आर्थिक आघाडी थंडच 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

अर्थनीती : शेअर बाजार
 

सध्या आर्थिक आघाडीवर थंडच वातावरण आहे. कोरोनामुळे हे आर्थिक संकट आले आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी एप्रिल ते जुलै या कालावधीत ८० लाख ग्राहकांनी ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’मधून (ईपीएफओ) रक्कम काढली आहे. ही रक्कम ३० हजार कोटी रुपये होती. ३० लाख सभासदांनी कोविड विंडो अंतर्गत आठ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. ५० लाख सभासदांनी वैयक्तिक कारणांसाठी २२ हजार कोटी रुपये काढले आहेत. १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत आर्थिक द्रवता आटल्याचेच चित्र दिसले. 

भारतातील शेअर बाजाराकडे जगातील मोठ्या गुंतवणूक संस्थांचे लक्ष लागले आहे. गुगल, ॲमेझॉन, फेसबुक या कंपन्यांनाही आता रिलायन्सचे आकर्षण वाटू लागले आहे. ॲपलसारख्या कंपन्याही भारताकडे जास्त आकर्षित होऊ लागल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजला फ्यूचर ब्रँड इंडेक्स २०२० च्या यादीत दुसऱ्या मोठ्या ब्रँडचे स्थान मिळाले आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेची मोठी कंपनी ॲपल आहे. सध्या रिलायन्स ऊर्जा, पेट्रोकेमिकल, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशनसह अन्य क्षेत्रांत कार्यरत आहे. यंदाच्या यादीत रिलायन्सनंतर सॅमसंगने तिसरे स्थान मिळवले आहे. रिझर्व्ह बँकेने ३ ऑगस्ट २०२० पासून सार्वभौम सुवर्णरोखे विक्रीला काढले आहेत. ही पाचवी मालिका आहे. 

ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँक रेपो दर पुन्हा ठरवणार होती. ६ ऑगस्टला रिझर्व्ह बँकेकडून ऑगस्ट, सप्टेंबरसाठीचे पतधोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार रेपो दर आहे तसाच ठेवण्यात आला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याने निर्देशांक व निफ्टी वाढले. शुक्रवारी निर्देशांक ३८ हजारांच्या आसपास होता. तसेच निफ्टीही ११,२०० वर स्थिरावला. नवीन खरेदीसाठी सध्या थोडे थांबावे.

आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी नीती आयोगाने देशभरातील टपाल कार्यालयांचे रूपांतर टपाल बँक शाखांत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. याशिवाय आयोगाने ग्रामीण बँकांचेही अन्य बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची शिफारस केली. ग्रामीण भागात बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ग्रामीण बँकांना काहीही महत्त्व राहिलेले नाही. टपाल खात्याचे रूपांतर बँकेत झाले तर बँक शाखांत १ लाखांची भर पडले. 

बँक ऑफ महाराष्ट्रचे खासगीकरण झाल्यास तिचे कार्यक्षेत्र आणखी व्यापक होऊ शकेल. बँक ऑफ महाराष्ट्रला सध्या नफा होत आहे. या शेअरचा सध्या भाव साडेअकरा ते साडेबारा रुपयांच्या दरम्यान आहे. रोज सुमारे १५ लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होत आहे. जून २०२० च्या तिमाहीमध्ये बँकेला १०१ संचालकांनी तीन हजार कोटी रुपये बाजारातून उभे करण्याचा प्रस्ताव डोळ्यासमोर ठेवला आहे. इंटरग्लोब एव्हिएशन हा शेअर सध्या घेण्यासारखा वाटतो. सध्या हा शेअर ९५० रुपयांच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव १८९८ रुपये होता. तर नीचांकी भाव ७७२ रुपये होता. रोज सुमारे १२ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. बजाज फायनान्स सध्या ३२५० ते ३३५० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. रोज ८० लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो.

गुजराथ अंबुजा एक्सपोर्टस्‌चे जून २०२० तिमाहीचे आकडे उत्तम आहेत. करपूर्व नफा ७१ टक्के वाढला आहे. करोत्तर नफाही ६५ टक्के वाढला आहे. शेअरगणिक उपार्जन त्याच प्रमाणात वाढले आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचा या तिमाहीचा नफा वाढलेला आहे.

इंडसइंड बँक नव्याने समभागात विक्री करून ३,२८८ कोटी रुपये उभे करणार आहे. ही बँक हिंदुजा समूहाची असल्यामुळे हा समूह, हे शेअर्स घेईल. आपली १५ टक्क्यांची पातळी राखण्यासाठी हा समूह इंडसइंड इंटरनॅशनल समूहाबरोबर युती करून आपली जबाबदारी पुरी करेल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रिझर्व्ह बँकेने सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांना मोठा  दिलासा दिला आहे. सोन्याच्या दागिन्यांवर ७५ टक्क्यांऐवजी ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल असे नवे धोरण सांगते. सोन्यावर कर्ज देणाऱ्या नॉनबँकिंग फिनान्शिअल कंपन्यांचे व्यवहारही (एनबीएफसी) जास्त प्रमाणावर होतील. सध्या बाजारात द्रवता खूप आहे. 

ही सवलत ३१ मार्च २०२१ पर्यंत राहील. त्यानंतर १ एप्रिल २०२१ पासून दागिन्यांच्या तारणावर देण्यात येणारे कर्ज एकूण किमतीच्या ७५ टक्क्यापर्यंत असणार आहे. सोन्याचे दर यापुढेही वाढले तर मार्जिनही वाढवले जाईल. चांदीचा भावही सध्या १ किलोसाठी ७३ हजार रुपये झाला आहे. कोरोना संकटामुळे जेरीस आलेल्या सूक्ष्म, लघु व मध्य उद्योगांना (एमएसएमई) संजीवनी देण्यासाठी पतपुरवठ्याचे मोठे पॅकेज केंद्र सरकारने देऊ केले होते. त्यानंतर ६ ऑगस्टला जाहीर केलेल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात सूक्ष्म, लघु व मध्य उद्योगांनी घेतलेल्या कर्जांची पुनर्रचना करण्याच्या सुविधेला मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ २५ कोटी रुपयांपर्यंत कर्जे घेतलेल्या उद्योगांसाठी असेल. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन खरेदीसाठी बजाज फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि CCP (कन्सॉलिडेटेड कॉफी प्रॉडक्ट्स) व फिलीप्स हे शेअर्स सध्याच्या भावात घेतल्यास वर्षभरात २५ टक्के किमान नफा मिळू शकेल. 

शेअर खरेदी करताना प्रत्येकाने आपली जोखीम घेण्याची क्षमता बघूनच व्यवहार करावेत. तरीही बँकांच्या मुदठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा शेअर्समधील परतावा जास्त असतो. गुंतवणुकीतील नफ्यासाठी किमान ३ वर्षे तरी थांबायची तयारी हवी. मात्र आपण मनात योजलेला भाव जर आधीच आला तर विक्रीसाठी थांबू नये. 

संबंधित बातम्या