व्यापारी हालचाली संथ  

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 23 मार्च 2020

अर्थनीती : शेअर बाजार
 

काही दिवसांपूर्वी चीनमधून सुरू झालेल्या आणि जगभर झपाट्याने फैलावलेल्या 'कोरोना' या रोगामुळे सगळे जग हादरून गेले आहे. अजूनही त्याचे पडसाद उमटतच आहेत. सर्व देशांतील सरकारांनी याबाबत ताबडतोब उपाययोजना सुरू केल्या आहेत. भारताने सर्व व्हिसे रद्द केले आहेत. बाकीच्याही अमेरिका, ग्रेट ब्रिटन, अनेक युरोपियन देश यांनीही तशीच पावले उचलली आहेत. 
 
कोरोनावरील विवेचनांनंतर अन्य आर्थिक बातम्यांमध्ये भारतीय बॅंकिंगचा विषय मननासाठी उपयुक्त ठरेल. गेले तीन आठवडे खासगी क्षेत्रातील येस बॅंकेकडे लक्ष केंद्रित झाले आहे. येस बॅंकेचे एकूण प्रकरण ३४ हजार कोटी रुपये इतके असावे. येस बॅंकेचे प्रवर्तक राणा कपूर व त्यांच्या तीन मुली यांच्याकडे संशयाची सुई दिशा दाखवत आहे. 

 नव्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्व व्यवहार, वेतन व निवृत्तीवेतन, फक्त सरकारी बॅंकांतूनच होतील असा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी खासगी आणि सहकारी बॅंकांमध्ये असलेली खाती बंद करावीत असे आदेश राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांना देण्यात आले आहेत? पण सहकारी बॅंकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. 

 यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बॅंकांमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा निधी जमा करण्याकरता उघडण्यात आलेली खाती १ एप्रिल २०२० पासून बंद करून ती फक्त सरकारी बॅंकांमध्येच उघडावीत असे आदेश देण्यात आले आहेत. 

 सहकारी संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्र सरकार पुढे ढकलणार होते, पण त्याला उच्च न्यायालयाने चपराक लावली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचे कारण पुढे करून महाराष्ट्र सरकार नगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलणार होते. तो निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. 

 आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव ३० टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. आपल्या देशात मात्र पेट्रोल व डिझेलचे भाव इतक्‍या प्रमाणात कमी झालेले नाहीत. आंतरराष्ट्रीय भावाप्रमाणे पेट्रोलचे भाव कमी करायचे असतील, तर पेट्रोल लिटरमागे ८ ते १० टक्‍क्‍यांनी कमी व्हायला हवे. अजून भाव कमी झाले नसल्यामुळे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तीन कंपन्यांना चांगला फायदा होईल. हिंदुस्थान पेट्रोलियम १९७ रुपयांपर्यंत उतरला आहे. गेल्या ५२ आठवड्यांतील त्याचा उच्चांकी भाव ३३३ रुपये होता, तर नीचांकी भाव १५० रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ५.०१ आहे. 

 बारा वर्षांनंतर शेअर बाजारात लोअर सर्किट लागले. ते लागल्यानंतरही शुक्रवारी १३ मार्चला शेअर बाजाराने परत उसळी घेतली. निर्देशांक व निफ्टी या दोन्ही ठिकाणी बाजाराने विक्रमी हालचाली दाखवल्या. एकवेळच्या नीचांकावरून निर्देशांक एक दिवसात १० टक्‍क्‍यांनी सावरला. गेल्या अनेक वर्षांनंतर हे प्रथमच घडले आहे. शेअर बाजार खालील गोष्टींमुळे सावरला - 

 अमेरिकी स्टॉक फ्युचर्समध्ये तेजी आली. 'रिस्क मॅनेजमेंट' सांभाळण्याचे सेबीने आश्‍वासन दिले. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण याला कारणीभूत झाली. बाजार पडल्यानंतर गुंतवणुकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 

 शेअर बाजारावर 'कोरोना'चा प्रतिकूल परिणाम झाला. निर्देशांक व निफ्टी घसरल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने परिणामकारक योजना म्हणून दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पुनर्खरेदीची योजना आखली आहे. डॉलरचा तुटवडा ओव्हरसीज केंद्रातून पडू नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने ही योजना आखली आहे. 

 येस बॅंक पूर्णपणे गाळात गेल्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळ, प्रत्येकी २४.५ टक्के नवीन भांडवलातील हिस्सा म्हणून घेणार आहेत. येस बॅंक कोलमडू नये म्हणून केंद्र सरकार व अर्थमंत्रालय जागरूक आहे. स्टेट बॅंक आपल्याबरोबर एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक महिंद्र बॅंक, अॅक्‍सिस बॅंक यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. या वृत्तानंतर येस बॅंकेचा शेअर १९ रुपयांवरून २६ रुपयांवर गेला आहे. गेल्या शुक्रवारी या शेअरमध्ये २८ लाख शेअर्सचे व्यवहार झाले. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १८.२६ पट दिसते. गेल्या १२ महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव २८६ रुपये होता, तर नीचांकी भाव काही क्षण ९ रुपयांपर्यंत होता. नवीन भांडवल स्टेट बॅंक व इतर बॅंका समभागाला प्रत्येकी १० रुपये देऊन घेणार आहेत. 

