निवृत्तीनंतरचे नियोजन

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 5 एप्रिल 2021

अर्थविशेष

नोकरी करणाऱ्या प्रत्येकास सर्वसाधारणपणे वयाच्या ६० वर्षांच्या जवळपास निवृत्त व्हावे लागते, तर व्यावसायिक जोपर्यंत शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत काम करू शकतो. असे असले तरी जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी अथवा व्यवसायातून निवृत्त होते तेथून पुढे नियमित मिळणारे उत्पन्न थांबणार असते, मात्र खर्च थांबणार नसतो आणि म्हणून आपण जेव्हा काम करत असतो तेव्हाच आपल्या निवृत्तीच्या दृष्टीने आवश्यक ते आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. मात्र असे नियोजन केले जात असल्याचे अभावानेच दिसून येते. 

पूर्वी सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीस निवृत्तिवेतन मिळत असे व मिळणारे         निवृत्तिवेतन निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा भागविण्यास पुरेसे होत असे. मात्र आता २००४ नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्या व्यक्तीस निवृत्तिवेतन मिळणार नाही. म्हणजे आता नोकरी सरकारी असो वा खासगी, नोकरी करणाऱ्या व्यक्तीस, तसेच व्यावसायिकास निवृत्तीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. 

निवृत्तीचे नियोजन प्रामुख्याने दोन भागात करावे लागते. यातील पहिला भाग म्हणजे प्री-रीटायरमेंट प्लॅनिंग व दुसरा भाग म्हणजे पोस्ट रीटायरमेंट प्लॅनिंग. या लेखात आपण प्री-रीटायरमेंट प्लॅनिंगबाबत माहिती घेऊ व ते कसे करावे हे पाहू.

प्री-रीटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे आपण नोकरी/व्यवसाय करत असतानाच आपल्याला निवृत्त होण्यास किती कालावधी आहे, निवृत्त झाल्यावर आपल्या काय गरजा असतील आणि त्या गरजा भागविण्यासाठी आपल्याला त्यावेळी किती पैसे लागतील याचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने आवश्यक तेवढी आर्थिक तरतूद करणे. आजपासून ते निवृत्त होईपर्यंतच्या कालावधीत ही तरतूद करणे अपेक्षित आहे. इतक्या पुढचा विचार आजच कशाला करायचा, असा विचार केल्याने प्रत्यक्ष निवृत्त होताना आपल्याकडे पुरेशी तरतूद झाली नाही, तर गंभीर आर्थिक समस्या उद्‍भवू शकते. आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसतो. परिणामी निवृत्तीनंतरचे आयुष्य खडतर होऊ शकते. हे टाळायचे असेल तर त्या दृष्टीने अर्थार्जनास सुरुवात केल्यानंतर लगेचच आर्थिक नियोजन केल्यास गुंतवणुकीला दीर्घ कालावधी मिळतो व त्यामुळे कमी गुंतवणूक करून अपेक्षित रीटायरमेंट कॉर्पस सहजगत्या जमा करता येतो.

