गुंतवणुकीच्या अनेक संधी...

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा फड आता जास्तीत जास्त रंगू लागला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कायम राहिली असून भाजप सुमारे १५० जागा, तर शिवसेना १२४ जागा लढवतील. उरलेल्या जागा मित्र पक्षांना दिल्या जातील. महायुती किमान २२० जागा तरी जिंकू शकेल. ठाकरे कुटुंबातील पहिले ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवीत आहेत. शिवसेना सोडून भाजप आणि त्यांच्या अन्य मित्रपक्षांनी १४५ च्या वर जागा जिंकल्या, तर भाजपने शिवसेनेची मनधरणी करण्याचे किंवा शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाचे बक्षीस देण्याचे काहीच कारण नाही. भारतीय जनता पक्षाने काही मंत्र्यांचा पत्ता कट केला आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना तिकिटे नाकारण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये जिथे लालकृष्ण अडवानी यांचे काही चालले नाही, तर त्यापुढे इतरजण गौणच ठरतात. अडवानींचे वय ७५ वर्षांच्या पुढे असल्याने त्यांना तिकीट नाकारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ७५ वर्षांची सीमारेषा आखून ठेवली आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा आव आणला असला, तरी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवली जाईल असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. प्रत्यक्षात काय होते ते २४ ऑक्टोबरलाच कळेल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांनाही तिकीट नाकारले गेले आहे.

कोकणातून नितेश राणे यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभेच्या साताऱ्याच्या रिक्त जागेसाठीही निवडणूक होणार आहे. तिथून उदयनराजे भोसले हे भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. भाजपची चलती बघून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बरेच कार्यकर्ते तिथे प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. तिकीट मिळाले तर पक्षाचे उमेदवार, नाहीतर बंडखोर उमेदवार असा अनेकांचा पवित्रा असला, तरी मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांचा बंदोबस्त केला जाईल असे म्हटले आहे. 

पुण्याहून भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा मतदार संघातून तिकीट दिले गेले आहे. नितेश राणे जरी भाजपतर्फे कोकणात उभे असले, तरी त्यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार आहे.

''आरे''च्या मेट्रोशेडबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने कौल दिल्याने तिथे विरोध करणाऱ्या शिवसेनेला अप्रत्यक्ष मानहानी पत्करावी लागली आहे.

साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेने नुकताच अनुआगा आणि नारायण मूर्ती यांचा गौरव केला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना नुकताच ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या हस्ते दिला.

निवडणुकीच्या रिंगणात अनेकदा अनेक उमेदवार आपले अर्ज भरतात आणि ते परत घेण्यासाठी काही अघोषित खंडणी घेऊन ते माघार घेतात. याही वेळेला जागांपेक्षा चौपट लोकांनी अर्ज भरले आहेत. शेवटी खरी लढत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी व भाजप-शिवसेना महायुतीमध्येच होईल.

कोल्हापूर, सांगली इथली पूरस्थिती आता आटोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजार बऱ्यापैकी सुधारलेला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर पाच टक्क्यांनी कमी करून शेअर बाजाराला एक स्टीम्य़ुलस दिला होता. पाठोपाठ ऑक्टोबरच्या पहिल्या गुरुवारी रिझर्व्ह बॅंक पाचव्यांदा रेपो दरात कपात करील अशी अटकळ होती. बॅंकांनी आपल्या कर्जांचे व्याजदर रेपोशी संलग्न करावेत अशी रिझर्व्ह बॅंकेची अपेक्षा आहे. आप खुशीने त्यांनी तसे न केल्यास रिझर्व्ह बँक दर कमी करण्याचे आदेश देऊ शकते. स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा सध्याचा भाव १४२ रुपये आहे. तिने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या एका कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीने २६ सप्टेंबरला युरोपमधील एका कंपनीचे आग्रहण केले आहे. त्याचा फायदा तिला येत्या वर्षात मिळेल. एडेलवाइजने स्टरलाईट टेक्नॉलॉजीजचे टारगेट २९६ रुपये दिले आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंक घेण्याबद्दल काही ब्रोकरेज संस्थांनी शिफारस केली आहे. त्याचे टारगेट ५० रुपये दिले आहे. सध्या तो ४४ रुपयांना मिळत आहे. 

