क्रिटिकल केअर इन्शुरन्स

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर,पुणे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अर्थविशेष    
 

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हृदयविकार, कर्करोग,किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन हॅमरेज, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट यासारख्या गंभीर आजाराला लोक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामतः सुशिक्षित लोकांमध्ये आजकाल मेडिक्‍लेमपॉलीसीबाबत बऱ्यापैकी जागरूकता दिसून येते. लोक आजकाल मोठ्या प्रमाणावर मेडिक्‍लेम पॉलिसी घेत असल्याचे दिसून येते. असे असले तरी अजूनही क्रिटिकल केअर इन्शुरन्सबद्दल फारशी माहिती नसल्याने ही पॉलिसी अगदी कमी प्रमाणात घेतली जाते. मात्र मेडिक्‍लेम पॉलीसीने वरील प्रकारच्या गंभीर आजारामुळे केवळ प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाची काही भरपाई होत असते व त्यासाठी रुग्णास हॉस्पिटलमध्ये राहणे आवश्‍यक असते. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चाची भरपाई होत नसल्याने प्रसंगी असलेल्या चीजवस्तू विकून उपचारावर होणाऱ्या खर्चाची तजवीज करावी लागते किंवा कर्ज घ्यावे लागते. हे टाळण्याच्या दृष्टीने क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा एक योग्य पर्याय आहे. 

क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी ही पेमेंट स्वरूपाची असून या पॉलिसीत समाविष्ट असलेल्या एखाद्या आजाराचे निदान झाल्यावर पॉलिसी कव्हरची रक्कम एकमूठी रुग्णास दिली जाते व ही पॉलिसी संपुष्टात येते. याउलट मेडिक्‍लेम पॉलिसी रीएम्बर्समेंट स्वरूपाची असल्याने हॉस्पीटलायझेशनचा व आनुषंगिक होणारा खर्च किंवा पॉलिसी कव्हर यातील कमी असणारी रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. थोडक्‍यात असे म्हणता येईल, की जर मेडिक्‍लेम पॉलीसीसोबत क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्चाची भरपाई तर होईलच, शिवाय अशा गंभीर आजाराच्या काळात होणारे अन्य आर्थिक नुकसान पॉलिसी कव्हरनुसार कमी होईल. क्रिटिकल केअर पॉलीसीमधील आजारांचा समावेश विविध इन्शुरन्स कंपन्यानुसार कमी अधिक असू शकतो.(सुमारे ८ ते ३६ आजारांचा समावेश असू शकतो.) मात्र यात कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन हेमरेज, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट, पॅरालेसीस, हार्ट व्हाल्व्ह रिप्लेसमेंट, हार्ट ॲटॅक, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा निश्‍चित समावेश असतो. यासाठी देण्यात येणारे कव्हर २ लाख ते ५० लाखापर्यंत असू शकते. मिळणारे कव्हर व समाविष्ट आजार विमा कंपनीनुसार बदलत असतात. तसेच सर्वसाधारणपणे १८ ते ६५ वयाच्या दरम्यान ही पॉलिसी घेता येते. खालील टेबलावरून याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांचे क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स प्लॅन (यातील प्रीमियम पॉलिसी घेते वेळी वर्ष ३० वयाच्या निरोगी असणाऱ्या व्यक्तीसाठी १० लाखाच्या कव्हरसाठी आहेत)

क्रिटिकल केअर इन्शुरन्स प्लॅन हा आपल्याला जनरल इन्शुरन्स कंपनी, लाइफ इन्शुरन्स कंपनी, हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून घेता येतो. लाइफ इन्शुरन्स कंपनी क्रिटिकल केअर इन्शुरन्स रायडर पद्धतीने देऊ करतात व रायडर हा बेस पॉलीसीशी जोडलेला असतो ( बेस पॉलिसी एन्डोमेंट, मनी बॅक, किंवा टर्म प्लॅन प्रकारची असू शकते) यामुळे रायडर प्रीमियम पॉलिसी कालावधी इतकाच असतो व तो फिक्‍स्ड असतो आणि जर पॉलीसीधारकाचे समाविष्ट आजारासाठी निदान झाले, तर क्रिटिकल इलनेस पॉलिसीच्या कव्हरची रक्कम एकरकमी पॉलीसीधारकास दिली जाते व क्रिटिकल केअर रायडरचे कव्हर संपुष्टात येते. मात्र बेस पॉलिसी पुढे चालू राहते व या रायडर प्रीमियम द्यावा लागत नाही. रायडर पद्धतीने दिल्या जाणाऱ्या प्लॅनमध्ये मिळणारे क्रिटिकल इन्शुरन्स कव्हर मूळ पॉलिसीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिळू शकत नाही व त्यासाठी मूळ पॉलिसीच्या प्रिमिअमच्या ३० टक्के इतका रायडर प्रीमियम द्यावा लागतो. लाइफ इन्शुरन्स कंपनीचे स्वतंत्र क्रिटिकल केअर प्लॅन काहीसे गुंतागुंतीचे असून त्यांच्या अटी किचकट असल्याने तितकेसे लोकप्रिय नाहीत.

