युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 25 जानेवारी 2021

सुरक्षा कवच

मागील लेखात आपण टर्म इन्शुरन्स प्लॅनबाबत माहिती घेतली, आज आपण युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनबाबत (युलिप) माहिती घेऊ. टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तरच वारसाला सम ॲशुअर्ड इतका डेथ क्लेम मिळतो. मात्र पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतीनंतर हयात असेल, तर त्याला स्वतःला काही रक्कम मिळत नाही आणि म्हणून अशा व्यक्तीस आपण भरलेल्या प्रीमियमची रक्कम वाया गेली असे वाटते. आपल्या पॉलिसी कालावधीनंतर आपल्याला काही रक्कम मिळणे अपेक्षित असेल, तर एन्डोव्हमेंट, मनी बॅक व युलिप यांसारखे पर्याय आहेत. थोडी रिस्क घ्यायची  तयारी असल्यास युलिप हा एक चांगला पर्याय आहे.

युलिप पॉलिसीच्या प्रीमियममधून सम ॲशुअर्डनुसार मॉरटॅलिटी प्रीमियम, पॉलिसी अॅडमीन चार्जेस, फंड मॅनेजमेंट चार्जेस व अलॉमेंट चार्जेस देऊन उरलेली रक्कम आपल्याला ज्या प्रमाणात रिस्क घ्यायची त्यानुसार, इक्विटी व डेटमध्ये गुंतविली जाते. यात आपल्याला ॲग्रेसिव्ह, मॉडरेट व कॉन्झरव्हेटिव्ह या प्रकारे गुंतवणूक करता येते. बाजारातील चढ-उतारानुसार यात बदल करता येतो. यामुळे लाइफ कव्हरबरोबर मार्केट लिंक्ड रिटर्न मिळविता येतो. तसेच गुंतवणूक फ्लेक्झिबल (लवचीक) असल्याने आपल्याला यात वेळोवेळी बदल करता येतो. पॉलिसी दीर्घ काळासाठी (१५ ते ३० वर्षे) असल्याने शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणुकीत १२ ते १४ टक्के इतका रिटर्न मिळू शकतो. (एन्डोव्हमेंट, मनी बॅक या पॉलिसीतून मिळणारा रिटर्न जेमतेम ५ ते ६ टक्के इतकाच असतो) यामुळे युलिप पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते. मात्र त्यासाठी मार्केट रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे. 

युलिप पॉलिसी घेताना प्रीमियम मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक पद्धतीने भरता येतो. मात्र एकूण वार्षिक प्रीमियमच्या किमान १० पट व कमाल ४० पट इन्शुरन्स कव्हर (सम ॲशुअर्ड) घेता येते. आयआरडीएने (इन्शुरन्स नियामक) यात नुकताच बदल केला असून आता किमान सात पट इन्शुरन्स कव्हर घेता येते. मॉरटॅलिटी प्रीमियम हा सम ॲशुअर्डनुसार असल्याने, जर सम ॲशुअर्ड कमीत कमी असेल, तर हा प्रीमियम कमी भरावा लागतो. परिणामी प्रीमियममधील जास्त रक्कम नियमित गुंतविली जाते व यामुळे पॉलिसी कालावधीनंतर मिळणारी रक्कम जास्त असते. असे असले तरी केवळ मुदतीनंतर जास्त रक्कम मिळते म्हणून सम ॲशुअर्ड कमी घेणे योग्य नाही. यामुळे लाइफ इन्शुरन्सचा मूळ हेतू साध्य होत नाही. युलिप पॉलिसीला पाच वर्षांचा लॉक पिरीयड असतो.

आपल्या प्रीमियममधून होणाऱ्या गुंतवणुकीचे युनिट आपल्या खात्यावर जमा होतात. एका युनिटची दर्शनी किंमत १० रुपये असते. तथापि, प्रीमियममधून होणारी गुंतवणूक त्यावेळच्या युनिटच्या असलेल्या बाजार भावानुसार (एनएव्ही) होत असते. युनिटची एनएव्ही बाजारातील चढ उतारानुसार कमीअधिक होत असते. पॉलिसीची मुदत संपल्यावर जमा झालेले एकूण युनिट त्यावेळच्या एनएव्हीनुसार विकले जाऊन रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते.

मात्र पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास खालील तीनपैकी जास्तीत जास्त असणारी रक्कम वारसाला दिली जाते.

