सुस्तावलेले अर्थव्यवहार 

डॉ. वसंत पटवर्धन 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

अर्थनीती : शेअर बाजार

सध्या कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवहारही सुस्तावले आहेत. बँकांमध्ये आमूलाग्र सुधारणा आवश्‍यक आहेत. अनेक बँकांना २०१९ अखेर ‘बेसिल-३’ नियमाप्रमाणे २ लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारणे आवश्‍यक होते. पण तसे काहीच झालेले नाही. नाही म्हणायला नुकतेच इंडसइंड बँकेने ३२८५ कोटी रुपयांचे भांडवल उभारायचे ठरवले आहे. शेअरच्या विक्रीची निर्धारित किंमत ३२४ रुपये दर शेअरमागे असेल. त्यासाठी आवश्‍यक असलेली रिझर्व्ह बँकेची संमती मिळवली जाईल. त्यानंतर ८५० कोटी रुपयांचे भांडवल आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफद्वारे उभारले जाईल. 

आरबीएल बँकेने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. बचत खात्यात १ लाख रुपये किंवा जास्त रक्कम असल्यास त्यावर ४.७५ टक्के व्याज मिळणार आहे. एक ते दहा लाख रुपयांच्या जमा रकमेवर सहा टक्के आणि १० लाख रुपये ते पाच कोटी रुपयांच्या जमा रकमेवर ६.७५ टक्के व्याज मिळणार आहे. याशिवाय ग्राहक आता एटीएममधून महिन्यात ५ वेळाच विनामूल्य रक्कम काढू शकणार आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे. 

बऱ्याच बँकांनी १ ऑगस्टपासून खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्यास शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय तीन विनामूल्य व्यवहारांनंतर पुढील व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि आरबीएल या बँकांकडून शुल्क आकारणी होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहरी आणि महानगरातील बचत खातेधारकांना आपल्या खात्यात किमान २ हजारांची रक्कम ठेवावी लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम दीड हजार रुपये होती. 

येत्या १ ऑगस्टपासून ई-कॉमर्स कंपन्यांना विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनांची निर्मिती कुठे झाली आहे, हे ग्राहकांना सांगावे लागणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने २०१९-२०२० या वर्षात गहू व तांदूळ यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. ३.८९७ कोटी टन गहू आणि ५.०५ कोटी टन तांदूळ इतकी खरेदी केली आहे. गोदामात ९ कोटी टन धान्य ठेवण्याची सुविधा सरकारकडे आहे. वेळ पडल्यास हे धान्य बाजारात येऊ शकत असल्यामुळे गहू - तांदुळाचे भाव आटोक्यात राहतील. पंजाब, मध्यप्रदेश, हरियाना आणि उत्तरप्रदेश इथून हे धान्य जरूर वाटल्यास खरेदी केले जाईल. 

सोन्याचे दागिने हॉलमार्क पद्धतीने विकले जावेत. दागिने असे विकल्यास ग्राहकांचे त्यात नुकसान होणार नाही. मात्र सराफांनी ही अट २०२२ पर्यंत शिथिल करावी, अशी विनंती केली आहे. कारण सरकारने १ जून २०२१ पर्यंतच मुदतवाढ दिली आहे. सराफांकडे हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांचा मोठा साठा असून त्यांना तो काढून टाकण्यासाठी ही मुदत हवी आहे. 

कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी वस्त्रोद्योगाला मात्र मास्कच्या विक्रीमुळे ही संधीच वाटत आहे. मास्क लावल्याखेरीज बाहेर फिरता येणार नाही, अशी आता सक्ती आहे. मास्कची बाजारपेठ १० हजार ते १५ हजार कोटी रुपयांची आहे. वस्त्रोद्योगातील ७५ मोठ्या कंपन्या मास्कचे उत्पादन करीत आहेत. मास्कची विक्री दुकानांतून व ऑनलाइनही होत आहे. मास्कमुळे सर्व वस्त्रोद्योग व्यवसाय तरून जाईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. 

पुनर्वापर करता येईल असे मास्क व पीपीई किट सध्या रेमंड तयार करत आहे. मास्कमध्येही अनेक फॅशन्स येत आहेत. त्यामुळे फॅशन व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत. 

३० जुलै रोजी काही शेअर्सचे भाव असे होते - 

बजाज फिनसर्व्ह ६१७८ रुपये, लार्सन अँड टुब्रो ९०८ रुपये. सध्या हा शेअर विकत घेतल्यास सहा महिन्यांत तो ११२५ पर्यंत जाईल, असे वाटते. त्यामुळे जोखीम पत्करणाऱ्यांनी हा शेअर विकत घ्यायला हरकत नाही. १९४६ मध्ये ही कंपनी सुरू झाली आहे. तिचे बाजारमूल्य सध्या १ लाख २६ हजार कोटी रुपये आहे. बजाज फायनान्सचा भाव ३२०० रुपयांच्या आसपास आहे. सध्याच्या भावाला किं।उ गुणोत्तर ३८ पट इतके महाग आहे. गेल्या बारा महिन्यांतील उच्चांकी भाव ४९२३ रुपये होता, तर नीचांकी भाव १७८३ रुपये होता. रोज अडीच लाख ते साडे पाच लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

लार्सन टुब्रो इन्फोटेकचा भाव २३५० ते २४५० रुपयांच्या पातळीत फिरत आहे. सध्याच्या भावाला किं।उ गुणोत्तर २७ पट दिसते. रोज दीड लाख शेअर्सचा व्यवहार होतो. गेल्या ५२ आठवड्यांत या शेअरचा उच्चांकी भाव २४९० रुपये होता, तर किमान भाव १२१० रुपये होता. किमान भावाच्या जवळपास ज्यांनी खरेदी केली असेल, त्यांना  
प्रचंड नफा झालेला आहे. 

दिलीप बिल्डकॉनचा भाव सध्या २९० रुपये आहे. गेल्या वर्षातील किमान व कमाल भाव अनुक्रमे १९० रुपये व ४७७ रुपये होते. इंटरग्लोब एव्हिएशन सध्या ९५० रुपयांपर्यंत घ्यावा. वर्षभरात तो १५०० रुपयांपर्यंत जाईल व ६५ टक्के नफा मिळेल.

संबंधित बातम्या