महागाई कमी होण्याचे संकेत

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अर्थनीती : शेअर बाजार
 

रिझर्व्ह बॅंकेने ६ फेब्रुवारीला आपले द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. असे धोरण दर फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्‍टोबर व डिसेंबरमध्ये जाहीर होते. रेपो दरात वाढ करणे किंवा तो कमी करणे या उपायाद्वारे बाजारातील द्रवता कमी करणे वा वाढवणे हे शक्‍य होते. रेपो दराच्या बदलानंतर बॅंकाही कर्जावरील आपले व्याजाचे दर कमी-जास्त करतात. 

रेपो दर म्हणजे 'रिपर्चेस रेट' (Repurchase Rate). पूर्वी याच दराला 'बॅंक रेट' म्हणायचे. बॅंक ऑफ इंग्लडने हा दर १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू केला. अमेरिकेत याच दराला 'फेड रेट' असे म्हणतात. सर्वच देशातील मध्यवर्ती बॅंका, व्यापारी बॅंकांना कर्जे पाहिजे असल्यास या दराने देतात. बॅंकांकडे द्रवता वाढली, तर रिझर्व्ह रेपो दराने बॅंकांकडून रिझर्व्ह बॅंक रकमा स्वीकारते. हा दर रेपो दरापेक्षा नेहमी कमी असतो. तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी व तीन केंद्रीय अधिकारी यांची एक वित्त समिती गेली काही वर्षे कार्यान्वित आहे. ती रेपो दर निश्‍चित करते. समितीचे सभासद शक्‍यतो एक मताने निर्णय घेत असले तरी प्रत्येक सभासदाला शक्‍यतो मत निर्भीडपणे मांडण्याचा अधिकार आहे. कधी कधी काही सभासदांनी असे स्वातंत्र्य घेतले आहे. 

यावेळच्या रेपो धोरणात काहीही बदल झालेला नाही. रेपो दर पूर्वी प्रमाणेच ५.१५ टक्के, तर रिझर्व्ह रेपो दर ४.९० टक्के ठेवण्यात आला आहे. 

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या सहामाहीत चलनवाढ आणखी खाली येत चार टक्के ते ३.८ टक्के यामध्ये राहील. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाही अखेर महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मागील पाच पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅंकेने एकूण १.३५ टक्के दर कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते चालू आर्थिक वर्षात जीडीपी पाच टक्के राहील. जीडीपीची ही टक्केवारी गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी टक्केवारी आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी जीडीपी सहा टक्के धरला आहे. सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात २०२०-२१ या वर्षात जीडीपी सहा ते ६.५ टक्के असेल असे म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेने एक नवा दोन ट्रिलीयन इतका निधी तीन वर्षांच्या रोख्यात जाहीर केला आहे (एक ट्रिलीयन म्हणजे एकावर बारा शून्य). युरोपियन बॅंकांनी हा प्रयोग काही महिन्यापूर्वी प्रथम केला आहे. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने त्याचे अनुकरण केले आहे. पुढील काही वर्षांत दोन लाख कोटी रुपये बॅंकांकडून बाजारात खेचले जातील. भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचाच संदेश रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. पतधोरणानंतर शेअर बाजारातील निर्देशांक कमी झाला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने टेलिकॉम कंपन्यांना बॅंकांनी दिलेल्या भरमसाठ कर्जाबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २४ ऑक्‍टोबर २०१९ च्या निर्णयामुळे रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी १.३३ ट्रिलीयन रुपयांइतकी रक्कम 4 व 5 Gच्या ध्वनीवर आधारित पद्धतीवर सरकारला द्यावी. केंद्र सरकारने हा आकडा निर्धारित केला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आपले दर वाढवले, तर ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसेल. टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या कर्जाबद्दल बॅंकांनी जास्त तरतुदी कराव्यात. त्यामुळे बॅंकांच्या नफ्यावर मोठा परिणाम होईल. काही बॅंकांनी याबाबत अधिक जागरूकता दाखवून तरतुदी वाढवल्या आहेत. जीओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांबाबत बॅंकांना जास्त जागरूकता दाखवावी लागेल. आयडीएफसी बॅंकेने याबाबत डिसेंबर २०१९ च्या तिमाहीसाठी १६२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम चार ट्रिलीयन रुपये इतकी असली, तरी सर्वच रकमेला धोका नाही. धोक्‍याची रक्कम साधारणतः एक ट्रिलीयन रुपयापर्यंत जाऊ शकेल. ही रक्कम पुढील पाच सहा वर्षांत थोडी थोडी पुरी केली जाईल. मार्च २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळात टेलिकॉमचे क्षेत्र जास्त गाळात गेले आहे. 