उदाहरणार्थ, पाटील यांचे वय ३० असून ते वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्त होणार आहेत व सध्या एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांचे सध्याचे मासिक उत्पन्न ७५ हजार रुपये आहे. त्यांच्या निवृत्तीसाठी आवश्यक तरतूद करण्यासाठी सुमारे ३० वर्षांचा कालावधी आहे. या कालावधीत आपले अन्य गरजांचे खर्च (दरमहाचा घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घर/गाडी इ.) करीत असतानाच आपल्या निवृत्तीचा विचार करावा लागेल. आवश्यक तेवढा निवृत्ती फंड तयार करण्यासाठी लवकरात लवकर योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे त्यांच्या दृष्टीने योग्य राहील. पाटील आयटी कंपनीत नोकरीला असल्याने वेळोवेळी त्यांच्या मासिक वेतनात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन सुरुवातीस त्यांनी दरमहा दोन हजार एनपीएसमध्ये (नॅशनल पेन्शन स्कीम) गुंतविण्यास सुरुवात केली व दरवर्षी त्यात १० टक्के इतकी वाढ केली (दुसऱ्या वर्षी २२०० दरमहा, तर त्या तिसऱ्या वर्षी दरमहा  २४२० रुपये, चौथ्या वर्षी दरमहा २६६२ रुपये, यानुसार ३०व्या म्हणजे शेवटच्या वर्षी ही रक्कम जवळ जवळ दरमहा ३५ हजार रुपये असेल.), तर ६०व्या वर्षाअखेर सुमारे पाच कोटी इतकी रक्कम निवृत्ती फंडात जमा होऊ शकेल. (एनपीएस गुंतवणुकीवर गेली १५ वर्षे सुमारे १० टक्के रिटर्न मिळाला आहे व तो तसाच यापुढेही मिळेल हे गृहीत धरून) यावर टक्के परतावा गृहीत धरल्यास दरमहा अंदाजे तीन लाख ५० हजार एवढी रक्कम (३० वर्षांनंतर मिळणाऱ्या या रकमेचे आजचे मूल्य ८५ हजार इतके असेल) पुढील २० वर्षे (वयाच्या ८० पर्यंत) मिळेल. अशा प्रकारे दरवर्षी १० टक्के गुंतवणुकीत वाढ करणे पाटील यांना सहज शक्य आहे. पाटील यांना निवृत्त होताना पीएफ, ग्रॅच्युइटी व एलएफसी यातून ही रक्कम मिळणार आहे व रक्कमसुद्धा बऱ्यापैकी असेल. यामुळे निवृत्त झाल्यावर त्यांना आर्थिक विवंचना असणार नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

 आता सुमंत यांचे उदाहरण पाहू. सुमंत हे व्यावसायिक आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाखाच्या दरम्यान आहे. त्यांचेही वय ३० असून ते पुढील ३० ते ३५ वर्षे व्यवसाय करणार आहेत. सुमंत यांना पाटील यांच्यासारखी पीएफ, ग्रॅच्युइटी व एलएफसी यातून रक्कम मिळणार नाही. तसेच दरवर्षी उत्पन्न कमी अधिक होत राहणार असल्याने त्यांनी दरमहा कमीतकमी एक ठरावीक रक्कम एनपीएसमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. ज्या वर्षी उत्पन्न जास्त असेल त्यावर्षी वाढीव गुंतवणूक करणे आवश्यक आहे. समजा त्यांनी एनपीएसमध्ये पुढील ३५ वर्षे दरमहा १० हजार रुपये गुंतविले व शक्य असेल तेव्हा वाढीव रक्कम वर्षभरात ५० हजारांपर्यंत गुंतवली, तर सुमारे ५ ते ५.५ कोटी एवढा निवृत्ती फंड जमा होऊ शकेल. यातून त्यांच्या वयाच्या ८० वर्षांपर्यंत कुटुंबास आजच्या एक लाख रुपये मूल्याची रक्कम सुरुवातीस मिळेल. महागाईनुसार या रकमेचे मूल्य कमी होत जाईल, मात्र यातून त्यांचे निवृत्तीनंतरचे खर्च निश्चितच भागू शकतील आणि जर व्यवसाय हळूहळू बंद केला तरी आर्थिक समस्या जाणवणार नाही.

आज आपण गुंतवणुकीसाठी एनपीएस हा एकाच पर्याय विचारात घेतला आहे. याशिवायही अन्य पर्याय उपलब्ध आहेत. पुढील लेखात निवृत्ती फंड किती असावा व तो कसा काढायचा हे आपण पाहू. त्यासाठी एनपीएस व्यतिरिक्त अन्य कोणते पर्याय आहेत व कोणता पर्याय फायदेशीर असेल हे आपण पाहू.

थोडक्यात असे म्हणता येईल, की निवृत्तीचे नियोजन हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व वेळीच समजून घेऊन त्याची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करणे आपल्याच हिताचे असते. यासाठी प्रसंगी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

संबंधित बातम्या