प्रधानमंत्री वय वंदना योजना

सुधाकर कुलकर्णी
गुरुवार, 7 जून 2018

अर्थविशेष
 

सततच्या कमी होणाऱ्या व्याज दरामुळे ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येते. असे असले तरी ज्येष्ठांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुंतवणुकीसाठी दोन पर्याय ज्येष्ठांना देऊ केले आहेत यातील एक पर्याय म्हणजे ‘ज्येष्ठ नागरिक ठेव योजना’ व दुसरा पर्याय म्हणजे ‘प्रधानमंत्री वय वंदना योजना’. यातील पहिला पर्याय निवडल्यास आपल्याला पोस्ट अथवा राष्ट्रीयकृत बॅंकेत गुंतवणूक करावी लागते व प्रधानमंत्री वय वंदना योजनेत मात्र केवळ एलआयसी मार्फतच करावी लागते. असे असले तरी ज्यांना गुंतवणुकीची जोखीम नको आहे व एक निश्‍चित उत्पन्न दरमहा/तिमाही/सहामाही किंवा वार्षिक हवे आहे. अशांसाठी पर्याय निश्‍चितच योग्य आहे. आज आपण प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे तपशिलात माहिती घेऊ.

ही योजना १७ मे २०१७ पासून कार्यान्वित केली असून दि. ३१/०३/२०१८ पर्यंत गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येणार होता. मात्र १ फेब्रुवारी २०१८ ला सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही मुदत आणखी एक वर्षे वाढवली आहे. आता ३१/०३/२०१९ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय याचबरोबर आधीची कमाल गुंतवणुकीची मर्यादा रु. ७.५ लाखांवरून आता रु. १५ लाख एवढी केली आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
१)    किमान वय ६० पूर्ण
२)    कमाल वय - अट नाही
३)    योजनेचा कालावधी - १० वर्षे
४)    किमान पेन्शन - रुपये १००० मासिक, रुपये ३००० तिमाही,  रुपये ६००० सहामाही व रुपये १२००० वार्षिक
५)    कमाल पेन्शन - रुपये १०००० मासिक, रुपये ३०००० तिमाही, रुपये ६०००० सहामाही व रुपये १२०००० वार्षिक
पेन्शनची कमाल मर्यादा कुटुंबासाठी असून, आपल्याकडे असणाऱ्या सर्व पॉलिसी मिळून होणारे पेन्शन कमाल मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये. कुटुंबामध्ये पती/पत्नी व अवलंबून असल्यास पालक किंवा मुले यांचा समावेश होतो. आपणास हवी असणारी पेन्शन व त्यासाठी एकरकमी भरावी लागणारी रक्कम खालील चौकटी प्रमाणे असेल. मिळणारे पेन्शन आपण निवडलेल्या पर्यायानुसार एनईएफटी किंवा आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीमद्वारे आपल्या बॅंक खात्यात जमा होते.

सरेंडर व्हॅल्यू
अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे पेन्शनर किंवा त्याची पती/पत्नी यांच्या गंभीर आजारासाठी ही पॉलिसी सरेंडर करता येते व आपण गुंतविलेल्या रकमेच्या ९८ टक्के इतकी रक्कम मिळू शकते.

कर्ज सुविधा
पॉलिसी घेतल्यापासून ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर गरज पडल्यास कर्ज मिळू शकते व असे कर्ज जास्तीत जास्त आपण एकरकमी भरलेल्या रकमेच्या ७५ टक्के इतके मिळू शकते. यावर सहामाही पद्धतीने व्याज आकारणी होते. हे व्याज मिळणाऱ्या पेन्शनमधून वसूल केले जाते. कर्ज रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम किंवा त्याआधी (सरेंडर केल्यास/ पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास) मिळणाऱ्या रकमेतून वसूल केली जाते.( पेन्शन पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम वारसास दिली जाते)

ही पेन्शन पॉलिसी एलआयसी एजंटामार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी http://www.licindia.in/ या साईटवर लॉग इन होऊन घेता येते.

आपण घेतलेल्या पेन्शन पॉलीसीबाबत आपण जर साशंक अथवा असमाधानी असाल तर आपण ही पॉलिसी फ्री लुक पिरीयडमध्ये रद्द करू शकतो. आपण पॉलिसी एजंटामार्फत घेतली असेल, तर फ्री लुक पिरीयड पॉलिसी घेतल्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत असतो. जर आपण ऑन लाईन घेतली असेल तर हा फ्री लुक पिरीयड ३० दिवसांपर्यंत असतो. अशा

पद्धतीने पॉलिसी रद्द केल्यास आपण भरलेली रकमेतून स्टॅंप ड्यूटी व तत्सम खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते. वरील सर्व बाबींचा विचार करता सद्द्य परिस्थितीत प्रधानमंत्री वय वंदना योजना ज्येष्ठांसाठी निश्‍चितच उपयुक्त आहे.

              किमान एकमुठी रक्कम रु.                कमाल एकमुठी रक्कम रु.
मासिक    १,५०,००० पेन्शन रु.१००० दम           १५००००० पेन्शन रु. १००००दम
तिमाही    १४९०६८ पेन्शन रु. ३००० तिमाही       १४९०६८० पेन्शन रु. ३०००० तिमाही
सहामाही  १४७६०१ पेन्शन रु. ६००० सहामाही     १४७६०१० पेन्शन रु.६००००सहामाही
वार्षिक    १४४५७८ पेन्शन रु. १२००० वार्षिक       १४४५७८० पेन्शन रु. १२०००० वार्षिक
 

संबंधित बातम्या