 • सम ॲशुअर्ड
 • फंड व्हॅल्यू (त्यावेळी जमा असणारे युनिट्स X एका युनिटची एनएव्ही)
 • एकूण भरलेल्या प्रीमियमच्या १०५ टक्के उदा : पॉलिसीधारक २५ हजार रुपये वार्षिक प्रीमियम भरत आहे. त्याने किमान सात पट कव्हर घेतले आहे. पॉलिसी कालावधी २० वर्षे आहे व त्याचे चार वर्षांनी निधन झाले, तर 
 • सम ॲशुअर्ड = १,७५,००० रुपये
 • फंड व्हॅल्यू : जमा युनिट २,७६३ X २७.५ एनएव्ही = ७५,९८२.५ रुपये
 • एकूण भरलेले प्रीमियम २५,००० X ४ = १,००,००० च्या १०५ टक्के १,०५,००० रुपये
 • या तिन्हीतील जास्तीत जास्त रक्कम, १,७५,००० (सम ॲशुअर्ड) रुपये एव्हढी रक्कम वारसाला मिळेल.
 • समजा पॉलिसीधारकाचे १० वर्षानंतर निधन झाले, तर 
 •  सम ॲशुअर्ड = १,७५,००० रुपये
 •  फंड व्हॅल्यू = जमा युनिट ५,८४३ X ४३.७५ एनएव्ही = २,५५,६३१.५५ रुपये
 •  एकूण भरलेले प्रीमियम =२५,००० X १० = २,५०,००० च्या  १०५ टक्के = २,६२,५०० रुपये 
 • या तिन्हीतील जास्तीत जास्त, २,६२,५०० एव्हढी रक्कम वारसाला मिळेल.
 • आणि जर पॉलिसीधारक २५ वर्षानंतर हयात असेल व जमा झालेले युनिट्स १८,७७२ इतके असतील व एनएव्ही १०७.४५ रुपये असेल, तर 
 •  सम ॲशुअर्ड = १,७५,००० रुपये
 •  फंड व्हॅल्यू = १८,७७२ X १०७.४५ = २०,१७,०५१.४० रुपये
 •  एकूण भरलेले प्रीमियम = २५,००० X २० = ५,००,००० च्या १०५ टक्के = ५,२५,००० रुपये

या तिन्हीतील जास्तीत जास्त, २०,१७,०५१.४० एव्हढी रक्कम पॉलिसीधारकाला मिळेल. मात्र फंड व्हॅल्यू नेमकी किती मिळेल हे नक्की सांगता येत नाही. कारण ही रक्कम मुदतीपर्यंत जमा होणारे युनिट्स व युनिटची त्यावेळची एनएव्ही यावर अवलंबून असते.

युलिप प्रीमियम प्राप्तीकर सेक्शन ८०सी नुसार, १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलतीस पात्र आहे. तथापि, ही सवलत १० वर्षांपुढील कालावधीच्या युलिपसाठी आहे. मुदतीनंतर मिळणारी रक्कम सेक्शन १०(१०डी) नुसार करमुक्त असते. तसेच वारसाला मिळणारी डेथ क्लेमची रक्कम करमुक्त असते. पाच वर्षांनंतर परंतु मुदतीपूर्वीसुद्धा रक्कम काढता येते. मात्र ही रक्कम फंड व्हॅल्यूच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर करपात्र असते. पॉलिसी कालावधी १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर प्रीमियम ८० सी नुसार करसवलतीस पात्र नसतो. तसेच मुदतीनंतर मिळणारी रक्कम १०(१०डी) करमुक्त मिळत नाही. यावरून असे म्हणता येईल, की १० वर्षांपेक्षा कमी कालावधीची पॉलिसी घेणे फारसे फायदेशीर नसते.

थोडक्यात असे म्हणता येईल, की २५ हजार रुपये वार्षिक प्रीमियममध्ये एन्डोव्हमेंट पॉलिसी जास्तीत जास्त पाच लाख रुपये इतके लाइफ कव्हर मिळू शकते. तर तेव्हढ्याच प्रीमियमच्या युलिप पॉलिसीमध्ये किमान १.७५लाख व कमाल २० लाख रुपये इतके लाइफ कव्हर आपल्या सोयीनुसार घेता येते. होणारी गुंतवणूक मार्केट लिंक्ड असल्याने आपण ज्या प्रमाणात रिस्क घेऊ, त्या प्रमाणात ८ ते १२ टक्के रिटर्न मिळू शकतो व परिणामी मुदतीनंतर मिळणारी रक्कम एन्डोव्हमेंट पॉलिसीपेक्षा अधिक मिळू शकते. उदा : ३० वर्षे वयाच्या व्यक्तीने २५ हजार रुपये वार्षिक प्रीमियमची पाच लाख रुपये कव्हर असणारी ३० वर्षे मुदतीची एन्डोव्हमेंट पॉलिसी घेतल्यास मुदतीनंतर अंदाजे २० लाख रुपये मिळतील. याउलट २५ हजार वार्षिक प्रीमियम व पाच लाख रुपये कव्हर असलेली युलिप पॉलिसी घेतल्यास सुमारे ४५ ते ५० लाख रुपये इतकी रक्कम मुदतीनंतर मिळू शकेल. या दृष्टिकोनातून एन्डोव्हमेंट पॉलिसी घेण्यापेक्षा युलिप पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते. मात्र यातील रिस्क समजून घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या