संयुक्त नावावरील गृहकर्ज 

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

अर्थविशेष

छोट्यामोठ्या शहरांमध्ये पतीपत्नी दोघांनीही नोकरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी लवकरात लवकर स्वतःच्या मालकीचे घर असावे या उद्देशाने आपल्याला परवडेल व सोयीचे असेल अशा घरचा शोध सुरू होतो. सध्या बांधकाम व्यवसायात मंदीसदृश परिस्थती असल्याने परवडेल असे व सोयीच्या ठिकाणी घर मिळणे सहज शक्य झाले आहे. असे असले तरी त्यासाठी लागणारी संपूर्ण रक्कम बहुतांश जोडप्यांकडे असतेच असे नाही. मात्र आजकाल बँका व गृह वित्तसंस्था घरासाठी सहजगत्या व कमी व्याजाने कर्ज देऊ करत आहेत. यामुळे गृहकर्ज घेणे सोपे झाले आहे. असे कर्ज पतीपत्नीने संयुक्त नावाने घेता येते व असे संयुक्त नावाने कर्ज घेण्याचे काही फायदे व काही तोटे आहेत हे कर्ज घेण्यापूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण नेमके काय फायदे व तोटे आहेत हे पाहू. 

संयुक्त नावावरील(पतीपत्नीच्या) गृहकर्जाचे फायदे - 

  1. संयुक्त नावावर कर्ज घेतल्याने दोघांचे एकत्रित उत्पन्न, कर्जरकमेसाठी विचारात घेतले जाते. त्यामुळे जास्त कर्ज मिळू शकते. यामुळे मोठे घर घेता येऊ शकते. केवळ एकाच्याच नावावर कर्ज घेतल्यास कर्ज कमी मिळत असल्याने मोठे घर घेऊ शकत नाही; परतफेडीची क्षमता असली तरी! 
  2.  कर्जफेडीतील मुद्दलाचा व व्याजाचा फायदा परतफेडीच्या प्रमाणात दोघांनाही मिळतो. यामुळे दोघांनाही प्राप्तिकर सेक्शन ८० सी व २४ नुसार दीड लाख व दोन लाख रुपये करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. (मात्र यासाठी केवळ गृहकर्ज संयुक्त नावावर असून चालत नाही, तर घराची मालकीसुद्धा संयुक्त असावी लागते. मिळणारी करसवलत मालकीच्या व परतफेडीच्या टक्केवारीनुसारच मिळते. उदा. जर दरमहाचा हप्ता रु. ७०००० इतका आहे व समान मालकी आहे व दोघेही समान रु. ३५००० इतका हप्ता भरत असतील, तसेच यातील आर्थिक वर्षातील मुद्दल परतफेड रु. ४ लाख व व्याज रु. ४.८ लाख इतके असेल तर तर दोघांनाही मुद्दल परतफेडीचे रु. १.५ लाख व व्याजाचे रु. २ लाख इतकी करपात्र उत्पन्नातून वजावट मिळू शकेल. मात्र जर पतीची मालकी ७५ टक्के व पत्नीची मालकी २५ टक्के इतकी असेल तर पत्नीला मुद्दल परतफेडीपोटी केवळ १ लाख व व्याजापोटी केवळ १.२ लाख एवढीच वजावट मिळेल. (जर घेतले जाणारे घर दोघांपैकी एकाच्याच मालकीचे असेल आणि कर्ज दोघांच्या नावावर असेल तर कर सवलत ज्याची मालकी आहे त्यालाच मिळेल, दोघांना मिळणार नाही.) 
  3. बहुतांश बँका महिला कर्जदारास ०.०५ % इतकी व्याजात सूट देत आहेत. गृहकर्जाच्या दीर्घकालीन परतफेडीचा विचार ही सूट निश्चितच फायदेशीर ठरते. तसेच महिलांसाठी काही राज्यात स्टॅम्पड्युटी पुरुषांच्या तुलनेने कमी असल्याने नोंदणी खर्च कमी होतो.(झारखंड, दिल्ली,राजस्थान, उत्तर प्रदेश व पंजाब). 
  4. प्रसंगी बँका कर्ज परतफेडीची मुदत जास्त देतात. 

आता आपण संयुक्त नावाने कर्ज घेण्याचे तोटे काय आहेत हे पाहू - 

  • दोघांपैकी एकाला काही कारणाने हप्ता भरणे शक्य झाले नाही किंवा एकाचा मृत्यू झाला, तर हप्ता भरण्याची जबाबदारी दुसऱ्यावर येऊन पडते. हप्त्याची संपूर्ण रक्कम त्याला भरणे शक्य नसेल तर कर्ज खाते अनियमित होऊन त्याचे संभाव्य परिणाम दोघांनाही भोगावे लागतात; यात दुसऱ्याची चूक नसली तरी! 
  • समजा नजीकच्या काळात उभयतांचे सबंध बिघडून घटस्फोट घेण्याची वेळ आली तर गृहकर्ज हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. यात समाधानकारक तडजोड निघाला नाही तर घटस्फोट घेताना एकाचे जास्त नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा घराचा ताबा दोघांनाही हवा असतो. किंवा गृहकर्ज जवळपास फिटत आले असेल आणि दुसरा उर्वरित रक्कम भरण्यास तयार असेल तरी पहिला मालकी देण्यासाठी ना हरकत देण्यास टाळाटाळ करू शकतो. 
  • तडजोड होईपर्यंत कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाल्यास पुढे जरी तडजोडीनुसार रक्कम भरली तरी दोघांचाही क्रेडीट स्कोअर खराब होतो. त्यामुळे पुढील काही काळ दोघांनाही नवीन कर्ज मिळणे शक्य होत नाही. 
  • चालू आर्थिक वर्षापासून अर्थसंकल्पात करदात्यास करदायित्व ठरविण्यासाठी नवीन पर्याय देऊ केला आहे आणि जर हा पर्याय स्वीकारायचा असेल तर गृहकर्जाच्या मुद्दल परतफेड व व्याज यातून सेक्शन ८० सी व २४ नुसार मिळणारी वजावट मिळणार नाही  
  • (व्याजाची वजावट जर घर भाड्याने दिले असेल तरच मिळू शकेल). 

थोडक्यात असे म्हणता येईल, की जरी संयुक्त नावाने गृहकर्ज घेणे पतीपत्नीच्या दृष्टीने फायदेशीर असले तरी हा निर्णय घाईत घेऊ नये. संभाव्य तोटे काय आहेत हे समजून घेऊन मगच निर्णय घ्यावा.

संबंधित बातम्या