टर्म इन्शुरन्स ही काळाची गरज 

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर
सोमवार, 11 जानेवारी 2021

घरातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दूरगामी आर्थिक संकट कोसळते. या संभाव्य आर्थिक संकटावर मात करता यावी यासाठी पुरेसे आयुर्विमा कव्हर असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. म्हणूनच कुटुंबाला आवश्‍यक ‘सुरक्षा कवच’ देणाऱ्या विम्याविषयी या सदरातून माहिती घेऊ.  

बदलेली जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा त्यामुळे येणारा सततचा कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, अपुरी विश्रांती या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामुळे अगदी चाळिशीत मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, वेळोवेळी येणारे साथीचे आजार (उदा. चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू व सध्या कोरोना) यांसारखे आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. याच बरोबर रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी व बेशिस्त वाहतूक यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून अकाली मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दूरगामी आर्थिक संकट कोसळते. या संभाव्य आर्थिक संकटावर मात करता यावी यासाठी यासाठी पुरेसे आयुर्विमा कव्हर असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र पारंपरिक मनी बॅक, एन्डॉव्हमेंट, होल लाइफ, यूलीप यांसारख्या पॉलिसीज घेऊन हे उद्दिष्ट साध्य होत नाही. या दृष्टीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा एक अगदी योग्य पर्याय आहे. मात्र अजूनही बहुतेकांना याविषयी फारसी माहिती नाही आणि म्हणून इन्शुरन्स कव्हर किती घ्यावे व ते कसे घ्यावे याबाबत आज आपण आवश्यक ती माहिती घेऊ.

इन्शुरन्स कव्हर किती असावे? 
कुटुंबात एकच व्यक्ती कमावती असेल, तर अशा व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे १२ ते १५ पट इन्शुरन्स कव्हर असणे गरजेचे आहे. मात्र जर पती पत्नी दोघेही कमवते असतील तर प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ८ ते १० पट कव्हर घेणे योग्य राहील. उदा. आपले वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये असेल, तर सव्वा ते दीड कोटी इतके कव्हर असावे. यामुळे कमवत्या व्यक्तीच्या अकाली निधनाने उद्‍भवणाऱ्या आर्थिक समस्येवर बऱ्यापैकी मात करता येते.

इन्शुरन्स कव्हर कसे घ्यावे? 
वर उल्लेख केल्याप्रमाणे उत्पन्नाच्या १२ ते १५ पट कव्हर घ्यावयाचे असेल, तर पारंपरिक इन्शुरन्स पॉलिसी घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. कारण वरील उदाहरणातील १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सव्वा कोटीचे कव्हर असणारी एन्डॉव्हमेंट पॉलिसी घेण्यासाठी सुमारे ६ ते ७ लाख रुपये इतका वार्षिक हप्ता भारावा लागेल. या उलट जर सव्वा कोटी कव्हर असणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली, तर केवळ १२ ते १३ हजार रुपये इतका वार्षिक हप्ता भरावा लागेल. (या ठिकाणी पॉलिसी घेणारी व्यक्ती निरोगी व ३० वर्षे वयाची गृहीत धरले आहे.) पारंपरिक पॉलिसी घेतल्यास केवळ १२ ते १३ हजार रुपये वार्षिक हप्त्यामध्ये २ ते ३ रुपये लाख इतकेच कव्हर मिळू शकेल. इतक्या अपुऱ्या कव्हरमध्ये इन्शुरन्सचे उद्दिष्ट साध्य होऊ शकता नाही.

टर्म इन्शुरन्स नेमका कसा आहे? 
टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फक्त डेथ क्लेम मिळतो. पॉलिसीची मुदत संपल्यावर जर पॉलिसी धारक हयात असेल, तर काहीही रक्कम मिळणार नाही. मात्र पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम क्लेमपोटी दिली जाते. उदा. ‘अ’ या व्यक्तीने १० हजार रुपये वार्षिक हप्त्याची ३० वर्षे मुदतीची एक कोटी रुपये कव्हर असणारी टर्म पॉलिसी घेतली आहे व ‘ब’ या व्यक्तीने १० हजार वार्षिक हप्त्याची २ लाख रुपये कव्हर असणारी ३० वर्षे मुदतीची एन्डॉव्हमेंट पॉलिसी घेतली आहे. समजा दोघांचेही वयाच्या ४० व्या वर्षी अपघाती निधन झाले, तर ‘अ’च्या वारसाला डेथ क्लेमपोटी एक कोटी रुपये एव्हढी रक्कम मिळेल. तर ‘ब’च्या वारसाला डेथ क्लेमपोटी सुमारे ३ लाख रुपये (१० वर्षांचा बोनस गृहीत धरून) एव्हढीच रक्कम मिळेल. समजा दोघेही पॉलिसीच्या ३० वर्षांच्या मुदतीनंतर हयात असतील, तर ‘अ’ला काहीही रक्कम मिळणार नाही, कारण टर्म इन्शुरन्सला मॅच्युरिटी क्लेम नसतो. मात्र ‘ब’ला सुमारे ८ लाख रुपये एव्हढी रक्कम मॅच्युरिटी क्लेम म्हणून मिळेल. विशेष म्हणजे वरील उदाहरणातील ‘ब’ला ३० वर्षे मुदतीनंतर जे ८ लाख रुपये मिळतील त्याची आजची किंमत केवळ १.७५ लाख रुपये इतकीच असणार आहे (५ ते ५.५ टक्के इतका महागाई वाढीचा दर गृहीत धरून).

वरील विवेचनांवरून आपल्या लक्षात आले असेल, की वार्षिक १० लाख रुपये उत्पन्न असणारी व्यक्ती १० ते १२ हजार इतका वार्षिक हप्ता सहज भरून एक कोटी कव्हरची इन्शुरन्स पॉलिसी सहज घेऊन आपल्या पश्‍चात आपल्या वारसांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करू शकते. केवळ मुदतीनंतर रक्कम मिळते म्हणून व आपला हप्ता वाया जात नाही या चुकीच्या समजुतीमुळे काहीजण पारंपरिक मनी बॅक, एन्डॉव्हमेंट, होल लाइफ यांसारख्या पॉलिसीज घेतात. विशेषतः तरुणांनी ही चूक प्रकर्षाने टाळली पाहिजे व शक्य तितक्या लवकर आपल्या आवश्यकतेनुसार कव्हर घ्यावे. कारण वाढत्या वयानुसार वार्षिक हप्ता वाढत जातो. 

आजकाल सर्व इन्शुरन्स कंपन्या टर्म इन्शुरन्स देत आहेत व कंपनीनुसार हप्ते कमी अधिक आहेत. पॉलिसी घेताना विविध कंपन्यांच्या प्रीमियमचा तौलनिक अभ्यास करून व क्लेम सेटलमेंट रेशो पाहून पॉलिसी घ्यावी. (क्लेम सेटलमेंट रेशो ९५ टक्के किंवा त्याहून अधिक असणारी कंपनी निवडावी). आजकाल  इन्शुरन्स कंपनीच्या साइटवर पॉलिसी ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. यामुळे प्रीमियम थोडा कमी होऊ शकतो. वरील सर्व माहिती बेसिक टर्म इन्शुरन्सची असून यात अपघाती निधन, अतिरिक्त उत्पन्न, यांसारखे रायडर घेऊन आणखी लाभ घेता येतात. तरी पॉलिसी घेताना या सर्व बाबींची माहिती घेऊन गरज पडल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपल्या गरजेनुसार पॉलिसी घ्यावी.

संबंधित बातम्या