आरोग्य विमा

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आरोग्य विमा

मागील दोन लेखात आपण टर्म इन्शुरन्स व युलिप या दोन आयुर्विमा पॉलिसींची माहिती घेतली. आर्थिक नियोजनात मेडिक्लेम पॉलिसीचे अनन्य साधारण महत्त्व आहे आणि म्हणून आज आपण मेडिक्लेम पॉलिसीबाबत माहिती घेऊ.

परिवार आरोग्य विमा पॅालिसी (फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी) ही पॅालिसी खालील दोन पद्धतीने घेता येते. 

    या पॅालिसीमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची विमा रक्कम वेगवेगळी द्यावी लागते व त्यानुसार प्रीमियम आकारला जातो. मात्र सर्वांना एकच पॅालिसी दिली जाते. या पॅालिसीतील समाविष्ट व्यक्तीला आजारी पडल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर संबंधित व्यक्तीच्या पॅालिसीतील कव्हरइतका जास्तीत जास्त क्लेम मिळू शकतो. 

उदा : पाटील यांची फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी अाहे आणि त्यांचे स्वतःचे कव्हर तीन लाख रुपये इतके आहे, पत्नीचे कव्हर दोन लाख रुपये इतके आहे आणि दोन्हीही मुलांचे प्रत्येकी एक लाख रुपये इतके कव्हर आहे (एकूण कव्हर सात लाख रुपये). या फॅमिली मेडिक्लेम पॅालिसीचा एकत्रित प्रीमियम हा प्रत्येकाचे कव्हर, वय व आरोग्य यानुसार आकारला जातो. जर यात पाटील यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर त्यांना एका वर्षात एकूण तीन लाखापर्यंतचा क्लेम मिळू शकेल (म्हणजे पॅालिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांनी पाटील रुग्णालयात भरती झाले व खर्च ९० हजार रुपये आला, तर यातील बहुतांश क्लेम मंजूर होईल. दुर्दैवाने जर पुढील दोन महिन्यांनी पुन्हा रुग्णालयात भरती झाले व यावेळचा खर्च २ लाख ८० हजार इतका आला, तर मात्र २ लाख ८० हजार इतका क्लेम मंजूर न होता २ लाख १० हजार (तीन लाख - आधीचे ९० हजार) इतकाच क्लेम मंजूर होईल. याप्रमाणे अन्य कोणाला रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर त्याच्या कव्हरनुसार क्लेम मिळेल. 

    या पॅालिसीला फॅमिली फ्लोटर प्लॅन असे म्हणतात. या पॅालिसीचे कव्हर संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित स्वरूपात असते. वरील उदाहरणातील पाटील आता प्रत्येकाचे वेगळे कव्हर न घेता संपूर्ण कुटुंबासाठी सात लाख कव्हर असलेली फ्लोटर पॅालिसी घेऊ शकतात. या पॅालिसीत समाविष्ट असणाऱ्या कोणाही एकास सात लाख किंवा चौघांचा मिळून सात लाखापर्यंत क्लेम मिळू शकतो. मात्र एका वर्षात एकूण सात लाख इतकाच क्लेम मिळू शकतो. 

