सुवर्ण कर्जरोखे 

सुधाकर कुलकर्णी,  सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर     
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अर्थविशेष

गेले काही दिवस सोन्याच्या भावात सातत्याने वाढ  होत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस या गुंतवणुकीकडे पुन्हा आकर्षित होऊ लागला आहे. पारंपरिक पद्धतीने सराफाकडून सोने खरेदी करण्यापेक्षा अन्य सुरक्षित पर्याय आज उपलब्ध आहेत. सोने गुंतवणूक करताना हे अन्य पर्यायसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. यातील आरबीआय गोल्ड बॉंड हा एक उत्तम पर्याय असून आज आपण याची  तपशिलात माहिती घेऊ. 

रिझर्व्ह बँकेने या वर्षी एप्रिल महिन्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण ६ वेळा आरबीआय गोल्ड बॉंड बाजारात विक्रीसाठी आणले जातील, असे घोषित केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत चार वेळा अशी विक्री झाली आहे. अगदी अलीकडची व चौथ्या सिरीजची विक्री ६ ते १० जुलै २०२० या कालावधीत झाली आहे. उर्वरित दोन सिरीजची विक्री ३ ते ७ ऑगस्ट २०२० या कालावधीत व ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. 

गोल्ड बॉंड ही केंद्र सरकारने ‘आरबीआय’द्वारा इश्यू केलेली सिक्युरीटी असून एक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने या ‘डीनॉमिनेशन’मध्ये दिली जाते. उदा. सध्या सोन्याचा भाव प्रती ग्रॅम ५००० रुपये इतका आहे. जर आपण ५० हजार रुपये गुंतविले तर आपल्याला सोन्याचे १० युनिट दिले जातील. म्हणजेच आपली ५० हजार रुपयांची गुंतवणूक १० ग्रॅम सोन्यात केली असे होईल. 

या बॉंडचा कालावधी ८ वर्षे इतका असून मुदतीनंतर आपण बॉंड घेताना जेवढे गोल्ड युनिट घेतले आहेत, तेवढ्या युनिटची त्यावेळच्या सोन्याच्या बाजारात असलेल्या किमतीनुसार येणारी रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय आपण सुरुवातीला जी रक्कम गुंतविली असेल, त्यावर २.५ टक्के दराने (वार्षिक) व्याज दिले जाते. हे व्याज सहामाही पद्धतीने दिले जाते. मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेत शेवटच्या सहामहीचे व्याज जमा केले जाते. ५ वर्षांनंतर गरज असल्यास मुदतपूर्व बॉंड मोडता येतात. हे बॉंड हस्तांतरणीय असून आपण गिफ्ट देऊ शकता किंवा ट्रान्स्फर करू शकता. 

यामध्ये निवासी भारतीय, एचयुएफ, ट्रस्ट गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीयांस गुंतवणूक करता येत नाही. मात्र गुंतवणूक करताना जर संबंधित व्यक्ती निवासी भारतीय असेल आणि त्यानंतर अनिवासी झाली असेल, तर मुदतीपर्यंत गुंतवणूक ठेवता येते. यात वैयक्तिक, तसेच एचयुएफ गुंतवणूकदारांना किमान एक ग्रॅम व त्या पटीत आणि कमाल ४ किलो एवढी गुंतवणूक करता येते. तर ट्रस्टला किंवा तत्सम किमान एक ग्रॅम व कमाल २० किलो एवढी गुंतवणूक करता येते. तसेच संयुक्त नावाने किंवा मायनरच्या नावानेसुद्धा गुंतवणूक करता येते. सरकारी बँका, काही खासगी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, एनएससी व बीएससी हे दोन्हीही स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी ही गुंतवणूक करता येते. या बहुतेक सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा गुंतवणूक करता येते. ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक केल्यास प्रती ग्रॅम ५० रुपये इतकी सूट दिली जाते. फक्त २० हजारापर्यंतची रक्कम रोखीने भरता येते.त्या पुढील रक्कम चेक, एनईएफटी/आरटीजीएस/युपीआय पद्धतीने भरता येते. गुंतवणूकदारास सर्टिफिकेट ऑफ होल्डिंग दिले जाते. ज्यात युनिट नंबरचा उल्लेख असतो. याशिवाय आपण डी-मॅट पद्धतीनेसुद्धा घेऊ शकता. डी-मॅट पद्धतीने घेतल्यास ट्रेडिंग करता येते. बॉंडला नॉमिनेशनची सुविधा आहे. 
 
गोल्ड बॉंडची नवीन सिरीज सुरू होण्याआधी दोन दिवस प्रती ग्रॅम सोन्याचा दर ‘आरबीआय’कडून जाहीर केला जातो व याच दराने सिरीजच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत युनिट दिले जातात. हा दर सिरीज सुरू होण्याच्या आधीच्या तीन दिवसांच्या सोन्याच्या बंद होणाऱ्या सरासरी भावाइतका असतो. (इंडिया बुलियन व ज्वेलर्स असोसिएश्न्स यांनी ठरविलेला ९९९ शुद्धतेचा सोन्याचा  भाव यासाठी विचारात घेतला जातो.) 

हे बॉंड हस्तांतारणीय असल्याने तारण म्हणून स्वीकारले जातात. त्यामुळे गरज पडल्यास कर्ज घेता येते किंवा पूरक तारण (कोलॅटरल) म्हणून स्वीकारले जातात. या बॉंडच्या तारणावर कर्ज देताना सोने तारण कर्जासाठी प्रती ग्रॅम जो दर असेल, तोच दर लावला जातो. 

या बॉंड वर सहामाही मिळणारे व्याज करपात्र असते. मात्र टीडीएस कापला जात नाही. यावरील लागू असणारा कर भरण्याची जबाबदारी गुंतवणूकदाराची असते. तसेच मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेस कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. मात्र ५ वर्षांनंतर व मुदतीच्या आत बॉंड मोडल्यास व कॅपिटल गेन असल्यास इंडेक्सशेषन करून २०.८ टक्के इतका कर भरावा लागतो. जर ट्रेडिंग करत असाल तर ३ वर्षांच्या आतील कॅपिटल गेन संबंधित आर्थिक वर्षाच्या उत्पन्नात जमा धरला जातो. कालावधी ३ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर इंडेक्सशेषन करून २०.८ टक्के इतका कर भरावा लागतो. 

थोडक्यात असे म्हणता येईल, की जर आपल्याला सोन्यात गुंतवणूक करावयाची असेल तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये गोल्ड बॉंड मधील गुंतवणूक निश्चितच फायदेशीर आहे. कारण एक तर गुंतवणुकीवर व्याज मिळते, जे अन्य कोणत्याही पर्यायांत मिळत नाही. चोरीची भीती नाही, लॉकर घेऊन त्याचे भाडे भरायची गरज नाही. सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी नाही, घडणावळ, विकातानाची घट यासारखे नुकसान नाही. शिवाय सोन्याचा वाढत्या दराचा मुदत संपेपर्यंत लाभ, प्रसंगी कर्ज मिळण्याची सोय आणि जर डी-मॅट स्वरुपात असेल, तर कधी विकता येण्याची सुविधा. या सर्व बाबी विचारात घेता, जर आपल्याला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय जरूर विचारात घ्यावा व त्यादृष्टीने नवीन गोल्ड बॉंड सिरीज केव्हा बाजारात येणार आहेत याची माहिती घेऊन त्या कालावधीत गुंतवणूक करावी.

संबंधित बातम्या