जोखीम घेण्याची तयारी हवी 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
मंगळवार, 28 जुलै 2020

अर्थनीती-शेअरबाजार ः डॉ. वसंत पटवर्धन 

कोरोनाच्या पाठोपाठ चीनवर आणखी एक आर्थिक संकट कोसळू बघत आहे. पूर्वी तिथे ‘ॲपल’सारख्या कंपन्या कमी पगारात कामगार मिळतात म्हणून तिथून आपले उत्पादन करून घ्यायच्या. ॲपलसारखी कंपनी अमेरिकेपेक्षा फक्त १० टक्के पगार देऊन आपले उत्पादन करून घ्यायच्या. आता ती शक्यता मावळली आहे. त्यामुळे या कंपन्या भारतातच जास्त गुंतवणूक करून आपले उत्पादन वाढवणार आहेत. गूगल पुढील ५ ते ७ वर्षांत कित्येक अब्ज कोटी रुपये गुंतवून आपला डिजिटल व्यवसाय वाढवणार आहे. 

अशा अनेक बातम्यांमुळे शेअरबाजारातील रिटेल व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे ‘सेबी’ बुचकळ्यात पडली आहे. 

अमेरिकेच्या ‘कॉल कॉम व्हेंचर्स’ने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीनंतरही ‘कॉलकॉम व्हेंचर्स’च्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केवळ ०.१५ टक्के हिस्सा प्राप्त होणार आहे. `कॉलकॉम’ने ‘जिओ’मध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपनीचे समभाग मूल्य ४.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहेत. त्याशिवाय कंपनीचे व्यवसायमूल्य ५.१६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. 

आयफोनचे उत्पादन घेणाऱ्या ‘फॉक्सकॉन’तर्फे चेन्नईजवळ लवकरच एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जवळजवळ १ अब्ज डॉलरची (साडेसात हजार कोटी रुपये) गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास सहा हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 

बंदरांमधून मालवाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी उद्योगांनाच थेट बंदरांच्या जागेवर नेण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. देशातील बारा मोठ्या बंदरांची मिळून एकूण १.१० लाख हेक्टर जागा उद्योगांच्या उभारणीसाठी वापरली जाणार आहे. बंदरांच्या या मोकळ्या जागा सरकारच्याच अनेक विभागांना भाड्याने देण्यात आल्या आहेत. हे येणारे भाडे, ते वेळेवर न आल्याने त्यावर लागणारा दंड, त्यावरील व्याज, यामुळे बंदरांना उत्पन्न मिळत आहे. त्याऐवजी या जागांवर आता कारखाने उभे राहणार आहेत. 

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ४० हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय या कंपनीने अमेरिकेतही कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २ हजार जणांची भरती करण्याचे ठरवले आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या महसुलात कोरोनामुळे मोठी घट झाली आहे. तरीही कॅम्पसच्या माध्यमातून भारतात ४० हजार नोकऱ्या देण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘विप्रो’ने अजून एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलेले नाही. खर्च कमी करण्यासाठी इतर अनेक उपाय केले जातील, पण नोकरकपात केली जाणार नाही, असे कंपनीचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी सांगितले आहे. 

सध्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची वाटत असल्यामुळे लोकांचा ओढा गोल्ड ईटीएफमध्ये (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड) गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे. गोल्ड फंडाची एकूण संपत्ती जून २०२० च्या अखेरीस दुपटीने वाढून १०,८५७ कोटी रुपयांवर गेली आहे. जून २०१९ अखेरीस ही संपत्ती ४९३० कोटी रुपयांवर होती. 

जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर गेला आहे. काद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ, हे त्याचे प्रमुख कारण आहे, असे केंद्र सरकारला वाटते. ग्राहकमूल्य निर्देशांकानुसार (सीपीआय) अन्नधान्याच्या महागाईचा दर वाढून याच महिन्यात ७.८७ टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे याबाबतचे अंदाज पार कोलमडले आहेत. रिझर्व्ह बँकेने नुकतेच काही नवीन बदल केल्यामुळे सहकारी बँकांचे अस्तित्त्व धोक्यात येत चालले आहे. 

शेअरबाजाराचा निर्देशांक १६ जुलै रोजी ३६४७१ होता, तर निफ्टी फिफ्टी १०७४० होता. जूनअखेरच्या तिमाहीचे ‘इन्फोसिस’चे आकडे समाधानकारक आहेत. काही अन्य शेअर्सचे १६ जुलैला भाव असे होते - बजाज फिनसर्व्ह - ६२६५, बजाज फायनान्स - ३२०४, लार्सन अँड टुब्रो - ९२१, लार्सन टुब्रो इन्फोटेक - २२९१, दिलीप बिल्डकॉन - २८०, एपीएल अपोलो ट्युब्ज - १७०१, जे कुमार इन्फ्रा - ९१, जे एस डब्ल्यू स्टील - २०१. येस बँकेने नुकताच एक एफपीओ काढला होता. त्याला बऱ्यापैकी मागणी आली आहे. १५ जुलैला ही विक्री सुरू झाली होती. एकूण विक्री १५ हजार कोटी रुपयांची होणार आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजीज सध्या १५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया १८५ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. रोजचा व्यवहार सुमारे साडेचार कोटी शेअर्सचा होतो. सध्याच्या भावाला किं-उ गुणोत्तर ६.५ पट दिसते. बंधन बँकेचा सध्या भाव ३४२ रुपये आहे. आरबीएल बँक १६६ रुपयांना मिळत आहे. पिरामल एंटरप्रायझेस सध्या १३५० रुपयांच्या आसपास फिरत आहे. अपोलो टायर्स ११० रुपयांना उपलब्ध आहे. 

सध्याची परिस्थिती बघता पूर्ण अभ्यास केल्याखेरीज आणि जोखीम घेण्याची तयारी असेल, तरच बाजारात खरेदीसाठी उतरावे.

संबंधित बातम्या