पी2पी लेंडिंग-एक नवा पर्याय

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 18 मे 2020

अर्थविशेष
पी2पी लेंडिंग ही संकल्पना तशी नवीन आहे. पण तरीही छोटा व्यावसायिक इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यास लागणारा विलंब टाळून पी2पी पोर्टलमार्फत सहजगत्या व त्वरित कर्ज घेऊ शकतो. तर ज्यांना जास्त रिटर्न मिळवायचा आहे व थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. पी2पी व्यवसाय जरी नवीन असला, तरी तेथील व्यवसाय वाढीस खूप वाव आहे.

लॉकडाऊन उठवल्यावर बऱ्याच जणांना कामकाज सुरू करण्यासाठी पैशांची गरज पडणार आहे. विशेषत: छोटे व्यावसायिक (रिक्षाचालक, ओला/उबर व्यावसायिक, किरकोळ विक्रते, फळ/भाजी विक्रेते, रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेते इ.). यांची गरजही फार मोठ्या रकमेची असणार नाही. २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम उभी झाल्यास हे छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय नक्की सुरू करू शकतील. सगळ्यांनाच सरकारी अर्थ साहाय्य मिळेलच असे नाही. अशा वेळी शक्य तितक्या लवकर पैसे उभे करून आपल्या व्यवसायास नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. बँक, पतपेढी किंवा अन्य वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळू शकेल, परंतु लगेचच मिळेल असे नाही. मात्र यावर आता पी2पी लेंडिंग हा एक नवीन पर्याय उपलब्ध आहे. अजूनही बहुतेकांना याबाबत फारशी माहिती नाही. या लेखाद्वारे ही माहिती आज आपण घेऊ.

पी2पी लेंडिंग हा क्लाऊड फंडिंगचा प्रकार असून यात ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी सरप्लस रक्कम आहे व जास्त रिटर्न मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे, असा गुंतवणूकदार आपली रक्कम पी2पी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या एस्क्रो अकाऊंटवर जमा करतो. ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते, अशी व्यक्ती आपली कर्ज मागणी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने करीत असते. कर्ज मागणी करणाऱ्या व्यक्तीची माहिती व क्रेडिट स्कोअर यासारखी आवश्यक ती माहिती प्लॅटफॉर्ममार्फत मिळविली जाते. ज्या व्यक्तीने एस्क्रो अकाऊंटवर रक्कम जमा केली आहे, अशा व्यक्तीस ई-मेल, एसएमएसमार्फत माहिती दिली जाते व त्याबरोबरच मिळू शकणारे व्याज व जोखीम याबाबत माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे निर्णय घेऊन कर्जदाराने मागणी केलेल्या कर्जात सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत आपला निर्णय गुंतवणूकदाराने पी2पी प्लॅटफॉर्मवर कळवायचा असतो. अशारीतीने ज्याच्याकडे सरप्लस रक्कम आहे, असा गुंतवणूकदार डायरेक्ट कर्जदारास कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम पी2पी लेंडिंग प्लॅटफॉर्म करत असतो. या मोबदल्यात काही फी दोघांकडूनही आकारली जाते. 

पी2पी लेंडिंग वैशिष्ट्ये - 

  • किमान गुंतवणूक ५,००० रुपये, तर कमाल गुंतवणूक ५० लाख रुपये.
  • सखोल चौकशी करूनच अर्जदाराची कर्ज मागणी विचारात घेतली जाते.
  • कर्जाची मुदत किमान ६ महिने व कमाल ३६ महिने इतकी असते.
  • गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीचे अपडेट्स वेळोवेळी मेल/एसएमएसद्वारा दिले जातात.
  • कर्जदाराला मिळणारे कर्ज अनेक गुंतवणूकदारांकडून दिले जाते, कारण एक गुंतवणूकदार कर्ज रकमेच्या २० टक्के किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपये इतकीच रक्कम कर्ज म्हणून देऊ शकतो. परंतु, २० टक्के दिलेच पाहिजेत असे नाही. अगदी ५०० रुपयेसुद्धा देऊ शकतो, यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम विभागली जात असल्याने खूप कमी होते.
  • शिवाय गुंतवणूकदार ठराविक सिबिल स्कोअरच्या खाली कर्ज न देण्याचा पर्याय देऊ शकतो.
  • यातून सुमारे १५ ते १७ टक्के इतक्या व्याजाने कर्ज सहजगत्या व त्वरित मिळू शकते.

आज अखेर रिझर्व्ह बँकेने ११ पी2पी कंपन्यांना रजिस्टर करून या व्यवसायास अनुमती दिली आहे. थोडक्यात छोटा व्यावसायिक, बँक, पतपेढी किंवा खासगी वित्तिय कंपन्या यांच्याकडून कर्ज मिळण्यास लागणारा विलंब टाळून पी2पी पोर्टलमार्फत सहजगत्या व त्वरित कर्ज घेऊ शकतो. तर ज्यांना बँक, पोस्ट, डिबेंचर्स यापेक्षा जास्त रिटर्न मिळवायचा आहे व थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. पी2पी व्यवसाय जरी नवीन असला, तरी अगदी अल्पावधी ३०० कोटी रुपयांचा व्यवसाय (३० जून २०१९ अखेर) असून व्यवसाय वाढीस खूप वाव असे म्हणावेसे वाटते.  

संबंधित बातम्या