सोमवारी १० तारखेला निर्देशांक ४०,९७९ होता, तर निफ्टी १२०३१ होता. अन्य काही शेअर्सचे भाव असे होते- मिंडा इंडस्ट्रीज ४७६, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन १२३, बजाज फिनसर्व्ह ९६२७, बजाज फायनान्स ४७२०, मॅक्‍स फिनान्शिअल ४८२, लार्सेन टुब्रो १९५०, उगार शुगर १३, दिलीप बिल्डकॉन ३८४, मॅस फिनान्शिअप ११२४, एल अँड टी फायनान्स १२७, एल अँड टी टेक्‍नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड १७०५, जेएसडब्ल्यू स्टील, एपीएल अपोलो २०७४, जे कुमार इंडस्ट्रीज १४६, येस बॅंक ३७, स्टर्लाईट टेक्‍नॉलॉजी १२४, स्टेट बॅंक ३७६, बॅंक ऑफ बडोदा ९६, एचडीएफसी बॅंक १२४०, एचडीएफसी लाइफ ५८८, गुजरात हेवी केमिकल्स १७६, पिरामल एंटरप्राइझेस १३४९. पिरामल एंटरप्राइझेसने या तिमाहीत २० टक्‍क्‍यांनी जास्त नफा मिळवला. पिरामल एंटरप्राइझेस अजूनही गुंतवणुकीला योग्य आहे. भारत पेट्रोलियम सध्या ४८५ रुपयांना आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्यांचा किमान ३८६ रुपये होता. एसबीआय लाइफ इन्शुरन्स ९५२ रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव १०३० रुपये होता, तर किमान भाव ५७५ रुपये होता. रोज सुमारे ३० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

नागरी सहकारी बॅंकांची तपासणी यापुढे रिझर्व्ह बॅंकेला करण्याचे अधिकार मिळाले आहेत. बॅंकांचे प्रमुख (CEO) शैक्षणिक पात्रता, अनुभव यावर विचार करून रिझर्व्ह बॅंक त्यांची नेमणूक करेल. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन करताना 'एफएसआय'च्या वापराचे बंधन काढून टाकण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात झोपडपट्टी धारकांना ३०० चौरस फुटांचेच घर देणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईप्रमाणे पुण्यातही फ्री एफएसआय निर्णय लागू करण्यात आला असून गेल्या आठवड्यातील १२ फेब्रुवारी रोजी याबाबतचा निर्णय होणार होता. 

गुजरात अंबुजा एक्‍सपोर्ट लिमिटेड स्टार्च डेरिव्हेटिव्हज, सोया डेरिव्हेटिव्हज आणि कापसाचे धागे यांचे अग्रगण्य उत्पादक आहेत. या कंपनीचे सहा सॉल्व्हंट एक्‍स्ट्रॅक्‍शनचे कारखाने आहेत. याशिवाय त्यांची बायो केमिकल विभाग आणि हरित ऊर्जा हिचे उत्पादन पवनऊर्जा व सौरऊर्जा यातून केले जाते. या कंपनीच्या शेअरचे बाजार मूल्यांकन १६८४ कोटी रुपये आहे. या शेअरचे पुस्तकी मूल्य १०७ रुपये आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १३.७० आहे. कंपनीची गंगाजळी १२०० कोटी रुपये आहे. 

येस बॅंकेला १० हजार कोटींचा निधी उभा करण्यास भागधारकांनी संमती दिली आहे. त्यांपैकी ११०० कोटी रुपयांचा निधी भाग भांडवलातून उभा केला जाईल. कुठल्या दराने समभाग विकले जातील हे अजून ठरलेले नाही. 

डी-मार्टची मालकी असणाऱ्या 'एव्हेन्यू सुपरमार्ट'च्या चार हजार कोटी रुपयांच्या वस्तू बाजारात विक्रीला आणल्या जाणार आहेत. यासाठी क्वालीफाइड इन्स्टिट्यूशनल प्रमोटर्सना दोन हजार रुपये (प्रति शेअरला) ही किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट आपल्या जवळील दोन कोटी समभागांची विक्री करून १८ टक्के हिस्सा बाजारात विकणार आहे. या शेअरचा देकार जेव्हा जाहीर होईल, तेव्हा त्यात जरूर गुंतवणूक करावी. 

ऑक्‍टोबर-डिसेंबर २०१९ च्या तिमाहीत टाटा स्टीलने १२२९ कोटी रुपयांचा तोटा जाहीर केला. युरोपमधील (ग्रेट ब्रिटन) टाटा स्टीलच्या उपकंपन्यांनीदेखील ९५६ कोटींचा तोटा जाहीर केला. भारतात टाटा स्टीलच्या नफ्यात ४७ टक्‍क्‍यांनी घट होऊन २२५३ कोटी रुपयांवरून नफा ११९४ कोटी रुपयांवर आला. जगातील सर्वच पोलाद कंपन्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे. जगातील सर्वांत मोठी पोलाद उत्पादक कंपनी 'आर्सेलर मित्तल' ही कंपनीही या वावटळीतून सुटलेली नाही. त्यामुळे पोलाद कंपन्यांतील गुंतवणूक गेली कित्येक वर्षे गुंतवणूकदारांना गर्तेत लोटत आहे. कंपन्यांत अजूनही ज्यांची गुंतवणूक आहे त्यांनी विनाविलंब त्यातून तोटा घेऊनही बाहेर पडावे. 

सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक बजाज फायनान्समध्येच होऊ शकते.

संबंधित बातम्या