 सर्व जगातील व्यापारी हालचाली 'कोरोना'मुळे एखाद्या डोहातील संथ पाण्यासारख्या झाल्या आहेत. मधूनच कोणी त्या पाण्यावर एखादी काठी मारली तर ते पाणी मोठी हालचाल करते आणि परत विसावते. अशाच डोहातच 'कोरोना'सारखा कालीया सर्पही पाण्यात येतो आणि कुठल्यातरी कृष्णाला मग 'कालीयामर्दन' करावे लागते. 

भारतात हळूहळू कोरोनाचा फटका बसत असला, तरी सर्व जगात एकूण आतापर्यंत सहा हजारांवर बळी गेले आहेत. कोरोना बाधितांची संख्या एक लाख साठ हजारांवर गेली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत चीनमधून ७६६, जपानमधून १२४, इराणमधून ३३६ आणि इटलीमधून २१८ भारतीयांना मायदेशात आणले आहे. पण त्यांना जरूर वाटल्यास विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्राकडून स्वसंरक्षणार्थ साधनांसाठी ८० लाख रुपयांपेक्षाही अधिक निधी देण्यात आला आहे. पण एकूण परिस्थिती पाहता हा निधी पुरेसा नाही. कोरोनाच्या जाळ्यात जागतिक अर्थव्यवस्था अडकत असून, तिला यातून बाहेर काढण्यासाठी जगातील मध्यवर्ती बॅंका सरसावत आहेत. त्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचाही समावेश आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या डॉलर विक्रीच्या निर्णयामुळे शुक्रवारी १३ मार्चला आशिया खंडामध्ये सर्वाधिक उसळी मारणारे चलन भारतीय रुपया हे ठरले. डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.५० या ऐतिहासिक नीचांकी स्तरावर आला. यापूर्वी ऑक्‍टोबर २०१८ मध्ये ७४.४८ च्या विक्रमी पातळीवर तो पोचला होता. 

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बॅंकेनेही एक ते तीन महिने अवधीच्या एक लाख कोटी डॉलरच्या रेपो ऑपरेशनची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरांची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जगातील गुंतवणूकदार अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या घोषणांची वाट बघत आहे. चीनच्या 'पीपल्स बॅंक ऑफ चायना'ने बॅंकांच्या राखीव निधीमध्ये अर्धा टक्‍क्‍याची कपात करून तो एक टक्का केला आहे. बॅंक ऑफ जपानने पण बॉंड खरेदी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. 

बॅंकेने देऊ केलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यांचे जर कोणी व्यवहार केले नसतील, तर ती रद्द होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कार्डधारकांनी महिन्यातून १, २ वेळा तरी त्या कार्डांचा उपयोग करून ती सक्रीय ठेवावीत. या कार्डांचा वापर ऑनलाइन खरेदीसाठीही जरूर करावा. 

कोरोनाची झळ शेतमालालाही लागली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे व फळभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कमी झाली असल्यामुळे शेतमालाची निर्यातही मंदावली आहे. परिणामी इथल्या विक्रीचे भाव कमी झाले आहेत. 

 कोरोनाग्रस्त जे रुग्ण आहेत, त्यांच्या शीघ्र मदतीसाठी महापालिकेने 'शीघ्र प्रतिसाद संघाची' (रॅपिड रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे. सोळा मार्च संपताना निर्देशांक ३१,३९० वर बंद झाले, तर निफ्टी ९१९७ वर बंद झाला. काही प्रमुख शेअर्सचे १६ मार्चअखेर भाव खालीलप्रमाणे होते. 

 बजाज फिनसर्व्ह ७४९५, बजाज फिनान्स ३६७५, मॅक्‍स फिनान्शिअल ४०१, लार्सेन अँड टुब्रो इन्फोटेक १५२७, उगार शुगर १०.७५, दिलीप बिल्डकॉन २७३, लार्सेन अँड टुब्रो फिनान्स ७१, जेएस डब्ल्यू स्टील १८५, एपीएल अपोलो ट्यूब्ज १४१९, स्टेट बॅंक ऑफ इंडिया २२३, एचडीएफसी बॅंक ९९९, मिंडा इंडस्ट्रीज ३०९, पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन ९२, डीसीबी बॅंक १३९, महिंद्र सीआयइ ९२, बंधन बॅंक २७४, आरबीएल बॅंक १६२, एचडीएफसी लाईफ इन्शुअरन्स ४७४. 

 सध्याच्या भावात थोडी वाट बघून दोन ते तीन वर्षांच्या मुदतीसाठी बजाज फिनान्स जरूर घ्यावा. तीन वर्षांत तो ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढेल. स्टेट बॅंक ऑफ इंडियाही सध्याच्या भावात जरूर घ्यावा. स्टेट बॅंकेने, येस बॅंकेत कमी भावात मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचा तिला नजीकच्या काळात मोठा फायदा होईल. पेट्रोल व डिझेलचे भाव मध्यपूर्वेत जरी कमी झाले असले, तरी आपल्याकडील पेट्रोल वितरण कंपन्यांनी आपले भाव कमी केले नसल्यामुळे त्यांना २०२०-२१ या वर्षात भरपूर फायदा होईल. या कंपन्या केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर लाभांश देत असतात. मात्र, शेअर बाजारात जबाबदारी व जोखीम खूप असते, हे विसरून चालणार नाही.  

संबंधित बातम्या