ग्रामीण भाग मंदीच्या छायेत

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 9 मार्च 2020

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात अमेरिकन अध्यक्षांची भारतभेट झाल्यानंतर राजकीय पातळीवर फारशा हालचाली नव्हत्या. फक्त अफगाणिस्तानमध्ये तालिबान व अमेरिका यांच्यात शनिवारी २८ फेब्रुवारीला ऐतिहासिक शांतता करार झाला. यानंतर अमेरिका अफगाणिस्तानातील आपल्या सैन्याची संख्या कमी करणार आहे. अफगाणिस्ताननेही त्यांच्या गटांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गेली १८ वर्षे हिंसाचाराच्या गर्तेत असणाऱ्या अफगाणिस्तानात शांततेची आशा निर्माण झाली आहे. 

अमेरिकेवर ९ सप्टेंबर २००१ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानावर कारवाईला सुरुवात केली होती. तेव्हापासून अमेरिकेसह मित्र देशांचे सैन्य अफगाणिस्तानात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि तालिबान यांच्यात सप्टेंबर २०१८ पासून चर्चा सुरू होती. ही चर्चा आटोक्‍यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात तालिबानने हिंसाचारमुक्त आठवडा पाळला होता. एकमेकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी व तालिबानमधील सर्व गट या कराराबद्दल सहमत आहेत हे दाखवण्यासाठी हा हिंसाचारमुक्त आठवडा पाळण्यात आला होता. दिसायला ही बाब जरी क्षुल्लक वाटली तरीही तिचे दूरगामी अनेक परिणाम होणार आहेत. उत्तर कोरियाबरोबर झालेल्या वाटाघाटीनंतर ही दुसरी बाब ट्रम्प यांना नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी खूप मोठे पाठबळ देणारी ठरेल. सीरियानंतर अफगाणिस्तानही थंडावला, तर जागतिक शांतता जास्त काळ टिकेल. 

दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी मध्यपूर्व आणि भारतासह आशिया या भागासाठी अफगाणिस्तानचे स्थान मोठे आहे. अलेक्‍झांडरच्या अफगाणिस्तानवरील स्वारीनंतर हा देश काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यानंतर खुद्द बाबरपासून गेली पाचशे वर्षे अफगाण लोक भारतात येत होते. इथल्या मोगल राजवटीत अनेक अफगाणी सरदार होते. 

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी २८ फेब्रुवारीला सहकार विभागाने जाहीर केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल व त्यांच्या अडचणींचे निराकरण होईल असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. आतापर्यंत एक लाख २५ हजार ४४९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून, २ मार्चपासून त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये पैसे जमा होतील. 

या कर्जमुक्ती योजनेमुळे १५ जिल्ह्यांत पूर्णपणे, तर येऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या येणाऱ्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे १३ जिल्ह्यांत अंशतः याद्या जाहीर झाल्या आहेत. ३६ लाख ४५ हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या २१ लाख ८२ हजार इतकी आहे. सरकारकडून या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यांतील गावांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. प्रमाणीकरणानंतर व्यापारी बॅंका कर्जखात्यांवर २४ तासांत रक्कम जमा करतील; तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणार आहे. 

उत्पादन क्षेत्रात घट झाल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा दर तिसऱ्या तिमाहीत (ऑक्‍टोबर ते डिसेंबर) धरून ४.७ टक्‍क्‍यांवर गेला आहे. हा गेल्या सात वर्षांतील २८ तिमाहीतील नोंदवण्यात आलेला नीचांकी दर ठरला आहे. 

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या तिसऱ्या तिमाहीतील सणासुदीच्या आणि खरीप पिके बाजारात आल्यानंतरही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मंदी जाणवत आहे. आर्थिक विकासाचा दर घटल्याची ही सलग तिसरी तिमाही आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षामध्ये (२०१८-१९) आर्थिक विकासाचा वेग ५.६ टक्के होता. त्याआधी चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर २०१९) हा दर साडेचार टक्‍क्‍यांवर आला होता. 

