बाजारात उभारी 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
मंगळवार, 21 जुलै 2020

अर्थनीती : शेअर बाजार

मागील आठवडा संपला, तेव्हा सहा तारखेला मुंबई बाजाराचा निर्देशांक ३६४५० होता. गेल्या ५२ आठवड्यांतील उच्चांकी निर्देशांक ४२२७३, तर नीचांक २५६३८ होता. जगभरातील अर्थक्षेत्रातील चांगल्या बातम्या व २०२१-२२ वर्षातील जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीच्या अपेक्षित चांगल्या आकड्यामुळे बाजार हळूहळू उभारी धरत आहे. 

गेल्या शुक्रवारी काही शेअर्सचे भाव असे होते - बजाज फिनसर्व्ह ६५८९, लार्सन अँड टुब्रो ९४५, बजाज फायनान्स ३३२९, जिंदाल स्टील १६४, मॅक्स फिनान्शिअल सव्हिर्सेस ५७१, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक २०४१, दिलीप बिल्डकॉन २८३, एम ए एस फिनान्शिअल ६८३, एल अँड टी फायनान्स ७१, जे एस डब्ल्यू स्टील १९७. 

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांपैकी २२ कंपन्यांनी वरचे भाव दाखवले आहेत. एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स सध्याच्या भावातही घेण्यासारखे वाटतात. एसबीआय कार्डसुद्धा घेण्यासारखे आहे. गेल्या वर्षी या कंपनीने ७५५ रुपये भावाला प्रथमिक भागविक्री केली होती. आता तो भाव ६५० रुपयांवर आहे. येस बँकेची नवीन शेअर विक्री (१५ हजार कोटी रुपयांची) पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंतच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदरात ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे नवा व्याजदर ६.६५ टक्क्यांवर गेला आहे. नवीन दरांची अंमलबजावणी १० जुलैपासून सुरू झाली आहे. 

स्टेट बँकेने सतत १४ वेळा व्याजदरात कपात केली आहे. या कपातीनंतर बँकेचे व्याजदर सर्वांत कमी झाले आहे. एचडीएफसी, कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांनीही व्याजदरात कपात केली आहे. ज्या ग्राहकांची कर्जे ‘एमसीएलआर’बरोबर जोडली गेली आहेत, त्यांनाच या व्याजदर कपातीचा फायदा होणार आहे. जूनमध्येही स्टेट बँकेने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. १० जूनला एमसीएलआरचे दर ०.२५ टक्क्यांनी घसरून सात टक्क्यांवर आले होते. २२ मे रोजी रेपो रेट ०.४० टक्क्यांनी कमी करून ४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युको बँक यांनी रेपो आणि एमसीएलआरशी संबंधित व्याजदर आधीच कमी केले होते. 

एचडीएफसी बँकेनेही एमसीएलआरमध्ये २० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. बँकेने आपल्या १ वर्षाच्या कर्जदारांवरील व्याजदर ७.६५ टक्क्यांवरून कमी करून ७.४५ टक्क्यांवर आणले आहेत. नव्या कर्जदाराची अंमलबजावणी ७ जुलैपासून सुरू केली आहे. कॅनरा बँकेनेही व्याजदरात १० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. कॅनरा बँकेने १ वर्षाच्या अवधीवरील एमसीएलआर ७.६५ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रानेसुद्धा १ वर्षाच्या कर्जावरील व्याजदर ७.७० टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. ओव्हरनाइट, १ महिन्याचे आणि ३ महिन्यांच्या अवधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ७ टक्के, ७.१० टक्के आणि ७.२० टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय बँकेने ६ महिन्यांच्या अवधीच्या कर्जदरावरील व्याजदर ७.५० टक्क्यांवरून कमी करून ७.३० टक्क्यांवर आणला आहे. नव्या व्याजदराची अंमलबजावणी ७ जुलैपासून सुरू केली आहे. 

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्यांची कपात केली आहे. त्यानंतर रेपो दर ४ टक्क्यांच्या खाली आहे. 

निफ्टी गेल्या आठवड्यात १०८१३ वर बंद झाला. गेल्या वर्षातील त्याचा उच्चांक १२४३२ होता, तर नीचांक ७५११ होता. आधीच्या परिच्छेदांत काही शेअर्सचे भाव दिलेले आहेत. आणखी काही शेअर्सचे भाव पुढे दिले आहेत - एपीएल अपोलो १७२४, जे कुमार इन्फो १००, येस बँक २६, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज १३७, स्टेट बँक २०१, फेडरल बँक ५५, कॅनरा बँक १०८, बँक ऑफ बडोदा ५३, एचडीएफसी बँक १११५, मिंडा इंडस्ट्रीज ३११, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ८५, बजाज कन्झ्युमर १४४, महिंद्र सीआयई ऑटोमोटिव्ह ११६, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस ७१३, बंधन बँक ३७७, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स ५९६, डीएलएफ १४६, गुजराथ हेवी केमिकल्स १६६, पिरामल एंटरप्रायजेस १४६३, अपोलो टायर ११६, जे के टायर ६७, फिनिक्स मिल्स ५८१, इंडसइंड बँक ५४९, सिएट टायर्स ९०८. 

गुंतवणुकीसाठी सध्या लोक सोन्याकडेही वळले आहेत. सोन्याचा भाव सध्या ५१ हजारांवर गेला आहे. तो ६० हजारांपर्यंत जाऊ शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारत संचारमधील आपली काही टक्के गुंतवणूक सरकार विक्रीला काढणार आहे. अशी विक्री सध्या ३७,५०० कोटी रुपयांपर्यंत होणार आहे. 

सध्या बँकांकडील द्रवता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणून स्टेट बँक व इतर बँका ठेवींवरील व्याजदरात कपात करीत आहेत. पंजाब नॅशनल बँक दहा हजार कोटी रुपयांची विक्री शेअर्स व रोख्यांद्वारे करणार आहे. 

म्युच्युअल फंड कंपन्यांनी चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारामध्ये जवळजवळ ३९,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेअरबाजारामध्ये सतत चढउतार असल्याने व करेक्शनचे दिवस असल्याने गुंतवणूकदारांसाठी सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. जाणकारांच्या माहितीप्रमाणे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून बाजारात सध्या गुंतवणुकीचा प्रवाह येत आहे. त्यामुळे चांगल्या कंपन्यांकडे लॉकडाउनच्या काळातही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. कोरोनाच्या काळातही म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. शेअरबाजारात सध्या बॉटम फिशिंगचे दिवस आले आहेत. आपली जोखमीची ताकद ओळखून माफक प्रमाणावर बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, फिनिक्स मिल्स आणि आयसीआयसीआय बँक येथे गुंतवणूक करावी.

संबंधित बातम्या