्स, मुथुट फायनान्स यांचे भाव लक्षणीय वाढण्याची शक्‍यता आहे. बजाज फायनान्स सध्या ४,०८५ रुपयांना आहे. तिथून तो ४,६०० रुपयांपर्यंत वर चढावा. लार्सेन टुब्रोला मोठ्या प्रमाणात नवीन कामे मिळाली आहेत. सध्या हा शेअर १,५८० रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव १,६८७ रुपये होता. तिथपर्यंत तो पुन्हा चढावा. इंजिनिअरिंग क्षेत्रातली ही एक मोठी कंपनी आहे. राजकारण आणि अर्थकारण यानंतर समाजकारणाचाही नेहमी विचार होत असतो. पण सध्या समाजकारण मागे पडले आहे. शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी या क्षेत्रांबद्दल फारसे औत्सुक्‍य दिसत नाही. ''आरे''सारखी एखादी बाब किंवा ''नाणार'' प्रकल्पासारखा एखादा प्रकल्प अधूनमधून चर्चेत येतो आणि विसरला जातो. असे प्रश्‍न राजकारण्यांसाठी तात्पुरते चर्चेचा विषय ठरतात. सर्वोच्च न्यायालयातील रामजन्मभूमीबद्दलचा वादही सामोपचाराने २०१९ हे वर्ष संपायच्या आत संपावा अशी अपेक्षा आहे. वर्षअखेरीस सर्वोच्च न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्त होण्यापूर्वी हा खटला संपला, तर त्यांना मोठे श्रेय मिळेल. 

चांगल्या सुगीमुळे शेतकऱ्यांच्या हातातही बऱ्यापैकी पैसे खुळखुळतील. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंक रेपो दर पुन्हा पाव टक्‍क्‍याने कमी करेल अशी अपेक्षा आहे. स्टरलाईट टेक्‍नॉलॉजी सध्या १६१ रुपयांना उपलब्ध आहे. एडेलवाइजने हा शेअर खरेदी करण्याबद्दल भलावण केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा शेअर वर्षभरात २९६ रुपयांपर्यंत चढावा. कंपनीने ३० जूनला संपलेल्या तिमाहीसाठी १,४९१.९५ कोटी रुपयांची विक्री दाखवली आहे. खरे तर जून २०१८ च्या तिमाहीत ही विक्री १,७९१ कोटी रुपये इतकी जास्त होती. कंपनी आयडीएस समूहातील शेअर्स विकत घेतल्यामुळे तिचा नफा यापुढील काळात वाढता राहील. 

टाटा ग्लोबल हा शेअर घेण्याबद्दलही एका ब्रोकरेज कंपनीने शिफारस केली आहे. सध्या त्याचा भाव २७९ रुपये आहे. तो २८६ रुपयांपर्यंत वाढावा. ३० जूनला संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १८९७ कोटी रुपयांची विक्री जाहीर केली होती. 

एचडीएफसी बॅंक हा शेअर सध्या १,२४४ रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, तो यापुढे थोडा घसरण्याची शक्‍यता असल्यामुळे त्याची विक्री करायला हरकत नाही. 

ग्रासीम इंडस्ट्रीज सध्या ७२७ रुपयांना आहे. तो ८९५ रुपयांपर्यंत चढू शकतो. जेएसडब्ल्यू स्टीलदेखील २४६ रुपयांपर्यंत वर जावा. रिलायन्सही १,३२० रुपयांपर्यंत चढू शकेल. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स ४५४ रुपयांपर्यंत वाढू शकतो. 

मिश्र धातू निगम (मिधानि) नजीकच्या भविष्यात चांगला वाढेल. १ सप्टेंबर २०१९ ला तिच्याकडे १,८१५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. सध्या या शेअरचा भाव १३१ रुपये आहे. वर्षभरातील किमान भाव १०० रुपये होता. वर्षभरात तो २५ टक्‍क्‍यांनी वाढून १६५ रुपयांपर्यंत जावा. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७.४३ पट दिसते. रोज सुमारे ७० हजार शेअर्सचा व्यवहार होतो. मिश्र धातू निगममध्ये अल्प प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही. 

वाहन कंपन्यांत मात्र बरीच मंदी आहे. मारुती सुझुकी, बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प या शेअर्सकडे दुर्लक्ष करावे व सध्या त्यात काही गुंतवणूक असेल तर विक्री करून बाहेर पडावे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक करावी. प्रत्येक खरेदीत फायदा होतोच असे नाही. गुंतवणूक हा करमणुकीचा विषय नव्हे.  

संबंधित बातम्या