ईएमआयचे मायाजाल

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

अर्थविशेष
 

महिना लाख ते दीडलाख पगार असणाऱ्या बऱ्याच तरुणांच्या दरमहा खर्चासाठी हातात शिल्लक उरणारी रक्कम केवळ २५ ते ३० हजार इतकीच असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे पगार जमा झाल्यावर खात्यात नावे (डेबिट) पडणारे विविध ईएमआय. यातील काही ईएमआय आवश्‍यक असतीलही पण ते सोडल्यास अन्य ईएमआय मात्र केवळ मायाजालात अडकल्याचा परिणाम होय.

या मायाजालात अडकण्याची सुरवात प्रामुख्याने गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी व नाताळ यासारख्या सणातून होते. कारण या सुमारास विविध वस्तूंचे उत्पादक व वितरक टीव्ही, पेपर, होर्डिंग्ज व सोशल मिडिया यांच्या मार्फत आकर्षक  जाहिराती देऊन ग्राहकांना अशा वस्तू घेण्यास उद्युक्त करीत असतात. उदाहरणार्थ महागडे मोबाईल, मोठे स्क्रीन असणारे स्मार्ट टीव्ही, मोठे फ्रिज, महागड्या मोटारसायकल्स. आणि अशा वस्तू घेता याव्यात म्हणून ईएमआयची सुविधा देऊ करतात. यात झीरो व्याजदराने मिळणारे कर्ज तर ग्राहकाला सहज भुरळ पाडते. आता तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासारख्या ई.-कॉमर्स कंपन्यासुद्धा ग्राहकाला झीरो व्याजदराने कर्ज देऊ करत आहेत. परिणामी तरुण मंडळी या मोहजालात अडकली जातात व सणासुदीला मोठ्या प्रमाणावर वरील प्रकारच्या वस्तूंची गरज नसताना खरेदी करतात. कित्येक वेळा एखादा महागडा मोबाईल फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर रात्री बारा वाजता विक्रीसाठी उपलब्ध होणार असतो. त्यासाठी रात्री जागून तरुण मंडळी बुकिंग करतात.

अशा वस्तूंचा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर उपलब्ध असणारा साठा सुरवातीच्या काही मिनिटातच संपून जातो. कारण झीरो इंटरेस्ट लोनची उपलब्धता. पण मुळात हे आपल्या लक्षात येत नाही, की झीरो इंटरेस्ट लोन हीच मुळी एक फसवी योजना आहे. 

समजा सोनीचा ४० इंचाचा स्मार्ट टीव्ही बाजारात ४८ हजारांना उपलब्ध आहे आणि दुकानदार आपल्याला झीरो इंटरेस्टने सहा महिने मुदतीचे कर्ज  देऊ करत आहे. साहजिकच यासाठी ८००० रुपये इतका दरमहा हप्ता(ईएमआय) दिला जातो. याशिवाय प्रोसेसिंग चाजेर्स म्हणून रुपये ८०० ते १००० इतके घेतले जातात. मात्र आपण वाटाघाटी करून हाच टीव्ही ४६ हजार रुपयांत घेऊ शकतो असे केल्याने आपले हजार रुपयांचे प्रोसेसिंग चार्जेस वाचतात. तसेच ४८ हजाराच्या टीव्हीसाठी ४६ हजार दिल्याने ४८ हजारावर लागणारे १४.७५ टक्के व्याज वाचते. हे नुकसान टाळायचे असल्यास तर टीव्ही गुढीपाडव्यास न घेता सहा महिन्यांनी गणपतीत घेण्याचे ठरवावे.  पुढील सहा महिने आपण जो ८ हजार रुपये हप्ता भरणार होतो तो बॅंकेत नियमित जमा केल्यास मिळणारी रक्कम ४८,६०० इतकी असू शकेल. 

(सहा टक्के व्याज गृहीत धरून). विशेष म्हणजे इलेक्‍ट्रिॉनक वस्तूंच्या किमती वाढत नसतात तर काही प्रमाणात कमीच होतात. थोडक्‍यात तोच टीव्ही ६ महिन्यांनी ४५ हजार रुपयांनासुद्धा मिळू शकतो.

गरज आहे तो थोडा संयम ठेवण्याची
दुसरे असे की बाजारात असणाऱ्या एक्‍स्चेंज स्कीमसुद्धा बऱ्याचदा फसव्या असतात. यात आपल्याला फारशी घासाघीस करता येत नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढून हप्ता वाढतो. थोडक्‍यात असे म्हणता येईल, की ज्या वस्तूंची आत्यंतिक गरज नाही अशी वस्तू केवळ सुलभ हप्त्यांवर किंवा झीरो इंटरेस्टने मिळते म्हणून फसव्या योजनांना बळी पडून घाई गडबडीत घेऊ नयेत. त्यासाठी योग्य ते नियोजन करून आवश्‍यक तेवढी रक्कम नियमित गुंतवून अपेक्षित रक्कम जमा झाल्यावरच अशी वस्तू विकत घ्यावी यामुळे अनावश्‍यक कर्जाचे हप्ते वाढत नाहीत. मात्र काही आवश्‍यक बाबींसाठी जरूर कर्ज घ्यावे (उदा: रोजच्या जाण्यायेण्यासाठी स्कूटर/मोटारसायकल आपली गरज भागवणारी व शक्‍य तितक्‍या कमी किमतीची घ्यावी. जेणे करून पडणारा हप्ता कमी असेल. घरासाठीचे कर्ज शक्‍य तितक्‍या लवकर घ्यावे व असे कर्ज घेताना आपल्या प्राथमिक गरजांना प्राधान्य द्यावे. अनावश्‍यक लक्‍झरी प्रकर्षाने टाळावी. जेणे करून घराची गरज भागेल व कर्जाची रक्कम वाढणार नाही. तसेच अशा कर्जाचा हप्ता फेडताना चाल ढकल झाली, तर आपला क्रेडिट स्कोअर कमी होतो व परिणामी अगदी गरजेच्या वेळी हवे असणारे कर्ज नाकारले जाते. (उदा: घरासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक असणारे कर्ज) या ठिकाणी वॉरन बफे यांचे एक भाष्य प्रकर्षाने आठवते ‘आपण जर अनावश्‍यक वस्तू त्याही कर्ज घेऊन खरेदी केल्या तर प्रसंगी आवश्‍यक वस्तू मिळेल त्या किंमतीस विकण्याची वेळ येऊ शकते’.   

संबंधित बातम्या