फारशी तेजी नाही 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अर्थनीती : शेअर बाजार

जानेवारी ते मार्च २०२० च्या जूनअखेरच्या तिमाहीचे कंपन्यांचे विक्रीचे व नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मात्र अपेक्षेपेक्षा ते कमी असतील. त्यामुळे बाजारात फारशी तेजी दिसणार नाही. २३ जुलै २०२० अखेर पुढील काही शेअर्सचे भाव असे होते.. 

बजाज फिनसर्व्ह ६३८१, लार्सन अँड टुब्रो ९१६, जिंदाल स्टील अँड पॉवर १७२, बजाज फायनान्स ३२९०, मॅक्स फिनान्शियल ५७१, लार्सन टुब्रो इन्फोटेक २२६१ (गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा नीचांक १२१० रुपये होता), उगार शुगर १४, दिलीप बिल्डकॉन ३७६ (या शेअरचा व्यवहार सध्या रोज ३४ लाख शेअर्सचा आहे, किं-उ गुणोत्तर १०.४७ पट आहे), एल अँड टी फायनान्स होल्डिंग ६२ (या शेअरचा सध्या व्यवहार ६४ लाख शेअर्सचा होत आहे). ही कंपनी दुबई वेल्थ मॅनेजमेंटमधील आपले व्यवस्थापन कमी करणार आहे. कंपनीचा जूनअखेरच्या तिमाहीचा नफा २३ जुलैअखेर निर्देशांक ३८१४० होता. निफ्टी ११२४५ होता. 

हेगचा (हिंदुस्थान इलेक्ट्रो ग्राफाइट्स) शेअर सध्या ८१४ रुपयाला आहे. मार्च २०२० ला संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीला ३६५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचा भाव गेल्या आठवड्यात १३७ रुपये होता. दूरसोवा क्षेत्रातील ५ जी ही सेवा ती लवकरच देणार आहे. त्यामुळे तिची विक्री पुढील तीन वर्षांत दुप्पट होईल. सध्याच्या भावाला या शेअरमध्ये थोडी जोखीम घेणे इष्ट ठरेल. ऑईल अँड नॅचरल गॅस (ओएनजीसी) सध्या ८३ रुपयाला उपलब्ध आहे. बजाज फायनान्स रोज थोडा थोडा वाढत असून २३ जुलैला तो ३२१६ ते ३३१६ पर्यंत उपलब्ध आहे. एपीएल अपोलो १८५३ रुपये आहे. गेल्या ५२ आठवड्यातील त्याचा नीचांकी भाव १०३० रुपये होता. सध्याच्या भावाला किं-उ गुणोत्तर फक्त ३.७४ पट दिसते. रोज सुमारे ६० हजार ते दीड लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

स्टेट बँक ऑफ इंडिया १९२ रुपयांपर्यंत उतरला आहे. रोज सुमारे ७ कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं-उ गुणोत्तर ९ पट दिसते. एसबीआय कार्डाला या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ३९३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या तीन तिमाहींपासून तो सतत वाढत आहे. शेअरबाजारावर लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला नाही. कर्जदारांना मोठ्या प्रमाणात बँकांकडून कर्जपुरवठा व्हायला हवा आहे. त्यांच्याकडे सध्या भरपूर द्रवता आहे. येत्या काही महिन्यांत बँकांची अनार्जित कर्जेही बरीच वाढतील. त्यामुळे या क्षेत्रात सध्या तरी गुंतवणूक टाळावी. 

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना, पुढील दोन तिमाहीत हप्ते भरण्याची सवलत दिली आहे. पण हप्ते कधीतरी भरायलाच लागतील, हे लक्षात घेऊन कर्जदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बँकांना त्यांच्या व्यवहारात फार कळ सोसावी लागली नाही. 

गुंतवणूकदारांनी पुढील काही महिन्यांत पायाभूत संरचनेतील कंपन्या, सिमेंट, पोलाद इथे गुंतवणुकीचा विचार करावा. पोलाद क्षेत्रातील व्यवहार जर जास्त वाढले, तर त्याचा फायदा एचईजी व ग्राफाईट इंडिया या कंपन्यांना होईल. विशेषतः चीनमधून या कंपन्यांना काहीही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे माफक प्रमाणात इथे गुंतवणूक करण्याचा विचार करता येईल. 

निर्देशांकात ज्यांचा समावेश होतो, त्या ३० कंपन्यांपैकी बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टेक महिंद्र, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या समभागात सुधारणा झाली आहे. पुढील काळातही त्यात थोडीफार वाढ होत असलेलीच दिसेल. त्यामानाने सन फार्मा, एनटीपीसी, मारुती सुझुकी, कोटक महिंद्र बँक व लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या भावात तशी सुधारणा झालेली नाही. 

शेअरबाजारावर लॉकडाउनचा चांगला किंवा विपरित परिणाम झालेला नाही. वर्षभरातील शेअर्सच्या गुंतवणुकीत अगदी किमान १० टक्के जरी फायदा झाला तरी बँकेतील मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा तो परतावा नक्कीच चांगला ठरतो. औद्योगिक क्षेत्रे मंदीत जाणे ही गोष्ट कुठल्याही देशाला परवडणारी नाही. 

सध्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, फार्मास्युटिकल्स या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर व्यवहार असलेल्या अरबिंदो फार्मा व डॉ. रेड्डीज या कंपन्या गुंतवणुकीस चांगल्या आहेत. औषधी कंपन्या पुढील वर्षात सतत तेजीतच राहतील. त्यातल्या त्यात अरबिंदो फार्मा सध्या ८२० रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव ८४५ होता. तर नीचांकी भाव २९० रुपये होता. सध्याच्या भावाला किं-उ गुणोत्तर १७ पट दिसते. रोजचा व्यवहार सुमारे २२ लाखांपेक्षा कितीतरी जास्त होतो. 

सध्या सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली आहे. १० ग्रॅमला ५१,५०० रुपये आहेत. अमेरिकेतील सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्यामुळे भारतातही ही वाढ झाली आहे. २००८ च्या आर्थिक मंदीत सोन्याने अमेरिकेत १९३० डॉलर प्रति औंस इतका भाव दाखवला होता. 

चांदीनेही प्रति किलोला ६० हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्यातील गुंतवणूक लॉकरमध्ये दडवून ठेवता येते. शिवाय त्यात भाव कमी होण्याची शक्यता बहुधा नसते. म्हणूनच बरेच लोक इथे गुंतवणुकीसाठी आकर्षित होतात. 

पिरामल एंटरप्राइजेस सध्या १५०० रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या ५२ आठवड्यांतील त्याचा नीचांकी भाव फक्त ६०७ रुपये होता, तर उच्चांकी भाव २००० रुपये होता. रोज सुमारे १२ ते १५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. ठाण्यामधील रेमंड कंपनीचा भाव सध्या २५० रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरातील उच्चांकी भाव ८३८ रुपये होता, तर नीचांकी भाव २१० रुपये होता. सध्याच्या भावाला किं-उ गुणोत्तर ८.१२ पट दिसते. कंपनीजवळ ठाण्याच्या परिसरात अनेक एकरांची जागा आहे. पण ती कंपनी गेली कित्येक वर्षे विकासासाठीही घेत नसल्याचे दृश्‍य आहे. 

लॉकडाउनच्या काळात शेअरबाबतचे व्यवहार काळजीपूर्वक व स्वतःच्या जोखमीवर करावेत.

संबंधित बातम्या