बाजारातील अनिश्‍चिततेत वाढ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 13 जुलै 2020

अर्थनीती : शेअर बाजार

अनेक दिवस बंद असलेली ''अर्थनीती : शेअर बाजार'' ही लेखमाला पुन्हा सुरू करताना मला आनंद होत आहे. कुठल्याही अर्थव्यवस्थेवर शेवटी राजकीय व सामाजिक घटनांची छाया पडत असतेच. सध्या जगभर कोरोना साथीचीच चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या दोन लाखांवर कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थाही सध्या रुग्णालयातच आहे. 

''आधीच मर्कट तशातही मध प्याला। 
झाला तशातही वृश्चिक दंश त्याला। 
त्यातून त्यास जडली जर भूतबाधा। 
चेष्टा वदू मग किती कपीच्या अगाधा।।''

या ओळींप्रमाणेच कंपन्यांची घसरलेली विक्री, त्यामुळे होणारा मोठा तोटा, कर्जाचे हप्ते नियमित न आल्यामुळे बॅंक व्यवसायाची झालेली दुर्दशा या सर्व गोष्टींमुळे शेअर बाजार गर्तेत सापडला आहे. 

तीन जुलैला शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६,०२१ होता. वर्षभरातील उच्चांकी निर्देशांक ४२,२७४ होता, तर नीचांक २५,६३२ होता. शेअर बाजारात एवढी पडझड गेल्या दहा वर्षांत कधीच दिसली नव्हती. निफ्टी ५० गेल्या शुक्रवारी ३ जुलैला १०,६०७ होता. वर्षभरातील निफ्टीचा उच्चांक १२,४३० होता, तर नीचांक ७,५११ होता. इथेही एवढी घसरण पूर्वी कधीच दिसलेली नव्हती. 

  काही महत्त्वाच्या शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते. जे. कुमार ९९ रुपयांवर होता. जे. एस. डब्लू. स्टील १९० रुपये, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज १२८ रुपये, स्टेट बॅंक ऑफ इंडिया १८५ रुपये, कॅनरा बॅंक १०३ रुपये, फेडरल बॅंक ५३ रुपये, बॅंक ऑफ बरोडा ५६ रुपये, एच.डी.एफ.सी बॅंक १,०७८ रुपये, फेडरल बॅंक ५३ रुपये, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ८४ रुपये, डी.सी.बी बॅंक ८० रुपये, बंधन बॅंक ३४३ रुपये, आर.बी.एल बॅंक १७४ रुपये, तर येस बॅंक २६ रुपयांवर होता. 

  असे सांगितले तर कोणाला खरेही वाटणार नाही, की स्टेट बॅंकेसारखा शेअर ८.४ किं/उ गुणोत्तराला मिळत आहे. एच.डी.एफ.सी बॅंकेसारखा कायम स्थिर किमतीला मिळणारा शेअरही आता १,०७० पर्यंत खाली आला आहे. त्यात रोज सुमारे सव्वा कोटींचे व्यवहार होत आहेत. एच.डी.एफ.सी बॅंक गेल्या आठवड्यात २१ टक्क्यांनी वाढला होता. एच.डी.एफ.सी बॅंकेच्या ठेवी आता ११,८९,५०० कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत. एच.डी.एफ.सी बॅंक सध्याच्या भावात घेतल्यास तो १,३७५ रुपयांपर्यंत गेलेला दिसू शकेल. सध्याच्या भावापेक्षा तो १५ टक्के खाली येईपर्यंत थांबणे इष्ट ठरेल. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने तो घेण्याची शिफारस केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे याच सुरात आपला सूर मिळवलेला आहे. एच.डी.एफ.सी बॅंकेने शेतकऱ्यांसाठी ''इ किसान धान'' अॅप सुरू केले आहे. एच.डी.एफ.सी बॅंकेचे मुख्य अधिकारी आदित्य पुरी यांच्याकडे ८०० कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. 