उदा: पॅालिसी घेतल्यानंतर दोन महिन्यांनी पाटील यांची अँजिओप्लास्टी होऊन चार लाख रुपये इतका खर्च आला. हा खर्च फ्लोटिंग कव्हरच्या आत असल्याने जवळपास संपूर्ण खर्चाचा क्लेम मिळू शकेल. जर कुटुंबातील अन्य कोणाचा (एकाचा/दोघांचा) हॉस्पिटलायझेशन खर्च याच वर्षात (पॅालिसी कालावधीत) पाच लाख रुपये आला, तर जवळपास तीन लाखाचा क्लेम मिळू शकेल. असा एकूण सात लाखाचा क्लेम संपूर्ण कुटुंबास मिळू शकेल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की या पॅालिसीचा प्रीमियम कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या वयानुसार घेतला जातो, कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या वयाचा विचार होत नाही. तसेच या पॅालिसीला नो क्लेम बोनस मिळत नाही. एक परिवार-एक पॅालिसी या कौटुंबिक तत्त्वाचा आधार घेऊन एकाच पॅालिसीतून कुटुंबातील सर्व सदस्यांना या दोन्हीही पॅालिसीतून आरोग्य विमा पॅालिसीचे फायदे मिळू शकतात. कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अवलंबित मुले यांचा या दोन्हीही पॅालिसीत समावेश करता येतो. ही पॅालिसी १८ ते ८० वर्षापर्यंतच्या व्यक्तीला घेता येते. तसेच आई-वडील पॅालिसी घेत असतील, तर तीन महिन्याच्या मुलापासून ते १८ वर्षे वयापर्यंतच्या अवलंबित मुलांचा समावेश करता येतो. अविवाहित व नोकरी न करणारी मुलगी, तसेच अपंग मुलांच्या बाबतीत वयाची अट नाही. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या परंतु उच्च शिक्षण सुरू असणाऱ्या मुलाचा वयाच्या २६ वर्षांपर्यंत समावेश करता येतो.

फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी व फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसीची ठळक वैशिष्ट्ये:

     या पॅालिसीमध्ये तृतीय पक्ष व्यवस्थापनाची (Third Party Administrator) सुविधा असून पॅालिसीचे क्लेमचे पेमेंट या यंत्रणेमार्फत केले जातात. या व्यवस्थेला टीपीए असे म्हणतात. टीपीए मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास पॅालिसीधारक रुग्णाचे हॉस्पिटलचे कव्हरच्या मर्यादेपर्यंतचे बिल टीपीएमार्फत परस्पर हॉस्पिटलला दिले जाते. (रुग्णाला अगदी नाममात्र पैसे भरावे लागतात) याला विना पेमेंट पॅालिसी (cash less policy) म्हणतात.

     पॅालिसीचा २५ हजार रुपयांपर्यंत वार्षिक प्रीमियम, प्राप्तिकर कलम ८०-डी अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असतो. तसेच ६० वर्षांवरील पॅालिसीधारकांना ही सवलत ५० हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. तसेच आईवडिलांची वेगळी पॅालिसी घेतल्यास ५० हजार रुपयांची आणखी वजावट मिळते. अशी मिळणारी सवलत प्रत्यक्ष प्रीमियम व कमाल मर्यादा यातील जी कमी रक्कम असेल ती करसवलतीस पात्र असते. 

     पॅालिसीच्या सर्वसाधारण अटी पुढील प्रमाणे असतात...

अ) हॉस्पिटलायझेशन क्लेमसाठी रुग्णाने किमान २४ तास हॉस्पिटल राहणे आवश्यक असते (मोती बिंदू, पाईल्स यांसारख्या शस्त्रक्रिया, ज्यामध्ये रुग्णास ३-४ तासांत डिस्चार्ज दिला जातो असे आजार व त्यावरील उपचार वगळता)

ब) रूम चार्जेस, नर्सेस चार्जेस, ब्लड आणि इंजेक्शन चार्जेस, रुग्णवाहिका चार्जेस  

ड) डॉक्टर, सर्जन, भूल तज्ज्ञ, विविध चाचण्या यांवरील खर्च 

ई) औषधे, भूल, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर चार्जेस, सर्जिकल उपकरणे, एक्स रे चार्जेस, डायलिसीस, केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेसमेकर, कृत्रिम अवयव बदलणे, अवयव दान करणाऱ्या व्यक्तीवर होणारा वैद्यकीय खर्च यांसारखे सर्व खर्च क्लेम करता येतात. यातील काही खर्चांना कमाल मर्यादा असते व तसा उल्लेख पॉलिसीमध्ये असतो. १ ऑक्टोबर २०२० पासून आयआरडीएने क्लेम सेटलमेंट पिरीयड, प्रीएक्झिस्टिंग डिसीज, क्लेम रिजेक्शनबाबत ग्राहकाभिमुख बदल केलेले आहेत.

संबंधित बातम्या