लग्नसमारंभ विमा पॉलिसी 

सुधाकर कुलकर्णी
गुरुवार, 3 जानेवारी 2019

अर्थविशेष
 

लग्नसमारंभ ही कुटुंबातील अत्यंत महत्त्वाची व आनंदाची घटना असते. समारंभ जास्तीत जास्त चांगला होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असतो. मात्र यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद आवश्‍यक असते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द करावा लागतो. यातून होणारे आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब असते. या समस्येवर योग्य त्या कव्हरची ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ घेऊन मात करता येते. असे असले तरी आजही बऱ्याच जणांना अशी इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकते याबाबत माहिती नसल्याने आजही बहुतांश विवाह समारंभ होताना ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ घेतली जात नसल्याचे दिसून येते. म्हणून आता आपण या पॉलिसीसंदर्भातील माहिती घेऊ. 

कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी संभाव्य जोखीम (रिस्क) विचारात घेऊन घेतली जाते. या पॉलिसीत खालील संभाव्य रिस्कचा प्रामुख्याने समावेश असतो.  

 • नवरा मुलगा/मुलगी यांना लग्न समारंभाच्या ठिकाणी - रेल्वेमध्ये झालेला बिघाड, रस्त्यावरील वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्था किंवा तत्सम कारणामुळे किंवा भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे उपस्थित राहणे शक्‍य न होणे. 
 • जवळच्या नातेवाइकाचा, नवरा मुलगा किंवा मुलगी किंवा दोघांचा अकस्मात मृत्यू. 
 • पोलिस कारवाईत अटक होणे  
 • लग्न समारंभाच्या ठिकाणी आग लागणे, दंगा धोपा, अन्न विषबाधा यामुळे होणारे नुकसान. 
 • पॉलिसीधारकाचे दागिने, लग्नाचे पोशाख भेटवस्तू यांची चोरी इत्यादी. 

पॉलिसीतील समाविष्ट खर्च  
     प्रत्यक्षात झालेला खर्च, दिलेला ॲडव्हान्स यामध्ये हॉलचे भाडे, केटरिंग, डेकोरेटर, फोटो/व्हिडिओ, करमणूक कार्यक्रम यांचा समावेश होतो. तसेच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत - ज्यानंतर वापरता येत नाही आणि परतही करता येत नाही. प्रवासी तिकिटे रद्द केल्याने किंवा करता न आल्याने होणारे नुकसान. कामगार नुकसान भरपाई, हॉल मुळे होणारे थर्ड पार्टी नुकसान. 

खालील परिस्थितीत पॉलिसीचा क्‍लेम मिळू शकत नाही  

 • वर अथवा वधू यातील एकजण विवाह समारंभास उपस्थित न राहता पळून गेल्यास अथवा लपून बसल्यास. 
 • वधू-वर पक्षात मतभेद झाल्यास. 
 • विवाह समारंभ जबरदस्तीने झाल्यास. 
 • मद्य अथवा ड्रगच्या अमलाखाली विवाह झाल्यास. 
 • समारंभप्रसंगी गुन्हेगारी कृत्य झाल्यास. 

विमा कालावधी 
लग्नसमारंभ सुरू होण्याअगोदर २४ तास (लग्नपत्रिकेत दिलेल्या तारीख व वेळेप्रमाणे) ते लग्नसमारंभ सुरू झालेल्या दिवसापासून पुढे १ दिवस. मात्र कालावधीबाबत इन्शुरन्स कंपनीनुसार कमी-अधिक कालावधी असू शकतो. 

पॉलिसीकव्हरमध्ये पुढील बाबींचा उल्लेख असतो. 

 • लग्नाचा एकूण खर्च (तपशील देणे आवश्‍यक असते)
 • वस्तू/मालमत्ता ज्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. दागिन्यांची किंमत, इतर वस्तू उदा. लग्नाचा पोशाख/साड्या/ड्रेस चांदीच्या वस्तू इत्यादी. 

ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स व नॅशनल इन्शुरन्स या सरकारी व आयसीआयसीआय लोम्बार्ड, बजाज आलियान्झ या खासगी जनरल इन्शुरन्स कंपन्या वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी देऊ करतात. काही कंपन्या इव्हेंट इन्शुरन्स पॉलिसीत वेडिंग इव्हेंटचा समावेश करतात. त्यामुळे त्या वेडिंग बेल इन्शुरन्स अशी वेगळी पॉलिसी न देता इव्हेंट इन्शुरन्स पॉलिसीतच वेडिंग बेल इन्शुरन्स देऊ करतात. 

सरकारी विमा कंपन्या प्रीमियम आकारणी खालीलप्रमाणे करतात. 

 • ०.५० टक्के विमा कव्हरवर. 
 • मालमत्तेचे नुकसान-२.७५ टक्के विमा कव्हरवर. 

     ३.२५ टक्के दायित्व रकमेवर. तर खासगी विमा कंपन्या २ लाख रुपयांच्या कव्हरसाठी सुमारे चार हजार व ८ लाखाच्या कव्हरसाठी सुमारे १५ हजार रुपये एवढा प्रीमियम आकारतात. 
या पॉलिसीत विवाहाच्या अनुषंगाने होणाऱ्या उपसमारंभाचाही समावेश करून घेता येतो. यासाठी असा समारंभ विवाहाच्या आधी ७ दिवसांच्या आत होणे आवश्‍यक असते. उदा. मेंदी समारंभ, संगीत समारंभ, हळदी समारंभ किंवा सीमांतपूजन. मात्र विवाहानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीनंतर पॉलिसी संपुष्टात येते. 
वेडिंग बेल विमा पॉलिसीमुळे परिस्थितीनुसार उद्‌भवणारी नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र अशी पॉलिसी घेताना संबंधित कंपनीच्या एजंटकडून पॉलिसीत समाविष्ट असलेल्या बाबी व क्‍लेम न मिळणाऱ्या कारणांची पुरेशी माहिती घेऊन आपल्याला आवश्‍यक असणाऱ्या कव्हरची वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी.   

संबंधित बातम्या