उलटपक्षी जनरल इन्शुरन्स कंपन्या देऊ करत असलेले क्रिटिकल केअर प्लॅन तुलनेने सुलभ असून आपल्याला हवे तेवढे कव्हर घेता येते हे आपल्याला वरील टेबलावरून दिसून येते. मात्र क्रिटिकल केअर इन्शुरन्स घेताना पुढील बाबी लक्षात घेणे आवश्‍यक आहे

  • क्रिटिकल केअर इन्शुरन्स घेतल्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत समाविष्ट आजाराचे निदान झाल्यास क्‍लेम मिळत नाही.
  • समाविष्ट आजाराच्या निदानापासून ३० दिवसाच्या आत (सर्व्हायव्हल पिरीयड) पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास क्‍लेम मिळत नाही.
  • धूम्रपान,मद्यपान व ड्रग सेवनामुळे आजारपण आल्यास क्‍लेम मिळत नाही.
  • प्रेग्नन्सी, प्रसूती अथवा सिझेरियन यांच्या परिणामातून उद्भवणाऱ्या आजारांसाठी क्‍लेम मिळत नाही.
  • एड्‌स -एचआयव्ही याचा समावेश क्रिटिकल केअरमध्ये होत नाही.

 युद्ध, आतंकवाद यासारख्या कारणानी होणाऱ्या गंभीर आजारांचा समावेश होत नाही. क्रिटिकल केअर पॉलिसी घेण्याचा नेमका फायदा काय हे आता पाहू.

समजा एखाद्याने रु. ५ लाखाची फ्लोटर मेडिक्‍लेम पॉलिसी घेतली आहे. अशा व्यक्तीस कर्करोगाचे निदान झाले आहे. तर त्यास केवळ हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्चासाठी रु. ५ लाखा पर्यंतच्या खर्चाची भरपाई मिळू शकेल. या कालावधीत अशा व्यक्तीचा व्यवसाय बंद राहिला किंवा नोकरी करत असल्यास बिनपगारी रजा झाल्यास होणारी नुकसान भरपाई होऊ शकत नाही. मात्र जर त्याने १० लाख कव्हरची क्रिटिकल केअर पॉलिसी घेतली असेल व समाविष्ट आजारांपैकी कोणत्याही आजाराचे निदान झाले असेल, तर त्वरित पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम रुपये १० लाख क्‍लेम म्हणून दिली जाते यामुळे रुग्णाचे आजारपणामुळे झालेले व्यावसायिक नुकसान किंवा पगार न मिळाल्याने होणारे नुकसान किंवा हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्च मेडिक्‍लेम पॉलिसी कव्हरपेक्षा जास्त झाल्याने होणारे नुकसान यांची कव्हर नुसार भरपाई होते. थोडक्‍यात असे म्हणता येईल, की आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून मेडिक्‍लेम पॉलिसीबरोबरच क्रिटिकल केअर पॉलिसी घेणे निश्‍चितच हितावह आहे या पॉलीसीचा प्रीमियम प्राप्तिकर धारा ८० डी. अंतर्गत करसवलतीत पात्र आहे मात्र असी पॉलिसी घेताना संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीत समाविष्ट असणारे आजार तसेच क्‍लेम मिळणार नाही अशा बाबी यांचा अभ्यास करून तसेच आनुवंशिक आजारांची शक्‍यता व असे आजार पॉलिसीत समाविष्ट आहेत की नाहीत हे पाहून मगच घ्यावी.

संबंधित बातम्या