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचे विधेयक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बुधवारी २६ फेब्रुवारीला विधानपरिषदेच्या सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना एक लाख रुपये दंड केला जाईल, तसेच शाळेची मान्यताही काढून घेण्याची तरतूद या विधेयकात केली आहे. या विधेयकाची अंमलबजावणी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून होईल. 

महाराष्ट्रात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीचे १०० दिवस होऊन गेलेले आहेत. अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी राज्यसरकारने २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे अभिवचन दिले होते, पण थंडीमुळे ते गारठून गेले आणि २०१५ ते २०१९ या चार वर्षांतील थकलेल्या कर्जाची प्रत्येकी जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची कर्जे माफ करण्याची घोषणा झाली. शेतकऱ्यांचा सातबारा ही गेली काही वर्षे एक मनोरंजक गोष्ट झाली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतापर्यंत एकूण २५ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विधेयकांचे याबाबत समाधान झालेले नाही हे उघडच आहे. 

एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी ५०० रुपयांच्या नोटा भरपूर मिळत आहेत. त्यामागे कदाचित दोन हजार रुपयांच्या नोटांत जास्त रक्कम दडवली जाऊ शकते, असे असेल. गेल्या वर्षी रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटा कमी छापल्या होत्या हे त्याचे सकृतदर्शनी कारण आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घटना सर्वसाधारण प्रकारचीच आहे असे म्हटले आहे. ५०० रुपयांच्या नोटा जास्त मिळाल्याने ग्राहकांचे व्यवहार सोपे होतात असा खुलासा बॅंकांनी केला आहे. 

राज्यातील मुस्लिम समाजाला यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (मे २०२० ते जून २०२१) पाच टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. त्याबाबतची घोषणा गेल्या आठवड्यात विधानसभेत करण्यात आली. 

येत्या १ मे रोजी महाराष्ट्राचा ६० वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. या दिवसापासून एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग प्लॅस्टिकमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्‍यक आहे. 

गेल्या सोमवारी निर्देशांक ३८,१४४ वर बंद झाला, तर निफ्टी ११,१३२ वर बंद झाला. काही शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते. जे कुमार इन्फ्रा १२७ रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर ४.५७ पट आहे. खरेदीसाठी हे अत्यंत आकर्षक आहे. स्टेट बॅंक २८७, एचडीएफसी बॅंक ११७९, मिंडा इंडस्ट्रीज ३६४, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन १११, डीसीबी बॅंक १५९, महिंद्र सीआयइ १२४, ज्युबिलंट ४८९, बंधन बॅंक ३९३, आरबीएल बॅंक २८३, एचडीएफसी लाइफ ५५४, अपोलो टायर्स १३६, जे के टायर्स ६२, बाळकृष्ण इंडस्ट्रीज १०६९, दिलीप बिल्डकॉन ३००, फोर्स मोटर्स १०५१, सीएट लिमिटेड ९९५, बजाज फायनान्स ४३६०. 

खालील कंपन्यांत सध्या गुंतवणूक किफायतशीर ठरेल. आयटीसी - सध्याचा भाव २०२, तर संभाव्य २८० रुपये, हिंडाल्को इंडस्ट्रीज - सध्याचा भाव १७४, तर संभाव्य २४१ रुपये. 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना संयम, सातत्य, चिकाटी आणि बाजाराला चिकटून राहण्याचा निर्धार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 'ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असो द्यावे समाधान' हे संतवचन इथे उपयोगी पडत नाही. त्याऐवजी 'बाजारात सतत कृतिशील रहा' हे वसंत वचन उपयोगी पडेल. लोभ किंवा तृष्णा आणि भीती या दोन गोष्टी इथे सतत हातात हात घालून चालत असतात. एखाद्या शेअरमध्ये नुकसान झाले, तरी अन्य शेअर्समध्ये जर फायदा होत असला आणि भांडवल वाढत असले, तर बाजारात पाय रोवून उभे राहिले पाहिजे. 

संबंधित बातम्या