टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

अर्थविशेष

जनरल इन्शुरन्स कंपन्यांनी आता मेडिक्लेम पॅालिसी अंतर्गत टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी देण्यास सुरुवात केली आहे. या पॅालिसीची अनेक ठळक वैशिष्ट्ये असून १५ लाख रुपयांपर्यंतचे कव्हर, परवडेल अशा प्रीमियममध्ये मिळू शकते. 

टॉप-अप पॅालिसी घेण्यासाठी आधी एक बेस पॅालिसी असणे जास्त सोयीचे असू शकते. फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी किंवा फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसी यापैकी कोणतीही एक बेस पॅालिसी असणारी व्यक्ती टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी घेऊ शकते. बेस पॅालिसीच्या सम ॲशुअर्डला थ्रेश होल्ड लेव्हल असे म्हणतात व टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीचे कव्हर या थ्रेश होल्ड लेव्हलनंतर कार्यान्वित होते. उदा. समजा पाटील यांच्याकडे तीन लाख रुपये कव्हर असणारी फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी आहे व त्यांनी पाच लाख रुपये कव्हर असणारी टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी पण घेतली आहे. दुर्दैवाने पाटील यांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करावी लागली आणि याचा एकूण खर्च पाच लाख रुपये इतका आला, तर तीन लाखाचा क्लेम त्यांच्या बेस पॅालिसीतून सेटल केला जाईल व उर्वरित दोन लाख टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीतून सेटल केले जातील. मात्र खर्च २.५ लाख रुपये (बेस पॅालिसीच्या मर्यादेच्या आत) झाला, तर क्लेम केवळ बेस पॅालिसीतून सेटल केला जाईल व टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीतून काहीही मिळणार नाही. 

थोडक्यात पाटील कुटुंबातील कोणाचे हॉस्पिटलायझेशन झाले, तर त्या व्यक्तीचा फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी कव्हरपर्यंतचा क्लेम बेस पॅालिसीतून सेटल होईल आणि झालेला खर्च त्यापेक्षा जास्त असेल, तर उर्वरित क्लेम हा टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीच्या कव्हरच्या मर्यादेपर्यंत सेटल केला जाईल. टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी फ्लोटर पद्धतीची असते. यातून मिळणारे कव्हर पॅालिसीत समाविष्ट असणाऱ्या सर्वांसाठी एकत्रित असते. थोडक्यात हे कव्हर कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वतंत्र नसते. विशेषतः जर आपण फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसी घेतली असेल आणि त्या वर्षात फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसीचे कव्हर कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी वापरले गेले, तर मधेच कव्हर वाढविता येत नाही. मात्र अशा वेळी जर टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी असेल तर गरज पडल्यास यातून क्लेम मिळू शकतो. जास्त कव्हरची बेस पॅालिसी घेणे खर्चीक असते. त्यामानाने टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीचा प्रीमियम खूप कमी असतो. 

एक परिवार-एक पॅालिसी या कौटुंबिक तत्त्वाचा आधार घेऊन एकाच पॅालिसीतून कुटुंबातील सर्व सदस्यांना टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीतून आरोग्य विमा पॅालिसीचे फायदे मिळू शकतात. कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अवलंबित मुले यांचा या दोन्हीही पॅालिसीत समावेश करता येतो. ही पॅालिसी १८ ते ८० वर्षापर्यंतच्या व्यक्तीला घेता येते. तसेच आई-वडील पॅालिसी घेत असतील तर तीन महिन्यांच्या मुलापासून ते १८ वर्षे वयापर्यंतच्या अवलंबित मुलांचा समावेश करता येतो. अविवाहित व नोकरी न करणारी मुलगी, तसेच दिव्यांग मुलांच्या बाबतीत वयाची अट नाही. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या, परंतु उच्च शिक्षण चालू असणाऱ्या मुलाचा वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत समावेश करता येतो.

टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीचे कव्हर व थ्रेश होल्ड लेव्हल यांचे खालील प्रमाणे पर्याय उपलब्ध असतात. 

पर्याय    थ्रेश होल्ड लेव्हल (रु.)    टॉप-अप  पॅालिसीचे कव्हर (रु.)
१    २,००,०००    ३,००,०००
२    २,००,०००    ५,००,०००
३    ३,००,०००     ३,००,०००
४    ३,००,०००    ५,००,०००
५     ३,००,०००     ७,००,०००
६    ५,००,०००    ५,००,०००
७    ५,००,०००     १०,००,०००
८     ५,००,०००     १५,००,०००

आपल्याकडे फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी किंवा फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसी यापैकी कोणतीही एक बेस पॅालिसी नसेल, तरीसुद्धा आपण टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसी घेऊ शकता. मात्र त्यासाठी एक थ्रेश होल्ड लेव्हल ठरवावी लागते. जितकी थ्रेश होल्ड लेव्हल जास्त, तितका प्रीमियम कमी असतो. टॉप-अप मेडिक्लेम पॅालिसीत समाविष्ट असणाऱ्या व समाविष्ट नसणाऱ्या बाबी तसेच क्लेमबाबतचे नियम फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी किंवा फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसीसारखेच असतात.

ज्या इन्शुरन्स कंपनीची बेस पॉलिसी असेल त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी घेणे सोयीचे ठरू शकते. मात्र त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी घेणे बंधनकारक नाही. आपण अन्य कंपनीची टॉप-अप पॉलिसी घेऊ शकता. उदा. आपली बेस पॉलिसी नॅशनल इन्शुरन्स कंपनीची आहे, पण आपण युनायटेड इन्शुरन्स कंपनीची टॉप-अप पॉलिसी घेऊ शकता. तसेच दोन्हीही पॉलिसी एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असे नाही.

टॉप-अप पॉलिसी दोन प्रकारात घेता येते १) टॉप-अप व २) सुपर टॉप-अप. या दोन्हीही पॉलिसी मूलतः सारख्याच असल्या, तरी सुपर टॉप-अप पॉलिसी घेणे जास्त फायदेशीर असते. कारण सुपर टॉप-अप पॉलिसीत मल्टिपल क्लेम मिळू शकतो. असा मल्टिपल क्लेम टॉप-अप पॉलिसीत मिळत नाही. उदा. जाधव यांची पाच लाखांची बेस पॉलिसी असून १० लाखांची टॉप-अप पॉलिसी आहे. त्यांचा  हॉस्पिटलायझेशनचा खर्च सात लाख रुपये झाला, तर त्यांना बेस पॉलिसीतून पाच लाख व टॉप-अप पॉलिसीतून उर्वरित दोन लाखाचा क्लेम मिळू शकेल. मात्र त्यांचे दोनदा हॉस्पिटलायझेशन झाले व प्रत्येकी साडेचार लाख रुपये खर्च आला, तर केवळ पाच लाखाचाच क्लेम सेटल होईल. कारण थ्रेश होल्ड लिमिट पाच लाखांची असल्याने टॉप-अप ट्रिगर होणार नाही. मात्र त्यांनी सुपर टॉप-अप पॉलिसी घेतली असेल, तर नऊ लाखांपैकी पाच लाखांचा क्लेम बेस पॉलिसीतून मिळेल. तर उर्वरित चार लाखांचा क्लेम सुपर टॉप-अप पॉलिसीतून मिळेल.

थोडक्यात असे म्हणता येईल की जास्त कव्हरची मेडिक्लेम पॉलिसी घेण्यापेक्षा तीन ते पाच लाखांची बेस पॉलिसी घेऊन पाच ते दहा लाखांची सुपर टॉप-अप पोलिसी घेणे निश्चितच फायदेशीर ठरू शकते. विशेषतः वयाच्या ५५ ते ६० नंतर अशी पॉलिसी घेणे गरजेचेच आहे. यामुळे संभाव्य हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची तरतूद होऊ शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या