साखर कंपन्यांतील मावाना शुगर २०२० या आर्थिक वर्षासाठी आपले शेअरगणिक उपार्जन १४ रुपयांपर्यंत जाहीर करेल. सध्या हा शेअर विकत घेतल्यास, त्यात वर्षभरात ४० ते ५० टक्के नफा मिळू शकेल. हिरो मोटो कॉर्प कंपनीची विक्री दसरा, दिवाळी सणांमुळे वाढू शकेल. 

केंद्र सरकार शिपिंग कॉर्पोरेशन इंडियामधील आपले काही शेअर्स निर्निवेशनाद्वारा विकणार आहेत. त्यामुळे जोखीम घेऊन या शेअर्समध्ये थोडीशी गुंतवणूक करावी. पेट्रोनेट एलएनजीने नुकताच एक अमेरिकन कंपनीचा कारखाना २५० लाख डॉलर्सना विकत घेतला आहे. 

वेदांत ही अनिल अगरवाल समूहातील कंपनी २५०० कोटी रुपयांना एक ॲल्युमिनियम फ्लॅट रोल्ड उत्पादन करणारा कारखाना विकत घेणार आहे. या शेअरमध्ये थोडीशी गुंतवणूक करायला हरकत नाही. 

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स या शेअरमध्येही बरीच तेजी येऊ शकते. तिथेही थोडी गुंतवणूक हवी. सिपलाने आपले एक इंजेक्शन क्षेत्रातील उत्पादन वाढवण्याचे ठरवल्याने हाही शेअर वाढू शकेल. 

जे कुमार इन्फ्राचे या वर्षातील शेअरगणिक उपार्जन २५ रुपये होण्याची शक्यता आहे. कंपनीकडे मेट्रो रेल्वेची खूप कामे आहेत. त्यामुळे हाही शेअर जरूर घ्यावा. 

श्रेयांस इंडस्ट्रीजचे शेअरगणिक उपार्जन ३८ रुपये व्हावे. त्यामुळे हाही शेअर तेजाळू शकेल. आता घेतल्यास त्यात ४० टक्के वाढ मिळेल. 
आयसीआयसीआय बँक पुढच्या दोन वर्षांत सुमारे ४५० शाखा वाढवणार आहे. त्यामुळे तिचेही भविष्य उज्ज्वल असेल. बँकेच्या शेअरचा सध्याचा भाव ४२६ रुपये आहे. तो ५६५ रुपयांपर्यंत वर जाईल. तिच्या उपकंपन्यांचेही भाव वर जाणार असल्यामुळे त्याचाही तिला फायदा होईल. औद्योगिक कंपन्यांना कर्जे देण्याबाबत आयसीआयसीआय बँक सुरक्षितता बघूनच कर्जे देते. छोट्या मोठ्या कर्जदारांनाही कर्जे देण्यापूर्वी बँक कटाक्षाने त्यांची सुरक्षितता पारखून घेते. नॉन बँकिंग फिनान्शिअल कंपन्यांनाही ती मोठ्या प्रमाणावर कर्जे देते. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एचडीएफसी, बजाज फायनान्स चोल मंडलम, सुंदरम, एचडीबी फायनान्शिअल आणि ॲक्सिस फायनान्सही तिच्या रडारवर आहेत. गृहवित्त कर्जे आणि वाहन कर्जे यातही तिचा मोठा सहभाग आहे. 

आयसीआयसीआय बँक ही खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक यांच्याप्रमाणेच एक मोठी बँक आहे. तिच्या शेअर्सचे बाजारमूल्य तीन ट्रिलियन रुपये आहे. तिचे भाग भांडवल १,२८५ कोटी रुपये आहे. तिची गंगाजळी २०१८ च्या आर्थिक वर्षासाठी १,०३,८७३ इतकी होती. ती २०२२ मार्चमध्ये १,५९,६२२ इतकी होणार आहे. 
 

संबंधित बातम्या