 मिंडा इंडस्ट्रीज सध्या २८५ रुपयांना उपलब्ध आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने तो ३२५ रुपयांपर्यंत जाईल असे संकेत दिले आहेत. गुजरात हेवी केमिकल्स (GHCL) १४३ रुपयांना उपलब्ध आहे. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव २३७ रुपये होता, तर नीचांकी भाव ७० रुपये होता. सध्याच्या भावला किं/उ गुणोत्तर ३.७५ पट इतके आकर्षक आहे. रोज सुमारे दोन लाख शेअर्सचा व्यवहार होतो.

पिरामल एंटरप्राईजेस सध्या १,४०० रुपयांच्या आसपास मिळत आहे. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव २,०४० रुपये होता, तर नीचांकी भाव ६०६ रुपये होता. रोज सुमारे १५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. कंपनीने औषधी विभागातील आपले शेअर्स २० टक्क्यांनी कमी केले आहेत. कार्लाइल समूहाने हे शेअर्स विकत घेतले आहेत.  

या विक्रीनंतर पिरामल शेअरचे भाव घसरले असले, तरी मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज कंपनीला तो १,६०० रुपयापर्यंत जाईल असे वाटत आहे.

   सध्या भारत व चीन या देशातील तणाव वाढला आहे. त्यामुळे भारताला संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी शस्त्रास्त्रे, दारूगोळा घेण्याची नितांत जरुरी आहे. सुखोई आणि मिग विमाने मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी यापूर्वीच सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. देशाची मारकक्षमता वाढवण्यासाठी ३९ हजार कोटी रुपयांची शस्त्रे खरेदी करण्यात येणार आहे. यातील बरीचशी खरेदी खासगी क्षेत्रातील कंपन्या करतील. खरेदीत सुखोई विमानांना प्राधान्य दिले जाईल.

  शेअर बाजारातील मंदी बघताना कंपन्यांच्या प्राथमिक भाग विक्रीचे प्रमाण जवळ जवळ शून्यावर आले आहे. बियाणी समूहाच्या फ्यूचर कंपनीने सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या शेअरकडे लक्ष देणे उचित ठरेल.

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी शेअर मार्केटमध्ये नोंद करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी एक समितीही नेमली होती. या समितीचा अहवाल आता आला असल्यामुळे सामाजिक भांडवली बाजारात जास्त उलाढाली अपेक्षित आहेत. 

 कोरोनाची वाढणारी व्याप्ती, जागतिक मंदी, भारत-चीनमधील वाढता तणाव, जून २०२० तिमाहीचे घटू शकणाऱ्या विक्रीचे व नफ्याचे अंदाज यांमुळे शेअर बाराजातील अनिश्‍चितता व जोखीम वाढली आहे. त्यामुळे एका दृष्टीने Bottom Fishing च्या संधी वाढल्या आहेत. पण कंपन्यांचा पूर्ण अभ्यास करूनच खरेदीसाठी शेअर्सची निवड करावी. 

  शेअर मार्केटमधील सध्याचे वातावरण लक्षात घेता, सर्वसामान्य गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यासाठी बिचकत असला, तरी एस.बी.आय कार्ड, एस.बी.आय लाइफ, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एच.डी.एफ.सी लाइफ या चार कंपन्यांतील गुंतवणूक इष्ट ठरेल. रिलायन्समध्ये फेसबुक आणि इतर तत्सम कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी कर वाढला आहे. 

 एस.बी.आय कार्डची बाजारावर जेव्हा नोंद झाली, तेव्हा प्रारंभिक विक्रीचा भाव (I.P.O.) ७५५ रुपये होता. सध्या या शेअरचा भाव ६५५ रुपयांपर्यंत आला असल्यामुळे इथे खरेदी करणे इष्ट ठरेल. एच.डी.एफ.सी लाइफ आणि एस.बी.आय लाइफ हेही शेअर्स घेण्याजोगे आहेत.

संबंधित बातम्या